Pathan- 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पठाण अच्छे दिन आणणार?}

'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

गिरीश वानखेडे

कदाचित २०२३ हे वर्ष बॉलीवूडसाठी मार्गप्रवर्तक ठरेल. कोरोनाचे निर्बंध संपल्यानंतर मोकळ्या वातावरणात श्वास घेणारे २०२३ हे वर्ष बॉलीवूडसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शाहरुख खानच्या पठाणने याला सुरुवात करुन दिलीये....

पठाण चित्रपट प्रेक्षकांना माहीत झाला तोच मुळी विवादांच्या सोबतीने. ‘बेशरम रंग’ हे या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाले आणि त्यासोबतच विवादही सुरू झाला; पण या विवादामुळे या चित्रपटाची जी काही बरी-वाईट प्रसिद्ध झाली तिचा मात्र ‘एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी’ या इंग्रजी म्हणीनुसार चित्रपटाला फायदाच झाला. (Shaharukh Khan Pathan will show good days to bollywood ahead)

खरेतर चार वर्षांनंतर शाहरुख खानचा (Shaharukh Khan) चित्रपट आलाय. त्यामुळे त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्साहित आहेत. पठाण (Pathan) हा या वर्षात प्रदर्शित होणारा पहिला मोठा चित्रपट आहे. १३ तारखेला प्रदर्शित झालेल्या ८० कोटी बजेटच्या ‘कुत्ते’ या आस्मान भारद्वाज (विशाल भारद्वाजचा मुलगा) दिग्दर्शित चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला नाही. हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात तीन कोटीचा टप्पादेखील गाठू शकला नाही आणि एक डिझास्टर फिल्म ठरला.

याच कारणाने आता सर्वांचे लक्ष लागले होते ते पठाण या चित्रपटाकडे. शाहरुख खानच्या चित्रपटाची केली जाणारी प्रसिद्धी, बॉक्स ऑफिसवर (Box Office) शाहरुख खानचा अधिकार, त्याच्या चाहत्यांची संख्या हे सर्वच अभूतपूर्व आहे. पठाण चित्रपटाबाबत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानने चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी भारतात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. या वेळेला त्याने आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी भारतात न करता आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचे धोरण स्वीकारले. त्याने आपल्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज केला त्यासोबतच त्याने तो दुबईतल्या बुर्ज खलिफावरदेखील प्रदर्शित केला. यावरून त्याच्या प्रसिद्धी धोरणाची भव्यता लक्षात येते.

त्याच्या चित्रपटाबद्दल फक्त भारतातच नव्हे, तर अमिराती देशांमध्येदेखील तितकीच उत्सुकता होती. जगभरात त्याच्या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग प्रदर्शनाच्या दहा दिवस आधीच सुरू झाले होते. या बुकिंगमधून चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच पाच कोटीचा गल्ला जमवला. भारतात १८ जानेवारीपासून या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आयडियली अशा मोठ्या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगची सुरुवात किमान पंधरा दिवस आधी व्हायला हवी.

खरेतर भारतातही यापूर्वीच बुकिंग सुरू व्हायला हवे होते; पण चित्रपटाचे वितरक आणि चित्रपट निर्माते यांच्यात तिकीट दराबाबत सुरू असलेल्या वाटाघाटीमध्ये बराच वेळ गेल्याने बुकिंग सुरू व्हायला उशीर झाला. बॉयकॉट बॉलीवूड ट्रेंड चालवणारे, खानविरोधी मोहीम उघडणारे यांचे भवितव्य काय असेल, हेदेखील प्रदर्शनानंतर पहिल्या सात दिवसांतल्या चित्रपटाच्या कमाईवरून लक्षात येतंय.

शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याची जुनी परंपरा मोडून नवी प्रथा पाडत हा चित्रपट बुधवारी प्रदर्शित करत वितरकांनी याची मोठी हवा निर्माण केली. प्रदर्शनानंतरच्या लाँग वीकेंडचा फायदा चित्रपटाला नक्कीच झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख किती विचारपूर्वक निवडली होती, हे चाणाक्ष प्रेक्षकांच्या लक्षात आलेच असेल. भारताबाहेरदेखील या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. त्यामुळे हा चित्रपट आजवरची विक्रमी कमाई करेल, असा अंदाज आहे. सध्या जगात युनिव्हर्स चित्रपट तयार करण्याचा ट्रेंड सुरू आहे. उदाहरणार्थ मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (ज्यात मार्व्हलचे सुपर हिरो तयार करण्यात आले) किंवा डायमंड कॉमिक्स युनिव्हर्स.

हिंदीमध्ये पाहायचे असेल तर सलमान खानचा टायगर हा स्पाय युनिव्हर्सचा चित्रपट आहे. रोहित शेट्टीचे सिंबा, सिंघम हे पोलिस युनिव्हर्सचे चित्रपट. त्याचप्रमाणे पठाणदेखील यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा एक भाग आहे. या चित्रपटाचीदेखील सिरीज तयार होऊ शकते. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी आजवर हम तुम, सलाम नमस्ते, बचना ऐ हसीनों यासारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्यांची जादू या चित्रपटांसोबतही चालेल, अशी अपेक्षा आहे. हा चित्रपट दोन तास २६ मिनिटांचा आहे.

आज कालच्या चित्रपटांच्या तुलनेत हा चित्रपट जरा लांब असला, तरीही शाहरुख खान असल्यामुळे प्रेक्षक हा चित्रपट नक्की पाहताहेत. पठाण चित्रपटाची आणखी एक गुलदस्त्यात असलेली गोष्ट म्हणजे सलमान खानची पाहुणा कलाकार म्हणून या चित्रपटात सुमारे वीस मिनिटांची उपस्थिती. शाहरुख आणि सलमान हे कॉम्बिनेशनच खूप ग्रेट आहे. या जोडीला प्रेक्षकांनी यापूर्वी करण अर्जुनच्या यशाद्वारे पसंती दर्शवलेली आहे. पठाण हिंदी सोबतच तेलुगू आणि तमिळ भाषांमध्येदेखील डब करण्यात आलेला आहे. एकंदरीत या सर्व बाबी पाहता प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात हा चित्रपट नक्कीच यशस्वी ठरतोय, असे दिसते. बॉलीवूडच्या सध्याच्या अडखळत सुरू असलेल्या प्रवासाला या चित्रपटाचे यश नक्कीच कलाटणी देणारे ठरेल.

प्रेक्षकांसाठी पोंगलची भेट म्हणून तमिळ भाषेतील अजितचा तुनिवू आणि विजयचा वारिस हे चित्रपट प्रदर्शित झाले आणि सुपर हीट ठरले. रितेश आणि जेनेलिया देशमुखचा मराठी चित्रपट ‘वेड’ नेदेखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मराठीतला आणखीन एक चित्रपट ‘वाळवी’ प्रेक्षकांना भावला असून चित्रपट समीक्षकांनीदेखील त्याची प्रशंसा केली आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांचादेखील चांगला काळ सुरू आहे, असे म्हणता येईल. दक्षिणेत तमिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटदेखील चांगली कमाल करत आहेत. त्यामुळे दाक्षिणात्य चित्रपटांचाही चांगला काळ सुरू आहे. अशा वेळी पठाण चित्रपटासोबत बॉलीवूडमध्येदेखील अच्छे दिन परतून येतील, अशी अपेक्षा आहे.

बॉलीवूडमध्ये आगामी काळात पठाणनंतर अंदाजे दर पंधरा दिवसांनी मोठ्या कलाकारांचे मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. १० फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय कार्तिक आर्यनचा शहजादे हा चित्रपट. त्यानंतर १७ फेब्रुवारीला अजय देवगनचा मैदान, २४ फेब्रुवारीला अक्षय कुमारचा सेल्फी, ३ मार्चला मिस चॅटर्लीज व्हर्सेस नॉर्वे, ८ मार्चला रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा तू झुठी मै मक्कार असे अनेक मोठे चित्रपट ओळीने प्रदर्शित होणार असतील, तर या रांगेतल्या पहिल्या चित्रपटाला म्हणजेच पठाणला यश लाभले, तर त्यामुळे बॉलीवूडमध्ये तयार झालेल्या सकारात्मक वातावरणाचा फायदा त्याच्या मागोमाग येणाऱ्या इतर हिंदी चित्रपटांना नक्कीच होईल.

कदाचित २०२३ हे वर्ष बॉलीवूडसाठी मार्गप्रवर्तक ठरेल. कोरोनाचे निर्बंध संपल्यानंतर मोकळ्या वातावरणात श्वास घेणारे २०२३ हे वर्ष बॉलीवूडसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या वर्षात एकट्या शाहरुख खानचे पठाण, जवान आणि डंकी हे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सलमान खानचे टायगर -३ आणि किसी का भाई किसी की जान, विकी कौशलचा फील्ड मार्शल सॅम माणिक शॉ यांच्या आयुष्यावर आधारित साम बहादूर चित्रपट, अजय देवगनचा भोला, अक्षय कुमारचा बडे मिया छोटे मिया, रणबीर कपूरचा ॲनिमल, प्रभासचा आदिपुरुष असे मोठमोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत ते याच वर्षात. म्हणूनच आपल्या सर्वांचे अच्छे दिन येणार का, याबाबत साशंक असलो तरी बॉलीवूडचे मात्र अच्छे दिन खात्रीने येणारच!
(लेखक प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक आहेत.)