
Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?
इम्रान आणि त्याची प्रेयसी सारिका यांचं ब्रेकअप झालं. एका डेटिंग अॅपवरुन भेटलेल्या इम्रान-सारिकाचं ब्रेकअप होण्यामागे कारण होतं.
आफताब पूनावालाने प्रेयसी श्रद्धाची केलेली हत्या. इम्रानसुद्धा असंच काहीसं वागेल, या भीतीने सारिकाने त्याच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले.
यानिमित्ताने मुस्लिम धर्मिय आफताबने हिंदुधर्मीय प्रेयसी श्रद्धाची हत्या केली आणि लव्ह जिहादचा मुद्दा प्रचंड चर्चेत आला.
मुळात लव्ह जिहाद या नावाचा कोणताही कायदा अस्तित्त्वातच नाही. भारतात ८ राज्यांत यासंबंधी कायदा करण्यात आला आहे आणि त्यातल्या एकाही कायद्याला हे नाव दिलेलं नाही. वेगवेगळ्या नावांसह तो कायदा तयार झाला आहे.
काय आहे हा कायदा?
मुलीचा धर्म बदलण्याच्या उद्देशाने केलेला विवाह रद्द केला जाईल, 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
जबरदस्तीने धर्मांतर केल्यास 1-5 वर्षांच्या तुरुंगवासासह 15,000 रुपये दंडाची शिक्षा होवू शकते.
महिला अल्पवयीन असल्यास किंवा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीची असल्यास, 3 वर्षे ते 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि 25,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
सामूहिक धर्मांतर करणाऱ्या संस्थांना 3-10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल.
जर कोणाला लग्नानंतर धर्म बदलायचा असेल तर त्याकसाठी दोन महिने अगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा लागेल.
लव्ह जिहादविषयक कायद्याचे वेगळेपण काय आहे ?
भारतात 1967 पासून धर्मांतरविरोधी कायदे असले तरी, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश ही पहिली राज्ये होती ज्यांनी विवाहासंबंधी कायदा लागू केला. उत्तराखंडचा धर्म स्वातंत्र्य कायदा, 2018, चुकीचे चित्रण, बळजबरी, फसवणूक, अवाजवी प्रभाव, बळजबरी, प्रलोभन किंवा विवाह याद्वारे धर्मांतर करण्यास मनाई करतो. त्याची शिक्षा एक ते पाच वर्षे तुरुंगवास आणि दंड अशी आहे, ज्यामुळे तो अजामीनपात्र गुन्हा ठरतो. हिमाचल प्रदेशने 2019 मध्येही असाच कायदा केला होता.
कायदेतज्ज्ञ काय म्हणतात?
अॅडव्होकेट उदय वारुंजीकर म्हणतात, 'लव्ह जिहाद' अशा नावाचा कोणताही कायदा नाही. वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या नावांनी कायदे केलेले आहेत. त्यातही मूलतत्त्व एकच आहे, ते म्हणजे सक्तीने धर्मांतर करण्यास विरोध.
आपल्या राज्यघटनेमध्ये त्याचा समावेश आधीपासूनच आहे. त्यामुळे ते नवीन नाही. आपली राज्यघटना प्रत्येक माणसाला त्याच्या धर्मपालनाचा हक्क असल्याचे मानते. त्यामुळेच सक्तीने धर्मांतर करण्यास घटनेचा विरोध आहेच.
लव्ह जिहादसंबंधी कायद्यामध्ये केवळ लग्नासाठी सक्तीने धर्मांतर करण्यास विरोध दर्शवलेला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये अध्यादेश काढण्यात आलेला आहे. ज्यावेळी अधिवेशन नसतं त्यावेळी राज्यपालांना अध्यादेश काढून कायदा आणण्याचे अधिकार असतात. परंतु ६ महिन्यात या अध्यादेशाला सदनाची मान्यता मिळवावी लागते.
लव्ह जिहाद आलाच कुठून?
गेले कित्येक वर्ष लव्ह जिहाद भारतीय राजकारणातला एक हुकुमाचा पत्ता झाला आहे. पण मुळात याची सुरूवात कुठून झाली, हा शब्द आला कुठून याचा शोध घेतला असता लक्षात आलं हे बरंच जुनं आहे.
साधारण २००७च्या आसपास कर्नाटक आणि केरळच्या काही भागांत हिंदु जनजागृती समितीच्या काही आंदोलनांमध्ये भडक प्रचारादरम्यान ही संकल्पना वापरली गेली, असं म्हटलं जातं.
आकर्षक मुस्लीम तरुण हिंदु मुलींना फुस लावून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात, फसवणुकीने लग्न करतात आणि मग धर्मांतर घडवून आणतात, त्यांना विदेशातून पैसेही पुरवले जातात, असा आरोपही याच संकल्पनेसंबंधी केला गेला होता.
ही संकल्पना खरोखरच खरी की खोटी, बनाव रचलेली आहे, हा भाग अलहिदा पण याद्वारे सर्रास हिंदु-मुस्लीम लग्नांना लव्ह जिहादचा आणि फसवणुकीचा रंग देण्यात आला. ही जास्त चिंताजनक बाब आहे.
आंतरधर्मीय विवाह करणारी जोडपी काय म्हणतात?
दिया आणि देवेश हे दोघे कोकणातील एका तालुक्याच्या गावात राहणारं जोडपं. देवेश हिंदु तर दिया मुस्लीम कुटुंबातील. दोघेही कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. त्यावेळी प्रेमात पडले. आपल्यातल्या धर्माच्या अंतरामुळे आपलं नातं जुळणं काही शक्य नाही. हे दोघांनाही लक्षात आलं होतं त्यामुळे त्यांनी चक्क एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णयही घेतला.
पण त्यांना ते शक्य झालं नाही. त्यांना प्रेम विसरता आलं नाही. दोघांनी ठरवलं होतं की, आपलं शिक्षण झालं. आपण आपल्या पायांवर उभे राहिलो की मग घरी सांगायचं. पण कसं कोण जाणे तिच्या घरी समजलं.
अर्थातच घरातून विरोध होता. तिचा फार छळही झाला. मात्र दिया मागे हटली नाही. एका दिवशी चक्क घरातून बाहेर पडली आणि तिने देवेशला फोन केला. अचानक आलेल्या या परिस्थितीला सामोरं जाण्याची देवेशचीही तयारी नव्हती. पण आपल्यासाठी एक मुलगी घर सोडून आलीय, हे कळल्यावर मागे हटणं योग्य नव्हतं.
त्यामुळे मग देवेश आणि दियाने लग्न केलं. अर्थात त्याआधी दियाने आपला धर्म बदलला. हिंदु विवाह कायद्याप्रमाणे दोघांनी लग्नगाठ बांधली.
देवेश म्हणतो, मी हिंदुत्त्ववादी आहे. पण माझी बायको मुसलमान आहे. मला हे फार महत्त्वाचं वाटतं. कारण आम्ही फक्त प्रेमासाठी एकमेकांशी लग्न केलं. त्यावेळी आमच्या वार्षिक परीक्षा तोंडावर होत्या. तरीही आम्ही त्या साऱ्यातून मार्ग काढला एकमेकांसाठी उभे राहिलो. दियाला धर्म बदलावा लागला पण अजूनही ती रोजे ठेवते, नमाज पढते. तिच्या पूर्वीच्या धर्मपालनात कोणताच बदल नाही. मीही त्याची सक्ती केली नाही. मुळात अशी सक्ती करावी, असं मला वाटतंच नाही.
देवेशच्या घरच्यांनी, परिचित, नातेवाईकांनी हळूहळू दियाला स्वीकारलं आता त्यांना मुलगीही झाली आहे. मात्र तिच्या घरुन अजूनही संपूर्ण स्वीकार झालेला नाही. फोनवर बोलतात पण येणं-जाणं नाही.
ताहीर आणि राधा हे दुसरं एक जोडपं. तो मुस्लीम तर ती हिंदु. दोघांच्याही घरुन तीव्र विरोध. दोघांनी घरच्यांना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. सुदैवाने दोघे उच्चशिक्षित असल्याने चांगल्या नोकऱ्या पटकावून भारताबाहेर ते सेट होऊ शकले. अजूनही दोघे आपल्या कुटुंबाकडे परत जाऊ शकत नाहीत.
हक्क प्रेमाचा
एकीकडे आंतरधर्मीय लग्नांना होणारा विरोध वाढतंच चालला आहे. दोन्ही धर्मातील कट्टरपंथीयांकडून अशा विवाहांना कडाडून विरोध केला जातो.
पण अशीही काही मंडळी आहेत. जी अशा लग्नांना नैतिक पाठबळ पुरवतात. अर्थात कायद्याचा आधार घेऊन मगच.
त्यातलेच एक म्हणजे राइट टू लव्ह हा उपक्रम चालवणारे के.अभिजित
डिसेंबर २०१४मध्ये लातूरजवळ अंकोली गावात एका आंतरजातीय जोडप्याला बेदम मारहाण झाली होती. मुलीला तर जातीचा उल्लेख करत जबर मारहाण करण्यात आली होती. त्यावेळी अभिजित आणि त्यांच्या समविचारी मित्रांनी पुण्यामध्ये राइट टू लव्ह नावाची एक फेरी काढली होती.
संविधानाने प्रत्येक सज्ञान व्यक्तीला जोडीदार निवडीचा आणि प्रेमाचा अधिकार दिलेला आहे, मग त्यात हस्तक्षेप करणारे आपण कोण असा विचार घेऊन ही रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर असं वाटलं की हे एका फेरीपुरतं मर्यादित ठेऊन उपयोगाचं नाही.
साधारण २०१२पासूनच अभिजित आणि त्याचे मित्रमंडळी एक आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह चळवळ नावाचा गट चालवत असत. पण राइट टू लव्ह खरोखरच गांभीर्याने घ्यायचं ठरलं आणि २०१५पासून या गटाची अधिकृत सुरूवात झाली.
सुरूवातीला लोकांनी प्रचंड कौतुक केलं. पण हळूहळू विरोधसुद्धा होऊ लागला.
अभिजित सांगतात, कधीकधी फार भीती वाटायची. विशेषत: आंतरधर्मीय लग्नांदरम्यान जास्तच तणाव असायचा. पहिल्यांदा ती जोडपी आमच्याकडे यायची आणि आपल्याबद्दल सांगायची. आम्ही ते पूर्ण ऐकून घ्यायचो.
दोघे सज्ञान आहेत की नाही, ते आधी नक्की करून घ्यायचो. त्यांची पूर्ण माहिती घ्यायचो आणि खरोखरच ते सांगतायत यात तथ्य आहे की नाही, त्याची खात्री करून घ्यायचो. यानंतर त्यांना संपूर्ण प्रोसेस काय असेल याची माहिती द्यायचो.
लग्न करण्यासाठी आम्ही सगळ्याच जोडप्यांना स्पेशल मॅरेज अॅक्टद्वारे लग्न करण्याचा सल्ला देतो. कारणे दोन आहेत.
एक म्हणजे आपल्या घटनेने व्यक्तीचं धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखून त्यांना विवाह करण्याचा अधिकार दिलेला आहे, दुसरं म्हणजे या कायद्यातील घटनात्मक तरतुदी अतिशय चांगल्या आहेत. व्यक्तींचे मूलभूत आधिकारांचा तो आदर राखतो.
यानंतर पायरी येते ती लग्नाची. लग्नाची नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात. त्यानंतर नोंदणी करण्याची नेमकी पद्धत काय आहे. त्यासाठी किती साक्षीदार लागतात, इथपासून सगळ्या गोष्टी राइट टू लव्हचे कार्यकर्ते सांगतात.
लग्न झाल्यानंतर पोलीस स्थानकात त्याची माहिती द्यावी लागते. नोटरी करावी लागते. काहीवेळा अशा विवाहाला पालकांचा किंवा आणखी कुणाचा विरोध असेल तर जोडप्याला पोलीस संरक्षण मिळू शकते. याची माहितीही हे कार्यकर्ते देतात.
लग्नानंतर या जोडप्यांना राहण्यासाठी जागा मिळवून देणे, काहीजणांना स्थलांतर करायचे असल्यास त्यात मदत करणे, नोकरीसाठी, शिक्षणासाठी प्रयत्न करणे यातही राइट टू लव्ह आणि त्यांचे हितचिंतक मदत करतात.
काहीवेळा विधवा किंवा टाकून दिलेल्या मुलीही येतात, कधीकधी बालविवाह होत असल्याची माहिती मिळते. अशावेळीही अभिजित आणि राइट टू लव्हची संपूर्ण टीम तिथे धावत पोहोचते.
हल्ली तर समलिंगी जोडप्यांच्या केसही येतात, असं अभिजित सांगतात. या जोडप्यांना मुख्यत्त्वेकरून राहण्यासाठी जागा मिळवून देण्यास अभिजित आणि त्याची टीम मदत करते.
क्षण कसोटीचे
राइट टू लव्ह हे नाव कितीही गोंडस असलं तरी हे काम भयंकर जोखमीचं आहे. विशेषत: आपल्याकडील समाज वास्तव लक्षात घेता तर त्यात अडथळेच जास्त आहेत, अशावेळी कसोटीचे क्षण येतात का, असं आम्ही अभिजितला विचारलं.
त्यावर अभिजित म्हणाले, नक्कीच येतात. कधीकधी अगदी जिवाची भीतीही वाटते.
अनेकदा गावातल्या केसमध्ये राजकीय हस्तक्षेप असतो.
काहीवेळा झुंडीच्या झुंडी मुलीच्या घरी धडकतात, पालक तिच्यावर भावनिक दबाव टाकतात अशावेळी ती स्टेटमेंट सहज बदलू शकते. कारण तीही हतबल असे. तेव्हा आम्हाला अतिशय शांत डोक्याने परिस्थिती हाताळावी लागते.
आम्ही कायमच पोलिसांना विश्वासात घेतो. कधीही त्यांच्याशी खोटं बोलत नाही. मुलांच्या पालकांशी बोलण्याचा प्रयत्न करून पाहतो.
शक्यतो सामंजस्यातून आणि सहमतीतून विवाह व्हावेत, हाच आमचाही उद्देश्य असतो. पण तरीही ते होत नसेल तर मात्र दुसरा पर्याय राहत नाही.
लव्ह जिहादचं सरसकटीकरण नको
लव्ह जिहादबद्दल तुमचं काय मत आहे असं विचारल्यावर अभिजित म्हणतात, हिंदु-मुस्लीम लग्नाला सरसकट लव्ह जिहाद म्हणणं अजिबात योग्य नाही.
खरंतर मला वाटत नाही, असा कुठला प्रकार आहे. कारण राष्ट्रीय स्तरावर कोणत्याही चौकशी समितीने लव्ह जिहादच्या प्रकरणांचा अहवाल दिलेला नाही.
कुठलीही संघटना राष्ट्रीय पातळीवर काम करत नाही. मग ठोस आकडेवारी नसताना त्याला मान्यता कशी द्यायची?