nature of trekking
nature of trekking sakal media

।। दुर्गभ्रमंतीचं निसर्गसूक्त ।।

चाळीस वर्षे झाली, हा असा गडकोटांवर फिरतोय. या चार दशकांत अनेक मनस्वी माणसं भेटली. इतकंच नव्हे, तर जशी माणसं मनस्वी असतात तसे डोंगर, उभे कडे, अफाट दऱ्या, उंच गिरिशिखरे, अगदी झाडेच काय, डोंगरदऱ्यातल्या वाटाही मनस्वी असतात
Summary

- डॉ. अमर अडके कोल्हापूर

चाळीस वर्षे झाली, हा असा गडकोटांवर फिरतोय. या चार दशकांत अनेक मनस्वी माणसं भेटली. इतकंच नव्हे, तर जशी माणसं मनस्वी असतात तसे डोंगर, उभे कडे, अफाट दऱ्या, उंच गिरिशिखरे, अगदी झाडेच काय, डोंगरदऱ्यातल्या वाटाही मनस्वी असतात. त्याही भेटल्या... भेटत राहिल्या, बोलत राहिल्या, सांगत राहिल्या आणि बोलावतही राहिल्या....

अलंगाच्या प्रशस्त माथ्यावर उभा आहे

चोहोबाजूंनी बोचरा वारा अंगात शिरू पाहतोय

एकमेव आसरा असणाऱ्या गुहेबाहेरच्या

काळ्या कातळावर पाय घट्ट रोवून उभा आहे

गुहेच्या वरच्या अंगाच्या दगडी लाटेमागून

सूर्य जणू कडा भेदून वर येतोय....

त्या लाल तेजोगोलातून सोनेरी प्रकाश

कुठून पाझरतोय कुणास ठाऊक?...

अलंगाचं अवघं पठार,

त्याच्या पुढच्या एखाद्या मुकुटासारखा मदनगड

आणि त्याच्याही पलीकडे भल्या पठाराचा कुलंगगड

हे सारं त्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघतंय....

मी अनिमिष नेत्रांनी हे समोरचं दृश्य भान हरपून पाहतोय...

नीरव शांतता....

शांतता पठारावर... शांतता शिखरावर,

शांतता कड्यांवर आणि शांतता त्या दऱ्यांमध्येही...

त्या शांततेत.. मी त्या दऱ्या-कड्यांमध्ये विरघळून गेलोय... माझं अस्तित्वच हरवून बसलोय. ती शांतता माझ्या रोमारोमांत पाझरतेय. अंतर्बाह्य शांततेची आकाशभरली अनुभूती माझ्यात दाटून आलीय.

तो अलंग, तो मदन, तो कुलंग, समोरची - मागची आणखी कितीतरी शिखरे जणू काही माझ्या मनात सामावली आहेत. जणू काही त्या शिखरांची उंची, दऱ्यांची खोली, ती अवाढव्य पठारं... ते उत्तुंग कडे.. सगळं... सगळं माझ्या आत कुठेतरी सामावलंय. त्या आकाशस्पर्शी पठारावर मी एक दीर्घ श्वास घेतो, अत्यंत संतृप्ततेनं डोळे मिटतो. कसं शांत... शांत वाटतं. डोळ्यांच्या कडा ओलावल्याचंही भान नाही. खरं तर त्या उत्तुंग पठारावर काल संध्याकाळपासून आम्ही फक्त तिघेच आहोत. निरभ्र चांदण्यारात्री काल त्या पठारावर आम्ही किती फिरलो. पठारावर, शिखरांवर पाझरणारा तो चंदेरी प्रकाश आमच्यातही ठिबकत होता. मध्यावरचं तारांगण, त्या ताऱ्यांमधल्या अंतरासह आम्ही जिथे जाऊ तिथे आमच्याबरोबर फिरत होतं. त्या दुधाळ चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेले ते अजस्र कडे केवढे स्थितप्रज्ञ भासत होते. उत्तररात्रीच्या त्या नीरव शांततेत, गार वाऱ्यात ती लागलेली डुलकी... आणि मग सूर्योदयापूर्वीची ती जाग... जगण्याच्या साऱ्या आयामांपलीकडचं.... हे दुर्गावरचं जगणं असतं. इथे शांतता शोधावी लागत नाही. इथे उंची गाठावी लागत नाही. इथे भव्यता मोजावी लागत नाही. ते सारं आपोआप तुमच्यात सामावून जातं.

चाळीस वर्षे झाली, हा असा गडकोटांवर फिरतोय. या चार दशकांत अनेक मनस्वी माणसं भेटली. इतकंच नव्हे, तर जशी माणसं मनस्वी असतात तसे डोंगर, उभे कडे, अफाट दऱ्या, उंच गिरिशिखरे, अगदी झाडेच काय, डोंगरदऱ्यातल्या वाटाही मनस्वी असतात. त्याही भेटल्या... भेटत राहिल्या, बोलत राहिल्या, सांगत राहिल्या आणि बोलावतही राहिल्या....

चार-दोन जणांनी शिधा घेऊन, पाठीवर वळकटी बांधून त्या अज्ञातात शिरायचं. मग कातळाची भिंत, आकाशाचं छप्पर, गुहांचं स्वयंपाकघर आणि पठाराचं अंगण करून संसार मांडायचा आणि त्या संसारात रममाण होऊन जायचं. या डोंगरदऱ्या, कडे, गुहा, त्यावरचे दुर्ग हे माझं घर कधी बनलं माझं मलाच कळलं नाही. आणि या घरातून मी अद्यापही बाहेर आलो नाही आणि हे घर सोडणं शक्य नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com