
दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...
शरद पांडुरंग काळे
भारतातील प्रत्येक शहरात आणि गावात रस्त्यांवर दुतर्फा दिसणारे प्लास्टिकचे ढीग अस्वस्थ करून सोडतात. हे ढीग होऊ नयेत यासाठी आपल्याला सुसंस्कृत होण्याची गरज आहे. भाजीवाल्याकडे प्रत्येक भाजीसाठी वेगळी प्लास्टिकची पिशवी मागणारी व्यक्ती ही सुशिक्षित असेल कदाचित, पण ती सुसंस्कृत नसते. बाजारात जाताना स्वतःची कापडी पिशवी नेली तर अशा सुशिक्षित पण असंस्कृत लोकांच्या प्रतिष्ठेला फार मोठा धक्का बसतो...
जर अजगराच्या विळख्यात कुणी सापडला, तर त्यातून सुटका अशक्य आहे असे म्हटले जाते. या अजगराच्या विळख्याप्रमाणेच पृथ्वीला प्लास्टिकचा (Plasitc) विळखा पडलेला आहे आणि दिवसेंदिवस तो घट्ट होत चालला आहे. कृत्रिम पदार्थांच्या दुनियेतील प्लास्टिकने बटु वामनाप्रमाणे ही पृथ्वी अवघ्या काही दशकांमध्ये व्यापून टाकलेली आहे. जर आपल्या भोवती नजर फिरवली, तर प्रल्हादाच्या नारायणाप्रमाणे जळीस्थळी पाषाणी प्लास्टिक दिसत आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण प्लास्टिकचे दर्शन, स्मरण, भक्ती, पूजा हे सर्व विधी विविध मार्गांनी करत असतो. ‘अति तिथे माती’ या उक्तीप्रमाणे प्लास्टिकच्या अतिवापराचे दुष्परिणाम पर्यावरणाच्या विविध घटकांवर होताना दिसत आहेत. (Global Health and Usage of Plastic silent implications on human life)
अतिपरिचयात अवज्ञा संततगमना अनादरो भवति।
मलयेभिल्लपुरंध्री चंदन तरुकाष्ठम इंधंन कुरुते।।
यातील मलय पर्वतावरील स्त्री जितक्या सहजतेने चंदनाचे लाकूड (Sandle Wood) स्वयंपाकासाठी जाळते, तितक्या सहजपणे आपण प्लास्टिकचा उपयोग करीत आहोत. प्लास्टिकचा वापर करत असताना त्यामुळे प्रदूषण (Pollution) होऊ शकते, हे समजत असले तरी उमजत नाही असेच म्हणावे लागेल. दुधाच्या प्लास्टिकच्या पिशवीचा कोपरा कापून दूध भांड्यात घेतले, की पिशवीचे काम संपते. ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ हीच भावना पिशवीबद्दल जनमानसात असते. हेच जेव्हा त्या पिशव्या पर्यावरणात ठिकठिकाणी विखरून पडलेल्या स्वरूपात दिसतात तेव्हा म्हणावेसे वाटते. दूध घरी आणताना ती पिशवी मौल्यवान असते. मग दूध काढून घेतल्यावर तिचे मूल्य नेमके कुठे हरवते?
पिशवी उघडताना ९९.५ टक्के लोक तिचा कोपरा कापून ती उघडतात. म्हणजे प्रत्येक पिशवीबरोबर तो कापलेला तुकडा केरात जातो. पिशवी धुऊन, स्वच्छ करून मग वाळवून ठेवण्याचे काम काही गृहिणी इमानेइतबारे करतात, पण त्यांची संख्या खूप छोटी आहे. जर पिशवी धुतली नाही, तर तिच्यातील दुधाचा (Milk) अंश जीवाणूंचे अन्न असल्यामुळे त्यांची वाढ त्या पिशवीत झपाट्याने होते आणि पिशवीला अतिशय वाईट वास येऊ लागतो. ती पिशवी केराच्या बादलीत टाकली असेल तर तो वास बादलीला लागतो! त्यामुळे महाराष्ट्रात किमान एक कोटी दूध पिशव्या रोज वापरल्या जात असतील, तर एक कोटी रिकाम्या आणि त्यातील बहुसंख्य वाईट वासयुक्त पिशव्या व एक कोटी पिशव्यांचे कापलेले तुकडे हे पर्यावरणात मिसळतात!
चहाने आपल्या दिवसाची तरतरीत सुरुवात होत असली, तरी प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाने वसुंधरेच्या दिवसाची सुरुवात मात्र कालच्यापेक्षा प्रदूषण अंकात वाढ होऊनच होत असते. आपण प्रत्येक जण त्या पापात वाटेकरी असतो. रोज महाराष्ट्रात एक कोटी पिशव्यांचा हा सिलसिला गेली दोन दशके तरी अबाधितपणे सुरू आहे आणि येत्या काही वर्षांमध्ये तरी त्यात मोठ्या प्रमाणावर बदल अपेक्षित नसल्यामुळे हे प्रदूषण वाढतच जाणार आहे.
पिशवी उघडताना कोपरा अर्धवट कापून दूध काढून घेतल्यावर, पिशवी कात्रीने सरळ उघडून (तुकडा न कापताच) मग धुऊन आणि वाळवून ठेवली, तर निदान तिचे पुनर्चक्रांकण तरी नीट होईल. प्रत्येक घराने ही मेहनत घ्यायलाच हवी. जर एक कोटी पिशव्या पर्यावरणात बेशिस्तपणे जाणे आपण वाचवू शकलो, तरी वसुंधरेसाठी ती मोठी मदत होईल. पण दुधाच्या पिशवीमुळे होणारे प्रदूषण हा प्रदूषणाच्या हिमनगाचा केसाएवढ्या जाडीचादेखील भाग नाही हे लक्षात घेतले पाहिजे! या हिमनगाची व्याप्ती फारच प्रचंड आहे.
प्लास्टिकोज या मूळ ग्रीक शब्दापासून प्लास्टिक शब्द आला आहे. या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे ‘साचेबद्ध किंवा आकारबद्ध करता येण्याजोगा’. साचे बनवून प्लॅस्टिकच्या विविध वस्तूंची निर्मिती करता येते. यात ताटल्या, पेले, चमचे, बादल्या, टब, पाण्याच्या टाक्या यापासून ते पेन, पेनच्या रिफिल्स, खुर्च्या, टेबल, इमारती बांधकाम, कपडे, स्वयंचलित वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू यात लागणारे विविध भाग यांचा समावेश आहे. पेट्रोलियम पदार्थांपासून प्लास्टिकची निर्मिती केली जाते. एकाच प्रकारच्या रेणूंची (मोनोमर) साखळी बनवून प्लास्टिकचा रेणू (पॉलिमर) बनतो. जे रेणू नैसर्गिकरीत्या पॉलिमर स्वरूपात आढळतात, त्यात सेल्युलोज, स्टार्च, कायटीन, लिग्निन इत्यादी सेंद्रीय पदार्थांचा समावेश होतो. पहिल्या कृत्रिम पॉलिमरच्या निर्मितीचे श्रेय जॉन वेस्ली हियाट यांना जाते. त्यांनी १८६९ मध्ये हस्तिदंतासाठी पर्यायी पदार्थ निर्माण करण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता.
बिलियर्डस् हा खेळ त्या काळात खूप लोकप्रिय होता आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या चेंडूंसाठी हस्तिदंत वापरला जात असे. त्यामुळे हत्तींची होणारी बेसुमार कत्तल टाळण्यासाठी हस्तिदंताला पर्याय शोधला जात होता. कापसातील सेल्युलोज आणि कापूर यांचा वापर करून हियाट यांनी सेल्युलॉइड किंवा एक प्रकारचे प्लास्टिकच बनवले होते आणि त्याचा वापर हस्तिदंत, कासवाचे कवच आणि शिंग यांच्यासाठी पर्याय म्हणू करता येईल असे सुचवले होते. तसा हा शोध क्रांतिकारी म्हणावयास हवा. शिंगे, हस्तिदंत, कासव कवच आणि विविध धातू यांसारख्या मर्यादित स्वरूपात असणाऱ्या गोष्टींना आता कृत्रिमरीत्या आणि अमर्याद प्रमाणात बनवण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली होती. कासव आणि हत्ती यांचा रक्षणकर्ता म्हणून सेल्युलॉर्इडची त्या काळात जबरदस्त जाहिरातदेखील केली गेली होती.
१९०७ मध्ये लिओ बेकेलँड यांनी बेकेलाईट या संपूर्णपणे कृत्रिम प्लास्टिकची निर्मिती करण्यात यश मिळवले होते. निसर्गात आढळणाऱ्या कोणत्याही पदार्थाचा त्यांनी हे प्लास्टिक बनवताना वापर केला नव्हता. शेलॅक या तत्कालीन प्रचलित विद्युतरोधकास पर्यायी पदार्थ त्यांना हवा होता. बेकेलाईट उत्तम विद्युत रोधक तर होतेच, शिवाय टिकाऊ आणि उष्णताविरोधकदेखील होते. त्याची निर्मिती कोणत्याही नैसर्गिक पदार्थावर अवलंबून नसल्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे सहजशक्य होते. ‘‘एक हजाराहून अधिक उपयोग असणारे’’ अशी त्याची त्या काळात जाहिरात करण्यात आली होती. साचेबद्ध आणि आकारबद्ध करता येत असल्यामुळे त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करण्याच्या अनेक वाटा उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे अनेक उद्योग निर्माण झाले आणि प्लास्टिकचे युग सुरू झाले.
दुसऱ्या महायुद्धामुळे प्लास्टिक उद्योगांना सुगीचे दिवस आले. अमेरिकेत तर या उद्योगांचे पेवच फुटले होते. १९३५ मध्ये वॅलेस कॅरोथर यांनी नायलॉन किंवा कृत्रिम रेशीम शोधून काढले. त्याचा उपयोग लष्करात पॅराशूट, हेल्मेटसाठी अस्तर, बळकट दोरखंड आशा अनेकविध वस्तूंमध्ये होऊ लागला. या महायुद्धादरम्यान अमेरिकेतील प्लास्टिक उत्पादनात ३०० टक्के वाढ झाली होती!
गेल्या दीडशे वर्षांमध्ये माणसाने कृत्रिम पद्धतीने अनेक पॉलिमर्स बनवण्यात यश मिळवले आहे. विशेषतः पेट्रोलियम पदार्थांपासून अनेक प्रकारच्या पॉलिमर्सची निर्मिती करण्यात आली आहे. समान कड्यांनी बनलेल्या कार्बन अणूंच्या लांब लांब साखळ्या या पॉलिमर्समध्ये आढळतात. अधिक बळकट, कमी वजनाचे आणि लवचिक असलेल्या अनेक वस्तू त्यापासून बनवल्या जातात. दीर्घकाळ टिकणाऱ्या या वस्तू जनमानसात लोकप्रिय होण्यास वेळ लागला नाही. हुबेहूब नैसर्गिक फुलांसारखी दिसणारी फुले, देवतांच्या मूर्ती, शोभेच्या वस्तू या सर्वांनी विविध ठिकाणचे बाजार भरून टाकले आहेत. स्वयंपाक घर, दिवाणखाना, नहाणीघर, बाल्कनी, अभ्यासाच्या खोल्या, झोपायच्या खोल्या, कार्यालये, विमानतळ, स्टेशन्स, बसस्थानके इत्यादी सर्व खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिकचे साम्राज्य पसरले आहे.
प्लास्टिकच्या उत्पादनांचे वैविध्य आणि त्यातील नावीन्य यामुळे त्यांचे बाजारमूल्य वाढीस लागले. स्टील, पितळ आणि तांबे या धातूंना स्वयंचलित वाहन उद्योगात, कागद आणि काच यांना पॅकेजिंग उद्योगात आणि लाकडाला फर्निचर व्यवसायात प्लास्टिक हाच एकमेव पर्याय ठरला होता. प्लास्टिकची ही यशोगाथा नक्कीच महत्त्वाची आहे आणि प्रदूषणाचा विचार करताना, तो या यशोगाथेच्या पार्श्वभूमीवरच आपल्याला करावा लागेल.
महासागरांच्या प्रदूषणामुळे १९६० च्या सुमारास प्लास्टिकच्या सार्वभौमत्वाला पहिला धक्का लागला. रॅकेल कार्सन यांच्या १९६२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकाने, पर्यावरणास निर्माण होत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांच्या धोक्याची जाणीव करून दिली. १९६९ मध्ये कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर पॅसिफिक महासागरात झालेल्या मोठ्या तेलगळतीमुळे ओहायो या राज्यातील कुयाहोगा नदीचे प्रदूषण आणि त्यामुळे लागलेली आग यामुळे वाढत्या प्रदूषणाचा धसका घ्यायला सुरुवात झाली. त्यानंतर प्लास्टिकचे दुष्परिणाम दिसण्यास सुरुवात झाली.
७० आणि ८० च्या दशकांमध्ये प्रगत आणि विकसनशील देशांमध्ये जनमानसात प्लास्टिकच्या वापराबद्दल संभ्रम निर्माण होऊ लागला. पुराणातील राक्षस तपश्चर्या करून देवांकडून वर मिळवत आणि मग त्या वरांच्या जोरावर दहशत निर्माण करीत असत. नेमका हाच प्रकार प्लास्टिकच्या बाबतीत घडत होता आणि त्यातून निर्माण झालेल्या भस्मासुराने सर्वत्र प्रदूषण करीत, मोठीच दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. पण समाजाच्या विशिष्ट स्तरापर्यंतच ही दहशत मर्यादित राहिली. ‘वापरा आणि फेका’ किंवा ‘एक वेळ वापर करण्यासाठी’ या पद्धतीची उत्पादने बाजारात मोठ्या प्रमाणावर येत राहिली. वाढदिवस, लग्न, मुंजी आणि इतर अनेक प्रकारच्या समारंभांमध्ये प्लास्टिकच्या उत्पादनांनी धुमाकूळ घातलेला आहे आणि तो अजूनही वाढतच चाललेला आहे.
फ्रान्स देशातील अतिशय शुद्ध हवामान असलेल्या पायरिणी पर्वतावर समुद्रसपाटीपासून ४५०० फूट उंचीवर हवेत तरंगणारे प्लास्टिकचे बारीक कण (०.०२५ ते ०.३ मिलिमीटर व्यासाचे) दर दिवशी दर चौरस मीटरला ३६५ या आश्चर्यकारक मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. पाच महिने रोज ही मोजणी सुरू होती. त्यासाठी शास्त्रज्ञांनी मोठ्या नरसाळ्यांना जोडलेली वायुपात्रे हे कण गोळा करण्यासाठी वापरली होती. संशोधन गटाचे प्रमुख स्कॉटलंडमधील स्ट्रँथक्लाईड विद्यापीठातील डॉ. स्टीव्ह एलन यांच्या मते फ्रान्ससारख्या प्रगत देशामध्ये हे होत असेल तर परिस्थिती भीषण आहे, असेच म्हणावे लागेल. आजपर्यंत प्लास्टिकच्या सूक्ष्मकणांचा समावेश प्रदूषक यादीत नव्हता; पण २०१९ च्या अभ्यासानंतर मात्र तो समावेश करण्यात आला आहे. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये असे प्रदूषण होत असेल, तर त्याचा मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होऊ शकतो.
नाकावाटे जरी हे कण शरीरात जायची शक्यता नसली, तरी या कणांचे वेगवान वाऱ्यांमध्ये आणखी अतिसूक्ष्म कणांमध्ये रूपांतर झाले, तर मात्र ते फुफ्फुसात जाऊन बसू शकतात. वाऱ्याबरोबर हे कण किती लांब जाऊ शकतात याविषयी अजून फारशी माहिती नाही; पण सहारा वाळवंटातून येणारे वाळूचे सूक्ष्म कण हजारो किलोमीटरवर जाऊ शकतात ही माहिती सिद्ध झालेली आहे. प्लास्टिकच्या सूक्ष्मकणांचे वजन लक्षात घेता ते कित्येक हजार किलोमीटर प्रवास वाऱ्याबरोबर करू शकतील, असे सामान्यज्ञान नक्कीच सांगते.
तपकीर ओढणाऱ्या लोकांच्या फुफ्फुसात तपकिरीचे कण जाऊन बसायचे. अहमदनगरला आमच्या वाड्यात असलेल्या आजोबांच्या फुप्फुसामधून सुमारे ५० वर्षांपूर्वी डॉक्टरांनी अर्ध्या किलोहून अधिक तपकीर शल्यक्रिया करून बाहेर काढली होती हे मला स्पष्टपणे आठवते! त्यामुळे या प्लास्टिक कणांच्या बाबतीत तसे होऊ शकते. तसे होत राहिले तर आपल्याला कोरोना विषाणू रोखण्यासाठी जो एन-९५ मास्क घालावा लागत आहे, तो चोवीस तास वापरण्याची वेळ येऊ शकते! कारण या कणांचा धोका महामारीपुरता मर्यादित न राहाता कायमस्वरूपी असणार आहे.
शिवाय हे कण जर जलाशयांवर आणि अन्नावर स्थिर झाले, तर अन्न-पाण्यातून अन्नसाखळीत येऊ शकते. साधारण एका क्रेडिट कार्डात जेवढे प्लास्टिक असते, तेवढे रोज वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या शरीरात प्रवेश करते. आपल्या शरीराची उत्सर्जक संस्था ही त्यातील बहुतांशी प्लास्टिक कण बाहेर फेकू शकली, तरी ते कण शरीरात फिरताना नेमके कुठे घातक ठरतील किंवा कुठे ते साचून राहातील यावर त्यांचे दुष्परिणाम अवलंबून असतील. जोपर्यंत संशोधनातून ते डॉक्टरांच्या अभ्यासक्रमात येत नाहीत, तोपर्यंत ते अज्ञात असतात. त्यामुळे तारतम्याने आपल्याला प्लास्टिकच्या सूक्ष्मकणांचे प्रदूषण कसे टाळता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
सागरी प्रदूषण हे सागरी सजीवसृष्टीसाठी मोठा धोका असतो. फुगे, कोळ्यांच्या मासे पकडण्याच्या जाळ्या, बोटीतील टाकाऊ प्लास्टिकच्या वस्तू, जहाजातून गळती होणारे पेट्रोलियम क्रूड तेल, नदीतून वाहत येणारा प्लास्टिकचा कचरा, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, बाटल्यांची झाकणे इत्यादी गोष्टी फार मोठ्या प्रमाणावर सागरात पोहोचतात. या सर्व गोष्टी कमी-अधिक प्रमाणात व्हेल, कासवे, डॉल्फिन, शार्क आणि अन्य समुद्रजीवांच्या पोटात पोहोचतात.
कॉमनवेल्थ वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्या अभ्यासातून असे दिसते, की २०५० पर्यंत एकूण सागरी सजीवांच्या ९९ टक्के प्राण्यांमध्ये प्लास्टिकचे अंश नक्कीच असतील. त्यामुळे त्यांच्या शरीरावर वेगवेगळे दुष्परिणाम होतील. त्यांच्या संख्येतही घट होईल. प्लास्टिकच्या कोट्यवधी तुकड्यांमुळे तथाकथित एक फार मोठा बेटासारखा तराफा निर्माण होऊन तो पॅसिफिकच्या पृष्ठभागावर तरंगत आहे. या प्लास्टिकच्या बेटाचे क्षेत्रफळ फ्रान्स देशाच्या तिप्पट असल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नसेल कदाचित, पण जगाच्या इतर महासागरांमध्ये असेच प्रदूषण सातत्याने होत आहे. जगातील सर्वांत जास्त प्लास्टिक प्रदूषित नद्यांमध्ये यांगत्से या चीनमधील नदीचा पहिला क्रमांक लागतो. सुमारे १४ ते १५ लाख टन प्लास्टिक या नदीतून सागराला मिळते. ‘जिथे सागरा नदी मिळते, तिथे ती प्रदूषणमुक्त होते’ असे म्हणावयास हरकत नाही! सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या दोन भारतीय नद्या या प्रदूषित नद्यांच्या यादीत अगदी वरच्या पाच क्रमांकांत आहेत.
आपण आपल्या वसुंधरेचे रूपांतर प्लास्टिक ग्रहात करीत आहोत. १९५० पासून प्लास्टिकच्या निर्मितीस सुरुवात झाली, त्या वेळी त्या वर्षी २० लाख टन प्लास्टिकची निर्मिती करण्यात आली होती. १९७६ मध्ये हा आकडा पाच कोटी टन, १९८९ मध्ये १० कोटी टन, २००२ मध्ये २० कोटी टन; तर २०१३ मध्ये ३० कोटी टनापर्यंत पोहोचला होता. २०१५ मध्ये आपण ३२ कोटी टन, २०१६ मध्ये ३४ कोटी टन, २०१७ मध्ये ३५ कोटी, २०१८ मध्ये ३६ कोटी टन आणि २०१९ मध्ये ३७ कोटी टन प्लॅस्टिकची निर्मिती केली आहे. गेल्या ७० वर्षांमध्ये ८३० कोटी टन प्लास्टिकची निर्मिती जगात झाली आहे. हा आकडा फार मोठा आहे.
यातील निम्म्याहून अधिक प्लास्टिक हे डम्पिंगयार्डस् आणि ठिकठिकाणी विखुरलेले आहे. सरासरी दरवर्षी ३५-३६ कोटी टन उत्पादनाचा हा आकडा कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. यातील निम्म्याहून अधिक उत्पादन हे वापरा आणि फेका किंवा एक वेळ वापरण्याच्या प्लास्टिकचे आहे. माणसाने स्वतःची संख्या तर प्रचंड वाढवली, त्याचबरोबर स्वतःच्या गरजादेखील प्रचंड प्रमाणात आणि विस्तारित स्वरूपात वाढवल्या आहेत. त्यामुळे सर्वच आता गरजेच्या गोष्टी झाल्या आहेत. पूर्वी गरजा कमी होत्या, त्या वेळी कचऱ्याचे प्रमाणदेखील नगण्य होते. जशा गरजा वाढत चालल्या आहेत, तसतसे हे प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाणदेखील वाढते आहे.
दरवर्षी सुमारे ५०० अब्ज प्लास्टिकच्या बाटल्या निर्माण केल्या जातात. हे प्रमाण कमी करण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही. यांचे विघटन होत नाही. पुनर्चक्रांकण करण्याची मानसिकता नाही. मग प्रदूषण रोखणार तरी कसे? अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये मिळून दरवर्षी ५५ कोटी प्लास्टिक स्ट्रॉ वापरल्या जातात. जोवर माणसे स्वतःच्या पलीकडे जाऊन या प्रदूषणाचा विचार करणार नाहीत, तोवर या प्रदूषणावर उपाय सापडणे अवघड आहे. पॉलिएथिलीन टेरेफ्थालेट (PET) या प्रकारचे प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट ट्रे, डिस्पेन्सर यासाठी वापरले जाते. उच्च घनतेचे पॉलिएथिलीन (HDPE) हे शाम्पू बाटल्या, दुधाच्या बाटल्या, फ्रीझर बॅग्ज इत्यादींसाठी वापरले जाते.
कमी घनतेचे पॉलिएथिलीन (LDPE) हे प्लास्टिकच्या पातळ पिशव्या आणि अन्न पदार्थ गुंडाळण्यासाठी वापरतात. पॉलिप्रॉपिलीन या प्रकारचे प्लास्टिक मायक्रोवेव्ह डिशेस, बाटल्यांची झाकणे आणि फेस मास्कसाठी वापरले जाते. पॉलिस्टिरिन या प्रकारच्या प्लास्टिकचा उपयोग कटलरी म्हणजे स्वयंपाकघरात वापरण्यासाठी डिश, वाट्या, बाऊल्स वगैरेसाठी केला जातो.
एका शास्त्रीय अभ्यासानुसार महासागरांमध्ये ५००० कोटी प्लास्टिकचे सूक्ष्म कण तरंगत आहेत. यातील कित्येक कोटी सूक्ष्मकण अन्नसाखळीतून सजीवसृष्टीत जमा होत आहेत. पाण्याच्या बाटल्या, पॅकेजिंग प्लास्टिक, प्लास्टिक कप, डिशेस, चमचे, प्लास्टिक पिशव्या यातूनच या सूक्ष्मकणांची निर्मिती होत राहते. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक जण या प्लास्टिक सूक्ष्मकणांच्या निर्मितीत समान भागीदार आहे.
प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी पिण्याऐवजी प्रत्येकाने घरी तांब्या भांडे वापरलेच पाहिजे. कार्यालयांमधून, शाळा-महाविद्यालयातून, समारंभांमधून, वसतिगृहातून म्हणजे जिथे शक्य असेल तेथून या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या हद्दपार करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. प्लास्टिक डिशेस, चमचे, पेले, डबे यांची गछन्तिसुद्धा सुजाण नागरिकांच्या घरातून आणि आयुष्यातूनच होणे गरजेचे आहे. बाजारातून भाजी आणताना आणि किराणा सामान आणताना प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता फक्त कापडी पिशव्या वापरण्याची प्रतिज्ञा प्रत्येकाने घेऊन ती मरेपर्यंत पाळली पाहिजे.
या प्लास्टिक डिस्पोजेबल वस्तू हा मानवतेला मिळालेला शाप आहे. या वस्तूंचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे. औषधांच्या बाटल्या, डोसेजसाठी वापरले जाणारे कप्स, इंजेक्शन सिरिंजेस, इतर प्लास्टिकची वैद्यकीय उपकरणे यांच्या वापरांवर आपले वैयक्तिक नियंत्रण असणे शक्य नसते. त्यामुळे कायद्याच्या स्वरूपात इथे सरकारी हस्तक्षेप आवश्यक आहे. प्लास्टिकचा हॉटेल उद्योगांमध्ये, प्रवासामध्ये आणि खेळाच्या मैदानावर कमीत कमी वापर कसा करता येईल, या दृष्टीने नियमावली बनवून त्यांचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे.
प्लास्टिकचे सूक्ष्मकण हे रासायनिकदृष्ट्या चिकट असल्यामुळे त्यांना पारा, शिसे यासारख्या अतिधोकादायक जड धातूंचे कण, तसेच हवेतील नॅफथिलीन, अंथरासिन यासारख्या पॉलिएरोमॅंटिक हायड्रोकार्बनचे बारीक कण चिकटून बसू शकतात. या जोडगोळ्या म्हणजे दीर्घ मुदतीच्या गंभीर आजारांना निमंत्रण दिल्यासारखेच आहे. अस्थमा, मेंदूवर आणि बुद्धिमत्तेवर होणारे परिणाम यासारखे आजार माणसाची इच्छाशक्ती कमी करतात. बहुतेक देशांमध्ये हवेतील दहा मायक्रॉन्सपेक्षा अधिक मोठ्या कणांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. प्लास्टिकचे सूक्ष्मकण याहीपेक्षा लहान असले, तरी त्यांच्या नियंत्रणासंबंधी वेगळे कायदे व उपाययोजना आपल्याला कराव्या लागणार आहेत. या सूक्ष्मकणांचे हवेतील प्रमाण कमी राखणे हे फार मोठे आव्हान आपल्यासमोर नजीकच्या भविष्यात उभे ठाकणार आहे हे मात्र नक्की.
रस्ते बनवण्यासाठी जेव्हा पुनर्चक्रांकित स्वरूपात प्लास्टिकचा वापर या सूक्ष्मकणांना आमंत्रण देणारा ठरू शकेल. जर या सूक्ष्मकणांचे अस्तित्व सर्वदूर जाणवत असेल, तर याच प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण (नॅनो कण) देखील वातावरणात सर्वत्र असण्याची शक्यता मोठी आहे. त्यांचाही सजीवांच्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होऊ शकतो. सूक्ष्मकणांपेक्षा अतिसूक्ष्मकण हे अधिक क्रियाशील असतात. एका टाचणीच्या टोकावर एका वेळी १०० कोटी अतिसूक्ष्म कण मावू शकतात. म्हणजे यांची व्याप्ती कोरोना विषाणूंपेक्षा अधिक असू शकते. हे अतिसूक्ष्म कण एका सजीव पेशीच्या भित्तिकेतून दुसऱ्या पेशीत सहज प्रवेश मिळवू शकतात. याचे अन्नसाखळीत नेमके काय परिणाम होणार आहेत, याचे उत्तर काळच देऊ शकेल.
प्लास्टिकच्या कचऱ्याची दोन मोठी निर्माणस्थळे आहेत. विमान सेवा आणि हॉटेल सेवा या दोन ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर होतो. त्या दोन्ही ठिकाणी काही मूलभूत बदल घडवून आणण्याची गरज आहे. हॉटेलच्या खोल्यांमध्ये आणि विमानांमध्ये पाण्याच्या बाटल्या पूर्ण बंद केल्या पाहिजेत. रेल्वे स्टेशन्स आणि बस प्रवासासाठी हाच नियम लावावा लागणार आहे. हॉटेल्समध्ये प्रत्येक ग्लासला सिलोफेन पेपर गुंडाळला जातो. ते थांबवले पाहिजे.
शॉवर जेल बारक्या बारक्या प्लास्टिक बाटल्यांमधून देणे बंद करून डिस्पेन्सर ठेवला तर या बाटल्यांची किंवा पाऊचेसची संख्या शून्य करता येऊ शकते. प्रत्येक हॉटेलच्या खोलीत टूथब्रश, डिस्पोजेबल रेझर देणे बंद केले पाहिजे. कदाचित ग्राहकांचा रोष त्यामुळे ओढवून घेतला जाईल, पण जगाच्या कल्याणासाठी सर्वांनीच हे नियम आपणहून स्वीकारले पाहिजेत.
भारतातील प्रत्येक शहरात आणि गावात रस्त्यांवर दुतर्फा दिसणारे प्लास्टिकचे ढीग अस्वस्थ करून सोडतात. उकिरड्यांवर फेकलेले अन्न आणि प्लास्टिक यांच्यामुळे तयार झालेल्या बकाल आणि अतिशय गलिच्छ वातावरणात जनावरे चरत असतात, ते पाहून मन अगदी उद्विग्न होते. प्रत्येक जनावराच्या पोटात किलोकिलोंनी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या जात असतात, त्यांचे जिणे असह्य करीत असतात, पण त्याची फिकीर सामान्य जनतेला नसतेच. भाजीवाल्याकडे प्रत्येक भाजीसाठी वेगळी प्लास्टिकची पिशवी मागणारी व्यक्ती ही सुशिक्षित असेल कदाचित, पण ती सुसंस्कृत नसते असे नक्की म्हणता येईल.
बाजारात जाताना स्वतःची कापडी पिशवी नेली तर अशा सुशिक्षित पण असंस्कृत लोकांच्या प्रतिष्ठेला फार मोठा धक्का बसतो. वास्तविक अशा लोकांनी आपल्या उदाहरणावरून समाजाला शिकवले पाहिजे. एका साडीच्या कमीत कमी ५० पिशव्या बनतात आणि या ५० पिशव्या आयुष्यभर पुरतात. एका पॅण्टच्या चारपाच तरी पिशव्या बनतात. ६०-७० च्या दशकामध्ये भारतातील ७०-८० टक्के घरांमध्ये या कापडी पिशव्या असायच्याच. भाजी आणण्यासाठी, किराणा आणण्यासाठी, शाळेसाठी, डब्यासाठी याच पिशव्या वर्षानुवर्षे वापरल्या जायच्या. आता मात्र प्रत्येक घरात बाहेरून आठवड्याला कमीत कमी १०-१५ तरी प्लास्टिकच्या पिशव्या येतात. ‘ना खंत ना खेद’ या अलिप्त भावनेने या सर्व पिशव्या सहजपणे फेकूनही दिल्या जातात. त्यामुळे घरांच्या पाठीमागे उकिरडे बनतात.
प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये उरलेले किंवा टाकलेले अन्न भरून, तिचे तोंड बांधून मग ती केराच्या बादलीत टाकली जाते किंवा कचराकुंडीच्या बाहेर फेकली जाते. कचराकुंडीवर जगणारी जनावरे मग अन्नाच्या आशेने या भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्याच खाऊन टाकतात. एकेका गाईच्या पोटात पाच-पाच किलो प्लास्टिक असते.
ही कहाणी एका गावाची नसून, भारत नावाच्या एका देशाची आहे. गोमाता म्हणून पूजा करणारे हेच नागरिक प्रदूषण लढ्यात सर्वांत पुढे असतात, पण आपल्या घरातून या पिशव्या येऊन पडतात, हे बघण्यासाठी त्यांना वेळ नसतो. वास्तविक अन्न वाया घालवणे हे मानवी संस्कृतीत बसत नाही. तयार अन्न टाकून देणे किंवा फेकणे म्हणजे ते अन्न बनवणाऱ्या घरातील अन्नपूर्णेचा अपमान असतो, ज्याच्या कष्टाने ते तुमच्यापर्यंत आले त्या शेतकरी दादाचा अपमान असतो आणि ज्या वसुंधरेने शेताची जोपासना अनंत काळ केली आहे, त्या वसुंधरेचाही अपमान असतो. पण निगरगट्ट झालेल्या या आपल्या समाजाला, आपण या तीन अपमानांच्या रूपात अपराध करीत आहोत याची जाणीवदेखील नसते, हा दैवदुर्विलास आहे.
भारतासारख्या गरीब समजल्या जाणाऱ्या देशात ३० टक्क्यांहून अधिक कचरा हा फक्त शिजवलेल्या अन्नाचा असतो. २० कोटी लोकांना एक वेळचे जेवण देता येईल इतके तयार अन्न आपण फेकतो. उकिरड्यांवर जी भयानक परिस्थिती असते, ती फक्त अन्न आणि प्लास्टिक या फोन घटकांमुळेच होत असते, पण लक्षात कोण घेतो?
प्लास्टिकचे पुनर्चक्रांकण होऊ शकते; पण होणे आणि होऊ शकणे यात जे अंतर आहे त्याचे कारण आपली मानसिकता हेच आहे. पुनर्चक्रांकण करण्यासाठी प्लास्टिकचे टाकाऊ पदार्थ काळजीपूर्वक वर्गीकरण करूनच पाठवले पाहिजेत, हा मूलभूत नियम आहे. किती भारतीय नागरिक टाकाऊ पदार्थांचे योग्य पुनर्चक्रांकण करून, आपल्या घराला शून्य कचरा असलेले घर असे म्हणू शकतील? सकाळी नागरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या गाडीत ज्यांच्या घरातून कचरा दिलाच जात नाही, तेच फक्त ‘शून्य कचरा घर’ या पदवीसाठी पात्र असतात. सर्वसाधारणपणे एक ते दोन किलो कचरा शहरातील प्रत्येक घरातून या गाडीत एकत्रित स्वरूपात टाकला जातो.
खरकटे, शिळे आणि टाकून दिलेले अन्न, फळांच्या आणि भाज्यांच्या साली, देठ, खराब झालेल्या भाज्या, खराब झालेले धान्य, प्लास्टिकच्या पिशव्या, पॅकबंद किराणा मालाच्या पिशव्या, बिस्किटे, ब्रेड वगैरेची वेष्टने, चहा-कॉफी, पेस्ट, साबण इत्यादींची खोकी, दुधाच्या न धुतलेल्या पिशव्या अशा अनेकविध गोष्टींनी भरलेली केराची बादली कधी एकदा घराच्या बाहेर टाकतो, अशी प्रत्येक घरात घाई होत असते. हा सर्व कचरा नगरपालिकेच्या गाड्या डम्पिंग यार्डवर नेऊन रिकाम्या करतात. आमच्या देशाचे बहुतांशी कचरा नियोजन हे असे आहे. यात बदल होणे अवघड आहे, कारण हा मानसिकतेचा प्रश्न आहे. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत यात बदल होणे अवघड आहे. जर ‘शून्य कचरा घर’, ‘शून्य कचरा गृहनिर्माण संस्था’, ‘शून्य कचरा शाळा’, ‘शून्य कचरा कार्यालय’, ‘शून्य कचरा वसतिगृह’, ‘शून्य कचरा नगरपालिका’ अशा कल्पना प्रत्यक्षात आल्या, तर ‘शून्य कचरा भारत देश’ ही कल्पना वास्तवात येण्यास वेळ लागणार नाही.
वास्तविक पाहता कचऱ्यावर गुजराण करणारी जवळजवळ लाखाहून अधिक घरे एकट्या मुंबई शहरात आहेत. डम्पिंग यार्डवर जाऊन तिथे घाण उपसत त्यातील पुनर्चक्रांकण करता येण्यासारख्या गोष्टी गोळा करून त्या कबाडीवाल्याला मिळेल त्या किमतीत विकणारी ही कचरावेचक मंडळी समाजाकडून अवहेलनाच सोसत असतात. निसर्गात कचरा हा शब्दच नसतो. प्रत्येक गोष्ट हा कशाचा तरी स्रोत असतो. या शास्त्रीय नियमाचे पालन हे कचरावेचक लोक करीत असतात; पण आपण त्यांची मदत करण्याऐवजी त्यांच्याकडे तुच्छतेने पाहण्यातच धन्यता मानतो. जर कोरडा कचरा वेगळा ठेवून तो यांच्याकडे सुपूर्द केला तर त्यांचेही जिणे सुसह्य होईल, त्यांना बऱ्यापैकी पैसे मिळतील आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा कोरडा कचरा डम्पिंगवर जाणारच नाही. डम्पिंगची व्याप्ती कमी करीत शून्य करण्याचा हा एकमेव उपाय आहे. तो जितक्या लवकर आणि जितके अधिक लोक अमलात आणतील, त्यानुसार भारत देश स्वच्छ होईल.
७० आणि ८० च्या दशकामध्ये प्लास्टिक कचरा जसजसा वाढू लागला, तसतशी समाजात अस्वस्थता निर्माण होऊ लागली होती. प्लास्टिकची भरपूर उत्पादने बाजारात होती, त्यामुळे टाकाऊ प्लास्टिकचे नेमके काय करायचे? या प्रश्नाला संयुक्तिक उत्तर मिळत नव्हते. पर्यावरणात दूरदूरवर प्लास्टिकचे तुकडे सापडत होते. त्यांचे नैसर्गिक विघटन होणे अशक्य कोटीतील आहे असे लक्षात येऊ लागले. हा असंतोष लक्षात घेऊन प्लास्टिक उत्पादकांनी त्याच्या पुनर्चक्रांकणासाठी पुढाकार घेतला. ही चळवळ भारतात येण्यास अजून वीस वर्षे लागली! तोपर्यंत पर्यावरणात प्लास्टिकच्या टाकाऊ गोष्टींनी हलकल्लोळ माजवला होता.
नगरपालिकांनी पुनर्चक्रांकणासाठी योग्य प्लास्टिक गोळा करून ते प्लास्टिक उत्पादकांकडे द्यावे, असेही प्रयत्न सरकारी पातळीवरून सुरू झाले. विशिष्ट प्रकारच्या पातळ प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली; पण पुनर्चक्रांकण या संकल्पनेला फारसा प्रतिसाद मिळत नाही ही सत्य परिस्थिती आहे. युनायटेड नेशन्सच्या पर्यावरण विभागाच्या अंदाजानुसार एकूण प्लास्टिक कचऱ्याच्या फक्त सात ते दहा टक्के कचऱ्याचे, जागतिक स्तरावर पुनर्चक्रांकण होत आहे. ही परिस्थिती आणि वाढते प्लास्टिक उत्पादन यामुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक महासागरांवर प्लास्टिकच्या तरंगत्या गोष्टींमुळे बेटे तयार झाली आहेत. या बेटांमुळे प्रदूषणाची व्याप्ती पृथ्वीवर सर्वत्र पसरली आहे.
प्लास्टिक उत्पादने बनवताना मानवी आणि एकूणच सजीवांच्या आरोग्याला धोकेही निर्माण होत आहेत. प्लास्टिक वस्तू टिकाऊ, पारदर्शक आणि लवचिक होण्यासाठी त्यात बिसफेनॉल्स आणि थालेट (phthalates) या गटातील काही रसायने घातली जातात. ही रसायने अन्नात, पाण्यात आणि एकूणच पर्यावरणात या प्लास्टिकद्वारे उतरतात आणि मानवी आरोग्यासाठी ते घातक आहेत. विषेशतः जेव्हा या प्रदूषणाने जलसाठे आणि माती प्रदूषित होते, त्या वेळी सर्वच मानव जातीच्या आरोग्याला फार मोठा धोका निर्माण होत असतो. संप्रेकरकांच्या कार्यात ही रसायने अडथळे आणतात. पुढच्या पिढ्यांवर त्यांचे विदारक परिणाम होण्याची वाट पाहण्यापेक्षा या प्रदूषणाशी आपण सर्वांनी लढणे आवश्यक आहे.
‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ या म्हणीप्रमाणे प्लास्टिक आणि आपले संबंध झाले आहेत. संगणक, मोबाईल फोन, वैद्यकीय क्षेत्रातील जीवनसुरक्षा उपकरणे यांना त्या प्रमाणावर आणि पर्यावरणपूरक पर्याय शोधणे सोपे काम नाही. वजनाने हलकी असल्यामुळे आणि उष्णताविरोधी गुणधर्मामुळे जीवाष्म इंधनाची वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकची उत्पादने वापरली जातात. वर उद्धृत केल्याप्रमाणे घरात प्लास्टिकचा वापर अनिवार्य झालेला आहे. शेती उद्योगात प्लास्टिक उत्पादनांचा वापर अतिशय वाढत चाललेला आहे.
नैसर्गिक स्रोतांची कमतरता, वाढती लोकसंख्या, वाढत्या गरजा आणि विविध क्षेत्रांमधील विविध उत्पादनांसाठी ‘ऑल इन वन’ किंवा एकमेवाद्वितीय म्हणजे प्लास्टिक! अशा परिस्थितीत प्लास्टिकवर सरसकट बंदी न घालता, सारासार विचारबुद्धी वापरून, त्याचा नियंत्रित स्वरूपात वापर करणे, त्याच्या पुनर्चक्रांकणाची व्याप्ती आणि प्रमाण वाढवणे आणि अनावश्यक व पातळ प्लास्टिक वस्तूंवर पूर्ण बंदी घालणे या उपायांमधूनच प्लास्टिकच्या भस्मासुराचे नियंत्रण होणार आहे. प्लास्टिक हे शाप की वरदान हे आपणच ठरवायचे आहे.
(लेखक पद्मश्री पुरस्काराने सन्मानित वैज्ञानिक असून, भाभा अणुसंशोधन केंद्रातून निवृत्त झाले आहेत.