Hinduism- मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाडगेबाबांचे धर्मकारण}

मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

चंद्रकांत वानखेडे

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, या संत तुकारामांच्या अभंगातील जातकुळीशी नातं सांगणारे गाडगेबाबांचे धर्मकारण आहे. यात धर्माचे अवडंबर नाही..नक्की काय होती गाडगेबाबांची धर्मकारणाची व्याख्या.....

भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या-नागड्यांना वस्त्र, बेघरांना आसरा, गरीब मुला-मुलींना शिक्षण, अंध, पंगू, रोग्यांना औषधं, बेकारांना रोजगार, पशू-पक्ष्यांना, मुक्या प्राण्यांना अभय, दु:खी व निराशांना हिंमत, आणि गरीब तरुण-तरुणींचे लग्न हा संत गाडगेबाबांचा रोकडा धर्म. त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न म्हणजे त्यांचे ‘धर्मकारण’. (Concept of Religion followed by Maharashtra Saint Gadagebaba)

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, या संत तुकारामांच्या (Saint Tukaram) अभंगातील जातकुळीशी नातं सांगणारे गाडगेबाबांचे धर्मकारण आहे. यात धर्माचे अवडंबर नाही. धर्माच्या नावावर सर्वसामान्यांवर थोपविलेली कर्मकांडे नाहीत. धर्माच्या नावावर पोट भरण्याचा धंदा नाही. या धर्मकारणात मृत्यूनंतरचे स्वर्गाचे प्रलोभन नाही किंवा नरकाची भीती वा दहशत नाही. पाप-पुण्याचा तराजू नाही. त्यामुळे गाडगेबाबांच्या या धर्मकारणात शोषणाला मुळी वावच नाही.

उलट शोषणमुक्तीच्या दिशेने नेणारे हे धर्मकारण. त्यांनी मंदिरात (Temple) बंदिस्त देवाला मुक्त करून माणसांत आणले आणि माणसातच देव पाहायला शिकवले. खरंतर दया, क्षमा, करुणा याशिवाय धर्म असू शकत नाही. करुणेशिवाय क्रांती क्रौर्य ठरते. तसाच धर्मसुद्धा करुणेशिवाय क्रौर्यच ठरतो. संत मुक्ताबाई म्हणतात, ‘संत तोचि जगी क्षमा दया ज्याचे अंगी.’ गाडगेबाबा या कॅटेगरीतील संत. त्यामुळे याच कॅटेगरीतील त्यांचे धर्मकारण. ‘बुडती हे जन। न देखवे डोळा। म्हणूनी कळवळा। येत असे।।’ या कळवळ्याचं हे धर्मकारण.

अमरावती (Amaravati) जिल्ह्यातील दर्यापूर तालुका. त्या तालुक्यातील टिचभर शेणगाव. या गावातील झिंगराजी जानोरकर आणि सखूबाई या दाम्पत्याच्या पोटी डेबूचा जन्म. डेबू लहान असतानाच डेबूच्या वडिलांचा मृत्यू. डेबू सहा सात वर्षांचा असतानाच आई सखूबाई डेबूला घेऊन दापुऱ्याला माहेरी आश्रयाला आली. माहेरावर तिने आपला भार पडू दिला नाही. सखूबाईने पहाटे उठावे. चार-सहा पायल्यांचे दळण दळावे. गोठ्यात जाऊन गाई-बैलांचे शेणमूत काढावे. गोठा झाडून पुसून स्वच्छ करावा. दुपारी शेतात जावे. हे सर्व डेबूच्या डोळ्यासमोर होत होते. त्यामुळे त्याच्यावर या गोष्टींचा संस्कार झाला. एक दिवस त्याने स्वत: होऊन मामाकडे ढोर चारण्याचे काम मागवून घेतले व ती जबाबदारी स्वेच्छेने स्वत:कडे घेतली. वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी मामाने त्याला शेतीत गुंतवले. डेबू शेतीच्या सर्वच कामात लवकरच तरबेज झाला. शेती चांगली पिकू लागली. घरात समृद्धी आली. रीतसर डेबूचे लग्नही झाले. कमालपूरच्या धनाजी खल्लाकरच्या मुलीशी. कुंताबाईशी. डेबूच्या लग्नानंतर डेबूच्या मामाच्या मुलाचे, बळीरामचे लग्न. त्याच्यापाठोपाठ त्यांच्या दोन मुलींची लग्ने. चार वर्षांत चार लग्ने. त्यामुळे मामाची आर्थिक परिस्थिती खालावत जाते. त्यातही वऱ्हाडातील १८९६ व १८९९ या वर्षीचे दोन मोठे दुष्काळ. पीक आलेच नाही. खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी सावकाराकडून कर्ज आणि या कर्जाच्या सापळ्यात डेबूचा मामा.

घरावर झालेले कर्ज फेडणे व या कर्जापायी मामाच्या मुलाची, बळीरामची सावकाराकडे गहाण पडलेली जमीन सावकाराच्या तावडीतून सोडवणे, एवढेच एक ध्येय डेबूसमोर होते आणि सावकाराचा प्रयत्न गहाण पडलेली जमीन हडपण्याचा. डेबूचा आणि सावकाराचा हा संघर्ष. यात सावकार सर्व हथखंडे वापरतो. कर्जाच्या परतफेडीची पावती सावकार कधीच द्यायचा नाही. सावकाराने रीतसर अर्ज करून कोर्टामार्फत जमिनीचा ताबा मिळविला. कोर्टामार्फत जप्तीचे वॉरंट पाठवून जमिनीचा कब्जा घेतल्याची तारीख ठरविली. ते पत्र बळीरामच्या नावे दापुऱ्यात पोहोचले. डेबूला कोणी तरी ते वाचून दाखविले. डेबू संतापाने पेटून उठला.

कोणत्याही परिस्थितीत सावकाराला त्या जमिनीचा ताबा घेऊ द्यायचा नाही, याचा निर्धार डेबूजीने मनोमन केला. कब्जाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला, तसतसे घरातले वातावरण तापू लागले. सावकाराशी डेबूने हमरीतुमरीवर येऊ नये, असा घरच्यांचा पोक्त सल्ला; तर सावकाराशी कोणत्याही परिस्थितीत दोन हात करायचेच, ही डेबूची तयारी. जीवात जीव असेपर्यंत दुसऱ्याचा वखर मामाच्या वावरात चालू द्यायचा नाही, ही डेबूची ठाम भूमिका; तर कुणाशीही भांडण करू नको म्हणून परीपरीने आजोबा, आजी, आई यांची डेबूला विनवणी. डेबू सगळ्यांचं ऐकत असल्याची बतावणी जरी करीत असला, तरीही त्याचा निर्धार पक्का आहे, याची जाणीव डेबूच्या देहबोलीवरून घरच्यांना होती. त्यामुळे स्वाभाविकपणेच घरच्या वातावरणाचे तापमान वाढले होते.

नोटीसप्रमाणे सावकाराने जमिनीवर कब्जा करण्याचा दिवस उजाडला. त्या दिवशी डेबू भल्या पहाटे वखर घेऊन शेतात गेला. त्याच्या मागोमाग काठी टेकत-टेकत आजोबा आले. त्यांच्या मागोमाग आई, आजी, मामी, बळीराम सारे आले. काही तरी वेगळंच पहायला मिळणार, या अपेक्षेने बघ्यांचीही गर्दी जमा होऊ लागली. आजोबा, आजी, आई या सर्वांची डेबूला विनवणी सुरूच आहे आणि दुसऱ्या बाजूला वावरात डेबूचा वखरही तेवढ्याच निर्धाराने सुरू आहे. एवढ्यात गर्दीतून ‘सावकार आला, सावकार आला’ असा गलका ऐकू येतो. इतक्यात सावकाराच्या माणसांनी आणलेले चार-पाच वखर शेतात येऊन पोहोचतात.

सोबत घोड्यावर बसून सावकार. सावकार आपल्या माणसांना शेतात वखरं धरण्याचा हुकूम देतो. तेवढ्यात ‘खबरदार’ असा डेबूचा दनकट आवाज वातावरणात घुमतो. त्या आवाजातील जरबच एवढी असते की सावकाराची सर्वच माणसं जागच्या जागीच थबकतात. सावकार परत हुकूम देतो; पण सावकारांची भाडोत्री माणसं डोक्याला कफन बांधून लढायच्या तयारीत असलेल्या डेबूच्या ‘खबरदार’ला चांगलीच टरकलेली असतात; तरीही त्यातील काही जण समोर भीत भीतच समोर सरसावतात. त्यात परत डेबूचा आवाज येतो, ‘‘मी माझ्या घरचं कुंकू पुसून आलो. तुम्ही तुमचा विचार करा.’’ जी माणसं डेबूच्या अंगावर धावून जातात, त्यांना डेबू जमिनीवर लोळवतो आणि हातात भली मोठी काठी घेऊन वाघासारखी सावकाराच्या दिशेने झेप घेतो.
काठीचा जबरदस्त फटका सावकाराच्या घोड्याच्या पुठ्ठ्यावर हाणतो. घोडा चौफेर उधळतो. आता सावकारच पळून जाताना त्याची माणसं पाहतात. ते तेथे थोडेच थांबणार. तेही तिथून पळ काढतात. अखेर ते भाडोत्रीच असतात ना? डेबू या घटनेनंतर परिसरात एका दिवसातच ‘हीरो’ बनून जातो; पण डेबूच्या मनात या काळात काहीतरी वेगळंच सुरू असावं.

सिद्धार्थ राजा न होता महान संन्यासी होईल, असं भविष्य एका भविष्यवेत्त्याने सांगितले असल्यामुळे त्याला बाहेरची हवा लागणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात होती; तरीदेखील राजवाड्याची दारे किलकिली होतात आणि सिद्धार्थला बाहेर वेदना, दु:ख आणि मृत्यू दिसतो. हे का आहे? असं का आहे? असं का असतं? यांसारख्या असंख्य प्रश्नांनी तो बेजार झाला असेल.
अस्वस्थ आणि बैचैन झाला असेल. त्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी त्याने राजवाड्याच्या बंदिस्त चौकटीत प्रयत्नही करून पाहिला.

सिद्धार्थचा गृहत्याग आणि डेबू जानोरकरचा गृहत्याग यात काहीही फरक नाही. असलाच तर एवढाच, सिद्धार्थने राजवाडा सोडला आणि डेबूने घर. मोठं घर सोडणारा सिद्धार्थ आणि छोटं घर सोडणारा डेबू. गृहत्यागाआधी झालेली सिद्धार्थची वैचारिक घुसळण आणि डेबूच्या वैचारिक घुसळणीत फार फरक असेल, असंही वाटत नाही. सिद्धार्थ राजवाड्यात जवळपास बंदिस्त तरी होता. डेबू मात्र ‘प्रंपच’ करण्याच्या निमित्ताने का होईना, समाजात वावरत होता. त्याने लहानपणीच वडिलांचा मृत्यू पाहिला होता. त्यांची व्यसनाधीनता अनुभवली होती. वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे घराचा ढासळलेला आर्थिक डोलाराही त्याने पाहिला होता. मृत्यूच्या दारात असताना त्यांनी सखूबाईस, म्हणजे डेबूच्या आईला सांगितले, ‘‘सखू, खंडोबा, बहिरोबा, मातामाय ही दैवते आता देव्हाऱ्यात ठेवू नको. त्यांच्या भक्तीला डेबूला लावू नको. जो प्राण्यांचा बळी घेऊन संतुष्ट होतो, तो देवच नाही. हे देव घरात नसते आणि त्यांना बळी दिले नसते, तर मी दारूडा झालो नसतो. आता मात्र एक कर, डेबूला या देवी-देवतांच्या नादी लागू देऊ नको, दारूकडे वळू देऊ नको.’’

हेही वाचा: हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

मरतेवेळेस बापाच्या या उपदेशानेही त्याच्या मनात प्रश्नांचे काहूर उठलेच असणार. मामाकडे आश्रयाला आल्यानंतर डेबूने स्वत:ला कष्टाच्या घाण्याला जुंपले. शेतीच्या कामात झोकून दिले. शेतीत एवढे कष्ट करूनही अखेर शेतकऱ्यांच्या गळ्यात सावकारी फासच का?
अशा कितीतरी प्रश्नांनी त्याच्या डोक्यात थैमान घातले असेल. चाकोरीबद्ध आयुष्यात या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची सूतराम शक्यता नाही, याची खात्री पटल्यानंतरच त्याने ही चाकोरी सोडून, उत्तरांच्या शोधात घरदार सोडले असेल. डेबू जानोरकर ते संत गाडगेमहाराज हा या सामान्य माणसाचा असामान्य प्रवास जरी न्याहाळला, तरी थक्क व्हायला होतं. स्वत:च्याच प्रश्नांनी बेजार झाला म्हणून म्हणा किंवा या प्रश्नांमुळे मन संसारातून विरक्त झालं म्हणून म्हणा, डेबू घरदार सोडतो‌; पण प्रस्थापित धर्मकारणानुसार जंगलात जात नाही, तर ‘माणसांच्या जंगलात’च १२ वर्षे घनघोर तपश्चर्या करतो.

ही डेबूची आगळीवेगळी साधना म्हणजेच गाडगे महाराजांचे ‘धर्मकारण’.
१९०५ ला डेबू घर सोडतो. १९०५ ते १९१७ पर्यंत ‘माणसांच्या जंगलात’तच आगळीवेगळी तपश्चर्या करतो. साधना करतो साधक बनून. डेबू जानोरकर हा साधकही वेगळा. त्याची तपश्चर्या वेगळी आणि त्याची साधना तर एकदमच जगावेगळी. षड्‌रिपूंवर विजय मिळविण्यासाठी रोज स्वत: इतरांकडून अपमान करवून घ्यायचा. समोरच्याकडून शिव्या खायच्या. समोरचा देत नसेल, तर द्यायला भाग पाडायचे. मार खायचा. सहजासहजी तो मिळत नसेल, तर समोरच्याला असं काही उत्तेजित करायचं, की त्याने डेबूला बदडून काढले पाहिजे. त्यासाठी नाना युक्त्या, क्लृप्त्या डेबूने करायच्या. हातात काठी व गाडगं घेऊन रोज पायी भटकंती. या गावातून त्या गावात. रोज नवीन गाव.

मिळेल तिथे निवारा. अंथरायला जमीन आणि पांघरायला आकाश. दिवसभर कोणाची लाकडं फोड. कोणाचं वावर निंदून दे. कोणाचे भारे उचलू लाग. कोणाला कुंपणासाठी काटे तोडून दे. धांड्यांच्या पेंढ्यांचा ढीग रचून दे, अशी कष्टाची कामे करायची; पण मोबदला मात्र घ्यायचा नाही. एवढच नव्हे, तर त्याने केलेल्या कष्टाबद्दल तारीफ ऐकण्यासाठीही तेथे थांबायचे नाही. मोबदला घेण्याच्या वेळेस व कौतुकाचे दोन शब्द ऐकायच्या वेळेस त्याने तेथून शिताफीने पसार व्हायचे व कोणीतरी कुठेतरी शेतात शिदोरी सोडून खात असला, तर त्याच्या तोंडासमोर उभं रहायचं. त्याला दया येऊन कोणी भुकेला दिसतो म्हणून त्याने डेबूला त्याच्या शिदोरीतली पाव चतकोर किंवा अर्धा कोर भाकर द्यावी, तर डेबूने म्हणावे, ‘‘बस एवढीच! यानं पोट भरन काजी?’’
देणाऱ्याने मिश्कीलपणे विचारावं, ‘‘मंग अजून किती देऊ?’’
डेबूने म्हणावं, ‘‘देऊन द्यानं आहे तेवढी.’’ त्यावरही संयम ठेवत, राग आवरत देणाऱ्याने विचारावं, ‘‘मंग मी काय खावू? उपाशी राहू?’’
त्यावर डेबूने निर्विकारपणे म्हणावं, ‘‘रायना उपाशी. एका टाइमाच्या उपासानं माणूस मरते थोडीच.’’ यावर देणाऱ्यासमोर एकच उपाय-
शिव्याशाप देणे किंवा डेबूला बदडून काढणे. या शिवाय दुसरा पर्यायच नसायचा; पण त्या दिवसापुरती का होईना डेबूची ‘साधना’ मात्र होऊन गेलेली असायची.

डेबूची भटकंती सुरू आहे. या गावावरून त्या गावाला. डेबू पायी चालला आहे. त्याच दिशेनी एक रिकामी बैलबंडीही जाते आहे. आपण ज्या दिशेनी जातो आहे त्याच दिशेनी बराच वेळ झाला एक फाटक्या-तुटक्या कपड्यातला माणूस बैलबंडीच्याच मागे मागे पायी-पायी येतो आहे, त्या बैलबंडी हाकलणाऱ्याला दया येते. तो डेबूला विचारतो, ‘‘अरे कोणत्या गावाला चाललास?’’ डेबू गावाचं नाव सांगतो. बैलबंडीवाला म्हणतो, ‘‘अरे बस ना मग बैलबंडीत. मीही त्याच गावात जातो आहे. कशाला उगाच पायी चालतोय?’’ डेबूने बसावं ना सरळ सरळ? मग डेबूची ‘साधना’ आणि ‘तप’ कसे झाले असते? साधकाला साधनेत ‘साधन आयतच मिळालं असते ना? तो ती संधी सहजासहजी सोडणार थोडीच? डेबू विचारतो, ‘‘खरंच बसू का जी बैलबंडीत?’’
‘‘अरे, मी कोणत्या भाषेत बोललो. खरंच बस.’’ बैलबंडीवाला म्हणतो.
‘‘पण तुम्ही खाली उतरल्याशिवाय मी कसा बसू जी?’’ या डेबूच्या प्रश्नावर बैलबंडीवालाही चक्रावतो आणि विचारतो, ‘‘कावून रे माही काही अडचण होते काय रे तुले?’’
‘‘नाहीतरी मले काय अडचण होईना तुमची? पण बैलाले होईन ना जी. त्याहीले आपल्या दोघांचा भार तोलणार नाही. म्हणून मी काय म्हणतो तुम्ही खाली उतरा, मी गाडीत बसतो.’’ यावर गाडीवाल्याने काय करावे? डेबूला अपेक्षित तेच त्याने करावे. गाडीवाल्याने संतप्त व्हावे. डेबूला भरपूर शिव्याशाप द्याव्यात. वेळप्रसंगी बदडूनही काढावे. त्याशिवाय डेबूने त्याच्यासमोर दुसरा पर्यायच ठेवला नसतो.

तप, साधना, तपश्चर्या काहीही म्हणा, ही जगावेगळी पद्धत डेबूने कशी व कोठून शोधून काढली असेल? धर्मकारणात पूर्वी अशी तपश्चर्या कोणी केली नव्हती. हे खास गाडगेमहाराजांच्या ‘धर्मकारणा’चे प्रॉडक्ट आहे. ते परंपरागत धर्माच्या कोणत्याही फॉर्ममध्ये बसत नाही म्हणून ते आपण नाकारूही शकत नाही.

अखंड बारा वर्षे शक्यतोवर पायी प्रवास. रोज कोणाच्या तरी शिव्याशाप खायच्या. स्वत:चा अपमान जाणीवपूर्वक करवून घ्यायचा. प्रसंगी मार खाण्याचे प्रसंग स्वत:च निर्माण करायचे व स्वत:च मार ओढवून घ्यायचा व पोटभर मार खायचा. हे ‘व्रत’ डेबू जानोरकर या ‘साधका’ने अत्यंत कठोरपणे पाळले. सांगायला आणि लिहायलाच जड जाते तिथे हे व्रत पाळायला किती अवघड गेले असेल हे डेबूच जाणे.
हे व्रत पाळायचे तर त्यासाठी रोज नवनवीन फंडे शोधणे हादेखील डेबूच्या ‘साधने’चाच भाग असावा.

पाणी पिण्यासाठी डेबू कोणाच्या तरी वावरात शिरायचा. जोरात हाक द्यायचा, ‘‘कोणी हात का जी वावरात?’’
हाकेला प्रतिसाद म्हणून समोरून आवाज यायचा, ‘‘कोण हाय रे? काय पायजे?’’ डेबू उत्तर द्यायचा, ‘‘काय नाय जी. पाणी प्यायचं आहे जी.’’
समोरच्याने म्हणावं, ‘‘अरे राजा तू लुळा-पांगळा आहेस का आंधळा? तिथेच विहीर आहे. दोर-बकेटही आहे. काढ पानी अन् पे पानी. का आयतच पायजे?’’
‘‘नाय जी.’’ असं म्हणत डेबूने विहिरीतलं पाणी काढायचं आणि प्यायचं. निघता निघता समोरच्याला म्हणायचं, ‘‘काजी आताच तुमची विहीर बाटली असं नाही.’’ काहीच न समजून समोरच्याने विचारावे, ‘‘विहीर कावून बाटली असन रे?’’ तेवढ्याच निर्विकारपणे डेबूने म्हणावे, ‘‘त्याचं काय हाय ना, मी म्हार हाय ना जी.’’ आता डेबूला ‘फ्री’ शिव्या असायच्या आणि वेळप्रसंगी मार ‘बोनस’च्या रूपात. डेबूची ‘तहान तर भागायचीच वर त्या दिवसाची ‘व्रतपूर्ती’ही साधून जायची ‘टू इन वन’.

हेही वाचा: कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

डेबू जानोरकराच्या बारा वर्षांच्या अखंड साधनेत वणवण पायी भटकंतीसोबतच रेल्वेचा प्रवासही आहे. अपमान, मार खाणे हे ओढवून घ्यायचे म्हटल्यावर रेल्वेचा विनातिकीट प्रवास तर सर्वोत्तमच.

एका प्रवासात डेबूचा ‘प्रवास’ सुरू असतानाच टीसी येतो. डेबूकडे तिकीट मागतो. तिकीट असण्याचा तर प्रश्नच नसतो. टीसी त्याला शिव्या देतो, मारतो आणि अक्षरशः लाथ मारून गाडीखाली फेकतो. डेबू आडवातिडवा प्लॅटफॉर्मवर पडतो. एवढा सर्व तमाशा झाल्यानंतर कोण त्या गाडीत आणि नेमका त्याच डब्यात बसेल, ज्या डब्यात सर्वांसमोर अपमान झाला, शिव्याही खाल्ल्या, मारही खाल्ला. तो डबा सोडून दुसऱ्या डब्यात बसायचे. हे सामान्य माणसाने केले असते; पण हा सामान्य दिसत असला, तरी तो सामान्य थोडाच होता. हा विनातिकीट डेबूजी जानोरकर गाडगे महाराज बनण्याच्या खडतर प्रवासाला निघाला होता ना!

डेबू परत त्याच डब्यात जाऊन बसतो. सर्व प्रवासी त्याच्याकडे पाहतात. त्यांच्या ‘नजरा’ कशा असतील त्यांची आपण कल्पना करू शकतो; तरीही त्यातील एका प्रवाशाला त्याची दया येते. तो त्याच्या जवळ जाऊन म्हणतो, ‘‘किती शिव्या खाशील? किती मार खाशील? किती अपमान करवून घेशील? आम्हाला बघवत नव्हतं रे. आणि आता परत विनातिकीट डब्यात चढलास? तो माणूस आपल्या खिशात हात घालून पैसे काढतो आणि डेबूच्या हातात बळजबरीने कोंबत म्हणतो, ‘‘जा बाबा जा, गाडी सुटायला अजून वेळ आहे. जा लवकर आणि तिकीट काढून घे.’’ तो अजीजीला आला असतो. डेबू शांतपणे ते पैसे वापस करतो आणि म्हणतो, ‘‘बाबा टीसीच्या एका लाथेने शंभर मुलांचा प्रवास होऊन गेला ना जी.’’

हेही वाचा: राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

डेबू जानोरकराचा हा प्रवास प्रचलित धर्मकारणाने ना कधी समजून घेतला, ना कधी त्याची गांभीर्याने दखल घेतली. कालांतराने ‘गाडगे महाराजां’चा जन्म झाला आणि डेबू जानोरकराचा मृत्यू. गाडगे महाराज कधी स्वत:हून डेबूबद्दल बोलण्याची शक्यता नव्हती आणि डेबूला काही विचारावे तर डेबू होताच कोठे काही सांगायला? गाडगे महाराजांच्या नित्य सहवासात असलेल्यांनी नेटाने महाराजांची पाठ धरली असती, १२ वर्षांच्या कालखंडात त्यांनी कशी, कोठे-कोठे भ्रमंती केली, याची जरी माहिती करवून घेतली असती, तर डेबूच्या प्रवासाचा ‘नकाशा’ बनविता आला असता आणि त्या नकाशाचा माग काढत डेबूचा थांग लावता आला असता; पण दुर्दैवाने तसे झाले नाही.

कोणालाही तीव्रतेने तसे वाटले नाही आणि डेबू काळाच्या अंधारकोठडीत बहुतांश गडप झाला. गाडगे महाराजांच्या तोंडून जो काही डेबू झिरपला असेल व सांगोवांगी लोकांनी सांगितला असेल, तेवढाच डेबू आपल्या वाट्याला आला. गाडगेबाबा पूर्णतः वाट्याला आले; पण ‘मेकिंग ऑफ गाडगेबाबा’ ही प्रक्रिया काळाच्या उदरातच बहुतांश गाडली गेली.

अंगावरच्या कपड्यानिशी डेबू बाहेर पडला होता. त्या कपड्याच्या चिंध्याचिंध्या झालेल्या होत्या. रस्त्याने सापडलेल्या चिंध्यांचीच ठिगळं तो त्यावर जोडत राहिला. अंथरण्यासाठी शिंदीच्या पानांची चटई म्हणजे चापऱ्या किंवा चिंध्यांपासूनच तयार केलेली ठिगळा-ठिगळांची गोधडी, कुत्र्यांपासून संरक्षणासाठी बांबूची काठी आणि पाणी पिण्यासाठी गाडगं. हीच डेबूची संपत्ती. यावरूनच डेबूला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं पडत गेली. ज्यांना नाव माहीत आहे, त्यांच्यासाठी डेबू बुवा किंवा ज्यांना जात माहीत त्यांचा वठ्ठी साधू. ज्यांना हे माहीत नाही, त्यांनी त्याच्या बाह्य चिन्हांवरून नावं ठेवली. शिंदीच्या पानांची चट‍ई किंवा चापऱ्या आहेत म्हणून चापरे बुवा, चिंधेबुवा, लोटके महाराज, गाडगे महाराज. शेवटी डेबूचं मातीचं गाडगंच टणक निघालं व तेच नाव लोकांच्या तोंडी रुजलं आणि कायमच लोकांच्या हृदयात जाऊन बसलं. बारा वर्षांचं डेबूचं तप संपलं असलं, तरीही त्याचा गृहत्याग देहत्यागापर्यंत संपला नाही. अविरतपणे तब्बल ५१ वर्षे त्यांची भटकंती सुरू राहिली शेवटच्या श्वासापर्यंत.

दिवसा घाण साफ करताना हातात खराटा हे माध्यम आणि रात्री लोकांच्या डोक्यातील घाण साफ करण्यासाठी कीर्तन. डेबूची बारा वर्षांची तपश्चर्या ही जशी कोणत्याही परंपरागत ‘फॉर्म’मध्ये बसत नाही; तसेच गाडगे महाराजांचे कीर्तन तरी कोण्या फॉर्ममध्ये बसते? आता जो माणूसच कोणत्याही फॉर्ममध्ये बसला नाही, त्याची साधना, तप किंवा तपश्चर्या असो वा कीर्तन, हे तरी कसे काय कोण्या प्रचलित फॉर्ममध्ये बसतील? पण ते कोणत्याही फॉर्ममध्ये बसत नाही म्हणून नाकारताही येत नाही, हीच प्रस्थापितांची अडचण असते.

वेगवेगळे संप्रदाय. त्यांची कीर्तनशैली वेगळी. त्यांची वैशिष्ट्य वेगळी. वारकरी संप्रदाय, रामदासांचा समर्थ संप्रदाय, नारदीय संप्रदाय. या कोणत्याही संप्रदायांच्या कीर्तनशैलीशी गाडगेबाबांच्या शैलीशी साधर्म्य नाही. तुकाराम महाराज आमचे गुरूबंधू असं स्वत: गाडगेबाबा म्हणतात. त्यामुळे गाडगेबाबांची वैचारिक जवळीक वारकरी संप्रदायाशी आहे; पण कीर्तनशैलीशी अजिबात नाही. वारकरी संप्रदायात जसं कीर्तन करतेवेळी ड्रेस कोड आहे, तसा गाडगेबाबांच्या कीर्तनासाठी नाही. काहीच नसलं, तरीही दगडांच्या टाळावरही गाडगेबाबांचे कीर्तन होऊन जायचे. करुणेने ओथंबलेले गाडगेबाबांचे शब्द, लेकरांवर रागवावं त्याप्रमाणे कधी रागावून, चिडून, कानउघाडणी; तर कधी थट्टामस्करी करीत समोरच्यांची टर घ्यायची. कधी त्यांना प्रेमाने कवटाळून त्यांचे कीर्तन श्रोत्यांच्या काळजाला हात घालत चालायचे.

श्रोत्यांना तासन् तास खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यात होते. हे केवळ त्यांच्या वाणीचे व मांडणीचे सामर्थ्य नव्हते, तर बारा वर्षे त्यांनी केलेल्या आगळ्यावेगळ्या तपश्चर्येने त्यांच्या शब्दाला प्राप्त झालेले वजन व आलेली धार त्याचा तो परिणाम होता. रिकामं पोतं जसं उभं रहात नाही, तसाच रिकामा शब्दसुद्धा उभा रहात नाही. तो भरावा लागतो ‘बोले तैसा चाले’ या अखंड वागण्यातून, तोच मग ‘त्याची वंदावी पाऊले’ या अवस्थेला पोहोचतो. गाडगेबाबा त्या अवस्थेला पोहोचले होते; पण या पावलांना वंदन करण्याची सोयसुद्धा या महाराजांनी ठेवली नव्हती. वंदन कराल, तर काठीचा तडाखा ठरलेलाच. गाडगेबाबांच्या कीर्तनाबाबत आचार्य अत्रे म्हणायचे, ‘‘त्यांचे सामर्थ्य एरवी तुम्हाला मुळीच कळणार नाही. सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात तसेच बाबांना पहावे कीर्तनात.’’ श्रोत्यांकडूनच बाबा आपल्या प्रश्नांची उत्तरं वदवून घेत. ही उत्तरं म्हणजे एकप्रकारे ज्यांच्याकडून चुका होताहेत, त्यांच्याकडून जाहीरपणे मिळविलेला कबुलीजबाब असायचा. सॉक्रिटिस ज्या पद्धतीने जनतेस प्रश्न विचारीत असे त्याच्याशी साधर्म्य सांगणारा हा प्रकार. बरं हे प्रश्नही सर्वसामान्यांशी निगडित असलेले. त्यांच्या जिव्हाळ्याचे. कीर्तनाचे विषय, ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या, ब्रह्म, ब्रह्मांड, आत्मा-परमात्मा, ये सब मोह माया है, देह नश्वर आत्मा अमर, जन्म-पुनर्जन्म, स्वर्ग-नरक, सगुण-निर्गुण, मोक्ष, कर्मकांड असले थोतांड नसायचेच. विषय फक्त गाडगेबाबांनी स्वीकारलेल्या दहा सूत्रांत सांगितलेल्या ‘रोकड्या धर्माचा.’

बाबांच्या कीर्तनातील बाबांनी केलेला हा संवाद पहा.
बाबा : बापहो, या जगात देव किती? एक की दोन?
लोक : एक.
बाबा : जरा मोठ्यानं सांगा, एक का दोन?
लोक : एक.
बाबा : पायथा बरं! नीट विचार करून सांगा - देव किती?
लोक : एऽऽऽक.
बाबा : हां, हिशेब करा आता. तुमच्या गावात खंडोबाचं देऊळ आहे का नाही?
लोक : आहे.
बाबा : मंग आता देव किती झाले?
लोक : दोन. (लोक या वेळी खजील व्हायचे.)
बाबा : वावराच्या बांधावर म्हसोबा आहे की नाही?
लोक : हो... आहे म्हसोबा.
बाबा : मंग आता देव किती झाले?
लोक : तीऽऽऽन.
बाबा : गावाच्या वेशीवर मरीमाय आहे की नाही?
लोक : आहे.
बाबा : मंग आता कितीक झाले?
लोक : चाऽऽऽर.
बाबा : मातामायची पूजा करता की नाही?
लोक : करतो.
बाबा : मंग आता कितीक झाले?
लोक : पाऽऽऽच

देवाची संख्या अशा प्रकारे वाढत गेली की गाडगेबाबा श्रोत्यांवर तुटून पडायचे. जनसमुदाय निमूटपणे ऐकून घ्यायचा. देवाधर्मावर बाबांनी कठोर टीका केली. तुमच्या देवाले अंग धुता येत नाही. ज्याला अंग धुवायची अक्कल नाही, त्याले देव म्हंता? तुमच्या देवाले धोतर नेसता येते का? ज्याला धोतर नेसता येते नाही, त्याले देव म्हणता? तुमच्या देवापुढं निवद ठेवला - कुत्रं भिडलं, तर कुत्रं हाणता येते का? कुत्रं हाणायची ज्याच्या अंगात ताकद नाही, त्याले देव म्हंता? गाडगेबाबांनी देवावर कठोर टीका केली असेल; पण ‘देवाला रिटायर करण्याची’ उठाठेव केली नाही. देव माणसात पाहिला असेल; पण देव ही संकल्पना नाकारली नाही. आयुष्यभर ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ ही टॅगलाईन कधी सोडली नाही.

बाबा कधी देवळात गेले नाही. पंढरपूरला गेले; पण विठ्ठलाच्या दर्शनासाठी देवळात गेले नाही; तरीदेखील धार्मिक स्थळी गरजू लोकांसाठी धर्मशाळा मात्र बांधलेल्या. क्रांतीतून करुणा वजा केली, तर केवळ कौर्य शिल्लक रहाते. त्याप्रमाणेच धर्मकारणातूनही ‘करुणा’ वजा केली, तर कौर्यच शिल्लक रहाते. गाडगेबाबांनी आयुष्यभर केलं ते करुणेचं ‘धर्मकारण’. देव आणि धर्म ही सर्वसामान्य माणसांची मानसिक गरज आहे, याची जाण संतांना होती. त्याच्या याच मानसिक गरजेचा गैरफायदा पोटभरू धर्मकारणी घेतात, याचीही जाणीव संतांना होती. मल्लखांबात ताकद नसते; पण देव नावाच्या मल्लखांबावर कसरत करून सर्वसामान्यांना ताकद मिळते म्हणून संतांनी सर्वसामांन्यांचा हा मल्लखांब उखडण्याचा प्रयत्न केला नाही.

बाबा कोणत्या शाळेत गेले नसतील; पण ‘लोकविद्यापीठा’त शिक्षण घेता-घेताच त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळले होते. त्यामुळे एका अर्थाने ते बहुजन समाजाचे शिक्षणतज्ज्ञ बनले होते. कधी विनवणी करत, तर कधी खडे बोल सुनावत बहुजनांना शिक्षणाचे महत्त्व सांगायचे. ‘‘बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या. इव्हायाले पाहुणचार करू नका; पण लेकराले शिकवल्याबिगर राहू नका, कारन विद्या मोठं धन आहे.’’ गरिबांचं सर्वात मोठं धन शिक्षण आहे, हे ते कीर्तनाच्या माध्यमातून कळवळून सांगत. केवळ सांगूनच ते थांबले नाही तर बहुजनांच्या शिक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर विविध प्रकारे धडपड केली. डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी गाडगेबाबांचे निर्माण झालेले संबंध शिक्षणाविषयी बाबांना असलेल्या आस्थेतूनच तयार झाले. खडू आणि झाडूचा हा संबंध मोठा हृदयस्पर्शी आहे.

१९४८ मध्ये गांधी हत्येनंतर निर्माण झालेल्या गैरसमजातून रयत शिक्षण संस्थेची ग्रॅन्ट बंद झाली. ही गोष्ट भाऊराव पाटीलांनी बाबांच्या कानावर टाकली. बाबांनी तत्काळ मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांची भेट घेतली. त्यांनी रयत शिक्षण संस्थेची ग्रॅन्ट बंद झाल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकला व विनवणी केली, ‘‘पोराबाळांच्या पाठीवर मारा; पण पोटावर मारू नका. मुलांच्या तोंडचा घास काढू नका.’’ कारण रयत संस्थेची ग्रॅन्टअभावी वसतिगृहेसुद्धा बंद पडली होती. लगेच बाळासाहेब खेरांनी त्या प्रकरणात लक्ष घातले आणि रयत संस्थेची ग्रॅन्ट पूर्ववत सुरू झाली.

गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण यज्ञाला आर्थिक मदतीचे आवाहन करायचे. त्याला इतका प्रतिसाद मिळायचा की लोक देणग्यांचा पाऊसच पाडायचे. शेवटी पत्र लिहून भाऊरावांनी बाबांना कळविले, ‘‘आपण कीर्तनातून जनतेला आमच्या शिक्षण संस्थेला मदत करण्यासाठी जे आवाहन केले आहे त्यात आपल्या कृपेने प्रतिसाद मिळाला असून हजारो रुपये देणगी रूपाने प्रतिदिन येत आहे. संस्थेला आता १०-१२ वर्षे तरी आर्थिक विवंचना जाणवणार नाही एवढी रक्कम जमा आहे. तरी आता रोजचे चेक्स, मनिऑर्डर रूपात येणाऱ्या पैशाचा ओघ थांबवा, अशी प्रार्थना आहे.’’ (संदर्भ- संत गाडगेबाबांचे सामाजिक कार्यातील योगदान (शोधप्रबंध) डॉ. संदीप राऊत.)

आता हे सगळं अविश्वसनीय वाटते. एक भणंग फकीर माणूस आपल्या कीर्तनातून रयत संस्थेला आर्थिक मदतीचे आवाहन करतो. त्याला प्रतिसाद म्हणून धो-धो मदतीचा ओघ सुरू होतो. एवढा की त्या संस्थेच्या संचालकाला बाबांना प्रार्थना करून आता हे थांबवा म्हणावं लागतं. आवाहनकर्ता आणि ज्याच्यासाठी आवाहन केले ते दोघेही ‘ग्रेट’च म्हटले पाहिजे. पैशाबाबत ‘सिर्फ आने दो, आने दो’च आपण अनुभवत असतो. ‘अब रहने दो’ असं म्हणणारी दुर्मिळ प्रजातीही या पृथ्वीतलावर होऊन गेली, यांचंही आपल्याला नवल वाटतं.

एका कीर्तनात बाबा म्हणाले होते, ‘‘माझी व साताऱ्याच्या दाढीवाल्या भाऊराव पाटलांची लवकर भेट झाली असती, तर घाट, मंदिरे, गोशाळा, धर्मशाळा या करिता हजारो रुपये खर्च केले, ते ज्ञानमंदिरे उभी करण्याकरिता व शिक्षणाच्या पवित्र कार्याकरिता खर्च केले असते. पांडुरंगाचे इथेच अधिष्ठान आहे.’’ शिक्षणाच्या ठिकाणी पांडुरंगाचे अधिष्ठान पहाणे हे गाडगेबाबांचे ‘धर्मकारण’.

बाबांनी इतर केलेल्या कामांसोबतच शिक्षणाच्या क्षेत्रातही बऱ्याच संस्था उभ्या केल्या. बालक मंदिर, विद्यालये, आदिवासींसाठी आश्रमशाळा, वसतिगृहे, धर्मशाळा वसतिगृह, वाचनालये इ.इ. या सर्व धडपडीमागचा ध्यास एकच, सर्वसामांन्यांना शिक्षण घेता आले पाहिजे. नवीन पिढीला ही गोष्ट माहीत नसेल. पूर्वी ज्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न १२०० रुपयांच्या आत असेल, त्याची फी सरकार भरायचे व विद्यार्थ्याला फी माफ असायची. त्यासाठी त्याला फक्त उत्पन्नाचा दाखला जोडून ईबीसीचा फॉर्म भरावा लागायचा. या सवलतीचा फायदा घेत लाखो करोडो सर्वसामान्य घरच्या मुलांना शिक्षणाचा फायदा घेता आला. सरकारने जरी ही फी माफी केलेली असली, तरीही त्या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा गाडगेबाबांनी केला आहे, ही बाब अनेकांना माहीतही नसते.

सर्वसामान्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी समाजातील श्रीमंतांनी त्यांना शिक्षणासाठी मदत केली पाहिजे, असे आवाहन बाबा वारंवार करीत असत. त्याचप्रमाणे सरकारनेदेखील सर्वसामान्यांना परवडेल, अशा स्वरूपात शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे, हाही त्यांचा आग्रह असायचा. ईबीसीची सवलत ही त्याच आग्रहाची फलश्रुती होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
गाडगेबाबांनी आपल्या हयातीत उभ्या केलेल्या संस्थांची संख्या व विस्तार पाहता आपण विस्मयचकित होतो. एका भणंग व अक्षरओळख नसलेल्या माणसाने एवढं अफाट काम कसं केलं असेल, याचं आजही कौतुकमिश्रित आश्चर्य वाटतं.

धर्मशाळा, अंधपंगूंसाठी सदावर्त, पाणेरी, दवाखाना, महाविद्यालये, आश्रमशाळा (आदिवासी मुलामुलींकरिता), आश्रमशाळा (विमोचित जाती व भटक्या मुलामुलींकरिता), वसतिगृहे, कन्या छात्रालये, कन्या प्रशाला, विद्यालये, बालक मंदिर, पाळणाघर, बालकाश्रम, वृद्धाश्रम एवढ्या सर्व प्रकारच्या संस्थांची संख्याही कमी नाही. त्याही केवळ लोकवर्गणीतून उभ्या करणे गंमतीची गोष्ट नाही. त्यासाठी सर्वसामान्य माणसांचा तुमच्यावर अढळ असा विश्वास असावा लागतो. तो मिळवावा लागतो. तो गाडगेबाबांनी मिळवला होता. गाडगेबाबांच्या कामासाठी दिलेला पैसा सत्कारणीच लागणार, याची खात्री असल्याशिवाय लोकांकडून असा प्रतिसाद मिळत नसतो. याबाबतीत कुबेरालाही लाजवेल, अशी श्रीमंती गाडगेबाबा नावाच्या ‘फकिरा’ने प्राप्त केली होती. त्यांनी हाताळलेले विषयही असेच विविध होते. अंधश्रद्धा निर्मूलन, तीर्थक्षेत्री दिले जाणारे पशुबळी, अस्पृश्यता निवारण, दुष्काळ निवारण्याचे कार्य, व्यसनमुक्ती, हुंडा पद्धतीचा विरोध, सर्वसामान्यांच्या मुलांचे शिक्षण असे कितीतरी विषय त्यांनी हाताळले. वाईट चालीरीती नष्ट व्हाव्यात म्हणून आपले आयुष्य झिजविले.

१९५२ मध्ये पंढरपूर येथे कीर्तनकारांची परिषद भरली होती. या परिषदेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्राचार्य सोनोपंत दांडेकर, कैकाडी बुवा, तनपुरे बाबा, धुंडा महाराज, बंकटस्वामी आणि इतरही प्रसिद्ध कीर्तनकार मंडळी हजर होती. या प्रसंगी बोलताना गाडगे महाराज म्हणाले, ‘‘तुम्ही प्रसिद्ध कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायाचे थोर मानकरी इथं पंढरपूरवारीला येता. तेव्हा प्रत्येकामागे हजारो भक्तांचा तांडा असतो. तुमच्या राहुट्या ठोकल्या जातात. त्यात सुग्रास भोजन शिजत असते. भक्तांचा गराडा तुमच्या भोवती असतो. हारतुरे व मिठाई घेऊन लोक तुमच्या पाया पडतात. असा तुमचा मान सन्मान; पण एक सांगा आपण साधू का झालो? रसातळाला गेलेल्यांना वर काढण्यासाठीच ना? जनसेवा करण्यासाठी ना? पण ती आपण करतो का? तुमच्यापैकी कुणाला असं वाटत का, की बाहेर पडावं अन्‌ यात्रेकरूंपैकी दलित-पीडितांची अवस्था पाहावी? ते उघड्यावर कसे पडले आहेत. जेवण काय बनवितात. पाण्याची काय सोय आहे. ही विचारपूस करण्याचा विचार तुमच्या मनात कधी येतो का? तुमच्या यात्रेच्या वाटेवर महारवाडे लागतात. तिथे थांबून झाडलोट करावी. घाण साफ करावी, नागड्या पोरांना कडेवर उचलून घ्यावे, असे कधी सुचते का? तुमचा विठोबा आमच्यासाठी काहीच करीत नाही. तुमचा विठोबा दगड आहे. दगडाला कसली लाज नि शरम? पण तुम्ही साधू मंडळी तर माणसं ना? तुम्हाला लाज वाटत नाही?’’ पंढरपूरच्या कीर्तन परिषदेतील गाडगेबाबांच्या भाषणाच्या या उताऱ्यानंतर त्यांच्या ‘धर्मकारणावर’ वेगळे भाष्य करण्याची गरजच नाही.

मी डेबू जानोरकरला पाहिलं नाही आणि पाहिलं असतं, तरी त्याला ओळखण्याची सूतराम शक्यता नव्हती; पण मी लहानपणी गाडगेमहाराजांना पाहिलं. तो प्रसंग मनात खोलवर रुजला. कालांतराने अंकुरला. फोफावला आणि त्या प्रसंगाचे झाड आजही मनाच्या अंगणात डोलत राहते.

वडील सरकारी नोकरीत. त्यामुळे वर्षा- दोन वर्षांनी येथून तेथे अशी भटकंती. त्या भटकंतीचा मुक्काम त्या वेळेस अकोल्यात होता. घर भाड्याचेच; पण घराच्या भोवती परिसर बऱ्यापैकी होता. घरी दुधा-दह्याची रेलचेल असावी म्हणून गाय होती. दुपारची वेळ असावी. वडील ऑफिसमध्ये गेले. आणि आईने सर्व आटोपून नुकतीच पाठ टेकलेली. तितक्यात आवाज आला- ‘‘देत कावं माय गाईचं उलीसं (थोडंसं) दूध? देतं कावं माय?’’
पहुडण्याची वेळ. डोळ्यावर येऊ घातलेली झापड. त्यातही अंगणात भिकाऱ्यासारखा दिसणारा माणूस शिळापाखा भाकर तुकडा सांगण्याऐवजी चक्क गाईचं दूध मागतो?
आई संतापाने लाल झाली. तिच्या तोंडाचा दांडपट्टा सुरू झाला. रागाने फणफणतच आई भिकाऱ्याला हुसकावून लावण्यासाठी उठली. भिकाऱ्याला पाहताच थिजल्यासारखी झाली. तिचा तोंडपट्टा बंद झाला. तिचे रागाने फणफणणे थंड झाले. गुन्हेगारासारखी ती ‘भिकाऱ्या’समोर फक्त उभी होती. काय करावे, करू नये... तिचा निर्णय होत नव्हता.

पण दारात उभा असलेला भिकारी गालातल्या गालात हसत होता. आईच्या अवस्थेची मजा घेत होता. दारात भिकारी म्हणून क्षणापूर्वी ज्या माणसाला आईने शिव्या दिल्या होत्या, तो भिकारी दुसरा-तिसरा कोणी नसून साक्षात वैराग्यमूर्ती संत गाडगेमहाराज होते.
धरणी फाकावी आणि तिने पोटात घ्यावे, अशी त्या क्षणी आईची अवस्था झाली होती. आयुष्यभर ज्याची पूजा करावी तोच देव प्रत्यक्ष दारातच प्रकट झाल्यानंतर मात्र हुसकावून लावावे, असाच काहीसा प्रकार अजाणतेपणी का होईना आईकडून घडला होता.
‘‘काय माय काय झालं? गाडगेबाबा होय म्हणून बोलती बंद झाली काय? मले उलीसं दवापाण्यासाठी गाईचं दूध पायजे. देत कां?’’ म्हातारा आईची मजा घेत म्हणाला.
शापानंतर उ:शाप मिळाल्याच्या आनंदात आई सावरली. घरात आली. गाईच्या दुधाने भरलेली चरवी घेऊन बाबासमोर उभी झाली.
‘‘कावून वं, गाडगेबाबा व्हय म्हून चरवीभर दूध काय? मले घोटभरच दूध पायजे.’’ असं म्हणत गाडगेबाबांनी अर्धा कपच दूध घेतले आणि म्हातारा तरातरा निघून गेला.
आई पाहातच राहिली. कितीतरी वेळ म्हाताऱ्याची पाठमोरी आकृती न्याहाळत होती. तिच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. ‘‘बुहारी मी, बुहारी मी’’ करत कपाळावर हात मारून घेत होती. ‘‘देव दारावर आला त्याला भिकारी म्हणून शिव्या दिल्या. त्याला या बसाही म्हटले नाही. बुहारीला काही सुचलंच नाही,’’ असे म्हणत हळहळत राहिली.

त्या वेळेस मी आईच्या पायाला चिकटून कावराबावरा होऊन काय झाले म्हणून बघत होतो.
अकोल्यात त्या वेळेस ज्या मोहल्ल्यात आम्ही रहात होतो, त्या वस्तीची साफसफाई केल्यानंतर, विश्रांतीच्या काळात आमच्या घरासमोर गाय दिसली म्हणून औषध घेण्यासाठी आवश्यक असलेले गाईचे दूध येथे मिळू शकेल, या अंदाजाने आमच्या दारावर आले. देणाऱ्याने चरवीभर देऊ केले; पण घेणाऱ्याने गरजेप्रमाणे घोटभर घेतले. तेही फुकटचे घेतले नाही. आधी संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि गरजेपुरतेच दूध घेतले. अतिरिक्त अजिबात नाही. देणाऱ्याने देऊ केले, तरीही नाही. तत्त्वज्ञान ही खरेतर केवळ सांगण्याची बाबच नसावी. प्रत्यक्ष आचरणातून ते प्रकट व्हावे लागते; अन्यथा ती केवळ पोपटपंची ठरते.

गाडगे महाराजांनी केवळ ही पोपटपंची केली नाही. आधी तत्त्वज्ञान जगले, मग सांगितले. म्हणून त्यांचा शब्द उभा राहिला. गाडगेबाबांनी सांगितलेला व अंमलात आणण्यासाठी आयुष्यभर प्रयत्नांची पराकाष्ठा केलेला दशसूत्री कार्यक्रम आजही सर्वसामान्यांच्या नजरेत ‘धर्माचे’ काम मानले जाते व तसे म्हटल्याही जाते. तेच धर्माचे काम गाडगेबाबांनी आयुष्यभर केले. तेच त्यांचे ‘धर्मकारण.’
(संदर्भ : १. ‘गाडगेबाबा’ : लेखक : प्रबोधनकार ठाकरे. २. ‘प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा’ : लेखक : संतोष अरसोड. ३) ‘संत गाडगेबाबांचे सामाजिक कार्यातील योगदान’ (शोधप्रबंध) : डॉ. संदीप राऊत.)