Indian Culture- महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापाषाणयुगीन समृद्ध संस्कृती}

महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

अमित भगत
‘दगडांच्या देशा’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात लेणी, मंदिरं, किल्ले, वाडे, मूर्ती, वीरगळ व दगडी दीपमाळ यापलीकडेही अजून एक अल्पज्ञात व काहीसा दुर्लक्षित असा ऐतिहासिक वास्तूप्रकार आहे आणि तो म्हणजे बृहदाश्मयुगीन अथवा महापाषाणयुगीन दगडी स्मारके...

प्रागैतिहासिक काळात विशेषतः इ.स.पूर्व पहिल्या-दुसऱ्या शतकांत जी मोठमोठ्या ओबडधोबड शिळांची रचना करून स्मारके उभी करण्याची पद्धती होती, त्या लोकांच्या संस्कृतीला महापाषाण किंवा बृहदाश्मयुगीन संस्कृती म्हटले जाते. युरोपात या संस्कृतीचा काळ सांस्कृतिकदृष्ट्या नवाश्मयुग व ताम्रपाषाणयुग एवढा प्राचीन असला तरी भारतात ही संस्कृती साधारणतः इ.स.पूर्व १०० ते इ.स.पूर्व २०० दरम्यानची, म्हणजे पूर्णतः लोहयुगीन काळातीलच आहे. (Archeology Ancient Stone Sculptures showing rich Indian Heritage)

दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक व केरळ या राज्यांत यांची संख्या सर्वाधिक आहे. दक्षिण भारत सोडून राजस्थान, उत्तर प्रदेश, काश्मीर, बिहार येथेही या संस्कृतीची स्थळे अस्तित्वात आहेत. बलुचिस्तान, मकरान व वायव्य सरहद्द प्रांतातही बृहदाश्मयुगीन अवशेष उपलब्ध झाले आहेत. याशिवाय पूर्व भारतात बस्तरपासून ईशान्येकडील आसामपर्यंत बृहदाश्मयुगीन दफने आढळून आली आहेत. महाराष्ट्रात या संस्कृतीचे अवशेष मुख्यत्वाने विदर्भात आढळून येतात. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील ‘खैरवाडा’ येथे जवळपास १५०० शिलावर्तुळे एकवटलेली आहेत.

बृहदाश्मयुगीन संस्कृतीच्या दफनांच्या विविध पद्धती आढळून येतात, त्यात शिळावर्तुळ (Stone Circle), शिळास्तंभ (Menhir), पेटिका-दफन (Cist Burial), शिळाप्रकोष्ठ (Dolmen) इ. चा समावेश होतो. याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण अशी शैलोत्कीर्ण खोल्यांतील (Rock-cut Chambers) दफने, टोपीकल्लू व कुडकल्लू हे दफनाचे प्रकार केरळमध्ये आढळतात. दफनातील ही विविधता मुख्यत्वेकरून स्थानिकरीत्या उपलब्ध असलेले प्रस्तर, शिळा, दगड-गोटे यांमुळे आलेली असल्याचे जाणवू लागते.

बृहदाश्मयुगीन स्थळांचा प्रारंभिक शोध
भारतातील महापाषाणांचे स्वरूप आणि वैशिष्ट्यपूर्णता यामुळे सुरुवातीच्या ब्रिटिश शासकांचे लक्ष याकडे वेधले गेले. या दगडी स्मारकांचा सर्वप्रथम उल्लेख जरी कर्नल कॉलिन मॅकेन्झी यांनी केला असला, तरी त्याच्या शोधाचे व अभ्यासाचे श्रेय जॉन बॅबिंग्टन यांना दिले जाते. बॅबिंग्टन यांनी अगदी १८१९ च्या सुरुवातीस मलबार येथे अशा स्थळांचा शोध घेतला व केरळमधील दोन शिळावर्तुळांचे उत्खननदेखील केले. बॅबिंग्टन यांनी दाखवलेला मार्ग अनुसरत पुढे बऱ्याच ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बृहदाश्मयुगीन स्थळांचा शोध घेत अशा स्थळांचा अभ्यास चालू ठेवला.
स्थानिक लोक या शिळावर्तुळांना ‘गवळ्यांची वर्तुळे’ व त्यांच्या मुक्कामाची किंवा ‘लमाणांच्या तांड्याची जागा’ मानत असत; तर ब्रिटिश त्यांना भारतात आक्रमण करून शिरकाव करणाऱ्या शककालीन संस्कृतीचे उरलेले अवशेष समजत होते.

स्कॉटिश मिशनरी म्हणून १८४४ साली भारतात आलेल्या स्टिफन हिस्लॉपला १८४७ दरम्यान नागपूरपासून २० मैलांवर असलेल्या टाकळघाट येथे एक शिळावर्तुळ आढळून आले. त्यानंतर नागपूरच्या भोवतालचा परिसर अक्षरश: पिंजून काढून शिळावर्तुळे असलेल्या आणखी २० स्थळांचा व शिलापेटिका असलेल्या आठ स्थळांचा उल्लेख हिस्लॉपने आपल्या नोंदवहीत केला आहे.

पुढे १८४९-५० च्या सुमारास केलेल्या अन्वेषणादरम्यान हिस्लॉपला जवळपास १०० शिळावर्तुळे सापडली. त्या शिळावर्तुळांच्या उत्खननाची परवानगी त्याने नागपूरच्या भोसले राजांकडून मिळवली. परंतु गावच्या प्रमुखाने उत्खननासाठी मजूर पुरवण्यास नकार दिल्याने मिशनरी व स्थानिक ख्रिश्चनांच्या सोबतीने हातात कुदळ घेऊन हिस्लॉपने स्वतःच उत्खननाला सुरुवात केली. या उत्खननात त्याला मृदभांडी व लोखंडी अवजारे आढळून आली.

हेही वाचा: का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

हिस्लॉपचा दुर्दैवी मृत्यू
नागपूरच्या भोसले राजांचे संस्थान खालसा झाल्यावर नागपूर राज्याचे रूपांतरण ब्रिटिश शासित मध्य प्रांतात झाले. या मध्य प्रांताचे मुख्य आयुक्त झालेल्या सर रिचर्ड टेम्पल यांनी हिस्लॉपला या शिळावर्तुळांवर मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले. ४ सप्टेंबर १८६३ रोजी ऐन पावसाळ्याच्या दिवसांत टाकळघाटजवळील बोरी या गावात त्यांच्या शिबिराचे आयोजन ठरले. या मोहिमेदरम्यान टाकळघाट-बोरी मार्गातील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात बुडून हिस्लॉपचा अपघाती मृत्यू झाला. त्या वेळेस त्याच्या अंगावरील कोटाच्या एका खिशात बायबल; तर दुसऱ्या खिशात शिळावर्तुळातील पुरातत्वीय अवशेष आढळून आले. एकीकडे मिशनरी कार्य; तर दुसरीकडे जिज्ञासू वृत्तीने केलेले संशोधन कार्य, असे विलक्षण संमिश्रण हिस्लॉपच्या ठायी एकवटले होते.

पुढील संशोधनाचा प्रवास
हिस्लॉपने पेटवलेली उत्सुकतेची ठिणगी ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये पसरली आणि त्याचा कित्ता गिरवत विदर्भात रुजू झालेल्या त्यानंतरच्या जवळपास सर्व उत्साही अधिकाऱ्यांनी या शिळावर्तुळांच्या शोध व उत्खननात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्या काळचे चांदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असलेल्या कर्नल सी. एल. ग्लासफर्ड यांनी सिरोंचामधील एका शिलापेटिकेचे उत्खनन करून त्यातील अवशेष स्टीफन हिस्लॉपला पाठवले होते; तर विदर्भातील पहिले शास्त्रशुद्ध उत्खनन व त्याचे दस्तऐवजीकरण बेरार प्रांताचे आयुक्त असलेल्या जॉन हेन्री रिवेट-कार्नाक यांनी १८६७ साली जुनापानी येथे केले.

त्याच वर्षी जुलै १८६७ मध्ये मेजर जी. जी. पीअर्स यांनी कामठीपासून एक मैलावर असलेल्या वरेगाव येथे शिळावर्तुळाचे अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्खनन केले. पुढे मध्य प्रांताचे तत्कालीन मुख्य आयुक्त असलेल्या सर जॉन हेन्री मॉरिस यांच्या आग्रहावरून जे. जे. कॅरी या अभियंत्याने वर्धा जिल्ह्यातील आर्वीपासून २४ किमी अंतरावरील खैरवाडा येथे १८६९ दरम्यान एका शिळावर्तुळाचे उत्खनन व दस्तऐवजीकरण केले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या सर अलेक्झांडर कनिंगहम व त्यानंतर हेन्री कझिन्सने अनेक बृहदाश्मयुगीन स्थळांचा उल्लेख आपल्या वार्षिक अहवालात केला आहे. जी. ए. पी. हंटर यांनी १९३३ मध्ये प्रकाशित केलेल्या माहूरझरी येथील अन्वेषणात तेथील शिळावर्तुळांचा उल्लेख केला आहे.

१९६० ते २०१९ पर्यंत विदर्भात ठिकठिकाणी या बृहदाश्मयुगीन दफनांचे उत्खनन करण्यात आले. यात मुख्यत्वेकरून पुण्याचे डेक्कन कॉलेज, नागपूर विद्यापीठ व राज्य पुरातत्व विभाग यांचा विशेष सहभाग होता. उत्खनन झालेल्या स्थळांत जुनापाणी, माहुरझरी, बोरगाव, भागीमहारी, नैकुंड, रायपूर-हिंगणा, टाकळघाट, खापा, धवलामेटी, व्याहाड, माल्ही, हिरापूर, गोरेवाडा इ. स्थळांचा समावेश होतो.

बृहदाश्मयुगीन दफन पद्धती
बृहदाश्मयुगीन संस्कृतीची दफनाची विशिष्ट पद्धत होती. यात साधारणपणे दोन प्रकारचे दफन करण्यात येत होते.
१) ज्यात मृत व्यक्तीच्या शरीराचे अवशेष आहे असे दफन
२) मृत व्यक्तीच्या शरीराचे अवशेष नसलेले दफन
दफनाकरिता साधारणपणे एक खड्डा खणून त्यात मृताचे शव किंवा त्याचे अस्थिअवशेष, मृत व्यक्तीच्या प्रिय वस्तू किंवा नंतरच्या जीवनात उपयोगी पडू शकणाऱ्या वस्तू दफन करण्यात येत असत. नंतर तो खड्डा मातीने बुजवून त्याच्या सभोवती किंवा त्या जागेवर मोठमोठे दगड ठेवले जात असे. या दफनांना व पर्यायाने दफनभूमीला स्थानिक जमातीच्या धार्मिक व सांस्कृतिक जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत असे.

उत्खननात आढळून आलेले पुरावशेष-
बृहदाश्मयुगीन दफनांच्या उत्खननात विविध तऱ्हेचे लोखंडाचे भाले, त्रिशूळ, कट्यारी, शूल, तलवारी इ. मिळालेले असून नागपूरजवळील माहुरझरी येथील शिळावर्तुळाच्या उत्खननात लोखंडी छिन्न्या, भाले, चपट्या कुऱ्हाडी, सुऱ्या, विळे, खुरपी, तलवारी, कट्यारी त्याचप्रमाणे कड्या, बांगड्या व नखण्या मिळाल्या आहेत. लोखंडासह तांबे, कांस्य व सोने या धातूंचाही वापर या संस्कृतीच्या लोकांना माहीत होता, हे दफनात सापडलेल्या तांब्याच्या नक्षीदार कड्या, बांगड्या, सोन्याची कर्णफुले व कंठमाला इ. वस्तूंवरून दिसून येते.

काही वेळेस घोड्याचेही दफन मृत व्यक्तीबरोबर केलेले दिसून येते. घोड्याच्या तोंडावर घालायचे व बहुधा चामड्यावर शिवलेले तांब्याच्या पत्र्यांचे बनवलेले अलंकारही घोड्याच्या अवशेषांबरोबर सापडले आहेत. दफनांत काळी आणि तांबडी मृद्‍भांडी (Pottery) आढळून आली आहेत. यात सर्वसामान्यतः वाडगे, थाळ्या, निमुळत्या बुडाची भांडी आढळून आली आहेत. महाराष्ट्रात नागपूरजवळील नैकुंड व भागीमाहारी या ठिकाणी झालेल्या उत्खननात या लोकांच्या गोल झोपड्यांचे अवशेष त्याचप्रमाणे लोखंड बनवायच्या भट्ट्या व गहू, तांदूळ, जव व वाटाणे या धान्यांचे अवशेष सापडले आहेत.

हेही वाचा: कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

महापाषाणयुगीन संस्कृतीचे हिंदू संस्कृतीशी साध्यर्म
कोणतीही संस्कृती ही निरंतर प्रवाही असल्याने स्वाभाविकपणे तिचा प्रभाव व पडसाद पुढील काळावर व तत्कालीन समाजावर उमटल्याखेरीज राहत नाही. महापाषाणयुगीन संस्कृतीबाबतसुद्धा तसे म्हटले जाऊ शकते. मानववंशशास्त्रीय व सामाजिक-सांस्कृतिक अभ्यासावरून असे निश्चितपणे म्हणता येऊ शकते की सध्यस्थितीतल्या काही चालीरीती, परंपरा व समज थोड्या-अधिक फरकाने प्रागैतिहासिक काळात प्रारंभिक अवस्थेत असल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने भूप्रदेशाचे दैवतीकरण, स्मारकीकरण, मृत्यूनंतरच्या जगाच्या संकल्पना इ.चा अंतर्भाव होतो.

भूप्रदेशाचे दैवतीकरण (Sacred Landscape)-
पर्वतांना ‘पहाडी’ किंवा ‘डोंगर’ असे संबोधून त्यांची पूजा करण्याची प्रथा अतिशय प्राचीन काळापासून अविरतपणे चालू आहे. स्थानिक लोक बऱ्याचदा अशा डोंगरांची मातृदेवता म्हणून पूजा करतात. ‘एकवीरा’, ‘काळूबाई’, ‘सप्तशृंगी’ या मातृदेवतांची उदाहरणे याबाबत पुरेशी बोलकी आहेत. त्याखेरीज आदिवासीबहुल गोंदियातील माँ काली कंकाली, गडचिरोलीमधील बाबालाय माता आणि छत्तीसगडमधील दंतेश्वरी, बम्लेश्वरी वा भंगाराम देवी ही सारी डोंगरमाथ्यावरील मातृदेवतांची ठाणी त्या त्या मुलुखात स्थानिकांची श्रद्धास्थाने आहेत.
प्रागैतिहासिक काळापासून जगभरातील आदिम जमाती अशा विशिष्ट आकृतिबंध असलेल्या पर्वतरांगांना गर्भवती मातेच्या स्वरूपात पाहत आल्या आहेत. पर्वतांच्या आकाराचे स्त्री वक्षस्थळाशी साधर्म्य जाणवल्याने त्यांचा सुफलन संप्रदायामध्ये (Fertility Cult) समावेश केला जाऊ लागला.

या पर्वतरांगांना पवित्र मानून त्यांच्या दिशेने व त्यांच्या साक्षीने अशा महापाषाणयुगीन स्मारकांची स्थाननिश्चिती केली गेल्याची उदाहरणे बऱ्याच ठिकाणी आढळून येतात. चंद्रपूर जिल्ह्यातील सात बहिणींचा डोंगर व त्यांच्या आसमंतात उभे केलेले शेकडो शिलास्तंभ याचीच साक्ष देतात.
डोंगर-टेकड्यांप्रमाणेच बृहदाश्मयुगीन स्मारकांनासुद्धा आदिवासी समाजाकडून दैवताचे स्थान दिले जाते. कधी ‘शिकारदेव’, ‘शिवारदेव’, ‘पहाडदेव’, ‘वानरदेव’, ‘वाघोबा’ या नावांनी; तर कधी ‘राकसगोटा’, ‘नांगरगोटा’, ‘मांडवगोटा’ या नावांनी स्थानिकांकडून महापाषाणयुगीन शिलास्तंभ व शिलाप्रकोष्ठ पुजले जातात.

भूप्रदेशाचे स्मारकीकरण
बृहदाश्मयुगीन स्मारके ही यादृच्छिकपणे इतस्ततः विखुरलेली नसून सभोवतालच्या भौगोलिक भूरूपांच्या अनुषंगाने त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आढळते. या गोष्टींचा पुरेपूर विचार करूनच आदिवासी संस्कृतीमध्ये अशा स्थळांच्या निवडीबाबत एक ठराविक विचार असल्याचे जाणवते. सभोवतालच्या टेकड्यांसह संरेखन करून एक आंतर-विभागीय बिंदू तयार केला जाऊन त्या छेदनबिंदूभोवती विशिष्ट पद्धतीने त्यांचे आयोजन केल्याचे दिसते.

बृहदाश्मयुगीन काळात स्मारकांची निर्मिती इतिहासकाळात म्हणजे अगदी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापर्यंत झाल्याचे दिसून येते. मंदिरस्थापत्याची अगदी प्रारंभिक सुरुवात त्यानंतर म्हणजे इसवी सनाच्या तिसऱ्या-चौथ्या शतकात झाल्याचे पुराव्यानिशी म्हणता येते. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील मलप्रभा नदीच्या खोऱ्यात ‘ऐहोळे’ येथे शिलाप्रकोष्ठ व मंदिरे ही एकाच परिसरात आढळल्याने एक सूचक संकेत देऊन जातात. या दोघांमधील साध्यर्म लक्ष वेधून घेते. त्यामुळेच शिलाप्रकोष्ठाच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेवरून मंदिरस्थापत्य रचनेला प्रेरणा मिळाली असावी, असा प्राथमिक अंदाज काही इतिहासतज्ज्ञांनी बांधला आहे.

महापाषाणयुगीन संस्कृतीचा प्रभाव व निरंतरता
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, सिरोंचा येथील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील माडिया गोंड जमातीमध्ये आजही मृत व्यक्तीला दफन करून त्याच्या स्मरणार्थ असे शिलास्तंभ उभारण्याची प्रथा आहे. छत्तीसगड, झारखंड, मेघालयमधील काही समुदायांमध्ये अशा प्रकारच्या परंपरा अजूनही सुरू आहेत. मृतात्म्याचे दैवतीकरण आणि मृत्यूनंतरच्या जगाबद्दलचे कुतुहूल यातून ही प्रथा उदयास आलेली दिसून येते. यात त्या दफनभूमीचे पावित्र्यसुद्धा अभिप्रेत असल्याने त्यास विलक्षण महत्त्व आहे.

इतिहासपूर्व काळातील या प्रथा आजही आपल्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात ठळकपणे अबाधित राहिल्याचे दिसून येते. मग ते ‘शहीद स्मारक’ वा ‘अमर जवान’ म्हणून हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांचे स्मारक शिलास्तंभ असो वा ‘शक्तिस्थल’ म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे स्मारक असो. महापाषाणयुगीन काळातील सर्वांत प्रसिद्ध स्थळ म्हणजे ब्रिटनमधील ‘स्टोनहेंज’ हे आहे. युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून याची नोंद केली आहे. गतवर्षीच कर्नाटकमधील ‘हिरे बेनकल’ या बृहदाश्मयुगीन स्थळाचा युनेस्कोच्या प्रस्तावित यादीमध्ये समावेश केला गेला होता.

भारतीय पुरातत्व इतिहासाच्या अभ्यासाला कलाटणी देणाऱ्या हडप्पा-मोहंजोदारो स्थळांच्या उत्खननाला १०० वर्षे पूर्ण झाली असली, तरी त्याच्याही १०० वर्षे आधी महापाषाणयुगीन शिळावर्तुळांनी ब्रिटिश अधिकारी व इतिहास अभ्यासकांना संमोहित केले होते. त्यात विदर्भाच्या शिळावर्तुळांच्या शोधाची व उत्खननाची शृंखला तितकीच सुरस व रंजक असूनही अल्पज्ञात आहे.
(लेखक स्वतंत्र संशोधक असून, त्यांनी विदर्भातील अनेक प्रागैतेहासिक ठिकाणे शोधली आहेत. ते सध्या विदर्भ व दख्खनच्या अश्मयुगीन संस्कृतीवर अभ्यास करत आहेत.)