Gold Market- सोन्याची झळाळी आगामी काळात आणखी वाढणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोन्याची झळाळी आगामी काळात आणखी वाढणार?}

सोन्याची झळाळी आगामी काळात आणखी वाढणार?

सध्याची भू-राजकीय अस्थिरता, चलनवाढ रोखण्यासाठी केलेले उपाय आणि गुंतवणूक जोखीम कमी करण्यासाठी व अन्य कारणांमुळे आगामी काळातही जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या मागणीत वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत...कशामुळे येतेय ही स्थिती?

कोविड (Covid 19) महासाथीमुळे अर्थव्यवस्था थांबली आणि धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी जोखीम कमी करण्यासाठी त्यांच्या आवडीच्या गुंतवणूक (Investment) पर्यायाला म्हणजे सोन्याला पसंती दिली. यामागची कारणे होती कोविडमुळे थांबलेली जागतिक अर्थव्यवस्था, ती पुन्हा रुळावर येण्यासाठी लागणारा वेळ, साखळी पुरवठ्यावर होणारा परिणाम, जागतिक बाजारपेठेतील जगन्मान्य डॉलर वा एकूणच चलनावर कमी झालेला गुंतवणूकदारांचा विश्वास, भू-राजकीय अस्थिरता. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी सर्वांत शाश्वत व सार्वभौमत्व असलेल्या सोने या मौल्यवान धातूमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे सोन्याने (Gold) आधीचे भावपातळीचे विक्रम मोडत नवी उच्चांकी पातळी गाठली आहे. दोन फेब्रुवारी २०२३ रोजी ‘एमसीएक्स’वर सोने प्रति दहा ग्रॅम ५८,६६० रुपयांच्या नव्या उच्चांकी पातळीवर गेले होते. (Will Gold Demand and Rates will be Increase in Global Market)

भारतात आणि जागतिक पातळीवर आलेल्या सोन्याच्या तेजीमागची कारणे एकसारखीच होती. प्रामुख्याने विविध देशांच्या मध्यवर्ती बँका, गोल्ड इटीएफ फंडांनी (Gold ETF Fund) सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे सोन्यात जून २०२० पासून आलेली तेजी पुढे दीड वर्षे कायम राहिली. त्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेत (Economy) गती यायला सुरुवात झाल्यावर सोन्यामध्ये उच्चांकी पातळीवर गुंतवणूकदारांनी नफा करून घेतला. यात प्रामुख्याने ‘गोल्ड इटीएफ’चा समावेश होता.

मध्यवर्ती बँकांकडून नवी खरेदी मंदावली होती. त्यामुळेच २०२१ च्या उत्तरार्धापासून २०२२ च्या पहिल्या सहामाहीअखेरपर्यंत सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ४६ हजार ते ५१ हजार रुपयांदरम्यान होता. जागतिक पातळीवर भू-राजकीय परिस्थितीत अनिश्चितता वाढण्यास सुरुवात झाल्यावर सोन्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढू लागला. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने जागतिक पातळीवर अन्नधान्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्यास सुरुवात झाली. चीनमध्ये ‘कोविड १९’ला पायबंद घालण्याची ‘शून्य कोविड’ धोरणाचा झालेला अवलंब, तेथील घटलेली निर्यात व घटलेली मागणी, जागतिक पातळीवर साखळीपुरवठ्यावर झालेला विपरीत परिणाम यांच्यामुळे अमेरिकेतील चलनवाढ आणि मंदावणारी अर्थव्यवस्था यांच्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेण्यास सुरुवात केली.

रुपयाही घसरला...
जून २०२२ नंतर अमेरिका व युरोप यांचे चीन, रशिया, इराण या देशांबरोबर असणारे संबंध ताणले गेल्याने व त्यांच्यावर लादलेल्या बंधनांमुळे भू-राजकीय परिस्थिती आणखी बिघडण्यास सुरुवात झाली. तसेच, उत्तर कोरियाकडून वारंवार होणाऱ्या क्षेपणास्त्र चाचण्या, चीन-तैवान संबंधांमुळे पुरवठा साखळीवरील परिणामाने गंभीर स्वरूप धारण केले. त्यामुळे चीन, रशिया, इराण या देशांनी व्यापारासाठी डॉलर चलन म्हणून वापरण्याऐवजी अन्य स्वरूपाचा मार्ग निवडण्याची तयारी सुरू केली. त्यामुळेच ऑक्टोबरपासून जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या मागणीत वाढ होण्यास सुरुवात झाली.

बाजारात येणारी मागणी ही गोल्ड इटीएफ फंडांकडून न येता अन्य संस्थांकडून येत असल्याचे संकेत मिळत होते. भारतातही जागतिक घडामोडींपासून वाचू शकला नाही. देशात महागाई केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टांच्या पुढे गेली. त्याच जोडीला परकी गुंतवणूकदार संस्थांनी भारतातून गुंतवणूक काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे डॉलरचा ओघ बाहेर पडण्यास सुरुवात झाली आणि परकी गंगाजळीत मोठ्या प्रमाणात घटली. २०२२ च्या सुरुवातीस डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ७३.८२ च्या पातळीवरून घसरून ऑक्टोबर २०२२ मध्ये ८३ च्या पातळीवर गेले.

हे देखिल वाचा-

जुना उच्चांक मोडला!
पीपल्स बँक ऑफ चायनाने नोव्हेंबर २०२२ मध्ये १.८ अब्ज डॉलर मूल्याचे तब्बल ३२ टन सोने खरेदी केले. २०१९ नंतर चीनने सोन्याच्या साठ्यात केलेली पहिली अधिकृत वाढ आहे. मात्र, यापेक्षा अधिक सोने चीनने खरेदी केले असण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाच्या मध्यवर्ती बँकेने सोन्याचा अधिकृत साठा जाहीर करणे बंद केले आहे. आगामी काळातही यांच्याकडून सोन्याची खरेदीवर भर दिला जाईल, असे संकेत मिळत आहेत.

तसेच, जागतिक व्यापारातील डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न रशिया, चीन व इराण यांच्याकडून तीव्रतेने होतील, असे संकेत मिळत असल्याने आणि जागतिक पातळीवर भू-राजकीय अस्थिरता, चलनवाढ या गोष्टी लवकर आटोक्यात वा पूर्ववत होण्याची शक्यता नजीकच्या काळात वाटत नाही. त्यामुळे सोन्याची मागणी पारंपरिक बाजारपेठेव्यतिरिक्त संस्थात्मक संघटना व गुंतवणूकदारांकडून राहण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत २०२३ च्या पहिल्या दोन आठवड्यांतच दिसले आहेत. सोन्याने २०२० नंतरचा ५६ हजार रुपयांचा उच्चांक मोडला. दोन फेब्रुवारी २०२३ रोजी ‘एमसीएक्स’वर सोने प्रति दहा ग्रॅम ५८,६६० रुपयांच्या नव्या उच्चांकी पातळीवर गेले होते.

भू-राजकीय अस्थिरता
अमेरिकेसह जगभरातील महत्त्वाच्या देशांच्या मध्यवर्ती बँकांचे धोरण महागाई नियंत्रणात आणण्यास प्राधान्य देणारे आहे. त्यामुळे प्रमुख व्याजदरांत बँकांकडून जून २०२२ पासून सुरू असणारी व्याजदरवाढ २०२३ मध्येही कायम राहणार असून, मात्र वाढीचा दर पूर्वी इतका तीव्र असणार नाही. महागाई नियंत्रणास प्राधान्य दिले गेले असल्याने त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. अमेरिका व युरोपात मागणी घटत असल्याने व बेरोजगारी वाढत असल्याने खर्चाला कात्री लावण्याचे प्रमाण वाढत आहे.

त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदीकडे जाण्याचे संकेत मिळत आहे. त्यातच रशिया-युक्रेन युद्ध एक वर्ष होऊनही संपलेले नाही. इराण-अमेरिकेतील वाढता तणाव, चीनकडून तैवानच्या हवाई सीमेत होत असणारी घुसखोरी, उत्तर कोरियाकडून होणारी संभाव्य क्षेपणास्त्र चाचणी आदी गोष्टींमुळे भू-राजकीय अस्थिरता वाढतच आहे. चीन, रशिया व इराण सोन्याच्या साठा वाढविण्यावर भर देतील, असे संकेत मिळत आहेत. या उलट डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी या देशांकडून क्रिप्टो करन्सीमध्ये व्यवहार करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणाही झाली आहे.

हे देखिल वाचा-

‘क्रिप्टो’ ठरणार गेम चेंजर
आजपर्यंत कोणत्याही देशाने क्रिप्टो करन्सी जारी केलेली नाही. मात्र, डॉलरला आंतरराष्ट्रीय व्यापारात चलन म्हणून शह देण्यासाठी रशिया व इराण क्रिप्टो करन्सी बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच ही क्रिप्टो करन्सी सार्वभौम अर्थात ‘सॉव्हरिन गॅरंटी’ असणारी असेल. यासाठी एका ‘क्रिप्टो’च्या दर्शनी मूल्याएवढे सोने त्यासाठी ठेवले जाणार आहे. त्यामुळेच क्रिप्टो करन्सीवरील विश्वास वाढू शकतो. इराण व रशिया सॉव्हरिन गॅरंटी असणारे ‘स्टेबलकॉइन’ ही क्रिप्टो करन्सी एकत्रित जारी करू शकतात, असे संकेतही आंतरराष्ट्रीय बाजारात २०२३ च्या सुरुवातीस मिळाले आहेत. या देशांसह अन्य देशांची सोन्यावर आधारित क्रिप्टो करन्सी बाजारात आणण्याचा निर्णय घेतल्यास आगामी काळात सोन्याची मागणी अनेक पटींमध्ये वाढू शकते.

कशामुळे तेजी?
दोन फेब्रुवारी २०२३ रोजी ‘एमसीएक्स’वर सोने प्रति दहा ग्रॅम ५८,६६० रुपयांच्या नव्या उच्चांकी पातळीवर गेले होते. सोन्याचे उत्खनन व पुरवठ्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे अनपेक्षित आलेल्या मागणीचे पडसाद सोन्याच्या भावावर उमटतात आणि २०२२ मध्ये ते आपल्याला दिसले आहे. सध्याची भू-राजकीय अस्थिरता, चलनवाढ रोखण्यासाठी केलेले उपाय आणि गुंतवणूक जोखीम कमी करण्यासाठी व अन्य कारणांमुळे आगामी काळातही जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या मागणीत वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

तसे झाल्यास सोन्यात तेजी येऊ शकते आणि ती येण्यामागे प्रमुख भूमिका मध्यवर्ती बँका व गोल्ड इटीएफ यांची असेल. सध्या प्रती औंस १९५० डॉलरच्या पुढे असणारे सोने जून ते ऑगस्टदरम्यान २००० डॉलरची पातळी गाण्याची शक्यता अधिक आहे. भारतात २०२३ मध्ये सोने प्रती दहा ग्रॅम ६० ते ६२ हजार रुपयांवर जाऊ शकते. एकूण वर्षातील सरासरी ही ५६-५८ हजार रुपयांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.

‘‘नव्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात अडीच टक्के घट केली आहे. मात्र, त्याचवेळी सोन्यावरील उपकर अडीच टक्क्यांनी वाढून पाच टक्के केला आहे. त्यामुळे सोन्यावर एकूण आयात शुल्क १५ टक्के कायम राहणार आहे. त्यामुळे व्यापारी व ग्राहकांची निराशा झाली.’’
- अमित मोडक, संचालक-सीईओ, पीएनजी अँड सन्स