
घरकाम ते पद्मश्री! दुलारी देवी यांचा अनोखा प्रवास
मधुबनी पेंटिंगमुळे प्रसिद्ध झालेल्या बिहारमधील दुलारी देवी यांना २०२१ मधील पद्मश्री सन्मान मिळाला आहे. मधुबनी येथील रांटी गावामधील रहिवासी असलेल्या ५३ वर्षीय दुलारी देवी यांनी वेगवेगळ्या विषयांवरील तब्बल आठ हजार पेंटिंग काढले आहेत. त्यांची पूर्ण आयुष्य प्रेरणादायी आहे. पद्मश्रीपर्यंतचा त्यांचा प्रवास खूप खडतर होता. त्यांचा विवाह अवघ्या बाराव्या वर्षी झाला. पण त्यानंतर दोनच वर्षांनी घटस्फोट झाला. त्यानंतर त्या माहेरी परत आल्या.
गरिबीमुळे घर चालवण्याचा प्रश्न होताच. मिथिला पेंटिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या महासुंदरी देवी व कर्पुरी देवी यांच्या घरी आईबरोबर घरकाम करू लागल्या. त्या दरम्यान महासुंदरी देवी व कर्पुरी देवी यांना पेंटिंग करताना पाहून दुलारी देवीही पेंटिंग करू लागल्या आणि आज त्या पद्मश्री पुरस्कारापर्यंत पोचल्या आहेत.
स्वतःचं फक्त नाव लिहू शकणाऱ्या दुलारी देवी यांचे पेंटिंग जगातील अनेक लेखकांनी आपल्या पुस्तकांत वापरलेलं आहे. मैथिली भाषेतील अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठावरही त्यांचे पेंटिंग छापलेलं आहे. गीता वुल्फ यांच्या ‘फॉलोइंग माइ पेंट ब्रश’, तसेच मार्टिन ली कॉज यांच्या फ्रेंच भाषांतील पुस्तकांची शोभाही दुलारी देवी यांच्या पेंटिंगने वाढविलेली आहे.
दुलारी देवी या मल्लाह बिरादरी समाजातील आहेत, जो अतिमागास समजला जातो. त्यांच्या कुटुंबातील त्या पहिल्या व्यक्ती आहेत ज्या मिथिला पेंटिंग शिकल्या. त्यांच्या कुटुंबातील कोणाचाही मिथिला पेंटिंगशी दुरूनही संबंध नाही. घरची गरीबी, कुटुंबात शिक्षणाबाबत नसलेली जागृकता यामुळे त्या शाळेत जाऊ शकल्या नाहीत. लग्न करून सासरी गेल्या तर तेथेही फक्त दोन-तीन वर्षे काढली व परत माहेरी यावे लागले. त्यानंतर त्या परत कधी सासरी गेल्याच नाहीत. पतीशी त्यांचं जमलं नाही व साने त्यांना घरी ठेवण्यास नकार दिल्याने त्यांना परत माहेरी यावं लागलं. माहेरी आल्यावर त्यांनी आईबरोबर काम करण्यास सुरवात केली. त्यावेळी त्यांचा परिवार एका झोपडीत राहात होता. त्यांची आई शेतात काम करत होत्या, तेव्हा दुलारी देवीही त्यांच्याबरोबर मदत करायला जात होत्या. काही दिवसांनी एका घरात भांडी धुण्याचं काम मिळालं. त्या कुटुंबात मधुबनी पेंटिंगची मोठी परंपरा होती. दुलारी देवी तेथे पेंटिंग बघत होती. तेव्हा आपणही पेंटिंग करावं अशी त्यांची इच्छा होत होती. सुदैवाने या कुटुंबात महासुंदरी देवी व कर्पुरी देवी या मधुबनी पेंटिंगमधील ख्यातनाम व्यक्ती राहात होत्या.
जमिनीवर पेंटिंग
दुलारी देवी यांना मिथिला पेंटिंगची आवड तर होती, पण त्यासाठी लागणारा रंग, कागद व कपडा खरेदी करायला पैसे नव्हते. त्यामुळे घरी आल्यानंतर काढी घेऊन त्या जमिनीवर चित्र काढायच्या. यामुळे त्यांच्या आई त्यांना ओढायच्या व जमिनीवर रेषा ओढल्याने माणूस भिकारी होतो, असं सांगायची.
कर्पुरी देवी आणि महासुंदरी देवी यांच्या घरी काम करताना दोघांनी दुलारी देवी यांना पेंटिंग शिकवायला सुरुवात केली. १९८४ मध्ये महासुंदरी देवी यांच्याकडे मिथिला पेंटिंगवर एक महिन्याचं प्रशिक्षण आयोजित केलं होतं. त्यात दुलारी देवी यांनीही भाग घेतला. त्या कर्पुरी देवी आणि महासुंदर देवी यांना पेंटिंग करताना पाहात होती व ते बघूनच हळू हळू त्या पेंटिंग शिकल्या. जेव्हा कर्पुरी देवी आणि महासुंदरी देवी पेंटिंग बनवायच्या त्यावेळी त्या दुलारी देवी यांना कपडे कापणे व इतर लहान कामे सांगायच्या. त्याचे त्यांना वेगळे पैसे मिळायचे. कर्पुरी देवी आणि महासुंदरी देवी त्यांना पेंटिंगमधील बारकावे शिकवले. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने पेंटिंग केलं पाहिजे, कुणाची नक्कल करता कामा नये, अशी शिकवण त्यांनी दुलारी देवी यांना दिली. या शिकवणीतून त्यांना पुढे जाण्यास मदत केली.
दरम्यानच्या काळात गौरी मिश्रा यांनी मिथिला पेंटिंग करणाऱ्या महिलांचे संघटन करण्यासाठी १९८३ मध्ये एक संस्था स्थापन केली. कर्पुरी देवी यांनी दुलारी देवींचे नाव तिथे नोंदविले.
तेथील आपल्या आठवणी सांगताना दुलारी देवी म्हणतात, पेंटिंग करण्यासाठी तिथे मला एक चमकदार कपडा देण्यात आला. तो कपडा इतका चमकत होता की मी त्यावर पेंटिंग करायला नकार दिला. चार दिवसांनी मी परत गेली. तेव्हा मला सुती कपडा देण्यात आला. त्यावर मी पेंटिंग बनवली जे त्यांना खूप आवडलं. त्यानंतर मला पेंटिंगसाठी साडी देण्यात आली. त्या साडीवर दोन महिने वेळ घेऊन पेंटिंग बनविले. असं हळूहळू मिथिला पेंटिंगमध्ये मी ‘मास्टरी’ मिळविली. कर्पुरी देवी आज जिवंत असत्या तर मला मिळालेल्या पद्मश्री सन्मानाबद्दल त्यांना खूप आनंद झाला असता.
सुरुवातीला दुलारी देवी यांचे पेंटिंग पाच रुपयांना विकले जायचे. कर्पुरी देवी जेव्हा जपानला जात होत्या तेव्हा छोट्या कागदावर पेंटिंग बनवून घेऊन जायच्या. प्रत्येक पेंटिंगचे दुलारी देवींना पाच रुपये मिळायचे. कागद मोठा असेल तर ४० रुपये मिळायचे. गौरी मिश्रा यांच्या संस्थेत त्या तब्बल १६ वर्षे होत्या. मधुबनी येथील मिथिला कला संस्थेमध्ये त्या मुलांना पेंटिंग शिकवत होत्या. पेंटिंग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामासाठी त्यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यात मिथिला अस्मिता सम्मान, राज्य पुरस्कार यांचा समावेश आहे.
मिथिला पेंटिंगच्या बळावर दुलारी देवी यांनी स्वतःचं पक्क घर उभारलं आहे. भावाला दुकान सुरू करण्यास आर्थिक मदत केली आहे. त्यांच्या घरात आता मिथिली पेंटिंगची दुसरी पिढी तयार होत आहे.
दुलारी देवी यांना दिल्लीवरून फोन आला की त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला आहे, तेव्हा त्यांना कर्पुरी देवी यांची आठवण आली. कर्पुरी देवी यांचं निधन दोन वर्षांपूर्वीच झालं होते. कर्पुरी देवी मिथिला पेंटिंग बनविणाऱ्या त्या कलाकारांमधील एक होत्या ज्यांनी या कलेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. जेव्हा जापानमध्ये मिथिला म्युझियम सुरू करण्यात येणार होते तेव्हा दुलारी देवी यांना बोलविण्यात आले होते.
पद्मश्री सन्मान मिळाल्यानंतर दुलारी देवी भावुक होऊन म्हणाल्या, ‘‘मुझे ये अवार्ड मिलने से सब खुश हैं। मैंने एक संस्थान में जिन बच्चों को पेंटिंग सिखाई थी, वे सुबह से ही फोन कर बधाई दे रहे हैं। घर के लोग भी बहुत खुश हैं। आज कर्पुरी देवी जिंदा होतीं, तो मुझसे ज्यादा वो खुश होतीं। उन्होंने मुझे बेटी से बढ़कर माना और पेंटिंग सिखाई।’’
पुरस्कार वितरण सोहळ्यात दुलारी देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्यावेळी त्यांनी मोदी यांना आपलं एक पेंटिंग भेट दिलं. त्यानंतर मोदी यांनी दुलारी देवी व पेंटिंगसोबत घेतलेले छायाचित्र समाज माध्यमावरून शेअर केले व त्यात म्हटलं की, मधुबनी येथील रहिवासी दुलारी देवी या एक प्रतिभाशाली कलाकार असून पद्मश्री सन्मान वितरण सोहळ्यात त्यांनी मला एक पेंटिंग भेट दिलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.