Gautami Patil- गौतमी नाचली, तुमचं काय गेलं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गौतमी पाटील}

गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

 'तिची लावणी ही लावणी नाहीच' पासून 'ही कालची पोरगी काय लावणी शिकवते....' इथपर्यंत उलटसुलट चर्चा रंगतायत. पण तरीही ऑनलाइन आणि ऑफलाइन विश्वात गौतमी पाटीलची हवा आहे. ही मुलगी लाखोंवर व्ह्यूज मिळवतेय शिवाय दणदणीत सुपाऱ्यासुद्धा...

तिची अभिव्यक्ती अश्लील आहे, अशी टीका होतेय. पण कुणाच्या अभिव्यक्तीला नावं ठेवणारे आपण कोण? अश्लीलतेच्या आणि श्लीलतेच्या लक्ष्मणरेखा आपण कशा आखणार, तिच्या लावणीला विरोध करायचा का तिला? अशा प्रश्नांची उत्तरं देणारा लेख... (Gautami Patil dance lavani maharashtra folk art social media marathi article)

गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील या मुलीची जोरदार चर्चा सुरू आहे. समाजमाध्यमांवर प्रचंड फॅन फोलोइंग असलेली गौतमी पाटील लावणीच्या नावाखाली अत्यंत आक्षेपार्ह हावभाव करत असल्याचा आरोप होतो आहे. गौतमी योग्य पद्धतीने नऊवारी नेसत नाही, लावणी करताना पायात घुंगरू बांधत नाही. शिवाय अतिशय अश्लील, आक्षेपार्ह हावभाव करते असे अनेक आरोप तिच्याबाबत केले जात आहे. एका कार्यक्रमात तिने अंगावर पाणी ओतून घेत काही ‘वेगळे’हावभाव केले होते त्या व्हिडीओवरून तिच्यावर टीका होत आहे. सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे यांच्यासारख्या ज्येष्ठ लावणी कलावंतांनीसुद्धा तिच्या नृत्यावर आणि नृत्य पद्धतीवर आक्षेप घेतला आहे.

समाज माध्यमं म्हणजे एक सनसनी झालेली आहे. या माध्यमांवरील विविध सेलिब्रिटींची खाती आणि त्यावरून चालणाऱ्या अॅक्टिव्हिटी यांची कायमच जोरदार चर्चा सुरू असते. परंतु समाजमाध्यमांची ताकद वेगळीच आहे. अनेक सामान्य व्यक्तींना सेलिब्रिटी बनण्याची संधी या समाजमाध्यमांनी दिली आहे. गौतमीसुद्धा याला अपवाद नाही. काही आर्थिक अडचणींमुळे स्टेजवर नाचण्यासाठी उतरलेली गौतमी आज दणदणीत रकमेच्या सुपाऱ्या घेणारी एक कलाकार बनली आहे. पश्चिम महाराष्ट्रात तिच्या लावण्यांचे कार्यक्रम दिवसेंदिवस रेकॉर्ड तोडत आहेत.

परंतु तिच्या लावणीविषयीच अनेक ज्येष्ठ कलाकारांनी आक्षेप नोंदवले आहेत. या सगळ्याविषयी बोलताना लावणीचे अभ्यासक भूषण कोरगांवकर म्हणतात, लावणी एक प्रवाही कला आहे. गौतमी जे करतेय ते काही व्यक्तींना, समाजातील काही घटकांना आक्षेपार्ह निश्चितच वाटू शकते परंतु म्हणून त्यावर बंदी घालावी, या मताचा मी नाही.

‘संगीतबारी’हे पुस्तक लिहीणारे भूषण सध्या ‘लव्ह अँड लावणी’आणि ‘लावणी के रंग’ या कार्यक्रमांचे लेखक-दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. या कलेचा अभ्यासक म्हणून आणि मग त्यातील व्यावसायिक तसेच एक विचार करणारी व्यक्ती म्हणून भूषण मांडत असलेली मते महत्त्वाची आहेत. ते म्हणतात,  गौतमीच्या नाचावर बंदी घालणं चुकीचं आहे.  ती लावणी या कलेचं नाव बदनाम करते आहे हा आरोपही चुकीचा आहे. कारण मुळात ती लावणी करतच नाही. तर लावणीतले काही elements घेऊन, fusion करून तिने तिची एक वेगळी स्टाइल आणली आहे.

ती चांगली का वाईट हा ज्याच्या त्याच्या अभिरुचीचा प्रश्न आहे. कुणाच्या अभिव्यक्तीवर बंदी घालणारे आपण कोण? हा माझा सवाल आहे. एखाद्याने आपल्या कलेची अभिव्यक्ती कशाप्रकारे करावी, हा त्या कलाकाराचा प्रश्न असतो. त्यावरून त्याला जज करणे, त्याच्याबद्दल मते बनवणारे आपण कोण, असे मला वाटते. लावणी ही कायमच प्रवाही राहिली आहे. मुळात ही लोककला आहे. शिवाय त्यात शृंगाराचा अंश आहे, नजाकत आहे. त्यामुळे सात्विक,  सोज्वळ वगैरे लावणी कधीच नव्हती. मग अश्लीलतेच्या आणि श्लीलतेच्या लक्ष्मणरेखा आपण कशा आखणार. १९९० नंतर लावणीचे कार्यक्रम तुफान लोकप्रिय झाले तेव्हा शास्त्रीय नृत्य करणार्‍यांनी किंवा व्यावसायिक नाटकवाल्यांनी अश्लीलतेच्या नावाखाली लावणीवर बंदी आणली असती तर?

सगळेच कलाप्रकार काही सर्वसमावेशक असतात असं नव्हे. म्हणजे काही पुस्तकंसुद्धा आपण एकेकट्याने वाचतो, काही मित्रांसोबत काही सगळे मिळून वाचू शकतो. तसंच या कलाप्रकाराचंसुद्धा आहे. पण सगळ्यांबरोबर पाहण्यासारखं नाही म्हणजे वाईट असतं का? तर नव्हे. आपली मनस्थिती, गरजा प्रत्येकवेळी वेगळ्या असू शकतात. अनेक कलाकृती अशा निरनिराळ्या स्थिती, ठिकाणं यांना अनुसरुन केलेल्या असतात. एकट्याने आनंद घेण्याच्या किंवा समवयस्क व्यक्तींच्या सोबत पाहण्याच्या) कलाकृती प्रत्येकवेळी काही वाईट ठरत नाहीत तर त्या वेगळ्या असतात.

हेही वाचा: Gautami Patil: गौतमी पाटील राजकारणात येणार का? म्हणाली...

कित्येक सिने अभिनेत्री लावणीच्या नावाखाली जे वेडेवाकडे हातवारे – तोंड करतात, तालबद्ध कवायती करून सुपरफास्ट उड्या मारतात, अर्धा पदर घेऊन किंवा पदर काढून नाचतात, कथकचे घुंगरू वापरतात, लावणीचे घुंगरू काय हेसुद्धा अनेकींना माहिती नसते. मग हे सगळं जर आक्षेपार्ह नाही तर गौतमीचा नाचही आक्षेपार्ह नाही.  

गौतमीच्या नाचात एक उत्साह आहे, ग्रेस आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद आहे. त्यामुळेच मला वाटतं ती इतकी लोकप्रिय आहे.  माझं मत आहे, तुम्हाला तिचा नाच आवडत नसेल तर तिला बोलवू नका किंवा इंटरनेट वर तिचे नाच पाहू नका .

मुळात एखाद्या कलाकृतीवर बंदी घालून काही होत नाही. उलट मी तर म्हणेन की सगळ्याच कलाकारांना त्यांची कला सादर करण्याचं स्वातंत्र्य द्यावं. त्यातली उत्तम कलाकृती कायम राहील, रसिक त्यालाच पाठिंबा देतील.

पारंपारिक लावणीला मागणी नाही, ती लोकांना कंटाळवाणी वाटते या मतांना छेद देत आम्ही आमच्या कार्यक्रमांमधून ती पुढे आणली आणि सांगायला आनंद वाटतो की तिला सर्व थरांतून विशेषतः तरुण पिढीकडून आणि अमराठी प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. शकुंतलाबाई नगरकर, पुष्पा सातारकर यांसह संगीत बारीत कार्यरत असणारे सात आठ कलाकार यात आहेत. असे प्रयत्न अनेक जणांनी केले तर प्रेक्षकांनाही अनेक पर्याय उपलब्ध होतील. आधीच काही कलाकृतींना तुम्ही अश्लील म्हणून बाद करणे मला पटत नाही. बंदी घातल्याने उलट त्याबद्दल उत्सुकता वाढते. शिवाय कुणा एका गौतमी पाटीलमुळे लावणी काही घडणार नाहीतर बिघडणार नाही. ती करते हीच खरी लावणी असं तीही म्हणत नाही, आपणही म्हणू नये.

लावणीचा अभ्यासक म्हणून मला माहिती आहे की, अनेक लावण्या जशा शृंगारिक होत्या, चावट होत्या तसंच त्यांचं सादरीकरणही होतं. अर्थात ते सर्रास नव्हतं आणि कुणी त्यांचे विडिओ काढून ते सोशल मीडियावर टाकत नव्हतं. पण आता काळ बदलला आहे. पूर्वी लावणी करताना नऊवारी साडी नेसली जात असे. अंबाडा खऱ्या केसांचा बांधला जात  असून त्यावर खऱ्या ताज्या फुलांचा गजरा बांधला जात असे. पायात ५-७किलोचे चाळ बांधले जात. आता ते होतं का? तर त्याचं उत्तर नाही हेच आहे. जणू काही नेसलेलीच वाटावी अशी नऊवारी शिवली जाते. चाळांचं वजन कमी झालेलं आहे. गजरे आणि नटण्यासजण्याची साधनं बदलली आहेत, मग लावणी सादरीकरणसुद्धा तसंच राहील अशी अपेक्षा चुकीची आहे. त्यातही बदल होणार. उलट अभ्यासक आणि लावणीप्रेमी म्हणून मला वाटतं की, जुनं आणि नवं दोन्ही प्रकारातलं सादरीकरण प्रेक्षकांसमोर यायला हवं. जे अस्सल असेल,  उत्तम असेल ते काळाच्या, लोकप्रियतेच्या कसोटीवर टिकून राहिलंच. पण संधी सगळ्यांनाच मिळायला हवी. सादर करण्याआधीच कुणाची कला नाकारणं मला पटत नाही.

साधारण २० वर्षांपासून लावणी करणाऱ्या विजया कदम(पालव) यांचेही मत जाणून घेतले. विजया यांनी देशभरांत विविध ठिकाणी लावणीचे सादरीकरण केले आहेच पण परदेशातही लावणीचा झेंडा तोलून धरला आहे. त्यांना लावणी नृत्यासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.  विजया म्हणतात, म्हणतात, मी सुरेखा पुणेकर, छाया-माया खुटेगावकर, माया जाधव यांच्यासारख्या लावणी सम्राज्ञींसोबत काम केलं आहे. त्यामुळे खरी लावणी, पारंपरिक लावणी म्हणजे काय हे मला माहिती आहे. मुळात मला घरातून लावणी करण्यासाठी फारसा पाठिंबा नव्हता. त्यामुळे काम करताना आपण जे करणार ते कुठेही अश्लील किंवा विचित्र वाटू नये, याची काळजी मी पहिल्यापासूनच घेत होते.

आपण या कलेचे पाइक आहोत. वाहक आहोत. हे एकदा लक्षात घेतले की आपण त्या कलेच्या भल्याचाच विचार करतो. त्यामुळे मी पारंपरिक पद्धतीची आणि बीभत्स नसलेली लावणी सादर करण्याच्या प्रयत्नात कायम होते आणि राहीन. गौतमी पाटीलविषयी मी सांगेन की, लावणीच्या नावावर असलं काहीतरी करू नका. बीभत्स हालचाली, विचित्र कपडे घालून लावणी कशाला करता, आयटम साँग म्हणून तुमचं सादरीकरण करा. लावणी म्हणून नको. लावणी म्हणजे हे असं नृत्य नव्हे. लावणीला एक चांगला समाजमान्य दर्जा मिळायला खूप वेळ गेलाय, तो जपण्याची आज  खूप गरज आहे. कारण आजही लावणीबद्दल समाजात बरेचसे समज गैरसमज आढळतात. अशी उदाहरण समोर आली की, लावणीचे पर्यायाने आम्हा कलाकारांचेही नुकसान होत असते. सगळ्याच कलाकारांना सरसकट असा टॅग आपल्याला लागेल की काय, याची भीती वाटते.त्यामुळेच लावणीचं जे मूळ रुप आहे ते जपून लावणी सादर करावी, असंच माझं म्हणणं आहे.

हेही वाचा: Gautami Patil: कोल्हापूरकरांच्या हृदयातली लावणी क्वीन गौतमी पाटील आहे तरी कोण...

तर गेली २५ वर्षे लावणी करणाऱ्या गौरी जाधव म्हणतात,  कुणी काहीही करो. शेवटी तुम्हाला लावणीच्या पारंपरिक रुपाकडे परत यावंच लागेल कारण तेच शाश्वत आहे. आपलं नाणं खणखणीत असेल तर ते वाजतंच. यावर माझा विश्वास आहे. आमच्या घरातच संगीत होतं. माझे आजोबा भजनीबुवा होते. आई गायक तर वडील वादक होते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीची कला म्हणजे काय, तिची जोपासना कशी केली जाते, याची शिकवण घरातूनच मिळाली होती. आम्ही सादर करत असलेली लावणी पायाच्या नखापासून केसांपर्यंत शृंगारिक आहे पण आपला आब राखून आहे. आम्ही अदाकारीतून अविष्कार करतो. त्यासाठी विचित्र कपडे, अश्लील हावभाव याची गरज भासत नाही.

गौतमीच नव्हे तर तिच्यासारख्याच अनेकजणी अशाप्रकारे सादरीकरण करतात, त्या सगळ्यांनाच मला सांगायचं आहे, लावणीच्या नावाखाली हे प्रकार करू नका. लावणी अशी नाही, अशी नव्हती. लावणीचा फलक लावायचा आणि घागरा घालून नाचायचं, हिंदी गाण्यांवर नाचायचं हे मला अजिबात आवडत नाही. पण मला या गौतमी प्रकरणांत राजकारण सुरू आहे, असं वाटतं. कारण तिच्यासारखा नाच तर अनेकजणी करतात, मग हिच्याचवर एवढी टीका व्हायचं कारण काय? मला वाटतं कुणा एकीला टार्गेट करायला नको. तर अशाप्रकारे जे चुकीचं सादरीकरण होतं, त्यावर बोललं पाहिजे.

याविषयी बोलताना लावणी पार्टी चालवणाऱ्या ज्येष्ठ लावणी कलाकार प्रमिला लोडगेकर म्हणतात, काही मोजके कलाकार सोडले तर अनेक मुली हल्ली गौतमीप्रमाणेच विचित्र पद्धतीने लावणी करतात. पण काय आहे ना त्यांच्याचबद्दल चर्चा होत राहते. बदनामी जरूर होते पण त्यांनाच कार्यक्रम मिळतात, असंही आमच्या निदर्शनास आलं आहे. अशाप्रकारे आमच्यासारखे खरे कलाकार राहतात बाजूलाच आणि या नुसत्या उड्या मारणाऱ्या आणि लावणीच्या नावावर काहीही करणाऱ्या मुली प्रसिद्ध होतात. याचं फार दु:ख होतं.

आमची पारंपरिक कला, लावणी आणि गौतमीसारख्या मुली सादर करत असलेला नाच यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पेटी-तबल्यासारख्या वाद्यांच्या प्रत्यक्ष साथीने नाचणं आणि रेकॉर्डवरच्या गाण्यावर नाचणं यात फरक असतो. खरी कला प्रत्यक्ष साथीच्या नृत्यात अधिक चांगल्या प्रकारे कळू शकते. मी माध्यमांनाही सांगेन की, गौतमीसारख्या मुलींना प्रसिद्धी देण्याऐवजी खऱ्या लावणी कलाकारांना त्यांनी आपल्या माध्यमात जागा द्यावी.

एकूण लावणी आणि कलाप्रकारांच्या सादरीकरणाविषयी कायमच मतमतांतरं राहिली आहेत. कोणतीही कला तिचा आब राखून सादर केली ,असाच त्यातील कलाकारांचा दृष्टीकोन दिसतो. अर्थात आब राखणे, कलेचं पारंपरिकपण जपणं म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न आहेच. शिवाय असं करताना कलाकारांच्या अभिव्यक्तीवर तर आपण टाच आणत नाही ना, याचीही काळजी घ्यायला हवी.