
Shivrajyabhishek Sohala : हिंदवी स्वराज्याची स्थापना केवळ राजकीय सत्तेसाठी केली नव्हती, हा तर भारतीयत्वाचा अरुणोदय
- रवींद्र सासमकर
स्वातंत्र्यलढ्यातील अनेक क्रांतिकारक, महानायकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची ऊर्जा मिळाली. अशा महान राजाचा राज्याभिषेक सोहळा आमच्यासाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे.
शिवराज्याभिषेक म्हणजे मातोश्री जिजाऊ आऊसाहेब यांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या पूर्तीचा क्षण! छत्रपती शिवाजीमहाराज हे थोर मातृभक्त होते. चौघडे, दुंदुभी, वाद्ये वाजत होती. सुवासिनींनी महाराजांचे औक्षण केले. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मस्तकावर छत्र धारण करून छत्रपती म्हणविले. राज्याभिषेकाच्या दिवसापासून ‘राज्याभिषेक शक’ ही कालगणना सुरु केली. महाराज शककर्ते राजे झाले. स्वतःच्या नावाने श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे असलेली सोन्याची नाणी पाडली.
शिवराज्याभिषेक हा केवळ सोहळा नव्हता, तर समाजाचे नवचैतन्य जागृत करणारा क्षण होता. या सोहळ्याचे दूरगामी परिणाम आपल्या देशावर झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यामुळे धर्म, साहित्य, कला आणि संस्कृतीचे संवर्धन झाले. हिंदुवरील अत्याचार थांबले, जिझिया कर बंद झाला. मुघल सत्तेच्या काळात देशभरातील अनेक मंदिरांचा विध्वंस झाला होता, त्यांचा जिर्णोद्धार करण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले.
भारतावर परकीयांचे आक्रमण झाल्यामुळे आपली भाषाही दूषित झाली होती. फार्सी आणि अरबी भाषेतून मराठीत अनेक शब्द घुसल्याने मराठी भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीतील फार्सी आणि अरबी शब्द काढून त्याऐवजी संस्कृतप्रचुर शब्द योजण्याचे ठरवले. या कार्यासाठी रघुनाथ हणमंते आणि धुंडीराज लक्ष्मण व्यास यांची नेमणूक केली. एकूण १३८० फार्सी शब्दांऐवजी संस्कृत शब्द योजून एका कोशाची निर्मिती केली त्यालाच ‘राजव्यवहारकोश’ असे म्हणतात.
हिंदवी स्वराज्याची संकल्पना
शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना राष्ट्रव्यापी होती. त्यांनी तशी दृष्टीच समाजाला दिली होती. पुढील काळात थोरले बाजीराव यांनी दिल्लीवर स्वारी केली त्याची प्रेरणा शिवचरित्रातच होती. देशाच्या रक्षणासाठी मराठे पानिपतावर अब्दालीशी झुंज घेण्यासाठी का गेले? तो काही महाराष्ट्रात येणार नव्हता. परंतु वायव्य सरहद्द ओलांडून भारतावर होणाऱ्या आक्रमणाला तोंड देणे हे मराठ्यांना आपले कर्तव्य वाटले.
भारत हा भारतीयांसाठी आहे, परकीय अब्दालीला येथे राज्य करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही या भूमिकेतून मराठे पानिपतावर लढले. यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्ररक्षणाची प्रेरणा होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेत मद्रासपर्यंत स्वराज्यविस्तार केला होता. केवळ आदिलशहा आणि दिल्लीचा औरंगजेब हेच हिंदुस्थानचे शत्रू नव्हते तर व्यापाराचे निमित्त करून आलेल्या इंग्रज व पोर्तुगीज या परकीय सत्ताही धोकादायक शत्रू आहेत हे त्यांनी ओळखले होते.
त्यांच्याबरोबर कराव्या लागणाऱ्या संघर्षासाठी शिवरायांनी बलाढ्य आरमार उभे केले. पानिपतानंतर अवघ्या दहा वर्षात महादजी शिंदे, तुकोजी होळकर, बिनीवाले यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतली आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवला. अभिमान वाटावा असा हा मराठ्यांचा पराक्रम आहे, याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजच होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केवळ राजकीय सत्तेसाठी केली नव्हती. ते भारताच्या महान परंपरेचे राजे होते. राजा रन्तीदेवाची प्रार्थना आहे. ‘न त्वहं कामये राज्यं न स्वर्ग नापुर्भवम् । कामये दु:खतप्तानां प्राणिनामार्तिनाशनम् ।’ याचा अर्थ मला राज्य नको स्वर्ग आणि मोक्षही नको माझी एकमात्र इच्छा आहे की, जे दु:खी आणि पीडित आहेत त्यांचे दु:खनिवारण व्हावे. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचेही ध्येय हेच होते. त्यांच्यासाठी राज्य हे साध्य नव्हे तर साधन होते. म्हणूनच शिवरायांचे राज्य हे गोरगरीब, शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांसाठी कल्याणकारी राज्य होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजात काळानुसार बदल घडवून आणले. त्याकाळी परधर्मात गेलेल्या हिंदुला पुन्हा हिंदू करता येत नसे, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमान झालेल्या नेताजी पालकरला पुन्हा हिंदू केले आणि एक क्रांतिकारक पाऊल उचलले. त्या वेळी आपले लोक समुद्रपर्यटन करणे पाप मानत असत. राष्ट्रीय सुरक्षेसाठी ही समुद्रबंदीची रूढी घातक होती. महाराजांनी ही रूढी धुडकावून मराठ्यांचे बलाढ्य आरमार उभे केले. आपल्या देशावर आणि समाजावर संकटे येतील, आक्रमणे होतील किंवा समाज निराशेच्या गर्तेत सापडेल तेव्हा तेव्हा शिवरायांच्या राज्याभिषेकाचा हा अपूर्व सोहळा प्रेरणा देत राहील. एवढे या राज्याभिषेकाचे महत्त्व आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या राष्ट्राचे महानायक होते. भविष्यात आपला देश प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावा, समाजातील सर्व प्रकारचा भेदभाव नाहीसा होऊन समतायुक्त आणि शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा, यासाठी शिवचरित्राचे पुन्हा पुन्हा स्मरण आणि अनुसरण करणे गरजेचे आहे.