Investment Funda- आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अती तेथे माती}

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

अभिजीत कोळपकर

निर्णय घेताना गरजेपेक्षा जास्त आणि अनावश्यक माहिती अभ्यासली तर निर्णय चुकतात या प्रकारच्या पूर्वग्रहास ‘माहितीचा पूर्वग्रह’ म्हणून ओळखले जाते. आर्थिक बाबतीत निर्णय घेताना तर याचे नक्कीच भान हवे...

आपण निर्णय घेताना माहिती गोळा करतो, साधकबाधक मुद्दे मांडतो, विचार करतो आणि निर्णयास येतो. कधीकधी खूप जास्त माहिती गोळा करून त्यातून भावतील असे पॅटर्न शोधायचा आपला प्रयत्न असतो. आर्थिक निर्णय घेताना गरजेपेक्षा जास्त माहिती गोळा केल्यामुळे निर्माण होणारा ‘माहितीचा पूर्वग्रह’ (Information bias) मोठी भूमिका बजावत असतो. पूर्वग्रहांमुळे आपले निर्णय चुकतात. पूर्वग्रह अनेक प्रकारचे असतात. (Too Much information gathering will hamper your investments)

There seems to be some perverse human characteristic that likes to make easy things difficult. -Warren Buffett

The danger of reading financial & other news is that things that don't make sense start making sense to you after progressive immersion
- Naasim Nicolas Tayeb


आजकाल डॉक्टरांकडे एक पाटी लावलेली असते - ‘‘आपली पादत्राणे आणि गुगलद्वारे मिळालेले ज्ञान दवाखान्याच्या बाहेरच सोडून या!’’ याचे कारण म्हणजे अवघड वैद्यकीय शिक्षण घेऊन, स्पेशलायझेशन करून, हजारो पेशंटवर यशस्वी उपचार केलेल्या निष्णात डॉक्टरांना पेशंट असे काही प्रश्न विचारतात, की डॉक्टर हैराण होतात. आपल्या आजाराबाबत व्हॉट्सॲपवर आलेली माहिती गुगलवर क्रॉसचेक करून अनेक पेशंट स्वत:ला डॉक्टरांपेक्षा ज्ञानी समजत असतात. आजारातून बरे होणे हे आपले ध्येय असते. रोगनिदान, डॉक्टर करत असलेले उपचार यांची पडताळणी आपण गोळा केलेल्या माहितीशी अनावश्यक ठरते. अशाप्रकारे ‘माहितीचा पूर्वग्रह’ (Information bias) काम करत असतो.

पूर्वग्रहांमुळे आपले निर्णय चुकतात. पूर्वग्रह अनेक प्रकारचे असतात. निर्णय घेताना गरजेपेक्षा जास्त आणि अनावश्यक माहिती अभ्यासली तर निर्णय चुकतात या प्रकारच्या पूर्वग्रहास ‘माहितीचा पूर्वग्रह’ म्हणून ओळखले जाते.

घरखरेदी आणि माहितीचा पूर्वग्रह
अजय नव्या घराच्या शोधात गेल्या पाच वर्षांपासून आहे. त्याचे स्व-मालकीच्या मनाजोगत्या घराचे स्वप्न काही केल्या वास्तवात उतरत नव्हते. अजय हा चिकित्सक स्वभावाचा व्यक्ती आहे. त्याला आवडत्या परिसरात फ्लॅट मिळत नव्हता, मिळाला तर बजेटमध्ये बसत नव्हता. दुसऱ्या पसंतीच्या परिसरात एखादा फ्लॅट बरा वाटला, तर तो कुटुंबियांना आवडत नसायचा. कधी बिल्डर विश्वासार्ह नसायचा, तर कधी ऑफिसपासून त्या फ्लॅटचे अंतर खूप लांब वाटायचे. यदाकदाचित सर्व गोष्टी जुळून आल्याच, तर वास्तुशास्त्रानुसार बांधकाम नसल्याचे निमित्त होऊन अजयच्या घराचा योग काही जुळून येत नव्हता.

समीर या अजयच्या मित्राने मात्र घरखरेदीसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांची एक चेकलिस्ट तयार केली होती. कायदेशीर बाबी, बजेट, बिल्डरचा नावलौकिक अशा काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींबाबत तडजोड न करता, इतर बाबींमध्ये मिळतेजुळते घेऊन त्याने चार वर्षांपूर्वीच स्वतःचे घर खरेदी केले होते. गृहकर्जात बँकेने ठरवलेल्या हप्त्यांपेक्षा थोडी जास्त रक्कम टाकत त्याने गृहकर्जसुद्धा कमी करून टाकले होते.

अजय आणि समीरने घरखरेदीचा निर्णय कसा घेतला, हे आपण बघितले. प्रत्येक निर्णय घेताना खूप माहिती गोळा करत गोंधळून जाऊन कुठलाच निर्णय घ्यायचा नाही. काहीतरी खुसपटे काढत राहण्याची प्रवृत्ती अशाप्रकारे आर्थिक नुकसानीस आमंत्रण देते. माहितीचा पूर्वग्रह तुम्हाला गोंधळून टाकतो व योग्य निर्णय घेऊ देत नाही.
आपण अजून एक उदाहरण बघूया.

हे देखिल वाचा-

बँक खाते आणि माहितीचा पूर्वग्रह
गोपाळराव निवृत्तीपश्चात सुखी जीवन जगत होते. दर तिमाहीला थोड्या रकमेची मुदत ठेव नातींसाठी म्हणून ते सरकारी बँकेत करत असत. ही साठलेली गंगाजळी तीन लाखांपर्यंत पोचली होती. आवड आणि वेळ मुबलक असल्याने त्यांचे वाचन भरपूर होते. सरकारी बँकांतील वाढत्या बुडीत कर्जांचे प्रमाण, घोटाळे, अपहार यांच्या बातम्या वाचून गोपाळराव घाबरले होते. पुढच्या भेटीत बँकेच्या मॅनेजरशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. त्यांना सांगण्यात आले, की सरकारी बँकांमधील पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना केंद्र सरकारची हमी आहे. तुमचे पैसे बुडणार नाहीत. तरीही चिंताक्रांत होत त्यांनी संबंधित सरकारी बँकेचे आर्थिक निकाल, वार्षिक अहवाल अभ्यासायला सुरुवात केली. पण त्यांच्या या अभ्यासाचा आणि ठेव सुरक्षित राहण्याचा काहीही उपयोग नव्हता. ‘माहितीचा पूर्वग्रह’ अशाप्रकारे गोपाळरावांना त्रास देत होता.

‘माहितीचा पूर्वग्रह’ कसा काम करतो?
आर्थिक निर्णय घेताना अभ्यासपूर्ण पद्धतीने, विचारपूर्वक, सर्वांगीण विचार करणे अपेक्षित असते. काहीजण कशाचाच मागचा-पुढचा विचार न करता फटाफट निर्णय घेऊन मोकळे होतात, तर काही लोक अतिविचार करून निर्णय घेण्याचे टाळतात. ‘किंकर्तव्यविमूढ़’ होऊन सदैव गोंधळात असणारे तर अनेक जण असतात. त्यांना अजून जास्त गोंधळात सगळीकडून येणारी माहिती टाकत असते.

अती तेथे माती, अती परिचयात अवज्ञा या उक्ती माहिती असल्या तरी माहिती अभ्यासताना कुठे थांबायचे, हे अनेकांना कळत नाही. माहितीच्या जंजाळात ते हरवून जातात. निरर्थक, अनावश्यक आणि अजिबात संबंध नसलेली माहिती अभ्यासताना ते थकून जातात आणि नेमक्या महत्त्वाच्या माहितीकडे दुर्लक्ष होते. कधीकधी तर गोळा केलेली सर्व माहिती एकसारखीच वाटायला सुरुवात होते. यामुळे पर्याय कुठलाही निवडला तरी फारसा फरक पडत नाही, असा विचार करुनही आर्थिक निर्णय माहितीच्या पूर्वग्रहामुळे चुकतात.

शेअर बाजार आणि माहितीचा महापूर!
शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी कंपनीचा अभ्यास करताना गुंतवणूकदाराने विविध प्रकारची माहिती अभ्यासणे, विचारपूर्वक निर्णय घेणे अपेक्षित असते. आजच्या इंटरनेट युगात पूर्वीपेक्षा खूप जास्त माहिती अनेक स्रोतांकडून सतत गुंतवणूकदाराकडे येत असते. यामध्ये प्रामुख्याने पुढील स्रोतांचा समावेश असतो-
- विविध वेबसाईट्सवर सतत अपडेट होत असणारे शेअरचे बाजारभाव
- कंपनीसंबंधित बातम्या- न्यूजपेपर, टीव्ही चॅनेलवर येणारी माहिती
- सोशल मीडियावर प्रसारित होणारी माहिती- युट्युब व्हिडीओ, टेलिग्राम चॅनेल आणि व्हॉट्सॲप ग्रुप, ट्विटर हँडल आदी.
- कंपनीने प्रेस रिलीज म्हणून स्वतः प्रकाशित केलेली माहिती, ‘सेबी’कडे, स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेली माहिती
- आर्थिक निकाल- तिमाही निकाल, वार्षिक सभेवेळी अध्यक्षांचे भाषण, वार्षिक अहवालामधील माहिती, इन्व्हेस्टर्स प्रेझेंटेशन आदी.
- ब्रोकिंग हाउसेसने प्रकाशित केलेले रिसर्च रिपोर्ट, ‘क्रिसिल’सारख्या पतमानांकन संस्थांनी प्रकाशित केलेले रिपोर्ट.

वरील अनेक स्त्रोतांकडून शेअरचे गेल्या ५२ आठवड्यांतील उच्चांकी आणि नीचांकी बाजारभाव, म्युच्युअल फंड कंपन्यांनी खरेदी केलेले व विक्री केलेले शेअर, या महिन्यातील टॉप १० स्टॉक, पुढील वर्षासाठी तज्ज्ञांनी सुचविलेले महत्त्वाचे ५ स्टॉक अशी खूप जास्त माहिती तुमच्याकडे येत असते. खूप जास्त माहिती गोळा केल्याने तथ्यहीन माहितीसुद्धा फार महत्त्वाची वाटायला लागते. शेअरमधील गुंतवणुकीतून संपत्तीनिर्माण करण्यासाठी चांगल्या कंपन्यांचे शेअर दीर्घकाळ सांभाळा, असे या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. सर्वसामान्य गुंतवणूकदाराच्या मनात एखाद्या चांगल्या कंपनीच्या शेअरचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळत आहेत आणि आता या कंपनीचे काही खरे नाही, अशी भावना टीव्ही बघून निर्माण झाली, तर तो त्याच्याकडील उत्तम कंपन्यांचे शेअरसुद्धा लगेचच विकतो आणि खराब कंपन्यांचे शेअर खरेदी करतो. माहितीच्या पूर्वग्रहामुळे अनावश्यक माहितीला जास्त महत्त्व दिल्याने त्याचे नुकसान होते.

हे देखिल वाचा-

माहितीचा महापूर आणि गुंतवणूक
शेअरच्या बाजारभावातील रोजचे चढ-उतार अभ्यासून दीर्घकाळात तो शेअर कशी प्रगती करेल, हे ठरवणे अशक्यप्राय असले तरीही यावर सखोल चर्चा करणारे अनेक टीव्ही कार्यक्रम आणि युट्युब चॅनेल आहेत. या दोन्ही माध्यमांवर तुम्हाला माहिती देणाऱ्या लोकांचे बिझनेस मॉडेल हे जाहिराती, एफिलिएट मार्केटिंग, क्लासेस, ट्रेनिंग प्रोग्रॅम अशा गोष्टींवर अवलंबून असते. तुम्ही किती मिनिटे किंवा किती तास त्यांचे कार्यक्रम बघायाला खर्च कराल, तितके जास्त त्यांचे उत्पन्न वाढत असते.

दीर्घकालीन संपत्तीनिर्माण वगैरेंपेक्षा सध्याच्या घडीला तुम्हाला काहीही करून आकर्षित करायचे, असेच त्यांचे उद्दिष्ट असते. तुम्हाला त्यांच्या चॅनेलवर दाखवली जाणारी माहिती ग्रहण करण्याची सवय लावणे, हा त्यांच्या व्यवसायाचा एक भाग आहे. शेअर बाजाराचे शिक्षण घेणे आवश्यक आहेच; परंतु सतत अनावश्यक माहिती मिळवत राहणे म्हणजे एक प्रकारचे व्यसनच आहे. तुम्ही गरजेपेक्षा माहितीला किती ‘ॲडिक्ट’ होता हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही सावधगिरीने माहिती ग्रहण करायला हवी.

गरजेपेक्षा जास्त माहिती धोकादायक
तुम्हाला आयुर्विमा खरेदी करायचा आहे म्हणून तुम्ही गुगल सर्च केल्यास भरपूर ऑफर समोर येतात. त्यांची तुलना करताना ‘विम्याबरोबरच गुंतवणूक’ अशी आकर्षक जाहिरात तुम्ही बघता. उत्तम निर्णय घेण्यासाठी अधिकाधिक वेबसाईट्स तुम्ही शोधता. त्यांच्या ग्राहकसेवा प्रतिनिधींकडून तुम्हाला विविध योजना उत्कृष्टपणे समजावल्या जातात. आपले मुख्य ध्येय पुरेसा आयुर्विमा घेणे हे आहे, हे विसरून तुम्ही गुंतवणुकीच्या मागे लागता. शेवटी अपुऱ्या रकमेचा विमा आणि गुंतवणुकीतून फारसा परतावा न देणारी पॉलिसी तुम्ही खरेदी करता.

माहितीच्या पूर्वग्रहातून सुटका कशी?
चिंतातूर जंतू होऊ नका! - ज्या गोष्टींची आपल्याला माहिती नसते, त्यांची सर्वांत जास्त भीति वाटत असते. आर्थिक निर्णय घेताना काळजी करत बसण्यापेक्षा काळजी घ्या. नियमितपणे आर्थिक विषयांचा अभ्यास करणे आर्थिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. जसा अचानक भरपूर व्यायाम केल्यास फायदा होण्यापेक्षा शरीरास अपायच होतात; तसेच कधीतरी, काहीतरी, वरचेवर वाचून विमाखरेदी, गुंतवणूक असे महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेऊ नका. खूप माहितीने पूर्वग्रहदूषित होऊन चिंता करण्यापेक्षा नेमकी सकस माहिती विचारात घ्या.

परिपूर्णतेचा अट्टाहास सोडा - Analysis Paralysis असा एक छान शब्द काही परिस्थितींसंदर्भात वापरला जातो. परिपूर्ण, बिनचूक, सर्वोत्कृष्ट निर्णय घेण्यासाठी माहिती गोळा करण्यात खूप वेळ जातो. कुठे थांबायचे आणि किती वेळ अभ्यास करायचा, हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. परिपूर्ण निर्णयाच्या नावाखाली आपण अधिक माहिती गोळा करत आळशीपणा करतो आहोत का, हे सतत तपासायला हवे.

आर्थिक नियोजन करा! - शांततेने विचार करून दीर्घकालीन, मध्यमकालीन आणि अल्पकालीन उद्दिष्टे ठरवा. इमर्जन्सी फंड बाजूला काढा. दरमहा बजेट तयार करून बचत करायची सवय स्वतःला लावून घ्या. गुंतवणुकीद्वारे बचतीचे पैसे अजून पैसे कमवण्याच्या कामाला लावा. पोर्टफोलिओचा नियमिपणे मागोवा घ्या. तुम्हाला काय करायचे आहे, हे तुम्ही एकदा व्यवस्थित ठरवले असले की अनावश्यक माहितीला तुम्ही बळी पडत नाही.

गुंतवणुकीबाबत प्राथमिक गोष्टी शिका - एखाद्या गोष्टीची मूलभूत माहिती नसेल, तर कुठल्याही खोट्या माहितीने तुम्ही फसू शकता. महागाई कशी काम करते, विविध गुंतवणूक पर्याय आणि त्यातून मिळणारा परतावा, पॉन्झी स्कीम कशा काम करतात, परतावा आणि नफ्यावर लागू होणारा प्राप्तिकर, शेअर बाजार कसा काम करतो, म्युच्युअल फंड संपत्तीनिर्मितीसाठी कसे मदत करतात, यांसारख्या विविध गोष्टींची अभ्यासपूर्ण माहिती तुम्ही नियमितपणे अभ्यासायला हवी.

रोजच्या रोज पोर्टफोलिओचा मागोवा घेऊ नका - आपल्या शेअर आणि म्युच्युअल फंडासारख्या विविध गुंतवणुकी कशाप्रकारे वाटचाल करत आहेत, हे समजून घेण्यासाठी दर तिमाहीला म्हणजे वर्षातून किमान चार वेळा तरी पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करायला हवे. परंतु, रोजच्या रोज पोर्टफोलिओत होणारे बरे-वाईट बदल बघत राहून माहितीचा पूर्वग्रह तुम्हाला त्वरित निर्णय घ्यायला भाग पडतो, या घाईगडबडीमुळे आर्थिक चुका होतात. दीर्घकाळात रोजच्या रोज पोर्टफोलिओ चिकित्सेचा काहीही उपयोग नसतो.

तज्ञांची मदत घ्या! - तुम्ही एखाद्या क्षेत्रात यश आणि नावलौकिक मिळवला असेल, उत्तम अर्थार्जन केले असेल तर त्या विशिष्ट क्षेत्रात पैसे कमवण्याचे नैपुण्य तुम्ही प्राप्त केले आहे, असे आपण म्हणू शकतो. परंतु पैसे कमावणे आणि पैसे योग्य प्रकारे गुंतवणूक करून त्यातून संपत्तीनिर्माण करणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. घाम गाळून, अनेक वर्षे कष्ट करून मिळवलेल्या पैशांवर कृपया अतिआत्मविश्वासाने जादूचे प्रयोग करू नका. आपल्याला काय समजते आणि काय नाही, हे स्वतःला माहिती असते. आर्थिक सल्लागारांचा जरूर सल्ला घ्या म्हणजे माहितीच्या जंगलात तुम्ही हरवलात तरी तुमचे आर्थिक सल्लागार व्यवस्थितपणे तुम्हाला बाहेर काढतील.

थोडक्यात काय....?

‘तू इधर-उधर की न बात कर, ये बता कि काफिला कैसे लुटा,
मुझे रहजनों से गिला तो है, पर तेरी रहबरी का सवाल है.’
- शहाब जाफरी


प्रवास करत असताना वस्तू लुटल्या गेल्या. त्यानंतर राखणदार मालकाला भेटतो आणि मुद्द्याच्या सोडून भलत्याच गोष्टी सांगतो. तेव्हा मालक त्याला सुनावतात, की तू इकडच्या-तिकडच्या गोष्टी काही बोलू नकोस. माल कसा लुटला गेला, ते सांग. सह-प्रवाशांबद्दल मला थोडीफार तक्रार तर आहे, पण लुटीच्या वेळेस तू काय करत होतास, हा नेमका प्रश्न तुझ्या राखणदारीबाबत आहे.
अशाचप्रकारे आर्थिक निर्णय घेताना केवळ महत्त्वाच्या माहितीवर लक्ष केंद्रित करा. आपण जरा जास्तच चिकित्सा करतो आहे, असे लक्षात आले, की ‘तू इधर-उधर की न बात कर...’ या पंक्तींची आठवण आपल्या मनाला लगेच करून द्या आणि माहितीच्या पूर्वग्रहात अडकण्यापासून स्वतःला वाचवा!

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट- सीए असून, ‘अर्थसाक्षर व्हा’ या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक आहेत.)