Positive Thoughts- द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाळू नकारात्मक विचार}

द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

डाॅ. वैशाली देशमुख

आपल्याकडं नसलेली गोष्ट दुर्लक्षून नक्कीच नाही चालणार. प्रगती होण्यासाठी आधी काय कमी आहे याची जाणीव व्हायला हवीच, त्याशिवाय कुठं सुधारणा करायची ते कसं कळणार?

शाळेत पहिला नंबर येणाऱ्या मुलाच्या आईला त्याची कमी उंची खटकते, सुंदर गाऊ शकणाऱ्या मुलीच्या बाबांना तिनं अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असं वाटतं. ज्यांची मुलं शाळेत जायलाच नकार देतात, ते ‘बाकीच्या कटकटी परवडल्या; पण शाळेत तरी जा,’ असं म्हणतात. अशा कुठल्या ना कुठल्या ‘न-गोष्टी’ पालकांना छळत राहतात. निखळलेल्या फरशा आपल्याला अस्वस्थ करत असतात. त्यामुळं बाकीच्या शेकडो, हजारो चांगल्या चपखल बसलेल्या, भिंत सुशोभित करणाऱ्या, आपापलं काम मनापासून चोख करणाऱ्या इतर सगळ्या फरशांकडं आपलं दुर्लक्ष होतं. (Why Important to keep away from negative syndrome)

डेनिस प्रेगर यांची ‘द मिसिंग टाइल सिंड्रोम’ म्हणून एक संकल्पना आहे. आपण एखाद्या सुंदर ठिकाणी आहोत. सहज आपलं लक्ष जातं वरच्या छताकडे. त्या छताचं सौंदर्य निरखत असताना अचानक काहीतरी खटकतं. अप्रतिम कोरीवकाम केलेल्या त्या छतातली एक फरशी निखळलेली असते. आता मात्र ते बाकीचं कोरीवकाम विसरून राहूनराहून आपली नजर तिकडंच वळायला लागते.

नकारात्मकता फार प्रभावी असते. ती एखाद्या शस्त्रासारखी आरपार घुसते. त्या हळूहळू झिरपत जातात. त्यांना वेळ द्यायला लागतो समजून घ्यायला. त्यातूनही आपल्याकडं नसलेल्या गोष्टीकडे आपलं लगेच लक्ष जातं. एखाद्या कमी उंचीच्या व्यक्तीला जिकडं तिकडं उंच माणसंच दिसतात. टीनएजमध्ये तर मुलांचं लक्ष मोठं नाक, फताडे पाय, गालावरचे पिंपल्स, कुरळे केस अशा एखाद्या कोणत्या तरी- आपल्या मते किरकोळ असणाऱ्या- गोष्टीवर एकवटलेलं असतं.

एक छान कार्टून पहिलं एकदा. सात-आठ वर्षांचा खोडकर मुलगा. आईचं लक्ष नाही अस पाहून स्वयंपाकघरात शिरतो आणि डबे उचकटायला लागतो. स्टुलावर चढून खाऊ शोधताशोधता एक डबा हातातून निसटतो आणि खोलीभर शेंगदाणे सांडतात, सगळा पसारा होतो. आपण कल्पना करू शकतो आईची यावरची प्रतिक्रिया! ते पाहून मुलगा आर्जवानं आईला म्हणतो, ‘‘रागवू नकोस गं आई. जरा आठवून बघ, मी जन्माला यायची तू आणि बाबा किती वाट पाहत होतात. मग माझा जन्म झाला, तेव्हा सगळ्यांना किती आनंद झाला होता! विसरलीस?’’ किती खरंय त्या मुलाचं म्हणणं! बाळाच्या जन्माची उत्सुकता, हुरहूर, आनंद नंतरच्या धबडग्यात किती पटकन विसरून जातो आपण! एकदा का ती वेळ यशस्वीपणे पार पडली, की आपलं संपूर्ण ध्यान एकवटतं न्यूनांवर.

शाळेत पहिला नंबर येणाऱ्या मुलाच्या आईला त्याची कमी उंची खटकते, सुंदर गाऊ शकणाऱ्या मुलीच्या बाबांना तिनं अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असं वाटतं. काही पालकांची तक्रार असते, की मुलं रोज शाळेत जाताना वैताग आणतात. ज्यांची मुलं शाळेत जायलाच नकार देतात, त्यांना वाटतं, ‘इतर कटकटी परवडल्या; पण शाळेत तरी जा!’ बरं, मूल शाळेत गेलं म्हणून आपण खूश असतो का? तर नाही. ती वर्गात दंगा करतात, नीट अभ्यास करत नाहीत, पास होत नाहीत, मार्क कमी पडतात, पहिला नंबर येत नाही अशा कुठल्या ना कुठल्या ‘न-गोष्टी’ पालकांना छळत राहतात. यात कुठंच नाव ठेवायला जागा नसेल, तर इतर कितीतरी छिद्रं आ वासून तयार असतात. मित्रमैत्रिणी खूप जास्त असणं, किंवा अजिबात नसणं, अव्यवस्थितपणा, लठ्ठपणा, घुमेपणा, गप्पिष्ट असणं, लवकर/उशिरा वयात येणं.....

हे देखिल वाचा-

या अशा निखळलेल्या फरशा आपल्याला अस्वस्थ करत असतात. आणि त्यामुळे बाकीच्या शेकडो, हजारो चांगल्या चपखल बसलेल्या, भिंत सुशोभित करणाऱ्या, आपापलं काम मनापासून चोख करणाऱ्या इतर सगळ्या फरशांकडं आपलं दुर्लक्ष होतं. एक वेळ छताची निखळलेली फरशी बदलता येईल; पण खऱ्या आयुष्यात प्रत्येक कमतरता भरून काढता येईलच, प्रत्येक नकोशी गोष्ट बदलता येईलच असं नाही. मग तिचा ध्यास धरून बसण्याचं प्रयोजन काय? त्याहूनही, त्याचा उपयोग काय? पाण्याचा शोध घेण जरूरीचं असलं, तरी मृगजळाच्या कितीही मागं धावलं, कितीही सातत्यानं प्रयत्न केले, तरी हाती पाणी लागणार आहे का?

तरीही हे असं न्यूनाकडं लक्ष जाणं साहजिक आहे. ती मानवी ऊर्मी आहे. ‘माझ्याकडं इतकं काही आहे, मग मी कशाला दुःखी होऊ?’ असा विचार खूप कमी जण करतात. आहे त्यात सुखी राहावं, की नव्या सुखाची आस धरावी, अल्पसंतुष्ट राहावं की महत्त्वाकांक्षी व्हावं हा ज्याचा त्याचा स्वभाव आणि ज्याचा त्याचा निर्णय असतो. तरी त्या निर्णयाचा समूहावर, समाजावर परिणाम होतोच. पाषाणयुगातून आजच्या आधुनिक जगाकडं झालेला आपला प्रवास हे याचंच द्योतक आहे. आपल्याकडे काय नाहीये आणि ते कसं मिळवता येईल याचा आपल्या या पूर्वजांनी विचार केला म्हणून तर आपण आज कच्चं मांस न खाता निरनिराळे सुग्रास पदार्थ खाऊ शकतो, पक्‍क्‍या घरात राहू शकतो.

आपल्याकडं नसलेली गोष्ट दुर्लक्षून नक्कीच नाही चालणार. प्रगती होण्यासाठी आधी काय कमी आहे याची जाणीव व्हायला हवीच, त्याशिवाय कुठं सुधारणा करायची ते कसं कळणार? आक्षेप त्या ‘मिसिंग टाइल’कडे बघण्याला नाहीये. आक्षेप आहे ‘फक्त’ त्याकडे बघण्याला, आणि त्या नादात असलेल्या गोष्टी विसरून जाण्याला. तसं बघायला गेलं, तर त्या बाकीच्या फरशा नसत्या, तर ही फरशी तिथं नाही हे लक्षातही आलं नसतं. मग असलेल्या फरशांचं महत्त्व विसरून कसं चालेल?

कमतरतेला किती महत्त्व द्यायचं?

या कमतरतेला किती महत्त्व द्यायचं, आपल्या आयुष्यात ती किती आवश्‍यक आहे, ती मिळवण्यासाठी जी किंमत भरायला लागेल, ती भरायची आपली तयारी आहे का? ही भरून काढण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी माझ्या आवाक्‍यात, कुवतीत आहेत का? असतील तर कुठल्या?...याचाही विचार करायला पाहिजे. ‘कमतरता शोधून काढल्या, तर मी त्या भरून काढायचा प्रयत्न करीन. मात्र, तसं नसेल, तर मात्र त्यांचा स्वीकार करीन. उगीचच त्यामुळे असलेलं सुख नाकारणार नाही,’ हेही मनाशी म्हटलं पाहिजे.