
शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....
गणाधीश प्रभुदेसाई
काही व्यक्ती एक स्वप्न पाहतात आणि एक व्रत म्हणून ते पूर्ण करतात. त्यांना मागे-पुढे फक्त त्यांचं स्वप्नंच दिसत. असेच एक अवलिया म्हणजे कर्नाटकातील अमाई महालिंग नाईक. कृषी क्षेत्रात त्यांनी जे केलं आहे ते आपण विचारही करू शकत नाही...जाणून घेऊ यात या व्यक्तीविषयी.....
प्रजासत्ताकदिनी कत्तृत्त्वान व्यक्तींना भारत सरकारतर्फे (Government Of India) पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यांच्या कार्याची ओळख सर्वांना होऊन त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतरांनीही कार्य करणे अपेक्षीत आहे. ‘भारत हा कृषिप्रधान देश आहे’ असे एक गुळगुळीत झालेले वाक्य आपण ऐकत आलो आहे. पण आज कृषी क्षेत्राची किती जणांना खरीच आवड आहे, हा संषोधनाचा मुद्दा आहे. शेती व शेतकरी (Farmers) हा विषय तर चर्चा न केलेलाच बरा अशी अवस्था आहे. (Who is Canal Man of Karnataka who was conferred Padmashree)
पण काही व्यक्ती एक स्वप्न (Dream) पाहतात आणि एक व्रत म्हणून ते पूर्ण करतात. त्यांना मागे-पुढे फक्त त्यांचं स्वप्नंच दिसत. असेच एक अवलिया म्हणजे कर्नाटकातील (Karnataka) अमाई महालिंग नाईक. कृषी क्षेत्रात त्यांनी जे केलं आहे ते आपण विचारही करू शकत नाही असं आहे. डोंगर पोखरून उंदीर काढण्याची सवय असलेल्यापैकी अनेकांनी अमाई महालिंग नाईक यांनी ‘डोंगर पोखरून’ काय-काय केले आहे हे जाणून घेतले तरी चक्कर येईल अशी परिस्थीती आहे.
डोंगरांवर त्यांनी शेतीमध्ये केलेले वेगवेगळे प्रयोग मार्गदर्शक ठरले आहेत. पाणी नाही, पाऊस नाही, दुष्काळ, खते महागली, कसं करायचंय, असे असंख्य प्रश्न सतावणाऱ्यांना अमाई महालिंग नाईक यांनी जे केले आहे ते समजून घेतले तर आपल्यापुढे असलेले प्रश्न किती शुल्लक आहेत हे समजेल. ‘मेहनत’ म्हणजे काय? याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमाई महालिंग नाईक!
इच्छाशक्ती जबरदस्त असे तर माणूस काहीही करू शकतो हे नाईक यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव भारत सरकारने पद्म पुरस्कार देऊन केला हे अमाई महालिंग यांना आणखी कार्य करण्यास प्रेरणा देणारे नाही तर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या करुण पिढीलाही प्रेरणादायी असे आहे.
अमाई महालिंग नाईक यांना कर्नाटकातील मंगळूर जिल्ह्यात ‘टनेल मेन’ म्हणून ओळखले जाते. ते सध्या ७३ वर्षांचे आहेत. त्यांनी स्वतःचीच सुमारे दोन एकर जमीन सिंचनाखाली आणण्याचा यशस्वी प्रयोग केलेला आहे. मंगळूरपासून ५० किलोमीटर अंतरावर दक्षिण-पूर्व भागातील डोंगराळ भागात एक झाड लावण्यात यश मिळविले आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. शेतीमध्ये आश्चर्यकारक प्रयोग करण्यात आनंद मानणारे नाईक यांनी स्वतःच्या हिमतीवर दोन एकर जमीन पाण्याखाली आणली आहे. त्यासाठी घाम गाळून स्वतःच्या ताकदीवर पडीक जमिनीत ३०० अधिक सुपारी, ७५ नारळाची झाडे, १५० काजू, २०० केळी तसेच मीरीच्या वेळी लाऊन एक सुंदर बाग फुलविली आहे.
अमाई महालिंग नाईक यांच्या शेतात आधी फक्त सुकलेले गवत दिसत होते. ते सुपाऱ्या व नारळ तोडून उदरनिर्वाह करायचे. एक जमीनदाराने अमाई महालिंग यांच्या प्रामाणिकपणावर खूष होऊन त्यांना १९७८ मध्ये पडीक जमीन भेट स्वरूपात दिली. त्यांना त्या पडीक जमिनीवर झोपडी बनविली व तेथेच बायको व मुलांसह राहू लागले. जमीन पडीक त्यांत डोंगरावर होती, हीच मोठी समस्या होती. पाणी अजिबात नव्हतं व मिळालं तरी ते साठवून ठेवणे शक्य नव्हतं. मुबलक पाणी उपलब्ध असेल तरच जलसंवर्धनसंबंधी ते विचार करू शकत होते. तेथे पाणी आणायचे कसे हाच एक मोठा प्रश्न होता.
पाणी मिळाले तरच हिरवं सपन फुलविण्याचं त्यांची इच्छा पूर्ण होणार होती. अखेर त्यांनी दृढ निश्चय केला व स्वप्न साकार केले. दुसऱ्यांच्या शेतात काम करणे सुरूच ठेवून त्यांनी आपल्या शेतात पाण्यासाठी बोगदा खोदण्यास सुरुवात केली, कारण त्यांना कुठल्याही किमतीत शेतात पाणी आणायचे होते.
पाण्यासाठी शेतात बोगदा खोदण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांची चेष्टा होऊ लागली. पण त्याकडे दुर्लक्ष करत त्यांना आपले काम सुरूच ठेवले. अनेक वेळा अपयश आले, पण त्यांनी माघार घेतली नाही. ‘‘एक दिवस असा येईल जेव्हा हिरवळीसाठी जगात मुबलक पाणी असेल,’’ असा विश्वास ते नेहमी व्यक्त करत होते आणि शेवटी नशिबाने त्यांना साथ दिली. अखेर पाचव्या प्रयत्नात त्यांना पाणी आणण्यात यश आले आणि त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.
शेतीसाठी समतल जमीन बनविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे होते. या कामासाठी दगडांची गरज भासणार होती. पण, अर्धा किलोमीटरच्या आसपास कोठेच दगड उपलब्ध नव्हते. आपल्या शेतातील माती सुरक्षीत ठेवण्यासाठी संरक्षक भिंत उभारण्यासाठी त्यांनी ते जिथे काम करत होते तेथून सुमारे सहा हजार दगडांची व्यवस्था केली. रोजचे काम करून घरी आल्यानंतर ते आपल्या शेतात दगड रचायचे काम करत होते. त्यांच्या घामातून आज माळरानावर बहरलेली हिरवी शेती सर्वांसाठी प्रेरणा देणारी ठरली आहे.
‘हॅलो...अमाई महालिंगा नायक बात कर रहे है क्या? आपको पद्मश्री मिला है’...असा आशयाचा फोन अमाई महालिंगा नायक यांना आला. त्यांना नेमके काय झाले आहे आणि काय मिळाले आहे हेच कळलं नाही. लोकांनीच त्यांना सांगितलं की तुम्हाला मोठा पुरस्कार मिळाला आहे. तेव्हा त्यांना सगळा प्रकार कळला. त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांची खूप प्रशंसा झाली. पण त्यांना अहंकाराने स्पर्शही केला नाही. सरकारकडून पद्मश्रीसारखा पुरस्कार मिळेल याची कल्पनाही त्यांनी कधी केली नव्हती.
एक शेतमजूर ते ‘कॅनल मॅन’पर्यंतचा त्यांचा प्रवास अचंबित करणारा आहे. ‘श्रम’ करणे त्यांच्या रक्तातच असल्याने त्यांनी दोन एकर खडकाळ पडीक जमिनीवर शेती फुलविली. पडीक जमिनीत पाणी आणण्यासाठी त्यांच्याकडे ना पैसा होता ना तांत्रिक ज्ञान. त्यामुळे त्यांनी स्वतःच बोगदा तयार करून कालव्याद्वारे पाणी आणण्याची निश्चय केला. पण बोगदा खोदण्यासाठी अधिक मनुष्यबळाची गरज होती. पण त्यांनी हिंमत सोडली नाही व बोगदा खोदण्यास सुरुवात केली.
जुन्या काळाच जेव्हा सिंचनाचे आधुनिक तंत्र उपलब्ध नव्हते तेव्हाही शेतीसाठी पारंपरिक पद्धतींचा वापर करून पाण्याची व्यवस्था केली जायची, असे अमाई महालिंगा नायक यांचे मन सांगत होते. त्यामुळेच त्यांनी बोगद्याद्वारे पाणी आणण्याचा निर्णय घेतला. पण या मार्गावर अनेक अडथळे होते. तब्बल चार वर्षे बोगदा खोदण्याचे काम केले, पण शेतीपर्यंत पाणी आणण्याचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. अशा वेळी त्यांच्या मनात निराशा आली व चार वर्षांची मेहनत फुकट जाते की काय, असे वाटू लागले. पण पुन्हा जिद्दीने खोदाई सुरूच ठेवली.
एक, दोन करत करत बोगद्यांची संख्या सहावर गेली. पण जेव्हा सातवा बोगदा खोदला तेव्हा आशेचा किरण दिसू लागला. जमिनीतून पाणी पाझरताना दिसू लागले आणि त्यांचे एक असंभव स्वप्न पूर्ण झाले. पाण्यासाठी बोगदा खोदण्यास सुरुवात केली तेव्हा लोकांनी त्यांना वेडा ठरविले होते. रात्री उशिरापर्यंत ते खोदाईचे काम करत होते. त्यामुळे त्यांची पत्नीही बेजार व्हायची. घरी आल्यानंतर त्यांची बायको म्हणायची, ‘इतका उशीर का झाला’, तर ते म्हणायचे काम करता करता किती वेळ झाला कळलंच नाही.
अखेर अमाई महालिंगा नाईकने आपल्या शेतात पाणी आणण्यात यश मिळविले. शेतात हिरवं सपन फुववलं. त्यांच्या या कार्याची कहाणी संपूर्ण गाव, शहर, कर्नाटक करत करत देश पातळीवर पोचली व नंतर विदेशातही त्यांच्या कामाची माहिती पोचली. अशिक्षित अमाई महालिंगा नाईकने ने आपल्या कार्यातून देशाला आपली वेगळी ओळख करून दिली. अशा पद्धतीने त्यांचा शेतातून पद्मश्री सन्मान स्वीकारण्यासाठी राष्ट्रपतीभवनापर्यंत झाला.