Living WIll- जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं लिव्हिंग विल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लिव्हिंग विल}

जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

शुभदा जोशी

‘लिव्हिंग विल’ हे एकदा करून टाकण्याचा विषय नव्हे. या विषयावरील रिसर्च असे दाखविते, की मृत्युची चाहूल लागायला लागली की प्रत्येकाची प्राधान्ये बदलायला लागतात. एखादी गोष्ट एखाद्या टप्प्यात अपरिहार्य वाटत असते, तिची गरज मग वाटेनाशी होते, अशा वेळी कसं जगायचं यासाठी आवश्यक आहे 'लिव्हिंग विल'

वीस वर्षांपूर्वी आईने तिच्या पंचाहत्तरीत, तिच्या शेवटच्या आजारपणात आम्हाला निक्षून बजावले होते, की तिला अजिबात हॅास्पिटलमध्ये न्यायचे नाही. तिच्या इच्छेला मान देत, छातीवर दगड ठेऊन, ते शेवटचे ४-५ दिवस कसे काढले, हे सांगणं अवघड आहे, पण तेच करणं योग्य आहे, हे पटत होतं. तिने तिची इच्छा अतिशय स्पष्टपणे व्यक्त केली होती याचं त्या कृतीला पाठबळ होतं आणि म्हणूनच असेल कदाचित तसं करणं शक्य झालं. (Why living will is necessary)

पुढे अनेक पुस्तके वाचनात आली, अनेक जणांची चर्चा झाल्या. स्वेच्छामरण हा अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे आणि त्याला खूप वैयक्तिक पदर आहेत. परदेशात ‘मरण’ या विषयावर जितकी चर्चा होते, तितकी आपल्या देशात होताना दिसत नाही. माझ्या आईसारखे निर्णय घेणारे अनेक आपल्याला भेटतात आणि शांतपणे मृत्युला सामोरे जाण्यास मदत करणारेही खूप आहेत.

मृत्युच्या अटळपणाविषयी कोणाच्याच मनात शंका नसावी. पण तरीसुद्धा याविषयी प्रचंड भीती आणि चिंता वाटते. जर मृत्यु हे अटळ सत्य असेल तर त्याचा विचार करायचाच नाही कां? आणि तसे असेल तर ‘लिव्हिंग विल’ करायची गरज आहे कां? या दोन्ही प्रश्नांचे उत्तर असे, की विचारही करायला हवा आणि ‘लिव्हिंग विल’ही करायला हवे!

शांतपणे विचार केला, तर ‘लिव्हिंग विल’ हे ‘मला शेवटपर्यंत कसे जगायचे आहे आणि परिस्थिती त्याच्यापलिकडे गेली की मला कसे जगवू नका,’ या विषयीचे माझे माझ्याबद्दलचे विचार असतात.
ते ‘लिव्हिंग विल’, जगण्याबद्दल आहे, मृत्युबद्दल नाही.

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग मेडिकल सायन्सला खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे. मानवी शरीरातल्या गुंतागुंतीचे अनेक शोध लागत आहेत. एकूणच काय तर आयुष्य सुसह्य करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्या सगळ्या मार्गांचा आणि साधनांचा उपयोग आणि वापर जरूर करायला हवा. परंतु त्याचा किती वापर करत मला किती आणि कसं जगायचं आहे, हा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तिला आहे आणि त्या अधिकाराचा मान समाजाने राखायला हवा. हा वैयक्तिक विचार काय आहे, हे आपल्या जवळच्यांना, नातेवाईकांना, डॅाक्टरांना कळायला हवा म्हणून ‘लिव्हिंग विल’ करायला हवे.

बरेच जण याचा विचार करतात, ‘लिव्हिंग विल’ करतातही; पण कायद्यापुढे त्याचा टिकाव लागेल कां, याबद्दल त्यांच्या मनात साशंकताच असल्यामुळे, करायचं म्हणून ‘विल’ करून ते संपत्तीच्या ‘विल’सोबत ‘सेफ डिपॅाझिट’मध्ये ठेवलं जाते. पण तसे करणे योग्य नाही. दोन्ही ‘विल’चा उद्देश पूर्ण वेगळा आहे. ‘लिव्हिंग विल’ हे एकदा करून टाकण्याचा विषय नव्हे. या विषयावरील रिसर्च असे दाखविते, की मृत्युची चाहूल लागायला लागली की प्रत्येकाची प्राधान्ये बदलायला लागतात. एखादी गोष्ट एखाद्या टप्प्यात अपरिहार्य वाटत असते, तिची गरज मग वाटेनाशी होते.

जसे पूर्वसंध्येला जगभर भटकावेसे वाटते, पण पुढेपुढे घरातल्या घरात आपल्या आपण फिरणे सुद्धा अवघड होऊन जाते. म्हणून बदलत्या परिस्थितीचा आढावा घेत प्रत्येकाने आपल्या ‘लिव्हिंग विल’कडे ४-५ वर्षांनी पाहिले पाहिजे आणि (वयाच्या आणि जडलेल्या व्याधी लक्षात घेऊन) बदललेल्या परिस्थितीप्रमाणे त्यात बदल केले पाहिजेत.

नोंद घ्या-

- स्वेच्छामरण हा अतिशय गुंतागुंतीचा विषय
- ‘लिव्हिंग विल’ हे जगण्याबद्दल आहे; मृत्युबद्दल नाही.
- किती आणि कसं जगायचं आहे, हा निर्णय वैयक्तिक
- बदलत्या परिस्थितीप्रमाणे ‘लिव्हिंग विल’मध्ये बदल केले पाहिजेत.

(लेखिका स्वेच्छामरण या विषयातील अभ्यासक आहेत.)

टॅग्स :lawhealth