Republic Day Special- अशोकचक्रासह केशरी-पांढरा-हिरवा या रंगांचा असलेला तिरंगी ध्वज (Tricolor) कुठं तयार होतो हे अनेकांना माहीत नसतं. तो तयार होतो मराठवाड्यातील नांदेडमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रध्वजनिर्मितीचं केंद्र}

....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

अंजली कलमदानी

भारतात सर्वत्र दिसणाऱ्या लहान-मोठ्या कापडी तिरंगी ध्वजाची निर्मिती प्रामुख्यानं इथल्या ‘खादी ग्रामोद्योग’मध्ये होते. कर्नाटकातील धारवाड, तसंच महाराष्ट्रातील नांदेड इथला ‘खादी ग्रामोद्योग’ या भारतातील खादीकापडातील ध्वज व वस्त्र बनवणाऱ्या अग्रेसर संस्था आहेत.

भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभर साजरा होत आहे. प्रजासत्ताकदिनाच्या निमित्तानं भारताच्या तिरंगी ध्वजाच्या रंगांची रोषणाई केलेली सर्वत्र दिसत आहे. ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्तानं काही शहरांचे मध्यवर्ती भाग रोषणाईनं लखलखत आहेत व त्यात प्रामुख्यानं तिरंगी रंगाची संकल्पना राबवली गेली आहे. (Republic Day Special The Centre in Maharashtra where Tricolor is Made)

स्वातंत्र्यसंग्रामात (Freedom Struggle) आहुती दिलेल्या सर्वांची आठवण काढत, आपल्या तिरंगी ध्वजाकडे बघताना ऊर अभिमानानं भरून येतो. एखाद्या छोट्या गावातील शासकीय इमारतीवर फडकणारा ध्वज ते दिल्लीतील (New Delhi) राष्ट्रपती-भवनावर फडकणारा मोठा ध्वज ही आपल्या स्वतंत्र भारताची अभिमानास्पद ओळख आहे. मात्र, अशोकचक्रासह केशरी-पांढरा-हिरवा या रंगांचा असलेला तिरंगी ध्वज (Tricolor) कुठं तयार होतो हे अनेकांना माहीत नसतं. तो तयार होतो मराठवाड्यातील (Marathwada) नांदेडमध्ये. महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेले स्वातंत्र्यसैनिक स्वामी रामानंदतीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांनी नांदेड इथं ‘मराठा खादी ग्रामोद्योग समिती’ची स्थापना १९६७ मध्ये केली. पुढं या संस्थेचं संगोपन माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या व इतर मान्यवरांच्या देखरेखीखाली झालं.

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधीजींनी केलेलं कार्य, त्यांची विचारप्रणाली हा या संस्थेच्या कार्याचा प्रमुख गाभा आहे. नांदेड येथील संस्थेच्या उदगीर, औसा, कंधार, अक्कलकोट इथं शाखा आहेत. या शाखांमध्ये खादीची सूतकताई व नंतर रंगकाम आणि कांडी मशिनवर विणकाम केलं जाऊन वस्त्रनिर्मिती होते. त्यानंतर नांदेड इथं तयार कापडाचा रंग, पोत, दर्जा यांची पडताळणी केली जाते व निरनिराळ्या आकारातील ध्वजांची निर्मिती होते. कापडाची योग्य प्रमाणात बेतणी करून पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या अशोकचक्राची छपाई झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी चक्र अचूक ठेवून जुळवल्यावर शिलाई मशिनवर पारंपरिक पद्धतीनं शिलाई होते. विशिष्ट दर्जाच्या दोऱ्यांची ध्वजाला गुंफण होते. ही सारी प्रक्रिया निष्णात कारागीर करतात; परंतु काळाच्या ओघात नांदेड इथल्या ‘खादी ग्रामोद्योग’च्या परिसराची दुरवस्था झाली आहे. हिरव्यागार वृक्षांची समृद्धी असलेल्या या परिसरात तिरंगी ध्वजाची निर्मिती होते. त्या इमारती व यंत्रसामग्री कालबाह्य झाली आहे. कारागिरांची घरंही मोडकळीला आलेली आहेत. काही वर्षांपूर्वी इथं पारंपरिक पद्धतीनं कागदनिर्मितीही केली
जायची. तीही यंत्रणा सध्या कार्यान्वित नाही.

एवढ्या महत्त्वाच्या जागेचं पुनरुज्जीवन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचं निमित्त साधून होणं व संपूर्ण देशाच्या तिरंगी ध्वजाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळणाऱ्या संस्थेची ओळख महत्त्वाची ‘खादी ग्रामोद्योग संस्था’ म्हणून इतरांना होणं आवश्यक आहे. त्यासाठी नियोजित वास्तुसंकुलाचा पुनरुज्जीवनप्रकल्प आम्ही तयार केला आहे. ही संस्था केवळ नांदेडमध्येच नव्हे तर, भारतातील ‘खादी ग्रामोद्योग संस्थां’साठी प्रेरणास्थान ठरेल अशा प्रकारे तिची संरचना आहे.

हे देखिल वाचा-

मराठवाड्यात कापसाचं पीक भरपूर होतं. स्थानिक पिकापासून वस्त्रनिर्मिती आणि त्याद्वारे अनेक लघु-उद्योगांना पूरक अशी ध्वजनिर्मितीची व्यवस्था नांदेडमध्ये तयार झाली आहे. ज्या भागांमध्ये मूळ सामग्रीची निर्मिती होते, कारागिरांचे हात ध्वजनिर्मिती करतात, कारागिरांना रोजगार निर्माण होतो आणि हे ध्वज पोहोचवलेही जातात. संपूर्ण देशांत असा हा या भागाचा अमूर्त वारसा आहे. मात्र, हाही वारसा सध्या पुनरुज्जीवनाची वाट बघत आहे. इथं
असणाऱ्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत, मोडकळीला आलेल्या आहेत किंवा त्या वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं फार काही सौंदर्यपूर्ण अशा इमारती नाहीत; पण त्या ठिकाणी भारताच्या ध्वजाची निर्मिती होते हीच महत्त्वाची बाब या संस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी महत्त्वाची आहे.

नियोजित संकुल हे गांधीजींच्या विचारसरणीला अनुसरून साधेपणा, नम्रता व त्याचबरोबर काळानुरूप नवीन तंत्राचा अवलंब यांना अनुसरून केलेलं आहे. मध्यवर्ती फडकणाऱ्या‍ तिरंगी ध्वजाभोवती इमारत व तीमधील सर्व उपक्रम कार्यरत असणार आहेत. संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ खादी-उद्योगातील विविध उत्पादनांचं केंद्र असून उत्पादनांशी निगडित निर्मितीचं माहितीपूर्ण दालन असेल, तर मुख्य इमारतीत असेल महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचं व वस्तूंचं प्रदर्शन. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, शंकरराव चव्हाण व इतर मान्यवरांचं योगदानही इथं पाहायला मिळेल. नवीन सुविधांनी सुसज्ज कार्यशाळेत ध्वजांच्या निर्मितीचे विविध टप्पे असतील. कारागिरांच्या घरांचं पुनरुज्जीवन करताना विशेष अतिथींसाठीही सोय करण्यात येणार आहे.

दृश्य वीटकाम, फेरो सिमेंट तंत्रातील नावीन्यपूर्ण छत, विटांचं जाळीकाम, लाकडी कमानी यांद्वारे नियोजित इमारतीचं बांधकाम करताना त्यात सौंदर्यपूर्णतेबरोबरच साधेपणाचंही भान राखलं
जाणार आहे. चरखा ही खादीची मूळ संकल्पना आहे आणि चरख्याचं अस्तित्व संपूर्ण संकुलात ठळकपणे दिसणार आहे. ‘नांदेड खादी ग्रामोद्योग संकुला’चं वैशिष्ट्यपूर्ण पुनरुज्जीवन हे नुसतंच ‘खादीच्या वस्त्रनिर्मितीसाठी व ध्वजनिर्मितीसाठी नवीन सुविधा’ एवढंच न राहता, पर्यटकांसाठीही ते माहितीपूर्ण केंद्र असेल.

खादीनिर्मितीला व वापराला प्रोत्साहन देताना वास्तूच्या निर्मितीमधील सौंदर्यपूर्ण नावीन्य, इतिहासाला उजाळा देणारं संग्रहालय अशा सर्वांची मूठ एकत्रितपणे बांधली जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नांदेडच्या आणि पर्यायानं भारताच्या ‘खादी’ या संकल्पनेतला हा मानाचा तुरा असणार आहे हे निश्चित. या प्रकल्पासंदर्भात गेल्या अधिवेशनात निश्चितपणे घोषणा झाली; पण हा प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्षात यावा अशी आशा करू या व पर्यायानं कारागिरांनाही नवी दिशा मिळेल अशीही आशा बाळगू या.

हे देखिल वाचा-