
भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करून काही वर्षे होत नाहीच तोच मुंबई क्रिकेटच्या नकाशावर आणखी एक तारा चमकू लागला आहे. पृथ्वी शॉ असे या ताऱ्याचे नाव आहे..... त्याने हॅरिस शिल्ड या शालेय क्रिकेट स्पर्धेत एकाच डावात 546 धावांची विक्रमी खेळी केली होती. याच स्पर्धेत साडेसहाशेची विक्रमी भागीदारी करून सचिन आणि विनोद नावारूपास आले होते.
आझाद मैदानावरी स्प्रिंगफिल्ड रिझवी आणि सेंट फ्रान्सिस डी असीस या शाळेतील सामन्याने क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव कोरले. रिझवीच्या पृथ्वी शॉने 336 चेंडूंत 85 चौकार व पाच षटकारांची घणाघाती खेळी करून शालेय क्रिकेटमध्ये प्रथमच पंचशतक केले. याअगोदर रिझवी शाळेचाच व माजी कसोटीपटू वासिम जाफरचा पुतण्या अरमान जाफर याने 498 धावांचा विक्रम केला होता. त्याचे पंचशतक काही धावांनी हुकले होते. (Prithvi Shaw New Hope for Indian Cricket Team)
भारतीय क्रिकेटमध्ये (Cricket) झळकावण्यात आलेले हे दुसरे पंचशतक आहे. याअगोदर दादाभॉय हवेवाला यांनी टाइम्स ढाल क्रिकेट स्पर्धेत 1933-34 मध्ये 515 धावा केल्या होत्या; पण नंतर पृथ्वी शॉने एकाच डावात सर्वाधिक धावा करण्याचा इतिहास घडविला. जागतिक क्रिकेटमध्ये पृथ्वीची ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या आहे.
ए. जे. कॉलिन्स (नाबाद 628) व सी. जे. एडी (566) या इंग्लंडच्या खेळाडूंनी अनुक्रमे 1899 आणि 1901 मध्ये सर्वाधिक धावांचे विक्रम केलेले आहेत.
असा आहे पृथ्वी शॉ
-मूळचा विरारचा रहिवासी
-शाळा स्प्रिंगफिल्ड रिझवी वांद्य्रात असल्यामुळे सरावासाठी विरार ते वांद्रे असा प्रवास.
-सध्या सांताक्रूझ येथे वास्तव्य.
-गतवर्षी अंतिम सामन्यात केलेल्या 174 धावांच्या खेळीमुळे रिझवी शाळेला विजेतेपद.
-ज्युनियर क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार द्विशतके.
-गतवर्षी ग्लुस्टरशायरमध्ये दुसऱ्या श्रेणीच्या संघातून खेळला.
बालपण
पृथ्वीचा जन्म 9 नोव्हेंबर 1999 रोजी ठाण्यात झाला. केवळ चार वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. त्यानंतर वडील पंकज यांनी त्याच्याकडे लक्ष देता यावे म्हणून काही काळ व्यवसाय बंद केला. स्टम्पपेक्षाही कमी उंची असल्यापासून पृथ्वीने बॅट हातात घेऊन खेळायला सुरवात केल्याचे पंकज सांगतात. रिझवी स्प्रिंगफिल्ड स्कूलचे प्रशिक्षक राजू पाठक यांनी त्याला मार्गदर्शन केले. शालेय पातळीवरील चमकदार कामगिरीमुळे पृथ्वीला इंग्लंड दौऱ्याचे आमंत्रण मिळाले. मॅंचेस्टरमधील शाळेकडून त्याने दोन महिन्यांत 1446 धावा फटकावल्या. यामुळे त्याला यॉर्कशायर लीगमध्येही संधी मिळाली.
हे देखिल वाचा
कारकीर्द
पृथ्वीने शालेय पातळीपासून मॅरेथॉन इनिंगचा सपाटा लावला. त्याने 2013 मध्ये हॅरिस शील्ड स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफिल्डकडून सेंट फ्रान्सिस डीऍसिसीविरुद्ध 330 चेंडूंत 546 धावा फटकावल्या. त्याने 85 चौकार आणि पाच षटकार मारले, तर 2016 मध्ये 19 वर्षांखालील आशिया करंडक जेतेपदात त्याचा वाटा होता. त्यानंतर त्याला गेल्या मोसमात थेट उपांत्य फेरीत तमिळनाडूविरुद्ध रणजी पदार्पणाची संधी देण्यात आली.
दुसऱ्या डावातील शतकाच्या जोरावर त्याने मुंबईचा अंतिम फेरीतील प्रवेश साकार केला. त्याने दुलिप करंडक स्पर्धेतही पदार्पणात शतक ठोकून सचिनसारखा पराक्रम केला. त्यानंतर त्याची विश्वकरंडक युवा स्पर्धेसाठी कर्णधारपदी नियुक्ती झाली. पृथ्वीने जगज्जेतेपद जिंकून विराट कोहलीच्या पंक्तीत स्थान मिळविले. पृथ्वीने "आयपीएल'मध्ये दिल्लीकडून नऊ डावांत 153.12च्या स्ट्राईक रेटने 245 धावा फटकावल्या. राजकोटमध्ये पृथ्वीने वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक झळकावताना असंख्य विक्रमांना गवसणी घातली.
मी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी म्हणून वडील माझ्यासाठी अपार मेहनत घेत आहेत. सकाळी लवकर उठून ते मला सरावासाठी तयार करीत असतात. ही खेळी मी त्यांना समर्पित करीत आहे, अशी भावना पृथ्वी शॉने व्यक्त केली होती. किती धावा करायच्या, हा विचार मी केला नव्हता. खेळत राहायचे याच उद्दिष्टाने मी फलंदाजी करीत होतो. चौकार, षटकार मिळत होते आणि माझ्या धावा वाढत होत्या. यापुढेही अजून चांगली कामगिरी करायची आहे, असे मत पृथ्वीने व्यक्त केले. सचिन तेंडुलकर माझे आदर्श आहेत आणि एक प्रामाणिक व्यक्ती होण्यासाठी मी त्यांच्याकडून शिकणार आहे, असेही पृथ्वी म्हणाला होता.
सध्या पृथ्वी मुंबई संघाकडून आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो आहे.
विक्रमी पृथ्वी
-हॅरिस ढाल स्पर्धेत 336 चेंडूंत 546 धावा (85 चौकार 5 षटकार).
-अगोदरचा विक्रम अरमान जाफरकडून 498.
-मुंबई क्रिकेटमध्ये दादाभॉय हवेवाला यांच्याकडून 515 धावांची खेळी (1933-34).
-सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये पृथ्वी तिसरा. ए. जे. कॉलिन्स (नाबाद 628, सन 1899), सी. जे. एडी (566, सन 1901)
मुंबईच्या पृथ्वी शॉ याने त्यानंतर रणजी क्रिकेट करंडकातील लढतीत ऐतिहासिक खेळी साकारली. त्याने आसामविरुद्धच्या लढतीत ३७९ धावांची मॅरेथॉन खेळी केली. रणजी क्रिकेट करंडकातील एका डावातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली, हे विशेष.
पृथ्वी शॉ (३७९ धावा) व कर्णधार अजिंक्य रहाणे (१९१ धावा) यांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ४ बाद ६८७ धावा फटकावल्या आणि डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. आसामने दुसऱ्या दिवसअखेरीस १ बाद १२९ धावा केल्या असून आता त्यांचा संघ ५५८ धावांनी पिछाडीवर आहे.
मुंबईने २ बाद ३९७ या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. पृथ्वी व अजिंक्य या जोडीने ४०१ धावांची सणसणीत भागीदारी करताना आसामच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. या भागीदारीत दोघांनी नेत्रदीपक फटके मारले. पृथ्वीने अवघ्या ३८३ चेंडूंमध्ये ४९ चौकार व ४ षटकारांसह ३७९ धावांची स्फोटक खेळी केली. रियान परागच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाला. त्यानंतर अजिंक्यने १५ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने १९१ धावांची खेळी केली. रियानच्या गोलंदाजीवर तोही बाद झाला.
रणजी करंडकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
- भाऊसाहेब निंबाळकर (महाराष्ट्र) - ४४३ नाबाद
- पृथ्वी शॉ (मुंबई) - ३७९
- संजय मांजरेकर (मुंबई) - ३७७
- एम. व्ही. श्रीधर (हैद्राबाद) - ३६६
- विजय मर्चंट (मुंबई) - ३५९ नाबाद
- समीत गोहेल (गुजरात) - ३५९ नाबाद
- व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (हैदराबाद) - ३५३
- चेतेश्वर पुजारा (सौराष्ट्र) - ३५२
- स्वप्नील गुगळे (महाराष्ट्र) - ३५१ नाबाद
पदार्पणाच्या शतकी खेळीत पृथ्वीने मोडले हे विक्रम
-पृथ्वीची 99 चेंडूंतील शतकी खेळी सर्वांत लहान वयात कसोटी पदार्पणात तिसरी वेगवान खेळी.
-कसोटी पदार्पणात शतकी खेळी करणारा चौथा तरुण फलंदाज. यापूर्वी महंमद अश्रफूल आणि हॅमिल्टन मसाकद्झा यांची 17व्या वर्षी शतकी खेळी
-भारताकडून पदार्पणात शतक करणारा दुसरा तरुण, तर एकूण 15वा खेळाडू
-पृथ्वी शॉ याचे रणजी, दुलिप करंडक स्पर्धेतही पदार्पणात शतक
-कसोटी पदार्पण करणारा पृथ्वी भारताचा तेरावा तरुण खेळाडू. यापूर्वी ईशांत शर्मा (18 वर्षे 265 दिवस)
-पदार्पणातच कसोटी सामन्यात पहिल्या चेंडूचा सामना करणारा चौथा खेळाडू. यापूर्वी हॅमिल्टन मसाकद्झा, तमिम इक्बाल आणि इम्रान फरहात यांनी ही कामगिरी केली होती