विघ्नहर्ता गणपती : या विचारातून झाला मूर्तिपूजेचा जन्म | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मूर्तिपूजा का करावी?  मूर्ती नेमकी कशी असावी?.....घ्या जाणून }

खरेतर हे एक दिवसाचेच व्रत आहे. काही ठिकाणी पंरपरेनुसार त्याचा दीड दिवसाचा उत्सव झाला

विघ्नहर्ता गणपती : या विचारातून झाला मूर्तिपूजेचा जन्म

सार्वजनिक गणेश मंडळांनी विघ्नहर्त्याच्या आगमन जल्लोषात केलंय. घरोघरीही बाप्पा विराजमान झालाय. मात्र मूर्तिपूजा का करावी, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखातून मिळणार आहेत....

सर्वांच्या लाडक्या गणेशोत्सवाला बुधवारपासून (ता. ३१) प्रारंभ झाला आहे. दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असल्याने सगळीकडे उत्साह पाहायला मिळतो आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी विघ्नहर्त्याच्या आगमन जल्लोषात केलंय. घरोघरीही बाप्पा विराजमान झालाय. मात्र मूर्तिपूजा का करावी, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखातून मिळणार आहेत.

अशी झाली गणशोत्सवाची सुरुवात...

दाते पंचागाचे मोहन दाते सांगतात, ‘‘आपल्याकडे पार्थिव गणेशपूजन (Ganesh Pooja) सांगितलेले आहे. पार्थिव म्हणजे माती. पृथ्वी तत्त्वाची असलेली माती. त्यामुळे गणेश मूर्ती मातीचीच असणे अपेक्षित असते. त्यामुळे पूर्वी मातीच्या गोळ्याला आकार देऊन गंधानेच सोंड, डोळे, कान काढून त्याची पूजा केली जात असे. खरेतर हे एक दिवसाचेच व्रत आहे. काही ठिकाणी पंरपरेनुसार त्याचा दीड दिवसाचा उत्सव झाला. मातीच्या मूर्तीला एका दिवसांत तडे जात नाही किंवा भेगाही पडत नाही. पण पुढे काहींनी साच्यात गणपतीची (Ganapati) मूर्ती घडवण्यास सुरुवात केली. ही मूर्ती अधिक काळ नीट राहू शकते. त्यामुळे मग पाच दिवस गौरींबरोबर गणपतीचे पूजन, अशी प्रथा सुरु झाली. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात चळवळ म्हणून दहा दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. तेथून पुढे दहा दिवसांचा उत्सवच रुढ झाला.’’ (Ganeshotsav 2022 why the idols should be worshipped)

मूर्तिपूजा का करावी?

मूर्तीचे महत्त्व विशद करताना दाते सांगतात, ‘‘आपल्या शास्त्रात कोणत्याही देवतांचे मंत्रानी आवाहन आणि मंत्रानी विसर्जन सांगितले आहे. मंत्राने आवाहन केल्यावर मूर्तीत देवत्त्व येते आणि मंत्राने विसर्जन केल्यावर देवत्त्व निघून जाते, असे मंत्रशास्त्रात सांगितले आहे. उत्तरपूजा केल्यानंतर मूर्तीचे विजर्जन करायचे असते. तात्कालिक व्रतवैकल्यांमधील हा एक भाग आहे.’’

‘‘तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितल्यास सर्व देव-देवतांना (God) निर्गुण-निराकार म्हंटले आहे. परंतु, निर्गुण-निराकार स्वरुपात त्यांची आराधना करण्याची सामान्य माणसाची आध्यात्मिक उंची नसते. ती प्राप्त करण्यासाठी सगुण व साकार म्हणजेच आकार असलेल्या मूर्तीचे (Idol) पूजन करतो. या विचारातून मूर्तिपूजेचा जन्म झाला आहे. मूर्तिपूजेच्या पुढे मानसपूजा वगैरे असे अनेक प्रकार असतात. मात्र ती उंची गाठण्यासाठी बरीच तपश्चर्या लागते. ती शक्य नाही म्हणून आपण त्या देवतेच्या आकारातील मूर्तीसमोर आपला भाव प्रकट करतो’’, असेही त्यांनी सांगितले.

मूर्ती कशी असावी?

गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना ती नेमकी कशी असावी, मूर्तीची उंची किती असावी, त्याचे रंग-रुप-आकार कसे असावे, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. याविषयी दाते सांगतात, ‘‘मूर्ती कशी असावी, याचे असे काही प्रमाण नाही. घरात धातूच्या ज्या मूर्ती असतात, त्या करंगळीच्या आकाराच्या असतात. तशी मूर्ती असल्यास उत्तमच. आपल्याला सहजगत्या पूजा करता यावी, अशा आकाराची मूर्ती असावी. साधारण सात ते आठ इंच उंचीची मूर्ती असल्यास उत्तम. आपले देवघर, त्यांची उंची, मूर्तीसाठी नियोजित केलेली जागा याचा विचार मूर्तीची उंची ठरवताना करावा. मुख्य म्हणजे, मूर्तीचे पावित्र्य राखले जाईल, भावप्रकट व्हावा, सुबकता असावी, याची काळजी घ्यावी. जितके दिवस उत्सव असेल, तितके दिवस मूर्तीची नित्यपूजा, तसेच सकाळी व सायंकाळी आरती करावी.’’

यंदा ‘या’ वेळेत करा प्रतिष्ठापना

यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे बुधवारी (ता. ३१) ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४ वाजून ४८ मिनिटे ते दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपर्यंत घरोघरी आपल्या सोयीनुसार गणरायाची प्रतिष्ठापना करावी. प्रत्येकाला आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्याकरिता भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही.

गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर शनिवारी (ता. ३ सप्टेंबर) अनुराधा नक्षत्र दिवसभर असल्याने दिवसभरात आपल्या सवडीनुसार केव्हाही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने रोजी रविवारी (ता. ४ सप्टेंबर) नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे. सोमवारी (ता. ५ सप्टेंबर) मूळ नक्षत्रावर रात्री ८ वाजून ६ मिनिटांपर्यंत केव्हाही गौरी आणि गणपतीचे विसर्जन करता येईल.

यावर्षी अनंत चतुर्दशी शुक्रवारी (ता. ९ सप्टेंबर) आहे. दहा दिवसांच्या गणपतींचे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशाचे विसर्जन या दिवशी दिवसभरात केव्हाही करता येईल. पुढील वर्षी १९ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे, असे दाते यांनी सांगितले.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”