Phishing Scams- ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इथून संपर्क..तिथून पैसे गायब}

..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

अमित रेठरेकर

नेटफ्लिक्स या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘जमतारा’ प्रदर्शित झाला आणि खऱ्या अर्थाने या स्थळाला भारतातील ‘फिशिंग राजधानी’ का म्हणतात, हे लोकांसमोर आले. या आणि अशाच काही ठिकाणांबद्दल माहिती असणे आणि जागरूक राहणे आवश्यक आहे....

नववर्षात ‘जमतारा’ (Jamtara) हे नाव पुन्हा वाचनात आले. डेहराडून (Dehradun) पोलिसांनी औरंगाबाद शहरात बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला आणि महाराष्ट्रात ‘जमतारा मॉडेल’ कसे कार्यरत होते, हे उघडकीस आणले. नेटफ्लिक्स (Netflix) या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘जमतारा’ प्रदर्शित झाला आणि खऱ्या अर्थाने या स्थळाला भारतातील ‘फिशिंग राजधानी’ का म्हणतात, हे लोकांसमोर आले. या आणि अशाच काही ठिकाणांबद्दल माहिती असणे आणि जागरूक राहणे आवश्यक आहे. (The Fishing scam in India Jamrata and other infamous Places)

आपण जसे राहत्या वास्तूबद्दल विचारपूस करूनच घरखरेदी किंवा बांधण्याचा निर्णय घेतो, त्याचप्रमाणे काही विशिष्ट स्थळाचे तेथील उत्पादनापासून अनन्यसाधारण असे महत्त्व असते. उदाहरणार्थ, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, ‘होम मिनिस्टर’मुळे घराघरात पोचलेली पैठणची साडी, पुणेरी पगडी, सोलापूरची चादर, नाशिकची वाईन आदी. आपला भारत देश जागतिक व्यापार संघटनेचा भाग असल्यामुळे भौगोलिक मानांकन (नोंदणी आणि संरक्षण) कायदा, १९९९ अंतर्गत या भौगोलिक स्थानांना मालमत्ता हक्क देण्यात आलेला आहे. याला ‘आयपीआर’च्या भाषेत जिओग्राफिकल इंडिकेशन्स (Geographical Indications) असे संबोधतात.

नजीकच्या काळात ‘केजीएफ’ (KGF) नावाचा मुळात कानडी; परंतु नंतर प्रत्येक भाषेत प्रदर्शित चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटात कथानक सांगणारा सूत्रधार म्हणतो, ‘‘Powerful people come from powerful places.’’ या धर्तीवर सध्याच्या युगात घोटाळे आणि गैरव्यवहार धोकादायक ठिकाणांहून घडतात. (DANGEROUS FRAUDS & SCAMS also happen from RISKY places) असे म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुष्कृत्यांमुळे प्रसिद्ध झालेली ठिकाणे
आपण लहानपणीच आपल्या थोरा-मोठ्यांपासून काही गोष्टी आत्मसात करतो. ठराविक दिशा आणि त्यावरून त्याची दशा असे गणित पक्के करतो. जसे, उत्तरेतून भारतावर कायम आक्रमण झाले, बाबा सांगतील ती पूर्व दिशा, उच्चशिक्षित लोकसंख्या असणारा प्रदेश दक्षिण आणि ‘पैसे/अर्थकारण’ याची दिशा पश्चिम. जगाची आर्थिक दशा ठरवतानादेखील कायम असा समज असायचा, की ‘वेस्टर्न’ म्हणजे प्रगती आणि ‘इस्टर्न’ म्हणजे प्रगतशील.

काही व्यक्ती किंवा संस्थादेखील आपल्या दुष्कृत्यामुळे आपली भौगोलिक ओळख कळत-नकळत निर्माण करत जातात. जागतिक पातळीवरदेखील लॉटरी लागली, अशा स्वरूपाच्या फसव्या स्पॅम ई-मेलना ‘नायजेरीअन स्कॅम’ म्हणतात. याचा अर्थ एखाद्या गुन्हेगारामुळे नुसते स्थळच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या नावाला स्कॅम असे जोडले गेले. त्यामुळे काही विशिष्ट ठिकाणच्या व्यक्ती किंवा संस्था यांच्याशी आर्थिक व्यवहार करताना अतिरिक्त जोखीम असते. अशा काही विशिष्ट स्थळातील व्यवहार पूर्णपणे फ्रॉड आहेत असे नाही; परंतु आपल्या आर्थिक तब्येतीच्या काळजीखातर आपण योग्य ती खबरदारी घ्यायला हवी.

बँकिंग प्रणालीमध्ये यांना HIGH RISK GEOGRAPHY असे संबोधतात. गेल्या काही वर्षांतील झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांमधून विशिष्ट स्थळे नावारूपास आलेली आहेत. त्यापैकी निवडक तीन Geographic Risk Indicators पुढीलप्रमाणे आहेत-

हे देखिल वाचा-

१) कोलकाता (पूर्वीचे नाव कलकत्ता)
आपल्या भौगोलिक व्यूहरचनेनुसार उद्योग-व्यापार आणि भारतातून आयात-निर्यात करायचे महत्त्वाचे स्थळ. काही असामाजिक तत्वांकडून याचा गैरवापर केला गेला. आपली संस्था विशेषतः कंपनी वारसाने मोठी आणि भरपूर वर्षांपासून इतिहास असल्याचे भासवायला सोपे व्हावे म्हणून कित्येक खोका कंपन्यांचे (इंग्रजीत यालाच शेल कंपनी म्हणतात) केवळ व्यावसायिक ठिकाण म्हणून दुरुपयोग केला जाऊ लागला. यातच अनेक आर्थिक गैरव्यवहार झाले आणि सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली गेली. याची दखल घेत कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने अशा सर्व व्यावसायिक स्थळाची शहानिशा करून केवळ कागदोपत्री असणाऱ्या अशा सर्व कंपन्यांची मान्यता रद्द केली. याशिवाय कोलकातास्थित बड्या समूहांनी गुंतवणुकीद्वारे फसवणूक केल्याची कित्येक प्रकरणे नजीकच्या काळात उघडकीस आलेली आहेत. (अगदी सहारापासून ते सारदापर्यंत). त्यामुळे कोलकातास्थित संस्थांशी आर्थिक व्यवहार करताना आवश्यक ती काळजी प्रत्येकाने घ्यावी. याशिवाय कोलकातास्थित मंडळींनी अशा खोका कंपन्यांचा बाजार मांडला आहे.

२) जमतारा
झारखंड राज्यातील एक दुर्लक्षित स्थळ. मुलभूत सुविधांचा अभाव आणि एकदम आलेल्या डिजिटल क्रांतीमुळे कमी वेळात जास्त पैसे येथील कमावण्यासाठी तरुणवर्ग सज्ज झाला. या गावाची एवढी धास्ती आहे, की जमतारामधून फोन आला, की आपले बँक खाते मोकळे होईल की काय याची लोकांना भीती वाटते. फिशिंग प्रकारचा अवलंब करून सक्रीय तरुण पिढीने अख्ख्या गावातील इतरांना त्यांच्या दुष्कृत्यामध्ये सहभाग घेण्यास उद्युक्त केले.

बँकेच्या ‘केवायसी’ कारणासाठी फोन करून निष्पाप लोकांना आपला ‘ओटीपी’ देण्यासाठी भाग पाडायचे, अशी त्यांची कार्यपद्धती. या तरुणांनी कित्येक निरपराध लोकांना फसविले आणि त्यांच्या पैशांचा चुराडा केला. अखेर भारतीय सायबर यंत्रणाच्या रडारवर हे स्थळ आले. नियोजनबद्ध रीतीने या टोळीचा नायनाट करण्यात आला; परंतु त्या टोळीतील प्रशिक्षित माणसे इतरत्र कार्यरत असण्याची शक्यता नाकारली जात नाही. जमतारा या नावाची आणि परिणामी या गावाची दहशत अजूनही कायमच आहे.

३) भरतपूर-मेवात-मथुरा (घातक त्रिकोण)
राजस्थानमधील भरतपूर, हरियाना राज्यातील मेवात आणि उत्तर प्रदेशस्थित मथुरा यांचे काय कनेक्शन असू शकते? या त्रिमिती स्थळांना नवे ‘जमतारा’ असे सध्या संबोधले जाते. भौगोलिकरित्या जवळ असणाऱ्या; परंतु वेगवेगळ्या राज्यात स्थित या तिन्ही गावांनी पोलिस खात्याला अक्षरशः सळो की पळो करून सोडले आहे. अंतर कमी असल्याने एका राज्यातून फसवणुकीचा फोन करायचा, दुसऱ्या राज्यातील बँक खात्याचा वापर करायचा आणि पैसे तिसऱ्या राज्यातून काढून चौथ्या ठिकाणी पलायन करायचे, अशी योजना असते. विशेष म्हणजे ही टोळी क्यूआर कोडद्वारे ॲप वापरणाऱ्या व्यक्तींनाच लक्ष्य करते. मुख्यतः डिजिटल बाजारपेठ (उदा. OLX) जिथे वापरलेल्या वस्तूंची खरेदी-विक्री होते, अशा ॲपचा वापर करणाऱ्या लोकांना बळीचा बकरा बनवले जाते. एकदा का त्यांना तुमच्या फोनचा ताबा मिळाला, की फसवणूक झालीच असे समजा. तिन्ही राज्यांतील त्रिकोनामध्ये वेगवेगळ्या मोबाईल टॉवरचा उपयोग करून तपास यंत्रणांनादेखील सुगोवा लागणे कठीण करते ही टोळी. त्यामुळे अशा डिजिटल वेबसाईट वापरताना प्रचंड काळजी घ्या.

धोकादायक संकेतस्थळे
ही झाली भौगोलिक स्थळांची गोष्ट. सध्या डिजिटलपासून मेटा युगाकडे प्रवास सुरू असणाऱ्या युगात ‘संकेतस्थळ’ देखील तेवढेच घातक ठरू शकते. सध्या गुन्हेगारांचा हेतू तुमच्या पैसे चोरण्याचा नसून, तुमची डिजिटल ओळख ‘आयडेंटीटी’चा गैरवापर करण्याकडे वळत चालला आहे. डार्कनेटसारख्या इंटरनेटच्या काही असे विभाग आहेत, जिथे माहिती विकत घेणाऱ्यांची ओळख गुप्त राहिली जाते. मानवी तस्करी करणाऱ्या हीन गुन्हेगारांच्या तावडीत आपली खासगी माहिती पोहोचू शकते. हे सर्व भयावह आहे. तंत्रज्ञान चांगलेच आहे, मात्र त्याचा गैरवापर वाढत चालला आहे.

याच धर्तीवर जागतिक अँटी-व्हायरस कंपन्यांनी अशा काही संकेतस्थळांची माहिती दिलेली आहे. तज्ज्ञांच्या मते, या संकेतस्थळांना तुम्ही भेट दिली किंवा संपर्कात आला, तर तुमचे संगणक किंवा मोबाईल फोन आधीसारखा राहणार नाही. इंटरनेटमधील ही अशी घातक ठिकाणे आहेत, की यांच्या संपर्कामुळे तुमच्या संगणक किंवा मोबाईल फोनमधील माहिती कुठे न कुठे आणि अधिक प्रमाणात तडजोड होते. सुरक्षेच्या कारणास्तव या संकेतस्थळांची माहिती किंवा लिंक देणे योग्य नाही.

हे देखिल वाचा-

संकेतस्थळाची सुरक्षितता जाणण्यासाठी पुढील गोष्टींचा उपयोग करावा-
१) संकेतस्थळाची सुरवात (SSL Certificate)- अवश्य तपासून पाहा. तुम्ही ज्या वेबसाईटला जाणार आहात, त्याची सुरवात  HTTP आहे का HTTPS अशी आहे? या  HTTP आणि HTTPS मधील फरक म्हणजे S-सुरक्षा.
२) वेबसाईटचे स्पेलिंग- प्रतिष्ठीत अशा वेबसाईटसारखेच; परंतु चुकीच्या स्पेलिंगने आपला तोतया निर्माण करायचा. हा चोरट्यांच्या क्लृप्त्यांचा एक भाग असतो. तुम्ही अकस्मात अशा वेबसाईटला भेट दिली, की तुम्ही फसला. त्यामुळे तुम्हाला ज्या वेबसाईटला जायचे आहे, त्याचे स्पेलिंग आधी तपासून घ्या. आपण बरोबर वेबसाईटला आलो आहोत ना, याची खात्री करून घ्या.
३) वेबसाईट safety checker tool चा वापर- सध्या ऑनलाइन विविध साधने उपलब्ध आहेत. तुम्ही गूगल वापरत असाल, तर त्यांचेच एखादे वेबसाईट सुरक्षित आहे का, याची खात्री करून देणारे ॲप किंवा साधन Google Safe Browsing site status वर अवश्य तपासून पाहा. यामुळे तुमच्या शंका दूर होतील.
४) चांगला ब्राउझर (browser) वापरा- Safari, Chrome, Firefox आदी ब्राउझर मोठ्या संख्येने वापरण्याचे मुख्य कारण म्हणजे यामधील काही अंगभूत सुरक्षा रचना. जसे, की plugins किंवा extensions. या गोष्टींमुळे वेबसाईटचा वापर अधिक सुरक्षित होतो. तुम्हाला गूगलकडूनच privacy हवी असल्यास अवश्य DuckDuckGo या सर्च इंजिनचा वापर करा. तुमची खासगी माहिती, जसे की तुम्ही कोणत्या वेबसाईटवर गेला, किती काळ होता आदी माहितीचा वापर विकून कमाई केली जाऊ शकणार नाही.
५) ई-मेल/एसएमएस/व्हॉट्सॲपवर येणाऱ्या लिंक क्लिक करू नका- अशा लिंकद्वारे तुमच्या नकळत तुमच्या मोबाइलच्या बॅकग्राउंडमध्ये छुपे काम चालू होते, ज्याची चाहूल देखील तुम्हाला लागत नाही. भविष्यात या माहितीचा दुरुपयोग करून खंडणीखोरीसारख्या (ransomware) सारख्या गोष्टीत तुम्हाला वेठीस धरले जाऊ शकते.

आम्हाला बँकेत नेहमी शिकवले जाते. ज्या गावी जायचे नाही, तिथला पत्ता विचारायचा नाही. त्यामुळे अशा धोकादायक स्वरूपातील भौगोलिक स्थळ आणि संकेतस्थळांपासून मी लांब असतो. कोरोना महासाथीच्या काळात जे शिकलो, त्याचा वापर डिजिटल हायजीनमध्ये नक्की करतो. धोकादायक वेबसाईट, अनोळखी लिंक आणि अनोळख्या ठिकाणच्या व्यक्तीपासून ‘लांब’ असलेले बरे.

ते माझी आर्थिक तब्येत सांभाळताना धोक्यांपासून दूर ठेवते.
राहिला तुमच्या मनातला महत्त्वपूर्ण प्रश्‍न, की गूगलला सगळेच माहिती असते की, मग?
यावर आता ChatGPT नावाचे अनन्यसाधारण असे उत्तर येऊ लागलेले आहे. आपण ऑनलाइन काय करतो, याची जाण असणे आणि त्याचे भान राखणे, हेच त्याचे उत्तर असेल.
अनिष्ट स्थळांपासून आपला सांभाळ करा. कलियुगात आणि मोबाइलयुगात सुद्धा...!

(लेखक क्वॉलिफाइड कंपनी सेक्रेटरी आहेत आणि कराड अर्बन बँकेत ‘केवायसी-एएमएल’चे विभागप्रमुख आहेत.)

टॅग्स :BankingscamMoney Heist