
नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
शिरीष देशपांडे
नेट बँकिंग सुविधा वापरणाऱ्या व्यक्तींनी आपली फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे हे वाचा सविस्तर....
तुम्हाला बक्षीस लागले आहे, मी खूप अडचणीत आहे, आपण विजेते आहात, आपली निवड झाली आहे, अशा तऱ्हेचे कोट्यवधी ई-मेल आणि मेसेज चोर कंपनीकडून जगभर रोजच्या रोज पाठवल्या जातात. संगणक जगताची थोडीच माहिती असलेले हजारो लोक अशा ई-मेल आणि मेसेजेसला बळी पडतात. त्यामधून ही चोर मंडळी कोणाच्या खात्यात भरपूर पैसे आहेत, त्यांना बळीचा बकरा बनवतात. अशा सर्व ई-मेल आणि मेसेजेस काढून टाकाव्यात म्हणजे डिलीट कराव्यात. आता आपण नेट बँकिंग (Net Banking) सुविधा वापरणाऱ्या व्यक्तींनी अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ते पाहू. (What Precautions to be taken for Net Banking)
फिशिंग (आभासी खऱ्या वाटणाऱ्या) इ-मेलद्वारे ८० लाख रुपयांची फसवणूक झाली. तपासयंत्रणा आणि कायदेशीर मार्गाने प्रयत्न करून पैसे परत मिळाले. आता आपण पाहू यात हे कसे घडले ते!
काही वर्षांपूर्वी नेट बँकिंग सुविधा वापरणाऱ्या एका व्यावसायिकाला ८० लाख रुपये गमवावे लागले. या व्यावसायिकाचा पार्टस उत्पादनाचा पुणे येथे कारखाना आहे. त्यांचे एका राष्ट्रीयीकृत बॅंकेमध्ये (Nationalized Bank) नेट बँकिंग सुविधेसह खाते होते. खात्यात ५० लाख २५ हजार रुपये शिल्लक होते. याशिवाय त्यांना रु. ३० लाखांचे कॅश क्रेडीट मंजूर झालेले होते. त्यांना एक शंकास्पद ई-मेल (फिशिंग) होता. त्या ई-मेलच्याद्वारे त्यांची बँकेविषयीची खातेदाराची गोपनीय माहिती मागवण्यात आली होती. या व्यावसायिकाला नेट बँकिंगमध्ये होत असलेल्या गुन्ह्यांची काहीच कल्पना नसावी. व्यावसायिकाने भोळेपणाने सर्व मागितलेला तपशील ई-मेलमार्फत दिलेल्या सूचनेनुसार संकेतस्थळावर (वेबसाईट) भरला.
दुसऱ्या दिवशी पाहतात तर काय त्यांच्या दोन्ही खात्यांमधून सर्वच्या सर्व म्हणजे ५० लाख आणि ३० लाखांची रक्कम नेट बँकिंगद्वारे मुंबई व गुजरात शाखेमार्फत जम्मूजवळील बँकेच्या एका शाखेमध्ये ट्रान्स्फर करून तेथून काही रक्कम चोरट्यांनी त्वरित काढून घेतली होती. मात्र, त्या व्यावसायिकाने तातडीने हालचाल करून बँकेच्या मदतीने जम्मू-काश्मीरमधील संबंधित बँकेच्या शाखेशी संपर्क साधून त्या खात्यात ट्रान्स्फर झालेल्या रकमेपैकी ३५ लाख शिल्लक होते ते गोठवले आणि सायबर सेल आणि कोर्टात केस दाखल केली, पण बरेच दिवस काहीच पुढे होत नव्हते.
दरम्यान, बँकेने गोठवलेले ३५ लाख परत देण्याचे मान्य केले, मात्र व्यावसायिकाने आपणहून माहिती दिली आणि त्यामुळे हा गुन्हा झाला म्हणून खात्यातून चोरट्यांनी काढलेले ४५ लाख देण्याचे नाकारले. त्यानंतर व्यावसायिकाने ॲडजुकेटिंग ऑफिसर (adjucating officer) महाराष्ट्र राज्याकडे तक्रार दाखल केली. ॲडजुकेटिंग ऑफिसर महाराष्ट्र राज्य यांनी बँकेला ४५ लाख रुपये व्यावसायिकाला परत देण्याची ऑर्डर दिली; कारण कागदपत्रांची (केवायसी) योग्य ती छाननी न करता चोरट्यांचे खाते उघडले गेले होते, त्या खात्याचा वापर चोरट्यांनी केला, मात्र त्यांची कागदपत्रे (केवायसी) खोटी असल्यामुळे ते सापडू शकले नाहीत आणि त्याचा फटका खातेदाराला बसला. या बँकेच्या चुकीबद्दल झालेले नुकसान ही बँकेचीच जबाबदारी, असा निकाल दिला.
हे देखिल वाचा-
आता आपण नेट बँकिंग सुविधा वापरणाऱ्या व्यक्तींनी अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ते पाहू.
१. तुम्हाला बक्षीस लागले आहे, मी खूप अडचणीत आहे, आपण विजेते आहात, आपली निवड झाली आहे, अशा तऱ्हेचे कोट्यवधी ई-मेल आणि मेसेज चोर कंपनीकडून जगभर रोजच्या रोज पाठवल्या जातात. संगणक जगताची थोडीच माहिती असलेले हजारो लोक अशा ई-मेल आणि मेसेजेसला बळी पडतात. त्यामधून ही चोर मंडळी कोणाच्या खात्यात भरपूर पैसे आहेत, त्यांना बळीचा बकरा बनवतात. अशा सर्व ई-मेल आणि मेसेजेस काढून टाकाव्यात म्हणजे डिलीट कराव्यात.
२. आपले आई-वडील जे आपल्याला देतात, तेच फक्त फुकट असते. इतर सर्व गोष्टींची काही ना काही किंमत असते, हे लक्षात असू द्या.
३. आपल्याला आलेल्या फिशिंग (फसव्या/खोट्या) ई-मेलला उत्तर देवून आपली खासगी माहिती देवू नका. उदा. अकाउंट नंबर, लॉग-इन आयडी, पासवर्ड, पत्ता, पॅन कार्ड, आधार कार्ड हे महत्त्वाचे आहे. ते संपूर्ण सुरक्षित राहील, याची काळजी घ्या.
४. तुमच्या मोबाईलचे नेटवर्क बराच वेळ चालू नसेल, फोन लागत नाही असे कोणी सांगितले, तर लक्ष ठेवा, ताबडतोब मोबाईल कंपनी आणि जरूर पडल्यास बँकेशी संपर्क साधा.
५. आपण नेट बँकिंग वापरत असलेल्या खात्यात कमीत कमी रक्कम ठेवा. जरुरीप्रमाणे व्यवहार करायच्या आधी तेवढीच रक्कम जमा करा.
६. नेट बँकिंग वापरत असाल तर त्यासाठी वेगळाच मोबाईल नंबर (स्मार्ट फोन नाही, तर डब्बा/साधा फोन) वापरावा. त्यातून फक्त एसएमएसच येतात आणि तेच बँक व्यवहारासाठी लागतात. तो साधा फोन सोशल मीडिया अकाउंटला संलग्न ठेऊ नका.
७. बँकेच्या मदतीने आपल्या रोजच्या नेट बँकिंग व्यवहारावर बंधन घाला. उदा. रोजची ट्रान्स्फर मर्यादा घाला, म्हणजे प्रत्येक व्यवहार रु. ५० हजार फक्त आणि उदा. एका दिवसाची एकूण ट्रान्स्फर मर्यादा रु. एक लाख फक्त. म्हणजे नुकसान झालेच तर जास्तीत जास्त तेवढेच होईल.
८. बँकेत समक्ष जावून बँकेच्या याबाबतीत असलेल्या सूचना माहीत करून घेऊन त्याचे तंतोतंत पालन करा.
९. आपल्या अकाउंटचा पासवर्ड वारंवार बदला, बँक खात्यातील व्यवहार मधूनमधून तपासा.
आपण जर फसवले गेला असाल तर काय कराल?
१. ताबडतोब https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.
२. १९३० अथवा १५५२६० (महाराष्ट्रासाठी) या नंबरवर संपर्क साधा. या नंबरवरची यंत्रणा ज्या खात्यात पैसे गेले असतील, ते गोठवण्याचे तातडीने प्रयत्न करतील.
३. बँकेत समक्ष जाऊनही तक्रार नोंदवा, त्याची कॉपी आरबीआयला ही पाठवा. नुसती तक्रार नोंदवून थांबू नका, भरपूर पाठपुरावा करा.
४. आपल्या फोनवर किंवा कॉम्प्युटरवर असलेले या संदर्भातील काही पुरावे/संदर्भ असतील तर जपून ठेवा, ते करण्यासाठी संगणक सल्लागाराची मदत घ्या. हे एवढ्यासाठी करायचे, की पुढे जाऊन आपल्याला हे पुरावे कोर्टात जरूर पडल्यास देता येतील.
५. शक्य असेल आणि आवश्यक असेल तर तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या.
(लेखक सीए आणि संगणक कंट्रोल, सायबर गुन्हेविषयक अभ्यासक आहेत.)