Share Market- शेअर बाजारात सततचे लाॅसेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रेडिंग मधले लाॅसेस}

शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

अवधूत साठे
शेअर बाजाराला जुगाराची उपमा देत नाहक बदनाम केले जाते. याला कारण म्हणजे ९५ टक्के गुंतवणूकदारांनी स्वतः ओढवून घेतलेले वैयक्तिक नुकसान; पण हे ९५ टक्के लोक ‘ट्रेडिंग’मध्ये अपयशी का होतात? या मागची कारणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

सामाजिक पार्श्वभूमीला न जुमानता, कोणत्याही व्यक्तीला केवळ त्याच्या इच्छेचा मान ठेवत, आर्थिक प्रगतीची संधी देणारी, शेअर बाजारासारखी निरपेक्ष, निष्पःक्ष व्यवस्था इतर कोणतीही नाही. व्यवस्था म्हटले, की नियम आलेच. नियम हे सुरक्षेच्या हेतूने केलेले असतात. गाडी चालवताना सीट बेल्ट, हेल्मेट, इन्शुरन्स यासह सुरक्षा आणि रहदारीचे नियम पाळणे जसे महत्त्वाचे असते; तसेच स्टॉक मार्केट ट्रेडिंगचे नियम पाळणेही महत्त्वाचे आहे. (Why Many Suffer Losses in Share Trading)

नियम पाळण्याला पर्याय नाही. नियम पाळूनदेखील तोटा झाला तरी चालेल; परंतु नियम न पाळून नफा झाला तरी तो अपघातच आहे. कारण त्याने मोठ्या तोट्यासारखे मोठे अपघात घडू शकतात. कारण अशा अपघाती नफ्यामुळे नियम न पाळण्याची प्रवृत्ती बळावते. गुड प्रॉफिट, गुड लॉस आणि बॅड प्रॉफिट, बॅड लॉस यातील फरक समजून घ्यायला हवा. बॅड प्रॉफिट म्हणजे अपघाती नफा टाळा, कारण तो भविष्यात जास्त नुकसान करू शकतो.

शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करणारे ९५ टक्के लोक ‘ट्रेडिंग’मध्ये (Trading) अपयशी का होतात, यामागे काही कारणे आहेत. अतिउत्साह, भीती, लोभ, घाई अशा भावनांवर नियंत्रण नसणे; स्थितप्रज्ञ राहण्याची कला अवगत नसणे, नफा किंवा तोटा दोन्हींचा समान मनःस्थितीने स्वीकार करता न येणे आणि मुख्य म्हणजे शिकण्याकडे उदासीन दृष्टीने पाहणे, अशा सार्वत्रिक कारणांमुळे ९५ टक्के लोक ‘ट्रेडिंग’मध्ये अयशस्वी होतात.

अपयाशाची मुख्य कारणे
भावनांवर नियंत्रण नसणे आणि योग्य प्रशिक्षणाचा अभावः योग्य प्रशिक्षण ते, जे ‘ट्रिपल एम’वर भर देते. मेथड (प्रक्रिया किंवा पद्धती), मनी आणि रिस्क मॅनेजमेंट व माइंडसेट मॅनेजमेंट.

भावनांवर नियंत्रण नसणे
संपूर्ण लक्ष पैशांच्या उलाढालीवर एकवटलेले असल्याने भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. शेअरखरेदी किंवा विक्री अशा कोणत्याही क्रियेचा तत्काळ परिणाम म्हणजे प्रत्येक व्यवहारानंतर ट्रेडर एकतर पैसे कमावतात किंवा गमावतात. इतका थेट परिणाम ज्या घडामोडींमध्ये असतो, त्यात भावनांच्या आहारी जाणे स्वाभाविक आहे; पण यात नुकसान जास्त आहे. त्यामुळे स्थितप्रज्ञता महत्त्वाची आणि ती गाठण्यासाठी प्रशिक्षणाशिवाय पर्याय नाही.

लक्षात घ्या, इतर कोणत्याही व्यवसायामध्ये निर्णयांचा आणि कृतीचा परिणाम लगेच पैशामध्ये होत नाही. आर्थिक नफा-नुकसान यांचे पडसाद उमटायला वेळ लागतो. उदा. एखाद्या डॉक्टरने केलेल्या शस्त्रक्रियेचा परिणाम त्याच्या स्वतःच्या बँक बॅलन्सवर होणार नाही. त्याचे नजिकचे ध्येय शस्रक्रिया यशस्वी होऊन रुग्ण बरा होणे हे असते. समजा, एखादी शस्त्रक्रिया अपेक्षेनुसार यशस्वी झाली नाही आणि डॉक्टरला (Doctor) पैशांच्या स्वरूपात भरपाई करावी लागणार, असे जेव्हा डॉक्टरला सांगण्यात येईल, तेव्हा त्याचे लक्ष कामात लागेल का?

अजून एक उदाहरण, एखादा खेळाडू मॅच खेळत असताना खेळाशी समरस होऊन फक्त खेळत असतो. त्याला माहिती असते, की सामन्याच्या परिणामाची चिंता करणे हे त्याचे लक्ष विचलित करू शकते. त्यात त्याला, सामना हरणे म्हणजे आर्थिक भुर्दंड असे आधीच सांगितले, तर आपले सर्वस्व देऊन कसा खेळणार तो? प्रत्येक पावलाला सतर्कतेच्या नावाखाली दडपण जाणवणारच. भावनांवर नियंत्रण करणे कठीण असले, तरी असंभव नाही; योग्य प्रशिक्षण आणि सराव असेल तर भावनांवर नियंत्रण ठेवणे शक्य होऊ शकते. गंमत म्हणजे हे माहित असूनही अनेक ट्रेडर प्रशिक्षणाबाबतीत उदासीन असतात. उदासीनतेचे कारण म्हणजे एखादी तंत्रशुद्ध प्रक्रिया असू शकते, तिचा शोध घेऊन पालन करायचे असते याची जाणीवच नसते.

कोणत्याही ट्रेडरची वाढ खुंटवणारे काही पूर्वग्रह
१. स्वतः नेहमीच बरोबर असण्याचा अट्टाहास : मी चुकायला नको, प्रत्येक व्यवहार नफ्यातच असायला हवा, हे दडपण असल्यामुळे लोक नफ्याच्या व्यवहारातून लवकर बाहेर पडतात आणि नुकसान होत असलेल्या व्यवहारात, ते काही काळाने का होईना, पूर्ववत चांगले होतील, अशा खोट्या आशेवर बसून राहतात. कारण त्यांना आतापर्यंत झालेले नुकसान भरून काढायचे असते. योग्य वेळी तोटा न नोंदवणे हेदेखील अपयशी होण्याचे प्रमुख कारण आहे.

२. खालावत चाललेल्या शेअरमध्ये अजून गुंतवणूक करणे : ‘पुटिंग मोअर मनी आफ्टर बॅड’ रोजच्या व्यावहारिक जीवनात ते जितके सुजाण वागतात, मार्केटमध्ये तितकेच उलट. उदा. व्यवस्थित काम न करणाऱ्या कर्मचाऱ्याला ते कामावरून काढून टाकतील, दरवाज्याच्या फटीत अडकलेले बोट पटकन काढून घेतील; पण बुडत असलेला शेअर धरून ठेवतील.

३. ‘कॅचिंग फॉलिंग नाइव्स’: पडणारे शेअर वधारतील, या लोभाने विकत घेणे.

४. ॲव्हरेजिंग आउट ऑन लूजिंग ट्रेड : सरासरी परिणामांच्या मागे धावणे.

५. सतत नुकसान करणारे शेअर काढून न टाकणे : सतत नुकसान करत असलेले शेअर न काढता लोक त्यांना अजून वेळ आणि पैशाचे खतपाणी घालतात. त्या शेअरची किंमत वाढून, नुकसानभरपाई होईल आणि कदाचित फायदाही होईल, या खोट्या आशेपायी अट्टाहासी बनतात. कारण त्यांना आपण गुंतवणुकीच्याबाबतीत चुकीचा निर्णय घेतलाय हे मान्यच नसते. उदा. एका ट्रेडरने अमुक कंपनीचा शेअर १५० रुपयांना विकत घेतला. तो उतरणीला लागून २० रुपयांपर्यंत गेला. इतकी घसरण डोळ्यासमोर होत असताना तो शेअर ७०, ६० किंवा अगदी ५० लाही विकून बाहेर पडू शकतो; पण आपला हा निर्णय चुकला आहे, हे मानून बाहेर पडणे त्याला पराभवासारखे वाटते. मात्र, वस्तुस्थिती ही आहे, की मार्केटमध्ये पराभव होत नसतो.

६. शेअरवर प्रेम करणे : अनेकजण आपल्या गुंतवणुकीमध्ये भावनिक गुंतवणूक करतात, त्यात ओढाताण करणे मंजूर असते; पण खालावत चाललेले शेअर विकून बाहेर पडणे जमत नसते.

७. लिव्हरेजिंग : आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भांडवलाच्या कैकपटीने जास्त गुंतवणूक करणे याला ‘लिव्हरेजिंग’ म्हणतात. झेपणार नाही इतकी ‘लिव्हरेजिंग’ काही ट्रेडर करतात. उदा. एक लाख रुपयांच्या भांडवलावर दहा लाखांपर्यंतचे शेअर विकत घेतात. समजा, दहा टक्के नुकसान झाले, तर त्याचा परिणाम संपूर्ण भांडवलावर होऊन संपूर्ण भांडवल गमावले जाऊ शकते. त्यामुळे ‘लिव्हरेज’ची सोय, ट्रेड पोझिशन बिनसली, तर नुकसान, उधारी आणि उधारीवर व्याज अशी तिप्पट गैरसोय बनते. प्रशिक्षणाचा अभाव असल्याने हे सर्व गणित बऱ्याच जणांना माहीतच नसते.

८.चुकीचा निर्णय : माझा निर्णय चुकीचाही असू शकतो आणि तसे झालेच, तर कुठे आणि कधी बाहेर पडायचे, यासाठीही मानसिकरित्या बरेच लोक तयार नसतात.

९. धाडसीपणाचा आव : अनेकजण आपले निर्णय योग्यच होते, हे स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात मार्केटशी जणू काही भांडतात. शेअर बाजाराला आम्ही ‘गॉड मार्केट’ किंवा ‘कामधेनू’ असे म्हणतो. येथे वावरताना सजगपणा, नम्रपणा आणि समर्पण अपेक्षित आहे, वैर नाही.

१०. पेनी स्टॉकची निवड : अनेकजण स्वस्त ते मस्त, असे मानून काहीही किंमत नसलेल्या पेनी स्टॉक्समध्ये, ते कधीतरी काही पटीने वाढतील, या आशेने गुंतवणूक करतात.

‘ट्रेडिंग’मार्गे समृद्धी मिळविण्याच्या प्रवासात खीळ पडू नये, यासाठी काय टाळावे हे जाणून घेऊया.

व्हिडिओमधून मिळणारे ज्ञान
ऑनलाइन व्हिडिओमधून माहिती मिळते. प्रशिक्षण होत नाही; कौशल्य विकसित होत नाही. व्हिडिओमध्ये एखादी स्ट्रॅटेजी सांगितली जाते, ज्याला ‘होली ग्रेल’ही म्हणतात. स्ट्रॅटेजी, एखाद्या सिक्रेट फॉर्मुल्यासारखी पैसे कमावून देईल, म्हणून तशा सिक्रेट फॉर्मुल्याच्या, हमखास चालेल अशा सेट-अपच्या शोधात बरीच मंडळी असतात. हमखास चालेल असा कोणताच सेट-अप नसतो. जेव्हा अपयश येते, तेव्हा त्याची कारणे बाहेर शोधतात.

स्ट्रॅटेजी मिळू शकते; पण मार्केटमध्ये टिकून राहण्याची, नफा किंवा तोटा कोणत्याही परिणामाला सामोरे जाण्याची मानसिकता तयार होऊ शकत नाही. त्यामुळे कमीतकमी तोटा होईल यासाठी ‘स्टॉपलॉस’ घेणे गरजेचे आहे. शेअर बाजारामध्ये शिरण्याची आणि बाहेर पडण्याची जागा माहित असणे गरजेचे आहे. अन्यथा दहापैकी आठ व्यवहारांमध्ये अल्पसा नफा मिळवून धन्यता मानत असतानाच एकाच व्यवहारामध्ये मोठा तोटा होण्याची संभावना असते. व्हिडिओ बघून व्यवहार करणारे एकलव्यासारखे असतात, शिकले तरी मार्केटला अंगठा देऊन बसतात.

ट्रेडिंग ॲप
स्मार्टफोन आल्यापासून प्रत्येक भावना, प्रत्येक अनुभवासाठी, प्रत्येकाचे आपले एक स्वतंत्र विश्व निर्माण झाले आहे. या आभासी विश्वात आपण खरेतर किती एकाकी आहोत, याची प्रचिती ट्रेडिंग ॲप देतात. कारण, जणू शेअर बाजार अक्षरशः आपल्या बोटांच्या इशाऱ्यावर चालतो, असे वाटू देणारे सोपे युजर इंटरफेस, पिच्छा पुरवणारे नोटिफिकेशन आपल्याला वेगवान; परंतु नुकसानकारक निर्णय घ्यायला उद्युक्त करतात. ॲपच्या माध्यमातून यशस्वी ट्रेडिंग करणे इतके सोपे असते, तर त्यांनी ते फ्री ॲप विकलेच नसते. प्रचंड रिटर्न स्वतःकडेच एकवटून ठेवले असते. ‘गोल्ड रश’चा किस्सा माहित आहे? लोकांमध्ये सोन्याच्या खाणी खणून, संपत्ती एकवटण्याची स्पर्धा लागली होती. सोने सर्वांनाच सापडले नाही. खणणारे नव्हे; तर जमीन खोदण्याची अवजारे विकणारे श्रीमंत बनले.

टिप्स देणारे ‘एसएमएस’
‘पैसे लावतोय ना, मग अजून डोकं लावायची काय गरज आहे? बघ, त्या एका ‘एसएमएस’ने मला सांगितल्याप्रमाणे दहापट रिटर्न मिळवून दिले. त्यांच्या टिस म्हणजे टिपटॉप रिटर्न’, असे सांगणारे भेटतात. मार्केट सेंटिमेंट्सवर चालते. सर्वच सावध राहून हुशार झाले, तर नुकसान कुणाच्या गळ्यात बांधणार? तुमचे अनामिक, अज्ञात हितशत्रू तुमच्या आळसाचा गैरफायदा घेत रिटर्नची इतकी स्वप्ने दाखवतात, की ‘एसएमएस’वर अवलंबून राहण्याच्या सवयीमुळेच कोट्यवधी रुपये हरणाऱ्यांच्या खिशातून जिंकणाऱ्यांच्या खिशात जातात, कारण जिंकणाऱ्यांनी दीर्घ अभ्यास केलेला असतो. त्यांची रणनीती स्पष्ट असते. रणनीतीची अंमलबजावणी काटेकोर असते.

टेलिग्राम व व्हॉट्सॲपवरील ग्रुप
कितीही आवडले तरी हे टाळाच. कारण चर्चा सर्वजण मिळून करतात; पण पैसे प्रत्येकाला स्वतःचे गुंतवायचे असतात. रिस्क घेण्याची कुवत सर्वांची सारखी नसते. ग्रुपमध्ये राहून ‘हर्ड मेंटॅलिटी’ला बळी पडण्याची शक्यता जास्त. शिवाय कोणी तरी नेक्स्ट पोझिशन ‘सुचवणं’, इतरांनी त्या स्टॉक निवडीभोवती चर्चा करणे, हा उहापोह एक तर वेळ फुकट घालवतो आणि सोप्या सल्ल्यांना भुलून ‘रिटेल इन्व्हेस्टर’ची गफलत होते, ती वेगळी. लोकांना काही परिश्रम न करता सर्व हवे असते, हे त्या ग्रुप चालवणाऱ्यांना बरोबर माहिती असते. ग्रुपमध्ये सहभागी होणाऱ्यांना हे लक्षात येत नाही, की ते स्वतः इतर लोकांना सदस्य बनवण्याचे साधन कधी बनले आणि फक्त सदस्यांची संख्या वाढली म्हणून त्या टेलिग्राम चॅनेलना फुटेज मिळाले. ग्रुपमध्ये किती सदस्य आहेत, यावरून त्या ग्रुपची विश्वासार्हता ठरवता येते का? लक्षात घ्या, ट्रेडिंग काही टीम स्पोर्ट नाही. स्टॉक ट्रेडिंगमध्ये प्रत्येक चाल ही वैयक्तिक जबाबदारी आहे आणि नुकसान झाले, तर त्याची झळसुद्धा प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवरच बसणार. ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ हा आत्मविश्वास हवा असेल, तर प्रशिक्षणाशिवाय पर्याय नाही.

असंघटित फंड मॅनेजर
‘मानसिक शांती अबाधित राखा, आकर्षक किमान रिटर्नचे सुख निवांत उपभोगा, कारण आम्ही आहोत ना!’ ‘सेबी’ रजिस्टर्ड नसलेले अनऑर्गनाइज्ड फंड मॅनेजरच्या महिना दोन-तीन टक्के निश्चित रिटर्न देऊ, अशा आशयाच्या जाहिराती त्यांचे काम चोखपणे बजावतात. आपण स्वकष्टाची बचत, तीही त्याग करून केलेली, सहज फंड मॅनेजरच्या हवाली करतो. ते फंड मॅनेजर स्वतःचे कौशल्य आणि स्टॉक निवडीबाबत आश्वस्त आहेत, की साशंक हे माहित करायला मार्ग नसतो. लॉक-इन पिरियड, पोर्टफोलिओ निवडीबाबतीत त्यांचे अबाधित निर्णय, गुंतवणुकीसाठी आवश्यक किमान रक्कम या अटी-शर्ती पाळणे आणि आपला फायदा होवो किंवा नुकसान, भरमसाठ वेल्थ मॅनेजमेंट फी आणि ब्रोकरेज देणे. यातून पुन्हा तेच, पैशांचे नुकसान आणि आत्मविश्वासाला तिलांजली!

बाह्य परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर आहे असे वाटणे, ट्रेडिंगकडे सट्टा म्हणून पाहणे आणि सट्टा लागावा यासाठी टिप्सवर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती म्हणजे तोट्याला सहर्ष आमंत्रण! स्वतः प्रशिक्षण घेऊन, सराव करत, शेअर बाजाराची शाश्वत मूल्ये आत्मसात करत, आपली संपत्ती आणि समृद्धी वाढवणे हे अधिक चांगले. कारण स्वतः शिकून, सराव करत, ट्रेडिंगद्वारे, दरमहा पाच ते दहा टक्के रिटर्न कमावणे शक्य आहे. स्वावलंबनाचा पर्याय उपलब्ध असताना परावलंबित्व का पत्करावे?

(लेखक अवधूत साठे ट्रेडिंग ॲकॅडमीचे संस्थापक; तसेच शेअर मार्केट ट्रेडर, ट्रेनर व मेंटॉर आहेत.)