Share Trading- स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टाॅक मार्केट कोर्स करुन यश मिळेल काय}

स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

अवधूत साठे

स्टॉक मार्केटमध्ये परिस्थिती दररोज बदलत असते. त्यामुळे ट्रेडिंगसंदर्भातील निर्णयांचे परिणाम स्वैर स्वच्छंदी, अनियंत्रित म्हणजे अगदीच ‘रँडम’ असू शकतात. त्यामुळे शेअर मार्केटचा फक्त कोर्स करुन चालत नाही. यशस्वी ट्रेडर बनण्यासाठी आणखीही काही गोष्टी आवश्यक आहेत.

शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. त्यासाठी एखादा छोटासा कोर्सही करतात, त्या आधारावर मोठा नफा मिळवण्याच्या आशेने गुंतवणूक करतात आणि अनेकदा तोंडघशीही पडतात. मग त्या कोर्सला दूषणे देणे, शेअर बाजाराची भीती बसणे असे प्रकार होऊन तो गुंतवणूकदार (Investor) शेअर बाजारापासून दूर होतो. असे हे गुंतवणूकदार एक गोष्ट विसरतात ते म्हणजे अभ्यासपूर्वक गुंतवणूक करण्याचे महत्त्व. एखादा प्रथितयश गायकदेखील नित्यनेमाने सराव करतो, तेव्हा त्याचे गाणे टिकून राहते. तो नव्या गोष्टीही आत्मसात करतो, तेव्हा त्याचे गाणे आणखी प्रभावी होण्यास मदत होते. हीच गोष्ट शेअर बाजारातील गुंतवणुकीलाही लागू होते. (Will Only Course will help one the be Professional Trader in Stock Market)

‘डॉक्टर आणि वकील ‘प्रॅक्टिस’ करतात रे! आम्ही डायरेक्ट कामच करतो. एकदम पहिल्या दिवसापासून थेट रिझल्ट!’ एक इंजिनीयर मित्र सहज बोलून गेला. जोकच्या मूडमध्ये होता बहुतेक. ‘प्रॅक्टिस’ शब्दावर कोट्या करत होता. स्वभावच विनोदी आणि वातावरण मजेदार. मित्रांच्या संगतीत संध्याकाळ घालवायला हवीच. असो, अशी ती संध्याकाळ आली आणि गेली. नंतर मित्राच्या शाब्दिक कोटीकडे दुर्लक्ष करून ‘प्रॅक्टिस’च्या महत्त्वाकडे लक्ष वेधले गेले.

हे देखिल वाचा-

बघा ना, प्रस्थापित अनुभवी डॉक्टरसुद्धा मेडिकल संबंधित पारंपरिक आणि अद्ययावत पद्धतींची रोजच ‘प्रॅक्टिस’ किंवा उजळणी करतात, जेणेकरून त्यांना आपल्या रुग्णांना उत्तमोत्तम सेवा देता यावी. परिणामस्वरूप, डॉक्टरांवरचा विश्वास वृद्धिंगत होतो आणि सगळ्याचा परिपाक म्हणजे व्यावसायिक भरभराट होते. सातत्य आणि प्रामाणिक सराव या मार्गाने गेले, की ती होतेच. मग ट्रेडिंगच्या अनुषंगाने ‘प्रॅक्टिस’कडे पाहिले आणि बऱ्याच लोकांचा याबाबतीत ‘दिल तोड देनेवाला’ गैरसमजही आठवला.

‘दिल क्यूँ टूटता है?’
गैरसमज- फक्त कोर्स केला, की झाले, स्टॉक मार्केटमध्ये (Stock Market) खोऱ्याने पैसे फक्त ओढायचे आहेत. अपेक्षाभंगाचं दुःख- भरमसाट पैसे, वेळ आणि आकांक्षांची निरर्थक आहुती, फक्त ‘थिअरी विदाउट प्रॅक्टिकल सपोर्ट’, ज्याने काहीही निष्पन्न होत नाही. जुन्या, निरुपयोगी व त्याज्य सवयी सोडून, स्पष्ट चित्र पाहून त्यानुसार वाटचाल करण्यासाठी जी मानसिकता लागते, तीही निव्वळ कोर्समधून साध्य होत नाही.

लक्षात घ्या, स्टॉक मार्केटमध्ये परिस्थिती दररोज बदलत असते. त्यामुळे ट्रेडिंगसंदर्भातील निर्णयांचे परिणाम स्वैर स्वच्छंदी, अनियंत्रित म्हणजे अगदीच ‘रँडम’ असू शकतात. अशा परिणामांना समर्थपणे हाताळण्याची क्षमता निर्माण व्हायला काही वर्षांचा कालावधी आणि काटेकोर सराव लागतो. फक्त काही दिवसांच्या ‘क्रॅश कोर्स’वर विसंबून राहिले, तर ट्रेडिंग करिअरच ‘क्रॅश’ होईल.

मूलभूत संकल्पनांची समज
काही मूलभूत संकल्पना असतात, ज्यांची इत्यंभूत माहिती आणि सखोल समज असायला हवा. दोन दिवसांच्या ‘मेगा इव्हेंट’मध्ये जेमतेम तोंडओळख होऊ शकते, मात्र साक्षात्कार नव्हे. त्या संकल्पना आपण किती समजतो, त्यांचा योग्य वापर कसा करतो, त्या संकल्पनांच्या बळावर रणनीती कशी ठरवतो, ट्रेडिंगमध्ये उद्भवणारी संधी ओळखून यशस्वी एंट्री, एक्झिट कसे करतो, हे सर्व माहित व्हायला वेळ आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन हवे. ‘गुड प्रॉफिट, गुड लॉस’, ‘बॅड प्रॉफिट, बॅड लॉस’मधील फरक समजायला हवा.

आपले नीतिधैर्य अजमावून बघायला हवे. स्टॉक मार्केटमध्ये तग धरून राहण्याची जिद्द हवी. प्रॉफिट अथवा लॉस, परिणाम मनाजोगते नसले, तरी मार्केटविषयी असूया ना बाळगता संधीचा महासागर अशा दृष्टीकोनातून पाहून आणि नमित राहून वाटचाल करणे, यासाठीही पाठबळ लागते आणि ते पाठबळ फक्त पैशांच्या स्वरूपात नसते, तर ते सपोर्ट सिस्टिमच्या स्वरूपात असते. ऑफलाइन असो किंवा ऑनलाइन, यशस्वी ‘ट्रेडर’ बनण्यासाठी आवश्यक असे अंतर्बाह्य मानसिक स्थित्यंतर आणि सर्वांगीण प्रशिक्षण फक्त कोर्सच्या माध्यमातून शक्य नाही.

एका कोर्सने मनासारखे मार्गदर्शन झाले नाही, तर निराश ट्रेडर दुसऱ्या कोर्सच्या शोधात निघतात. खरेच ते मार्गदर्शन शोधतात, की जो हमखास प्रॉफिट देऊन जाईल असा सेट-अप शोधतात, हाही आत्मसंशोधनाचा विषय आहे. खरे तर, नेहमीच हमखास चालेल असा कोणताही सेट-अप, कोणतीही एक ठरलेली स्ट्रॅटेजी नसते. मार्केटच्या बदलत्या वाऱ्याबरोबर स्ट्रॅटेजीतही दिशाबदल हवाच. म्हणून प्रत्येक होतकरू ट्रेडरने मार्केटमध्ये पदार्पण करताना आपल्या अपेक्षाही पडताळून बघाव्यात आणि त्या हिशेबाने शिकण्याचे माध्यम निवडावे.

हे देखिल वाचा-

साधारणपणे, एकदा कोर्स संपला, की प्रत्येक जण आपापल्या निर्णयांचा स्वामी असतो. स्टॉक मार्केटमधील घडामोडींनुसार आपण फक्त निर्णय घेऊ शकता, परिणामांचे केवळ भाकित करू शकता; पण परिणामांवर नियंत्रण ठेऊ शकत नाहीत. परिस्थिती हाताबाहेर जाऊन भांडवल गमावण्याचे दडपण किंवा अचानक ‘रँडम ट्रेड’अखेरीस जोरदार नफ्याच्या ‘जॅकपॉट’मुळे होणारा भ्रामक हर्षवायू, हे दोन्ही यशस्वी ट्रेडरच्या वाटचालीसाठी मारक असतात. या ‘झटपट समाधान’ वृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी अशी यंत्रणा हवी, की जी अक्षरशः बोट धरून प्रशिक्षण देईल आणि धोक्याची वळणे ओळखून मार्गक्रमण करण्यास आपणास तयार करेल.

‘युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ’
‘युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ’ असे उगाच म्हणत नाहीत. हर्ड मेंटॅलिटी आणि सिलेक्ट क्लब ऑफ मिलियनेर्स यामध्ये फरक आहे. तो फरक दूरदृष्टी आणि दूरगामी धोरण यांचा आहे, दूरगामी ध्येय गाठण्याच्या दृढनिश्चयाचा आहे, रोज प्रॅक्टिस करत राहण्याच्या शिस्तीचा आहे. हाच फरक असतो जेव्हा यशस्वी ट्रेडर, बदलत्या मार्केटचे भान ठेवून, प्रत्येक संधीनुसार आपल्या स्किल्स, नेटवर्क आणि नेटवर्थचे सोने करतो. हे मानसिक, वैचारिक स्थित्यंतर फक्त कोर्स करून शक्य नाही.

रिस्क मॅनेजमेंट, योग्य स्टॉपलॉस, इतरांच्या एकत्रित अनुभवातून शिकणे, मेंटॉर, सहपाठी यांच्या मार्गदर्शनासह कुटुंबाचे समर्थन व विश्वास संपादित करून, समृद्धी कशी वृद्धिंगत करावी, हे फक्त मुरलेल्या प्रशिक्षकांच्या निरीक्षणाखालीच होऊ शकते. शिक्षण आणि प्रशिक्षण यातील अंतर ओळखा, आपला वेळ, शिकण्यासाठी शिलकीला टाकलेले पैसे यांचा योग्य विनिमय करा. शेवटी तीही एक गुंतवणूकच आहे आणि आपले व्यक्तित्व म्हणजे प्रगतीकडे भरधाव गतीने निघालेला स्टॉक. प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी आणि कॉन्स्टंट परफॉर्मन्स तुमच्यासाठीही तितकाच लागू आहे, जितका स्टॉक एक्स्चेंजसाठी असतो. खरे ना?

यशाचे सर्व घटक तुमच्यातच!
यशासाठी आवश्यक सर्व घटक तुमच्या आत सामावलेले असतात. उदाहरणार्थ, आंब्याच्या कोयीला माहिती असते, की आंबाच बनणार; पण काय मग तितक्यावर भागेल? कोयीला वाळवंटात टाकून तिचे संगोपन होणार का? असो, इतके टोकाचे नको, तर जरा सौम्य उदाहरण घेऊ. त्या कोयीला हिमाचलच्या सुपीक भागात रोवून पण चालणार नाही, तिच्या फलनिश्चितीसाठी कोकण किंवा कोकणसदृश परिस्थिती हवी. त्याचप्रमाणे, यशस्वी ट्रेडरसाठी पोषक वातावरण केवळ इतर समविचारी आणि सिद्धहस्त ट्रेडर्स आणि द्रष्टा/व्हिजनरी इन्‍व्हेस्टरच्या सान्निध्यातच शक्य आहे, अन्यथा नाही. आपल्याला ट्रेडर म्हणून स्टॉक मार्केटमध्ये प्रगती करायची असेल, तर त्यानुसारच सपोर्ट सिस्टिम हवी. तुका म्हणे येथे, पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे हे काम नोहे!

(लेखक अवधूत साठे ट्रेडिंग ॲकॅडमीचे संस्थापक; तसेच शेअर मार्केट ट्रेडर, ट्रेनर व मेंटॉर आहेत.)

टॅग्स :Share MarketTrading