Cricket News- सूर्यकुमार भारतीय क्रिकेट मधला लंबी रेस का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सूर्यकुमार}

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

सूर्यकुमार यादव या खेळाडूचं टी-२० क्रिकेटमधील क्रमांक एकचा फलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या, टी-२०मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी त्याला नामांकनही मिळालं आहे. नुकताच तो भारताच्या संघाचा उपकर्णधारही बनला आहे. त्याच्या एकूण कारकिर्दीवर एक नजर...

सूर्यकुमार यादव हा भारतीय क्रिकेटमधला (Cricket) सध्याचा लखलखता तारा. तुफान फटकेबाजी करत, कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करत मोठी धावसंख्या रचणारा सूर्यकुमार अनेकदा संघाची नौका हेलकांडत असते तेव्हा तिच्यासाठी आधार ठरतो. पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार (Sixer) ठोकत पदार्पण करणारा सूर्यकुमार हा भारताच्या संघासाठी मोठी ॲसेट आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० (International T-20) संघात निवड झाल्यानंतर केवळ एका वर्षात उपकर्णधारपदापर्यंत झेप घेणारा सूर्यकुमार ‘लंबी रेस का घोडा’ आहे असं जाणकार सांगतात. (Indian Cricket Suryakumar Yadav Career)

सूर्यकुमार मुंबईकर (Mumbai) आहे. त्याचे वडील भाभा अणु संशोधन केंद्रात काम करतात. ते कामासाठी उत्तर प्रदेशमधून मुंबईत स्थायिक झाले. तेव्हा सूर्यकुमार दहा वर्षांचा होता. चेंबूरच्या रस्त्यांवर खेळताखेळता त्यानं क्रिकेटमधल्या कौशल्याला पैलू पाडले. त्याचं क्रिकेटचं वेड बघून वडिलांनी दिलीप वेंगसरकर यांच्या अकादमीत त्याला घातलं आणि तिथं त्याला खऱ्या अर्थानं मार्ग गवसला.सूर्यकुमारनं सुरुवातीला पारसी जिमखाना क्रिकेट क्लब, शिवाजी पार्क जिमखाना क्लब आणि दादर युनियन क्लब अशा क्लबमध्ये कामगिरी खेळली.

त्यानंतर २०१०-११ला त्याची रणजी करंडकासाठी मुंबई संघामध्ये निवड झाली. पहिल्याच सामन्यात त्यानं ७३ धावा केल्या. पुढच्या वर्षी ९ सामन्यांमध्ये तब्बल ७५४ धावा करून तो रणजीमधील आघाडीचा फलंदाज ठरला. दुलिप करंडक स्पर्धेतही २०१३-१४मध्ये तो मुंबई संघासाठी सर्वोच्च धावसंख्या करणारा फलंदाज होता. आता सूर्यकुमार मुंबई संघाचा नियमित आणि वरिष्ठ खेळाडू आहे.

२०१८-१९मध्ये त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. मात्र, २०१९-२०मध्ये त्याची पुन्हा निवड करण्यात आली आणि त्याला कर्णधार म्हणून नेमण्यात आलं. सईद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत २०२०-२१मध्ये तो मुंबई संघाचा कर्णधार होता. पारसी जिमखाना क्लबसाठी खेळताना त्यानं पोलिस शिल्ड करंडक स्पर्धेत या क्लबला सलग तीन वेळा अजिंक्यपद मिळवून देऊन इतिहास रचण्याची संधी दिली.

हे देखिल वाचा-

आयपीएलमधील कामगिरी
सूर्यकुमारची २०१२मध्ये आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघासाठी निवड झाली होती. मात्र त्याला एकच सामना खेळता आला. २०१४मध्ये कोलकता नाइट रायडर्स संघानं त्याला संधी दिली. २०१५मध्ये इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात त्यानं पाच षटकार झळकावून ४६ धावा केल्या आणि तिथूनच त्याचं नाव दुमदुमायला सुरुवात झाली. नंतर तो या संघाचा उपकर्णधारही झाला. २०१८मध्ये त्याची मुंबई इंडियन्स संघासाठी निवड झाली. या संघाचा तो आता स्टार खेळाडू म्हणून ओळखला जातो.

पहिल्याच चेंडूत षटकार
फेब्रुवारी २०२१मध्ये त्याची टी-२० स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झाली. १४ मार्चला त्यानं पदार्पण केलं; मात्र, प्रत्यक्ष फलंदाजी करण्याची संधी त्याला मिळाली १८ मार्च रोजी. पहिल्याच चेंडूत त्यानं षटकार ठोकून अर्धशतक केलं. पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्याच चेंडूत षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. नंतर त्याची एकदिवसीय सामन्यांसाठीच्या संघातही निवड झाली. आता तर तो टी-२०च्या संघाचा उपकर्णधार ठरला आहे. संघात निवड झाल्यानंतर केवळ एका वर्षात उपकर्णधार व्हायचा मान त्याला मिळाला.

धावांचा पाऊस
सूर्यकुमारनं २०२२ या सरत्या वर्षात धावांचा पाऊसच केला. त्यानं टी-२०मध्ये ३१ सामन्यांमध्ये १,१६४ धावा केल्या. या प्रकारात, या वर्षात १०००पेक्षा जास्त धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. त्यानं तब्बल ६८ षटकार ठोकले. त्यानं दोन शतकं केली आणि ९ अर्धशतकं केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या, टी-२०मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्कारासाठी त्याला नामांकनही मिळालं आहे. झिंबाब्वेचा सिकंदर रझा, इंग्लंडचा सॅम कुरान आणि पाकिस्तानचा मोहंमद रिझवान हे या पुरस्कारासाठी सूर्यकुमारबरोबर स्पर्धेत आहेत.

‘भारताचा एबी डिव्हिलियर्स’
भारताच्या टी-२० संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवताना निवड समितीनं सूर्यकुमार यादवला टी-२० संघाच्या उपकर्णधारपदी बढती दिली आहे.
सूर्यानं २०२२ मध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला उपकर्णधारपद मिळालं. क्रीजवर येताच झटपट फलंदाजी करण्यात माहीर असलेल्या या खेळाडूची कोणत्याही गोलंदाजीचा मुकाबला करण्याची क्षमता आहे. संघाकडे संजू सॅमसनच्या रूपानं आधीच अनुभवी खेळाडू असतानाही सूर्यकुमारची निवड हे म्हणजे त्याच्या कामगिरीवरचं शिक्कामोर्तब मानलं जातं. सूर्यकुमार यादवला ‘भारताचा एबी डिव्हिलियर्स’ म्हटलं जातं. तो मैदानाच्या कोणत्याही बाजूला फटके मारू शकतो.

प्रकार सामने धावा षटकार चौकार
एकदिवसीय सामने १६ ३८४ १० ६
टी-२० (आंतरराष्ट्रीय) ४२ १४०८ २८ ८०
देशांतर्गत ११८ ३२३८ ६९ ९३
टी-२० २३६ ५६३१ ११८ २२३

पदार्पण
एकदिवसीय सामने : श्रीलंका विरुद्ध भारत (कोलंबो) : १८ जुलै, २०२१
टी-२० (आंतरराष्ट्रीय) : भारत विरुद्ध इग्लंड (अहमदाबाद) : १४ मार्च, २०२१
देशांतर्गत : मुंबई विरुद्ध गुजरात (अहमदाबाद): ११ फेब्रुवारी, २०१०