Indian Culutre- प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शस्त्रे शक्तिपूर्ण}

प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

संदीप ऊर्फ नाना सावंत

प्राचीन काळापासून मानवानं शस्त्र निर्मितीचं तंत्र आत्मसात केलं होतं. वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची शस्त्र बनवली जात. जाणून घेऊयात या शस्त्रांविषयी.....

वाल्मिकी रामायण, तुलसी कृत रामायण आदी ग्रंथांमध्ये विभिन्न, विचित्र आकार, प्रकारची शस्रास्रे व त्यांचा वापर पाहण्यास मिळतो. रामायणात वानर सेनेद्वारे आपल्या शरीराचा वेगवेगळ्या भागाचा शस्र म्हणून वापर कसा केला हेही पाहण्यास मिळाले, तर राक्षसांनी वेगवेगळ्या आकाराच्या हत्यारांचे संचलन केले. त्यामध्ये मकरमुख, सर्पमुख, बाराहमुख, खरमुख व नागपाश अशा भयानक शक्तिपूर्ण शस्रांचे वर्णन पाहावयास मिळते. (Weapons used in various Indian Cultures)

अश्वगंधा नावाची तरवार (Sword) बाणकोशात ठेवली जात असे किंवा ती बाणकोशात मेखल्यावर अडकवली जात असे. अशा निस्रीश अशा तरवारींची नावे ही पौराणिक काळात पाहावयास मिळतात. भारतवासी आदिमानवाने पाषाण युगात अनेक प्रकारची हत्यारे बनविल्याचे पुरावे मिळतात. स्वात नदीच्या खोऱ्यात कुऱ्हाड व तरवारीच्या आकाराचे लांब दगड मिळाले. नर्मदेच्या (Narmada) प्राचीन घाटीमध्ये अनेक प्रकारची पाषाण शस्रे प्राप्त झाली आहेत.

चेन्नई येथील गुहांमध्ये आदिमकालीन पूर्ण तरवारीसारखी दगडी शस्रे मिळाली. दक्षिण भारतात पाषाण युगात आदिमानव होता त्यास ‘मदरासियन’ म्हटले गेले. ‘स्फटिक’, पारदर्शी स्फटिक, श्वेदार स्फटिक, ज्वालामुखीतून आलेला ‘मणि’ किंवा ‘मणिवत’ पाषाण यांचे तुटलेले तुकडे तराशून शस्रे बनविली जात. पाषाणयुगात मानवास दगड घासण्याची कला अवगत होती. दगडास हत्याराचा आकार देण्याबरोबरच मुठीचा हिस्सा बनविण्यास आदिमानव कारागीर होते. सोलणे व प्रहार करणे यासाठी आदिमानवाने प्राण्यांची हाडे, शिंगे, लाकूड यास अणकुचीदार दगड बसवून हत्यारे बनविली.

सिंधू संस्कृतीमध्ये (Sindhu Culutre) मानव शेती, गृहनिर्माण, नगर योजना, सुरक्षा व्यवस्था, सैनिक संघटन, शस्रास्र निर्मिती यांमध्ये प्रगती करीत गेला. मोहनजोदडो आणि हडप्पा उत्खननात बाण, भाले, तरवार, बरच्छा अशी विविध प्रकारची शस्रे सापडली. प्राप्त शस्रांमध्ये तरवार पाषाणयुगापेक्षा विकसित रुपात पाहण्यास मिळाली. यावरून असे समजते की, सिंधू संस्कृतीमध्ये मानव निरंतर विकसित झाला होता. महत्त्वाची बाब म्हणजे येथे प्राप्त झालेली सर्व शस्रे तांबे व पितळ यांपासून बनवलेली होती. म्हणजे धातूयुगाची सुरुवात खऱ्या अर्थाने सिंधू संस्कृतीत झाली असे म्हणावयास हरकत नाही.

गुप्तकाळात कनिष्क, हुनिष्क राजाच्या नाण्यावर तरवारींची चित्रे आहेत. लांब टोकाच्या, जाड पानाच्या व तिरकस अशा मुद्रित त्या दिसतात. धनुर्वेदात तरवारीच्या विविध प्रकारचे वर्णन पाहण्यास मिळते. तरवारीची संहारक शक्ती, गुण, वैशिष्ट्ये यांचा विचार करून त्यांचा नामोल्लेख केल्याचे जाणवते. उदा.
१) निस्रीश - घातक प्रहार करणाऱ्या
२) विध्वंस - उग्ररुपी आकाराच्या
३) विजय - युद्धात सदैव विजयी असणाऱ्या
४) तीक्ष्णधारा - धारधार असणाऱ्या
५) श्रीगर्म - समृद्धीचे प्रतीक असलेल्या
६) दुरासद - दूरवर मारा करणाऱ्या
७) धर्मतुल - धर्मरक्षण करणाऱ्या
८) खंग - शक्तीसाठी प्रहार करणाऱ्या

त्या काळात रणवीर, रणमर्द, प्रहार करणाऱ्या योद्ध्याचा त्याच्या तरवारीच्या प्रहारावरून समाजिक व धार्मिक कृत्याचा लेखाजोखा होत असे. कौशल्याने तरवारीचे जे वर्णन केले आहे त्यामध्ये निस्रींश, अस्थास्थि व मंदालग्रा अशी नावे मिळतात. अस्थास्थि तरवार लांब व तीक्ष्ण धारेची, निस्रींश तरवार वक्र मुठीची व घातक प्रहार करणारी, तर मंदालग्रा तरवार सरळ तोंडाजवळ गोल असे. तरवारीच्या मुठी गेंडा व बैल यांच्या शिंगापासून, हस्तिदंतापासून, लाकूड, बांस यांच्यापासून, तर नेडच्या दगडापासून बनविल्या जात असत.

तरवारीच्या आकारावरून तिच्या पात्याचे वजन प्रहार करताना हातामध्ये योग्य प्रमाणात आले पाहिजे अशाप्रकारे घट्ट पकडीच्या मुठीत बनवीत असत. तरवारीच्या लांबीवरून तिची गुणवत्ता ठरविली जात असे. ५० इंच लांबीच्या तरवारी उत्तम, ३० ते ४० इंचांपर्यंतच्या तरवारी हलक्या व गुणकारी. विशेषतः तरवारीचा उपयोग करणाऱ्या यौद्ध्याच्या शारीरिक क्षमतेनुसार तिची लांबी ठेवली जात असे.
(लेखक : शिवकालीन शस्र संग्राहक व अभ्यासक).

टॅग्स :Indiaweapons