Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dating apps}

Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

श्रद्धा वालकर केसच्या निमित्ताने समोर आलेली एक गोष्ट म्हणजे डेटिंग अॅप्सवरून भेटणारी तरुणाई. श्रद्धा आणि आफताब बंबल नावाच्या डेटिंग अॅपवर भेटले होते, असं म्हटलं जातं.

एकूणच या निमित्ताने डेटिंग अॅप्स हा प्रकार चर्चेत आलाय. ही अॅप्स आता तरुणांच्या मोबाइलवर लीलया वावरतात.

आपण ज्याप्रमाणे फेसबुक, ट्विटर वापरतो त्याप्रमाणे अनेक तरुण ही अॅप्स वापरतात.

या अॅप्सच्या निमित्ताने निरनिराळी सर्वेक्षणंही केली जातात. त्यामुळेच ही अॅप्स, ती वापरणारी तरुणाई आणि अॅपकर्त्यांनी केलेली सर्वेक्षणं काय सांगतात आजच्या तरुणाईबद्दल ते वाचूया....

डेटिंग हा शब्द काही वर्षांपूर्वी भयंकर गुपित असल्यासारखा घेतला जात असे. पण माध्यमांनी, तंत्रज्ञानाने हे सगळं सोप्पं केलं.

आता तु्म्हाला ऑनलाइन जशी भाजी, खाणं-पिणं, कपडे मागवता येतात, तसेच जोडीदारही भेटू शकतात.

dating

dating

या अॅप्सबद्दल युजर्स काय म्हणतात?

जेमतेम विशीतला विवान म्हणतो, मी ही सगळी अॅप डाऊनलोड केली आहेत पण त्याची माहिती माझ्या घरच्यांना नाही. खरंतर मी त्यावर फारसा नसतोसुद्धा. पण मित्रांमध्ये जरा शाइनिंग मारण्यासाठी मी अॅप डाऊनलोड केलं आहे.

असं अॅपवरुन कुणी भेटेल, यावर फारसा विश्वास नाही. पण भेटलीच कुणी तर तो चान्स मला घालवायचा नाही. त्यामुळे ही अॅप मी निश्चितच एक्स्प्लोअर करणार आहे.

तर पंचविशीतली सरिता म्हणते, मी हे अॅप्स वापरते. माझ्या आईलाही त्याची माहिती आहे. पण अॅप्सवर मी अजिबात सिरीअस रिलेशनशिपचा विचार करत नाही.

लग्न कधी केव्हा करेन, लव्ह की अरेंज यातलं काहीही अजून ठरवलेलं नाही. पण अशा अॅपवरून जोडीदार भेटेल, याची खात्री नाही. इथे कदाचित प्रियकर नाही सापडणार पण नवे मित्रतर होतीलच.

चाळीशीतल्या अजूनही सिंगल असलेल्या हिमानीला ही डेटिंग अॅप्स बरी वाटतात. ती म्हणते, प्रेम तुम्हाला कोणत्या रुपात भेटेल सांगता येत नाही.

मी प्रेमाची वाट पाहते आहे. अर्थात डेटिंग अॅप्स वापरून लगेच मला माझं प्रेम मिळेल, असा माझा अजिबात दावा नाही.

अॅप वापरलं तरी भेटणाऱ्या व्यक्तीची माहिती मी काढतेच. केवळ अॅपवरून जुजबी ओळख असताना ब्लाइंड डेट वगैरे उद्योग मी करत नाही. मला पटत नाहीत. ब्लाइंड डेट नो नो.

तर चाळीशीतच असलेला दुसरा एक कूल ड्यूड म्हणतो, इथे वयाचं बंधन नाही. पण बाहेर आहेच की.

चाळीशी आली तरी अजून हा डेटिंग अॅपवर आहे, म्हणून माझ्याबद्दल सहकाऱ्यांमध्ये चर्चा होते पण मी तिकडे लक्ष देत नाही.

माझं लग्न झालेलं नाही, याचा अर्थ मला जोडीदारच नसावा का?

समर हा स्वत: समलैंगिक आहे. मित्र मिळवण्यासाठी त्याला ऑनलाइन माध्यमांचाच आधार घ्यावा लागतो.

कारण बाकीच्या दोस्तांसारखं पोरगी पटवण्याइतकं हे सोपं नाही, असं त्याला पक्कं माहिती आहे.

फार पूर्वी जेव्हा ऑर्कुट होतं. तेव्हा तिथेही समर होता. त्याने काही अशा समूहात नोंदणी केली होती. मात्र त्याची फसवणूक झाली. मग असे वाईट अनुभव आल्यानंतर समर जास्तच काळजीपूर्वक वागू लागला.

आज पस्तीशी ओलांडल्यानंतर समर म्हणतो, सोशल मीडिया चांगलाच आहे. माणसं त्याला वाईट बनवतात. आता याला पर्याय नाही. हे तुम्ही आम्ही बदलू शकत नाही. त्यामुळे काळजी घेणं, याच उपाय आहे.

त्यातही समलैंगिकांसाठी असलेली खास अॅप वापरताना आम्ही अधिकच काळजी घेतो. कारण डेटिंगसाठी बोलावून मग लैंगिक अत्याचार करणे किंवा लुटणे अशा गोष्टी होतात. तशा केसेस झालेल्या आहेत. त्यामुळे आम्ही जरा जास्तच काळजी घेतो.

डेटिंग अॅप्स डाऊनलोड केल्यानंतर हजारो प्रश्न विचारतात पण ही अॅप कसली जबाबदारी घेत नाहीत. एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर तुमची फसवणूक वगैरे झालीच तर त्याची रितसर पोलीसांत तक्रार करावी लागते. त्यामुळे थेट निर्णय घेताना केवळ अॅपवर अवलंबून राहू नये. त्याबरोबर साकल्याने, सर्व विचार करणं अत्यंत गरजेचं आहे.

डेटिंग अॅप्स वापरताना काय लक्षात ठेवाल?

०अगदी पहिल्याच भेटीत त्या माणसाच्या फार जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. त्यालाही आपल्याजवळ येऊ देऊ नका.

०पहिल्या भेटीत लैंगिक संबंध ठेवू नका.

०ब्लाइंड डेटला जात असाल तर शक्यतो शहरातल्या एखाद्या गर्दीच्या रेस्टॉरंटची निवड करा. अगदीच एकाकी ठिकाणी, फार लांब जाणं टाळा.

०तुम्ही नक्की कुठे, कोणाबरोबर जात आहात हे कुणालातरी नक्की माहिती असू द्या. मग ते पालक असतील किंवा तुमचे मित्रमैत्रिणी. म्हणजे न जाणो उद्या गैरप्रकार घडलाच तर मदत करणं सोपं जाईल.

०केवळ डेटिंग अॅपची प्रोफाइल पाहून आयुष्यभराचा जोडीदार निवडू नका. तो प्रत्यक्षात कसा आहे, हे पडताळून पाहा.

०आपले आर्थिक व्यवहार, नातेवाईक, कुटुंब या सगळ्याची माहिती पहिल्या भेटींत नकोच नको.

०आधी एकमेकांचे मित्र व्हा, नंतर पुढील नात्याचा विचार करा.