
शरद पवारांना समजून घ्यायचेय....हे १२ किस्से माहिती असलेच पाहिजेत
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे भल्याभल्यांना न उलगडलेले कोडे आहे. ५० हून अधिक काळ सार्वजनिक जीवनात त्यांचा वावर आहे. देशातील राजकारणही त्यांना डावलून होऊच शकत नाही. निवडणुकीच्या मैदानात एकदाही त्यांनी पराभव स्वीकारलेला नाही. राज्याच्या राजकारणातही वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी भूकंप घडविला आणि महाराष्ट्रात ‘महाविकास आघाडी’ सरकारची स्थापना झाली. (Know various aspects of Sharad Pawar)
शरद पवार (Sharad Pawar) यांनी १२ डिसेंबर रोजी ८२ व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘सकाळ’ने (SAKAL) २४ एप्रिल २०२२ रोजी म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात ‘भविष्यवेधी शरद पवार’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात पवारांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार, श्रीनिवास पाटील, हेमंत टकले, सतीश मगर तसेच पवारांचे बंधू प्रताप पवार यांनी पवारांबद्दलचे अपरिचित किस्से सांगितले. पवारांच्या आजवरच्या जीवनात हे किस्से कधी लोकांपर्यंत पोचले नाहीत. परंतु, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या किश्श्यांचे गुपित उघड झाले. त्यामुळे पवारांना समजून घेण्यासाठी ते माहिती असलेच पाहिजेत.
पवारांच्या पहिल्या विजयाचा साक्षीदार
विठ्ठल मणियार : मी आणि शरद पवार १९५८ च्या सामरास बीएमसीसीमध्ये आलो. वर्गप्रतिनिधीची निवडणूक (Election) होती. माझ्याविरोधात पवार उभे होते. ग्रामीण भागातून आलेला मुलगा माझ्यापुढे कसा टिकाव धरेल, असे मला वाटत होते. मात्र, पवारांचा प्रचार वेगळ्या पद्धतीने सुरू होता. वर्गात १२० मुले होती. प्रत्येकाशी ते संवाद साधत होते. पुढे काय करणार, कसे करणार हे सांगत. त्या निवडणुकीचा निकाल लागला. ८० टक्के मते मिळवून पवार विजयी झाले. तो त्यांचा पहिला विजय होता आणि मी त्याचा साक्षीदार होतो. पुढे पवार विद्यापीठावरही प्रतिनिधी म्हणून निवडून गेले. तेव्हापासून त्यांनी निवडणुकीत कधीही पराभव पत्कराला नाही.
साहेब वाचन असे करतात....
पुस्तक प्रकाशनांच्या अनेक कार्यक्रमांना पवार आवर्जुन उपस्थित राहत. अन संदर्भही नेमके देतात, असे माझे निरीक्षण होते. म्हणून एकदा पवारांनाच विचारले. तुम्ही इतक्या झपाट्याने पुस्तके (Books) कशी वाचून काढतात. त्यावर ते म्हणाले, ‘‘आडव्या ओळींद्वारे मी पुस्तक वाचत नाही. तर, पुस्तकातील ओळी उभ्या क्रमाने वाचतो. त्यात एकच महत्त्वाचा शब्द असतो. त्यावर पुढच्या अनेक ओळी किंवा काही पाने असतात... क्रियापदे वाचत नाही. त्यामुळे ३०० पानांचे पुस्तकही ८ तासांत वाचून होते.’’
एकाच वेळी अनेक विषयांवर काम करू..
एकदा मुंबईत (Mumbai) गेलो होतो. पवार तेव्हा मुख्यमंत्री होते.आग्रहाने त्यांनी ‘वर्षा’वर बोलावून घेतले. रात्री आम्ही गप्पा मारत होतो. तेव्हा एका खोलीत खाली गादी टाकून पवार बसले होते. त्यांच्या भोवती 'यु' आकाराचे टेबल होते. त्यावर सुमारे २ फूट उंचीचा फाईल्सच ढिग होता. त्या हातावेगळ्या करीत असतानाच पवार माझ्याशी कौटुंबिक गप्पा मारत होत्या. मला राहवले नाही म्हणून त्यांना विचारले. इतक्या महत्त्वाच्या फाईल्सवर तुम्ही स्वाक्षऱ्या करीत असताना, गप्पा कशा मारू शकतात. त्यावर त्यांनी सांगितले की, विषयांचे कप्पे माझ्या डोक्यात असतात. त्यांची सरमिसळ मी होऊन देत नाही. त्यामुळेच एकाचवेळी अनेक विषयांवर मला काम करणे जमते.’’
पवारांना ४ तास कोणीही उठवायचे नाही
प्रताप पवार (अध्यक्ष, ‘सकाळ’ माध्यम समूह) - मुंबईतील माझ्या फ्लॅटवर शरद पवार आले. खूप दमलेले दिसत होते. तेव्हा त्यांना विचारले की, काय झाले आहे. त्यावर ते म्हणाले, की तीन दिवस मी झोपलोच नाही. मला रहावेना. त्यांना घेऊन मी एका खोलीत गेलो. त्यांना तेथे विश्रांती घेण्यास सांगितले. बंदोबस्तावरच्या पोलिसांना सांगितले की, पुढील ४ तास जगात काहीही झाले तरी पवारांना कोणी उठवायचे नाही किंवा कोणाचाही फोन त्यांना द्यायचा नाही. त्यानुसार पोलिस वागले. चार तास विश्रांती घेऊन पवार फ्रेश झाले अन पुढच्या कामांसाठी मार्गस्थ झाले.
माझ्या अवतीभवती दोघेजण
माझ्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी कायमच व्यग्र असणारे शरद पवार आणि त्यांच्या सौ. प्रतिभाताई माझी भेट घ्यायला आले. माझ्यावरील प्रेमापोटी पुढील दोन दिवस ते दोघेही माझ्या अवतीभवती होते. एवढे बिझी असणारे पवार माझ्यासाठी सपत्नीक दोन दिवस काढतात, हे पाहून मला भरून आले अन मी बरा ही लवकर झालो.
भावाला ओळखायला मी चुकलो...
बिटस पिलानी आयआयटीमध्ये मी शिक्षण घेत असताना, ६० दिवसांचे ट्रेनिंग करण्यासाठी उद्योगांत जावे लागायचे. मी मुंबईला पवारांच्या घरी राहत होतो. आमचे बोलणे व्हायचेच नाही. भेट तर दुरापास्त होती. एकदा शनिवारची सुट्टी असल्यामुळे मी सकाळीच पवारांच्या शेजारी जाऊन बसलो. पाहतो तर, काय यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, ग. दि. मागडगूळकर आदी किती तरी जणांचे त्यांना फोन येत होते. सर्व जण त्यांचा सल्ला घेत होते. मला खरंच वाटेना. इतकी मोठी माणसे पवारांचा कसा काय सल्ला घेतात. म्हणून मी टेलिफोन ऑपरेटरकडे जाऊन चौकशी केली. तेव्हा ते सगळे फोन खरंच येत होते, असे मला दिसले आणि भावाबद्दलचा अभिमान माझा वाढला.
पवारांच्या भेटीसाठी दरवर्षी भारतात
ह्युंदाई मोटीरीच्या कंपनीचा मालक दरवर्षी भारतात येतो आणि शरद पवारांना भेटून परततो, असे रतन टाटा यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी पवारांना गळ घातली की, ह्युंदाई कंपनीचा मालक भारतात आला की, माझी भेट घालूनच द्या. पवारांनी आपण तिघे जेवण बरोबर करू, असे सांगितले. त्यानुसार ह्युंदाईचा मालक मुंबईत आला. टाटांबरोबर जेवण झाले. त्यानंतर बैठक संपत असताना, टाटांनी त्या ह्युंदाईच्या मालकाला विचारले की, आपला भारतात काही प्लॅन आहे का, त्यावर त्या मालकाने सांगितले की, तूर्त तरी काही प्लॅन नाही. मग भारतात दरवर्षी का येता, असे टाटांनी विचारले. त्यावर त्यांनी उत्तर दिले की, माझी शरद पवारांशी मैत्री आहे. त्यामुळे वर्षातून एकदा तरी मी येऊन पूर्ण दिवस त्यांच्या सोबत घालवतोच. त्यासाठीच भारतात येतो.
कथा मगरपट्टा आयटी पार्कची !
सतीश मगर (प्रवर्तक, मगरपट्टा सिटी) - मगरपट्ट्यातील जमिनीवर १९८५-८६ मध्ये आरक्षण आले. शेतजमीन कायम ठेवण्याची मागणी घेऊन आम्ही पवारांकडे गेलो. परंतु, पुढची व्हिजन त्यांनी दाखविली आणि ‘एमआरटीपी’ - ३७ ची प्रक्रिया सुरू करण्यास त्यांनी सांगितले. पुढे शेतकरी या प्रकल्पात भागीदार झाले. सगळे शेतकरी असल्यामुळे बांधकामासाठी पैसै मिळत नव्हते. तेव्हा पवार मदतीला धावून आले. एचडीएफसीचे दीपक पारेख यांच्याशी त्यांनी भेट घालून दिली आणि प्रकल्पाचे महत्त्व सांगितले. वित्त पुरवठा झाला आणि मगरपट्ट्यात आयटी पार्क साकारले. तेथे आता १ लाख लोक काम करतात आणि वार्षिक ७ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. हे नसते झाले तर, गुंठा-गुंठा जमीन विकत शेतकरी बसले असते आणि आम्ही अंगावर सोन्याचे दागिने घालून कोणाच्या तरी मागे फिरत राहिलो असतो !
राजकारणाबाहेरचे पवार
हेमंत टकले (साहित्यीक) : राजकारणाच्या बाहेरचे पवार साहेब अनुभवायला मिळाले. आम्ही पुणे विद्यापीठाशी संलग्न आहोत. पण, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नाशिकला व्हावे, अशी आमची आग्रही मागणी होती. यासाठी मोठा लढा देण्याची आमची तयारी होती. पण, त्यावर आमची समजूत काढण्याचं काम नाशिकला येऊन पवार साहेबांनी केले. ते म्हणाले, “तुम्ही काहीतरी मागत आहात, पण मला तुम्हाला त्यापेक्षा मोठे काहीतरी द्यायचे आहे.” आम्ही विद्यापीठ मागतोय, यापेक्षा तुम्ही आम्हाला मोठे काय देणार, असा प्रश्न आम्हाला पडला होता. मात्र, त्यानंतर नाशिकमध्ये महाराष्ट्रातील पहिले मुक्त विद्यापीठ स्थापन झाले. त्याला यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले. चव्हाण साहेबांना पवार साहेब गुरुस्थानी मानतात. त्यामुळे एका सर्वोत्तम शिष्याने गुरुला दिलेली दक्षिणा म्हणजे हे विद्यापीठ आहे. देशातील दुसऱ्या स्थानावरचे हे विद्यापीठ आहे. यातून पवार यांची शिक्षणाकडे बघण्याची दूरदृष्टी दिसते. आज या विद्यापीठातून २० लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
हेही वाचा: काय आहे आनंदी देशांचे रहस्य?
साहित्यिकांना बोलते करणारे साहेब
दौऱ्यावर असताना त्या गावातील साहित्यीक, कवी कोण आहेत, याची जंत्री साहेबांकडे असायची. नाशिक दौऱ्यावर आलेले साहेब राजकारण बाजूला ठेऊन कुसुमाग्रजांशी गप्पा मारायचे. साहित्य संमेलनाची उद्घाटने किंवा समारोप करून साहित्यिकांना मोठे केले जाऊ शकत नाही. साहित्यिकांची समाजाबद्दलची जाणीव आहे, ती राजकारण्यांनी प्रत्यक्ष समजून घ्यावी, या दृष्टीने पवार यांनी साहित्यिकांशी संबंध जोडला आहे. सांस्कृतिक क्षेत्रात राजकीय मतभेद कधीही ठेऊन चालत नाही, हा विचार त्यांनी प्रत्यक्षात आणल्याचे वेळोवेळी अनुभव घेतले आहेत.
पवार पॅनेल जोरात
श्रीनिवास पाटील, खासदार : महाविद्यालयीन शिक्षणासाठी १९५७ मध्ये मी स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तर; साहेब १९५८ मध्ये बीएमसीसी महाविद्यालयात आले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा गराडा पवार यांच्या अवतीभोवती असायचा. पवार यांच्या नावाने पुण्यातील सर्व महाविद्यालयात पवार पॅनेल उभे केले की ते प्रतिनिधी निवड़ून यायचे. ते सगळीकडे लढवय्ये होते. त्याच वेळी त्यांच्यातील नेतृत्वाची हीच वृत्ती दिसून आली होती. अनेकांनी त्यांना विरोध केला पण; त्यांची लढाऊ तर; आमची पळाऊ वृत्ती.
पाऊस, वादळ वाऱ्याला ‘पवारा’ म्हणतात त्या मधील ‘प’ काढला तर ‘वारा’ उरतो, त्यामुळे पवार. मी पुणे जिल्हाधिकारी असताना आळंदीमध्ये माऊलींच्या समाधीवर पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन केले होते, ते झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या पवारसाहेब मला फोन करुन "अरे मी देहुत संत तुकाराममहाराज समाधीवरही पुष्पवृष्टी करतो," असे म्हणाले. वारकरी त्यांच्या हृदयात आहेत. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रचाराचा नारळ त्यांनी काटेवाडीतील मंदिरात फोडला मग; ‘ते’ नास्तिक कसे !
परदेशातही पवारांची ‘पॉवर’
संजय नहार (सरहद संस्था) : देश असो की परदेश, पवार यांच्या नावाची महती सगळीकडे जाणवते. घुमान येथे आयोजित मराठी साहित्य संमेलनाचं १०० टक्के श्रेय साहेबांना जाते. तसेच, ११ वर्षांपूर्वी भारतातून पाकिस्तानला गेलेल्या शिष्टमंडळाचा एक सदस्य मी होतो. पाकिस्तानला शिष्टमंडळाबरोबर चालल्याचे साहेबांना सांगितले. त्यांनी शिष्टमंडळाची विचारपूस केली. भारत-पाकिस्तानची परिस्थिती खराब असल्याने काळजी व्यक्त केली. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शायर खान यांना फोन लावला. खान यांनी इस्लामाबादमध्ये सर्वतोपरी सहकार्य केले. ‘आप पवार साहब के यहाँ से आये है, पवार साहब ने कहाँ है’ हीच वाक्य सातत्याने कानावर पडत होती. पाकिस्तानातील कांद्याच्या व्यापाऱ्यांपासून ते क्रिकेट क्षेत्रापर्यंत सर्वांना असे वाटत होते की, मी पवारांच्या जवळचा माणूस आहे. त्यामुळे प्रत्येक जण माझ्यासोबत फोटो काढत होते. पवारांनी शक्ती दिली, त्यातूनच संस्था उभ्या राहिल्या.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”