अशांत आफ्रिका | Global News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अशांत आफ्रिका}

अशांत आफ्रिका

सारंग खानापूरकर

अफगाणिस्तानमधील परिस्थितीमुळे जगाचे सर्व लक्ष या देशाकडे आणि एकूणच दहशतवादाच्या मुद्याकडे खेचले गेले असले तरी जगात केवळ हाच एक संघर्षग्रस्त भाग नाही. आधीच गरिबीने पिचलेल्या आफ्रिका खंडातील अनेक देशांमध्ये संघर्षाची आणि तणावाची स्थिती आहे. जगाच्या एक सप्तमांश लोकसंख्या असलेल्या या खंडात विस्थापितांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या खंडाचा विकास दर पाच टक्क्यांपेक्षाही कमी असूनही विकसित देशांचे त्यांच्याकडे लक्ष नाही. केवळ भूराजकीय फायदा असलेल्या देशांकडेच लक्ष देण्याच्या आणि तेथील राजकारणात हस्तक्षेप करण्याच्या त्यांच्या धोरणांमुळे आफ्रिका खंड आणि तेथील अराजकता दुर्लक्षित राहिली आहे. या खंडातील संघर्षग्रस्त देशांमधील परिस्थितीचा हा थोडक्यात आढावा :

इथिओपिया (पूर्व आफ्रिका)

इथिओपियामध्ये गेल्या वर्षभरापासून अंतर्गत संघर्ष सुरु आहे. वांशिक आणि प्रादेशिक पक्षांची एकजूट करण्यासाठी पंतप्रधान अबिय अहमद यांनी आघाडी स्थापन केली. इथिओपियाच्या राजकारणावर २७ वर्षांपासून वर्चस्व असलेल्या टिग्राय पीपल्स लिबरेशन फ्रंटला ही बाब खटकली आणि त्यांनी अहमद यांचं सरकारच बेकायदा असल्याचं जाहीर करत सरकारविरोधात बंड केलं. टिग्राय भागावर वर्चस्व मिळवत त्यांनी सरकारी फौजांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यांना त्याच भाषेत प्रत्त्युत्तरही मिळत आहे. सुरुवातीला सरकारची सरशी होत असताना आता पुन्हा एकदा बंडखोरांनी एकेक शहर ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांना मनाई असल्याने रक्तपाताची निश्‍चित कल्पना नसली तरी या संघर्षात हजारो लोकांचा मृत्यू झाला असून वीस लाख लोक विस्थापित झाले आहेत. या अस्थिरतेमुळे देशात अन्नधान्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या संघर्षाला सरकार आणि बंडखोर एकमेकांना दोषी ठरवत आहेत. या काळात देशात प्रचंड प्रमाणात हत्याकांड, सामूहिक बलात्कार, बेकायदा अटकसत्र, वांशिक हल्ले असे प्रकार घडले. टिग्राय समुदायाच्या प्रत्येक घरातील किमान एकाचा या संघर्षात मृत्यू झाला आहे. संघर्ष संपविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांवर दबाव वाढत असला तरी अद्याप तोडगा निघण्याची चिन्हे नाहीत.

हेही वाचा: एकाच गावात राज्यातील सर्व गडकिल्ले!

माली (पश्‍चिम आफ्रिका)

लीबियामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर आफ्रिकेतील साहेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात संघर्ष उफाळून आला आहे. या भागातील माली देशात २०१२ मध्ये झालेल्या उठावानंतर निर्माण झालेली संघर्षग्रस्त परिस्थिती अद्यापही निवळलेली नाही, उलट ती आणखीनच बिघडत गेली आहे. देशाच्या उत्तर भागातील सशस्त्र गटांनी बंडखोरी करत तो भाग स्वतंत्र करण्याची मागणी केली असून त्यासाठी त्यांनी सरकारी फौजांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. ही परिस्थिती हाताळण्यात अपयश आलेल्या अध्यक्षांचीही हकालपट्टी झाली. वर्षभराच्या संघर्षानंतर फ्रान्सने हस्तक्षेप करत शांतता करार घडवून आणला होता. मात्र, बंडखोरांनी हा करार नंतर अमान्य केला. देशावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने सशस्त्र गटांवर कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्याने हिंसाचार बोकाळला आहे. गरीबी आणि बेरोजगारी यामुळे या सशस्त्र गटांना मानवी रसद मिळतच आहे. या देशातील संघर्षाची झळ शेजारील देशांनाही बसत आहे.

बुर्किना फासो (पश्‍चिम आफ्रिका)

गेल्या काही वर्षांपासून आफ्रिकेतील बुर्किना फासो या छोट्या देशात अनेक सशस्त्र गट आणि दहशतवाद्यांकडून हिंसाचार सुरु आहे. देशाच्या अनेक भागांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसून सैन्याचे अस्तित्व नावापुरतेच उरले आहे. आफ्रिकेतील संघर्षग्रस्त साहेल भागात बुर्किना फासोचा समावेश होतो. शेजारील देशांमधील हिंसाचाराची झळ या देशाला बसल्याने २०१५ पासून येथे अस्थिरता आहे. अनेक वर्षांच्या अस्थिरतेमुळे येथे ‘इसिस’, ‘अल शबाब’ या सारख्या दहशतवादी संघटनांनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे. संघर्षाचा परिणाम म्हणून या देशातील दहा लाख लोक विस्थापित झाले आहेत. हजारो लोक आतापर्यंत मारले गेले आहेत.

हेही वाचा: टेलिस्कोपची दुनिया!

येमेन (आखाती देश)

या देशात २०१४ पासून अंतर्गत यादवी सुरु आहे. अब्द्रुब्बा मन्सूर हादी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि हौथी बंडखोर यांच्यातील मुख्य संघर्षांला इतर अनेक संघर्षांची जोड मिळाल्याने या देशात अराजकतेची स्थिती आहे. दोन्ही बाजूंनी, आपलेच सरकार वैध असल्याचा दावा केल्याने देशाची दोन गटांत विभागणी झाली आहे. या शिवाय, हादी सरकारला सौदी अरेबिया आणि हौथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा मिळाल्याने परिस्थिती आणखी चिघळली आहे. २०१५ मध्ये हौथी बंडखोरांनी राजधानी सानाचा ताबा मिळविला आणि नंतर बऱ्याच भूभागावर वर्चस्व मिळवले. देशाचे अध्यक्ष हादी परागंदा झाले. मात्र, सौदी अरेबियाने हादी यांना पुन्हा सत्तेवर बसविण्यासाठी हवाई हल्ले केले. सध्या साना शहरावर आणि देशाच्या उत्तर भागावर बंडखोरांचा ताबा असून ते हादी समर्थक सैन्याशी लढत आहेत. इराणही हौथी बंडखोरांच्या आडून सौदी अरेबियावर ड्रोन हल्ले करण्यासाठी येमेनच्या भूमीचा वापर करत असल्याने संघर्षात तेल पडत आहेत.

लीबिया (उत्तर आफ्रिका)

देशातील आर्थिक डबघाईची स्थिती आणि भ्रष्टाचार यांना कंटाळून २०१० पासून अरब देशांमध्ये सुरु झालेल्या आंदोलनाचा परिणाम म्हणून लीबियामध्ये २०११ पासून सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होऊन नागरिकांनी आंदोलन सुरु केले. याचा परिणाम म्हणून या देशात अंतर्गत यादवी, इतर देशांचा हस्तक्षेप आणि चाळीस वर्षांपासून सत्ता गाजविलेला हुकूमशहा मुअम्मर गडाफी याची गच्छंती आणि मृत्यू अशा घटना घडल्या. यामुळे देशात अस्थिरतेची परिस्थिती निर्माण होऊन २०१६ पासून मोठ्या प्रमाणावर हिंसाचारात वाढ झाली. या हिंसाचारात आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला आहे. या संघर्षामुळे लीबियाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. तेलाचे मोठे साठे असूनही उद्योगांची प्रचंड हानी झाल्याने हा देश गरीबीकडे ढकलला गेला आहे. गेल्या दहा वर्षांत या देशाने दोन वेळेस अंतर्गत यादवी अनुभवली आहे.

हेही वाचा: दीर्घायुषी व्हायचयं, जपानी नागरिकांचं अनुकरण करा!

व्हेनेझ्युएला (दक्षिण अमेरिका)

व्हेनेझ्युएलावर गेल्या २२ वर्षांपासून दोनच व्यक्तींनी सत्ता गाजविली आहे. १९९९ पासून ते २०१३ मध्ये मृत्यू होईपर्यंत ह्युगो चावेझ हे देशाचे अध्यक्ष होते, तर त्यांच्यानंतर निकोलास माडुरो यांच्याकडे देशाची सूत्रे आहेत. या दोघांनी सत्तेच्या बळावर देशातील न्यायसंस्थेसह बहुतांशी यंत्रणा आपल्या ताब्यात ठेवले आहे. अनिर्बंध सत्ता असली तरी गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. माडुरो यांच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडून पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून सरकारविरोधात वारंवार निदर्शने होत आहेत. लोकांना मूलभूत सुविधाही मिळत नसल्याने सुमारे ५६ लाख लोकांना देश सोडावा लागला आहे. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत माडुरो यांचा विजय झाला असला तरी त्यात गैरप्रकार झाल्याचा आरोप होऊन संसदेचे नेते युआन गायडो यांनी स्वत:ला हंगामी अध्यक्ष म्हणून घोषित केले आहे. देशातील ५० हून अधिक देशांचा त्यांना पाठिंबा असला तरी लष्कराच्या बळावर माडुरो यांचाच देशावर ताबा आहे. गायडो यांच्या बाजूने असलेल्या अमेरिकेने व्हेनेझ्युएलावर अनेक निर्बंध लागू केले आहेत.

सोमालिया (पूर्व आफ्रिका)

सोमालियामध्ये गेल्या तीस वर्षांपासून अंतर्गत संघर्ष सुरु आहे. ऐंशीच्या दशकात लष्करी राजवटीविरोधात असंतोष वाढल्याने अनेक सशस्त्र गट निर्माण झाले. या गटांच्या सरकारविरोधातील कारवाया आणि त्यांना दडपण्यासाठी सरकारने केलेला बळाचा वापर यातून १९९१ पासून या देशात संघर्षग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गट प्रबळ होत गेले आणि त्यांनी सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केल्याने संघर्ष वाढत गेला. या तीस वर्षांच्या संघर्षात या देशात पाच लाख लोकांचा मृत्यू झाला असून अकरा लाखांहून अधिक जण विस्थापित झाले आहेत. अस्थिर परिस्थितीमुळे सोमालियामध्ये अल शबाब हा कट्टर इस्लामिक दहशतवादी संघटनेने जम बसविला आहे. देशातील अनेक अपहरणाच्या, खंडणीच्या आणि हल्ल्यांच्या घटनांमागे याच संघटनेच्या दहशतवाद्यांचा हात आहे. याशिवाय, चाचेगिरीही वाढली आहे. कोणतीही व्यवस्था, व्यवसाय नीट सुरु नसल्याने सोमालियाला सध्या अन्नधान्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या आपत्तीबरोबरच हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तींचाही सामना सोमालियाला करावा लागत असून या देशात दुष्काळाने नागरिकांना बेहाल केले आहे.

सुदान (उत्तर आफ्रिका)

सुदानमध्ये अध्यक्ष बाशीर यांनी २०१८ च्या डिसेंबरमध्ये आणीबाणी जाहीर केली आणि संघर्षाचा भडका उडाला. आर्थिक डबघाईतून देशाला बाहेर काढण्यासाठी ही आणीबाणी जाहीर करण्यात आली असली तरी विरोधकांनी त्याचे भांडवल करत सरकारविरोधात संघर्ष सुरु केला. सरकारने ब्रेड आणि इंधनाच्या अंशदानात कपात केल्याने महागाई वाढली. आधीच चणचण भासत असताना महागाईचा भडका उडाल्याने नागरिकांनी सरकारविरोधात आंदोलन सुरु केले. गेल्या तीस वर्षांपासून सत्तेत असलेल्या बाशीर यांना हटविण्याच्या मागणीने जोर धरला. यातूनच अंतर्गत संघर्ष सुरु झाला. नागरिकांनी लष्कराची मदत घेऊन सरकार उलथवून लावले आहे. लष्कराने सत्ता ताब्यात घेतली असली तरी परिस्थिती सर्वसामान्य करण्यात त्यांना अपयश आले आहे.

हेही वाचा: लॉकडाउनला करुयात नॉकडाउन

याशिवाय जगात इतर अनेक ठिकाणी संघर्ष सुरु असून तो देशांतर्गतच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. अफगाणिस्तान, आर्मेनिया, सीरिया, पॅलेस्टाइन, युक्रेन, बेलारुस, थायलंड या देशांमध्ये अशांतता आहे. तसेच अमेरिका-इराण, अमेरिका-चीन, इस्राईल-पॅलेस्टाइन, रशिया-युक्रेन, सौदी अरेबिया-इराण या देशांमधील संघर्षामुळे जागतिक पातळीवर कायम संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :AfricaTerrorism
go to top