Tourism- Mangrove Tourism Project prospering in Raigad District of Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदळवन निसर्ग पर्यटन}

रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील काळींजे व दिवेआगर या गावांमध्ये "कांदळवन निसर्ग पर्यटन" हा जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे...काय आहे हा प्रकल्प

महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात (Raigad District) सर्वाधिक जवळपास 120. 97 चौरस किमी एवढे विस्तीर्ण कांदळवन क्षेत्र आहे. जिल्ह्यातील समृद्ध जैविवधतेने बहरलेल्या या कांदळवनांमध्ये निसर्ग पर्यटन (Nature Tourism) बहरत आहे. शिवाय समुद्र तटरक्षण होत आहे, समुद्री जीवांचे आश्रयस्थान अबाधित आहे. येथील महत्वपूर्ण जैविविधतेचा ठेवा जगासमोर येत आहे. शिवाय रोजगार निर्मिती बरोबरच आर्थिक विकासाला चालना सुद्धा मिळत आहे. याबरोबरच बहुविध जैवविधतेचे (Biodiversity) संरक्षण आणि संवर्धन होत आहे. येथे कांदळवन पर्यटनास सुरुवात झाली आहे. कायाकिंग व बोटिंगला सुरुवात होईल. अशी माहिती कांदळवन वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी दिली. (Mangrove Tourism Project prospering in Raigad District of Maharashtra)

कांदळवन निसर्गपर्यटन वैशिष्ट्ये
कांदळवन निसर्ग पर्यटनामध्ये कांदळवनाची सफर, कांदळवन नौका स्वारी, निसर्ग भ्रमंती / पक्षी निरीक्षण, किनारा भ्रमंती आणि किनाऱ्यांवरील खडक टाळ्यांमधील जैवविविधतेचे निरीक्षण, ताऱ्यांचे निरीक्षण, पारंपरिक व आधुनिक मासेमारी, समुद्रातील जलचरांची माहिती, भ्रमंती / नौका स्वारी दरम्यान मत्स्यपालन प्रकल्प किंवा कांदळवन वृक्षारोपणाच्या स्थळांना भेट, आसपासच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, स्थानिक पाककृती आणि पारंपारिक जेवण आदी बाबींचा समावेश कांदळवन निसर्ग पर्यटनात पर्यटकांना अनुभवता येणार आहे. यातील काही अनेक बाबी सुरू झाल्या आहेत.

पर्यटन वृद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर
येथील कांदळवन निसर्ग पर्यटनाची माहिती जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत पोहोचावी व पर्यटनाला चालना मिळावी यासाठी काळींजे कांदळवन निसर्ग पर्यटन या नावाने फेसबुक वर इंस्टाग्राम पेज बनवण्यात आले आहे. असेच पेज दिवेआगर कांदळवन निसर्ग पर्यटनाचे देखील बनविण्यात येणार आहे.

स्थानिकांना प्रशिक्षण व सहाय्य
काळींजे व दिवेआगर या गावांमधील स्थानिक लोकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आणि क्षमता बांधणी उपक्रम राबवून तज्ज्ञांमार्फत कांदळवन निसर्ग पर्यटनातील विविध बाबींचे प्रशिक्षण दिले गेले आहे. यामध्ये कांदळ प्रजातींची ओळख, पक्षी प्रजातींची ओळख, पक्षी निरीक्षणाचे तंत्र, किनारी आणि सागरी जैवविविधतेची ओळख, निसर्ग पर्यटनाची संकल्पना व त्यामधील तत्वे, स्थानिक पदार्थाना अधिक बाजार योग्य बनवण्याचे प्रशिक्षण, तारका निरीक्षण आणि जीवरक्षण प्रशिक्षण इ. उपक्रमांचा समावेश आहे. कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटनाचा हा उपक्रम स्थानिक लोकांच्या उन्नतीसाठी आणि कांदळवन व सागरी जैवविविधता संवर्धनास प्रोत्साहित करण्यासाठी हाती घेतलेल्या समुदाय-आधारित संवर्धन कार्यक्रमाचा एक भाग आहे. सुरुवातीच्या तांत्रिक आणि आर्थिक पाठिंब्यानंतर, निसर्ग पर्यटनाच्या या प्रकल्पाचे नियोजन संपूर्णपणे स्थानिक समुदायाद्वारे करण्यात येत आहे.

राखीव क्षेत्र
रायगड जिल्ह्यात 2,302.096 हेक्टर कांदळवन क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये श्रीवर्धन, म्हसळा, पेण, रोहा, मुरुड, महाड व तळा या तालुक्यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात रेवदंडा व आगरदांडा येथे खारफुटीच्या सर्वाधिक 11 प्रजाती आढळल्या तर, कुरुळ, भालगाव, वाशी- हवेली येथे 10 प्रजाती आढळल्या आहेत.

हे देखिल वाचा-

कांदळवन/खारफुटी (मँग्रोव्ह)
खारफुटी हा एक समुद्राजवळ वाढणारा, अनेक जातींच्या वनस्पतींचा एक समूह (वनश्री) आहे. मराठीत या वनस्पतीला कच्छ वनस्पती असेही म्हणतात. इंग्रजीत मँग्रोव्ह म्हणतात. तिवर हा या समूहातील एक उपप्रकार आहे. या वनस्पतीमुळे बनलेल्या जंगलाला कांदळवन म्हणतात. खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणार्‍या भागात वाढते.

उपयुक्तता
खारफुटीच्या दाट झाडीमुळे समुद्र व जमीन तसेच खाडी, किनारा व त्यावरील प्रदेश यांत एक हिरवी भिंत निर्माण होते. त्यामुळे किनार्‍याजवळच्या जमिनीची पाण्यापासून होणारी धूप थांबते. भूसंरक्षणाच्या दृष्टीने या वनस्पती अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यामुळे इतर वनस्पती व जीवसृष्टीचे संरक्षण होते. जलचर प्राण्यांना संरक्षण मिळते. मासे, खेकडे, झिंगे वगैरे प्राणी येथे अंडी घालतात. पिले मोठी झाली की समुद्राकडे जातात. या वनस्पती समूहात झिंगे चांगले वाढतात. खारफुटीची वने असलेल्या सर्व ठिकाणी सागरी लाटांपासून संरक्षण मिळते. सागरकिनार्‍याचे रक्षण करण्यासाठी खारफुटीची/तिवरांची जंगले खर्‍या अर्थाने तटरक्षकाची भूमिका चोख बजावतात. त्यामुळे या खारफुटीच्या संवर्धनाची गरज आहे. असे वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी सांगितले.

कांदळवन निसर्ग पर्यटनाचा आनंद शेकडो पर्यटक घेत आहेत. कांदळवन निसर्ग पर्यटनासाठी आवश्यक असलेली कायाक, नौका, दुर्बीण आदी विविध साहित्य शासनाकडून 90 टक्के सबसिडीने देण्यात येणार आहे. त्याबरोबरच प्रशिक्षण व मार्गदर्शन देखील दिले जात आहे. या माध्यमातून आगामी काळात येथे हजारों लोकांना रोजगार निर्माण होईल. तसेच जगभरातील लोकांना येथील जैवविविधता व निसर्गाचा खजिना जवळून पाहता व अनुभवता येईल.

-सिद्धेश कोसबे, अध्यक्ष दिवेआगर कांदळवन निसर्ग पर्यटन गट

हे प्राथमिक पथदर्शी प्रकल्प आहेत. जिल्ह्यात कांदळवनाच्या विविध प्रजाती असून अनेक दुर्मिळ प्रजाती देखील येथे टिकून आहेत. त्यामुळे येथे जैवविविधता बहरत आहे. भविष्यात जिल्ह्यातील आणखीन अश्या कांदळवन पर्यटन स्थळांची निवड करून कांदळवन निसर्ग पर्यटन प्रकल्प सुरू केले जातील. त्या अनुषंगाने पर्यटक वाढतील व किनारपट्टीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. आणि जैवविविधतेचे व कंदळवनांचे संरक्षण व संवर्धन देखील होईल.
-समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन कक्ष अलिबाग-रायगड