Samruddhi Highway- या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  महाराष्ट्र समृद्धी महामार्ग}

या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

नरेश म्हस्के

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरला थेट राजधानी मुंबईशी जोडणारा ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ हा असाच ‘तेज कदम’ म्हणजे वेगाने प्रगतीकडे नेणारा महामार्ग आहे...जाणून घेऊयात या महामार्गामुळं येऊ घातलेल्या संधी....

‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा...’ असे शांताबाई शेळके यांनी त्यांच्या कवितेत म्हटलेले आहे. कारण कुठलीही वाट, कुठलाही रस्ता आपण शोधतो, त्या रस्त्याने जातो, तेव्हा आपल्याला त्या रस्त्याने पुढे जाऊन प्रगतीची (Prosperity) दार उघडावी, असेच वाटत असते; मात्र गुलजार यांनी त्यांच्या गाण्यात म्हटले आहे तसे ‘कुछ सूस्त कदम रस्ते’ असतात आणि ‘कुछ तेज कदम राहे’ असतात. महाराष्ट्राची (Maharashtra) उपराजधानी असलेल्या नागपूरला (Nagpur) थेट राजधानी मुंबईशी जोडणारा ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ हा असाच ‘तेज कदम’ म्हणजे वेगाने प्रगतीकडे नेणारा महामार्ग आहे. (Know importance of Mumbai Nagpur Samruddhi Highway)

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thacekray) महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्‌घाटन नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या महामार्गाचे मनोगत कुणी विचारले तर तो स्वतःच सांगेल की ‘किती किती काय काय घडून गेले, क्षणाक्षणाला हजारो प्रश्न पडून गेले.’ या सर्व घडण्याचे, प्रश्न पडण्याचे दोन अत्यंत महत्त्वाचे साक्षीदार आणि कर्तेधर्ते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. (Devendra Phadanavis)

फडणवीस यांनी प्रथम समृद्धी महामार्गाचे स्वप्न पाहिले आणि पुढे त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही त्यात सामील करून घेतले. सरकारे येत-जात राहिली, संकटेही येत जात राहिली; मात्र समृद्धी महामार्ग त्याच्या गतीनं जातच राहिला आणि आज नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन झाले आहे.

सिमेंट-काँक्रीट म्हणजे महामार्ग नव्हे!

महामार्ग बांधण्यासाठी काय लागते, असा प्रश्न कोणी विचारला तर त्याला ‘सिमेंट, काँक्रीट, रोड रोलर, जेसीबी, डम्पर, कामगार लागतात’ असेच उत्तर कोणीही देईल; परंतु हे फसवं उत्तर आहे. या सगळ्या गोष्टी जुळवून आणण्यासाठी लागते प्रचंड इच्छाशक्ती आणि समोर आलेला कोणताही प्रश्न सोडवण्याची तयारी असलेला निर्धार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तो निर्धार दिसतो. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या महामार्गाच्या बांधणीत येणारे अनेक अडथळे व्यक्तिगत लक्ष घालून दूर केले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर विचारांचं बाळकडू आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा प्रदीर्घ सहवास लाभलेले एकनाथ शिंदे यांच्यासाठी संघर्ष काही नवा नाही; मात्र मुळातच लोकांचे प्रश्न समजावून घेण्याची, ते सोडविण्याची आवड असल्याने त्यांनी समृद्धीचा हा महामार्ग मोकळा करून घेतला. प्रसंगी ते स्वतः बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी बोलले, त्यांना दिलासा दिला. महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीची दारं सताड उघडणारा हा महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग प्रत्यक्षात आला तो अशा अविरत प्रयत्नांमधूनच.

मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मिसिंग लिंक, रिंग रोड, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोस्टल रोड या आणि अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून आधुनिक महाराष्ट्राचा नवा ‘रोड मॅप’ जन्माला येत असताना या राज्याच्या प्रगतीचा आणि चौफेर समृद्धीचा रथ याच महामार्गावरून आता चौखूर उधळणार आहे.

हे देखिल वाचा-

नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावापासून ठाणे जिल्ह्यातील आमने गावापर्यंत या महामार्गाची ही ७०१ किलोमीटर लांबी आहे. या सहापदरी महामार्गाची सर्वसाधारण रुंदी १२० मीटर असून डोंगराळ भागांत ती ९० मीटर एवढी आहे. ताशी १५० किलोमीटर वेगाने (डोंगराळ भागातून ताशी १२० कि.मी.) धावू शकतील. या महामार्गावर ६५ उड्डाणपूल, ३३ मोठे पूल, २७४ छोटे पूल, ८ रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, २५ इंटरचेंजेस, ६ बोगदे, १८९ भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी ११० भुयारी मार्ग, पाळीव प्राणी आणि पादचाऱ्यांसाठी २०९ भुयारी मार्ग, वन्यजीवांसाठी ३ भुयारी मार्ग आणि ३ उन्नत मार्गांचा समावेश असेल. व्हाया डक्ट / फ्लायओव्हर यांची संख्या ६५; तर ६७२ कल्व्हर्ट आणि रस्त्याच्या बाजूला २१ ठिकाणी विविध सुविधा असतील. प्रत्येकी पाच किमी अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि विनामूल्य दूरध्वनी सेवा, बोगद्यात विद्युत रोषणाई, पूल सुशोभीकरण, सुधारित पथदिवे आणि डिजिटल सिग्नल यांचा वापर आहे.

वेगवान प्रवास आधुनिक तंत्रज्ञान

सर्व प्रकारच्या आधुनिक सोयीसुविधा पुरवण्याकडे जाणीवपूर्व लक्ष देण्यात आले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी चार्जिंग स्टेशनची उभारणी, ‘इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ची सुविधा, पथकर संकलन प्रणाली (टोल), एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आणि ऑप्टिकल फायबर केबल यामुळे या समृद्धीला आधुनिकतेचा स्पर्श होणार आहे.

जमीन संपादन आणि विश्वास संपादन

समृद्धीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या संदर्भात भू-संपादन हा सर्वात मोठा अडथळा असतो. अनेक मोठमोठे विकास प्रकल्प केवळ भू-संपादनामुळे वर्षोनुवर्षे खितपत पडल्याची अनेक उदाहरणे देशात आहेत. समृद्धी महामार्गासाठी दहा जिल्ह्यांमधून तब्बल ८ हजार ८६१ हेक्टर भू-संपादन करणे गरजेचे होते. शेतकऱ्यांच्या अडचणी नीट समजावून घेऊन त्यांचे पूर्ण समाधान होईल, अशा प्रकारे काम केले गेल्यानं हा अडथळाही दूर झाला आहे.

हे देखिल वाचा-

राज्याला देशाशी जोडणारा महामार्ग

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय मार्गाशी जोडला जाणार आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर, बंगलोर-चेन्नई इकॉनॉमिकल कॉरिडॉर, वेस्टर्न डेडिकेटेट फ्रेट कॉरिडॉर, ईस्टर्न डेडिकेटेट फ्रेट कॉरिडॉर तसेच चेन्नई विझाग इकॉनॉमिक कॉरिडॉर असे महत्त्वाचे मार्ग आणि कॉरिडॉर जोडले जाणार आहेत.

हे सर्व कॉरिडॉर स्वाभाविकपणे जेएनपीटीशीही थेट जोडले जातील, त्यामुळे खऱ्या अर्थाने राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. पुढील काळात समृद्धीचा विस्तार गडचिरोलीपर्यंत केला जाणार आहे. यामुळे नक्षलग्रस्त भागाच्या विकासालाही चालना मिळेल. राज्यातील दोन प्रमुख शहरांना जोडणारा एक द्रुतगती महामार्ग एवढेच याचे महत्त्व नाही, तर दोन भौगोलिक टोके, दोन संस्कृती आणि विकासाची, उत्कर्षाची दोन बेटे यातून जोडली जाणार आहेत.