Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोककला आणि चावटपणा}

Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

Gautami Patil Lavani

लोककला या मोकळ्याढाकळ्या असल्या, तरी छचोर कधीच नव्हत्या आणि नाहीत. लावणी सादरीकरण, गोदावरीबाई पुणेकर ते सुरेखा पुणेकर आणि यमुनाबाई वाईकर ते गुलाबबाई संगमनेरकरांची लावणी आणि दुसरीडे गौतमी पाटीलची लावणी यात नेमका फरक काय याचे लोककला अभ्यासक डॉ. मुकुंद कुळे यांनी केलेले विश्लेषण...

गौतमी पाटीलच्या अश्लील सादरीकरणामुळे महाराष्ट्राची लोकप्रिय लोककला असलेली लावणी पुन्हा एकदा वादात सापडली आहे. खरंतर आजवर अश्लीलतेच्या शिक्क्यामुळेच ही लावणी लोककला पांढरपेशांनी गावकुसाबाहेर ठेवली होती. वास्तविक कुठलीही कला ही मूलत: श्लील वा अश्लील असत नाही. ती कला कधी, कोणा पुढे आणि कशासाठी सादर करतो, त्यावर अनेकदा कुठल्याही कलेचं स्वरूप ठरत असतं. (Maharashtra Gautami Patil dance Lavani folk art social media marathi article)

उदाहरणार्थ गोंधळ-जागरणासारखे विधी धार्मिक कुळाचार म्हणून सादर होत असल्यामुळे त्या लोककलांचं सादरीकरण हे धार्मिक-सात्त्विक असतं. याउलट लावणी या लोककलेचं प्रयोजनच मुळी मनोरंजन हे असल्यामुळे लोकानुनय हा या लोककलेचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र या लोकानुनयामुळेच खरंतर लावणी कला पूर्वी आणि आजही अश्लीलतेकडे झुकेलेली आहे.

अर्थात लावणी सादरीकरणातील श्लील-अश्लीलतेचा तोल नि ताल आमच्या पारंपरिक लोककलावंतानी सुरेख सांभाळलेला होता, जो आज सांभाळला जात नाही. गोदावरीबाई पुणेकर ते सुरेखा पुणेकर आणि यमुनाबाई वाईकर ते गुलाबबाई संगमनेरकर या सगळ्या जुन्याजाणत्या लावणीकलावंतानी आपल्या लावणीतला शृंगारिक आशयही कलात्मक करून टाकला. याउलट आताच्या काळात लावणी थेट शृंगारिक नसली तरी तिचं सादरीकरण मात्र अश्लील होत चाललेलं आहे. 

हे देखिल वाचा-

हेही वाचा: गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

वास्तविक लोककला, म्हणजे खरंतर प्रयोगात्म लोककला (performing folkarts) या बव्हंशी मोकळ्याढाकळ्या आणि सैल असतात. विशेषत: ज्यांचं प्रयोजन प्रामुख्याने मनोरंजन आहे, अशा लावणी, भारूड, दशावतार... यांसारख्या लोककला. या लोककलांत मोकळेपणा असतो किंवा त्या त्या वेळी सादरीकरणात तो मोकळेपणा-सैलसरपणा आणला जातो कारण या लोककला परस्परपूरक आणि परस्परसंवादी असतात. या कला सादर करताना एकप्रकारे प्रेक्षकांनाही त्यात सामावून घेतलं जातं.

म्हणजे प्रेक्षकांचा आनंद, त्यांचा भावनावेग, त्यांचे चित्कार हेही कळत नकळत त्या कलेचा किंवा सादरीकरणाचा भाग बनून जातात. आणि मग परस्परांना प्रोत्साहन देताना कधी कधी कलावंत आणि प्रेक्षक दोघेही आपली मर्यादा सोडतात. खरंतर आजच्या ओटीपी प्लॅटफॉर्मच्या युगात सा-याच मर्यादा ओलांडलेल्या गेल्या आहेत. तरीही प्रत्यक्ष आणि आभासी या कलेला असलेल्या चौकटी आपल्याला स्वीकाराव्याच लागतात. शूट करून पडद्यावर दाखवलेलं अश्लील दृश्य आणि प्रत्यक्षात समोर केलेलं अश्लील वर्तन यात फरक करावाच लागतो.

हे देखिल वाचा-

हेही वाचा: Gautami Patil: पायाखालून कमरेपर्यंत येईल तेवढी साडी... गौतमीवर लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे भडकल्या...

म्हणूनच मग लावणीसारखी कला कितीही मोकळढाकळी असली तरी तिला सामाजिक साधनशुचितेच्या चौकटीतच पाहावं लागतं. कलेतली ही साधनशुचिता पूर्वीच्या लोककलावंतानी प्राणपणाने जपूनही पांढरपेशा समाजाने त्यांना वाह्यात-ग्राम्य-चावट ठरवलं होतं. आतातर गौतमी पाटील सारख्या तरुण नृत्यांगना, ज्या मूळ लावणीपरंपरेतील नाहीत, त्यांनी लावणी छचोरच करून टाकलीय.

मात्र लोककला या मोकळ्याढाकळ्या असल्या, तरी छचोर कधीच नव्हत्या आणि नाहीत. लोककला या प्राकृतिक दृष्ट्या मुक्त नि मोकळ्या असल्यामुळे क्वचित कधी त्यांचा बाज चावटपणाकडे झुकते खरा पण, तो चावटपणा सूचक असतो, थेट नसतो. हा सूचकपणाच लोककलांचा आत्मा आहे!