
Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’
सुधाकर कुलकर्णी
क्रेडिट स्कोअर चांगला असण्याचे फायदे बरेच आहेत, पण तो चांगला राखण्यासाठी करायचं काय?
गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, अन्य वैयक्तिक कर्जे तसेच क्रेडिट कार्ड देताना बँका सर्वप्रथम सबंधिताचा क्रेडिट स्कोअर किती आहे, हे पाहतात आणि तो समाधानकारक असेल तरच कर्ज देऊ करतात.
क्रेडिट स्कोअर ७५०च्या पुढे असल्यास तो समाधानकारक समजला जातो. (हा स्कोअर ३०० ते ९००च्या दरम्यान असतो.) क्रेडिट स्कोअर कमी असल्यास आपला अर्ज विचारात घेतला जात नाही आणि विचारात घेतला तरी व्याजाचा दर, तारण, परतफेडीचा कालावधी तसेच जामीन याबाबतच्या अटी जाचक असतात.
आपला क्रेडिट स्कोअर हा समाधानकारक ठेवणे आवश्यक असते. पण विविध कारणांनी तो कमीच होताना दिसतो.
अशावेळी काय करायचं, क्रेडिट स्कोअर समाधानकारक राहण्यासाठी नेमके काय करायचे, याची माहिती घेऊ.
क्रेडिट स्कोअर समाधानकारक ठेवण्याचे फंडे
आपण घेतलेल्या कर्जांचे हप्ते वेळेत भरा तसेच आपल्या क्रेडिट कार्ड बिलाचे वेळेत पेमेंट करा. क्रेडिट कार्ड बिलाची रक्कम एकरकमी भरा. हप्त्याने किंवा किमान रक्कम भरण्याचा पर्याय वापरू नका.
एकाच वेळी अनेक ठिकाणी कर्जाची किंवा क्रेडिट कार्डांची चौकशी करू नका. असे केल्याने आपण कर्जासाठी अगतिक आहात, असे दिसून येईल. यामुळे आपला क्रेडिट स्कोअर बिघडू शकतो.
आपण एखाद्या कर्जासाठी सहकर्जदार असाल किंवा जामीनदार असाल, तर अशा कर्जाची नियमित परतफेड होते आहे याची खात्री करा. होत नसेल तर आपला क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो.
आपल्या क्रेडिट कार्डची मर्यादा पूर्ण वापरली जाणार नाही, याची काळजी घ्या. आपल्या कार्ड मर्यादेच्या १५ ते २० टक्क्यांपर्यंत सर्वसाधारणपणे वापर करावा व अपवादात्मक परिस्थितीत संपूर्ण मर्यादेचा वापर करावा. असे केल्याने व संपूर्ण कार्ड बिल देय तारखेच्या आत नियमित भरल्याने आपला क्रेडिट स्कोअर सुधारतो.
काही अपरिहार्य कारणाने क्रेडिट कार्ड बिल वेळेत भरता आले नाही किंवा कर्जाचा हप्ता वेळेत भरता आला नाही, तर शक्य तितक्या लवकर ही रक्कम भरावी, यासाठी गरज पडल्यास आपल्याकडील बँक, शेअर, म्युच्युअल फंड, सोने यात गुंतविलेली रक्कम काढणे श्रेयस्कर असते.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला नियमित परतफेड करता येईल इतक्याच रकमेचे कर्ज घ्या, केवळ मिळतेय म्हणून जास्त तसेच अनावश्यक कर्ज घेऊ नका.
आपला क्रेडिट स्कोअर चांगला आहे की वाईट ?
३०० ते ५४९ दरम्यानचा स्कोअर पुअर (खराब), ५५० ते ७०० फेअर (बरा), ७०० ते ७५० गुड (चांगला), ७५० ते ८०० व्हेरी गुड (खूप चांगला) व ८०० च्यापुढे एक्सलन्ट (उत्तम) असे सर्वसाधारण वर्गीकरण असते. पहिल्या दोन प्रकारात कर्ज मिळण्याची शक्यता नसते, तर त्या पुढे जितका आपला स्कोअर चांगला असेल तितकी कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. त्याशिवाय त्यानुसार कर्जाच्या अटी सुलभ असू शकतात.
सिबिल स्कोअर आणि त्याचे महत्त्व
सध्या सिबिल व एक्सपीरियन हे दोन क्रेडिट स्कोअर प्रचलित असले, तरी प्रामुख्याने बँका सिबिल स्कोअर प्राधान्याने विचारात घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कर्जासाठी किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी ‘सिबिल’च्या वेबसाईटवर लॉग-इन करून आपण आपला क्रेडिट स्कोअर किती आहे हे, पाहू शकतो व त्यानुसार कर्जाचा विचार करता येतो.