Hinduism- गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारकऱ्यांची विनम्र बंडखोरी}

गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

धर्माच्या चौकटीत राहूनच वारकऱ्यांनी हिंदू धर्मातील विषमतेविरुद्ध बंडखोरी केली. पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटात समतेचा खेळ मांडला. त्यात सर्व जाती, धर्मांतील स्त्री-पुरुष सहभागी झाले. त्यातून शूद्र ठरविल्या गेलेल्या वर्गाला आत्मसन्मान आणि प्रेम मिळाले. सवतासुभा मांडून संघर्ष केल्यास निष्प्रभ व्हावे लागते, हा लिंगायत आणि महानुभवांचा अनुभव त्यांच्या समोरच होता. त्यामुळे वारकरी संतांनी धर्मात राहूनच अत्यंत विनम्रपणे बंडखोरी केली.

तुम्ही हिंदू (Hindu) आहात; पण तुम्हाला मंदिरात जाण्याचा अधिकार नाही... तुम्ही हिंदू आहात, पण तुम्हाला शिक्षण (Education) घेण्याचा किंवा देण्याचा अधिकार नाही... तुम्ही हिंदू आहात, पण इतरांसोबत पंगतीला बसू शकत नाही... तुम्ही हिंदू आहात, पण तुम्हाला ठरवून दिलेल्या कामांपेक्षा वेगळं काम करता येणार नाही... तुम्ही हिंदू आहात; पण तुम्हाला शुद्ध-अशुद्ध, पवित्र-अपवित्र, सोवळं-ओवळं हे सर्व पाळावं लागेल... या आणि अशा अनेक गोष्टी, निर्बंध, नियम, उपनियम हिंदू धर्मात कडकपणे पाळले जात होते. (Contribution of Saints in Maharashtra to remove oddity in the society and bringing harmony)

अर्थात हे सगळे हिंदू धर्मातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णांपैकी केवळ शूद्रांच्याच वाट्याला आले. त्यांना वेदांचा, धर्मग्रंथ वाचण्या-ऐकण्याचा अधिकार नाकारला गेला. विशेष म्हणजे तत्कालीन ख्रिश्चन धर्मातील कुठलीही व्यक्ती बायबल वाचू शकत असे. कुठल्याही मुसलमानाला कुराण वाचण्यास बंदी नव्हती; पण ती बंदी हिंदू धर्मात होती. अस्पृश्य मानल्या गेलेल्या अतिशूद्रांची कहाणी, तर भयंकर अमानवी होती. धर्माने ठरवून दिलेले नियम मोडले, तर त्यांना कठोर शिक्षांना सामोरे जावे लागत होते.

जातींचा मनोरा केला आडवा
जगातील सर्वात प्राचीन धर्म असलेल्या हिंदू धर्मात अशा प्रकारे चातुर्वर्ण्य व्यवस्था भक्कम झाली होती. ती भक्कम करण्यासाठी मदत केली ती त्यांना वाटून दिलेल्या कामांनी. ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णांतील लोकांना षट्कर्मे सांगण्यात आली. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह अशी ती कर्मे होत. यजन म्हणजे यज्ञ करणे, याजन याचा अर्थ यज्ञकर्मात पौरोहित्य करणे, अध्ययन म्हणजे वेदपठणाचे शिक्षण घेणे, अध्यापन म्हणजे वेद शिकवणे, दान याचा अर्थ दान देणे आणि प्रतिग्रह म्हणजे दिलेले दान स्वीकारणे. यातील अध्ययनाचा अधिकार त्रैवर्णिकांना म्हणजे ब्राह्मण, क्षत्रीय आणि वैश्य यांना होता. चौथ्या शूद्र वर्णाला वेदाध्ययन करता येत नसे.

शूद्राला यज्ञ करण्याचा अधिकार होता; पण त्यात मंत्र म्हटले जात नसत. थोडक्यात शास्त्राने सांगितलेल्या षट्कर्मांपैकी केवळ मंत्र न म्हणता केला जाणारा यज्ञ आणि दान देणे एवढी दोनच कर्मे शूद्र करू शकत असत. क्षत्रीय आणि वैश्य हे अध्ययन, यजन आणि दान ही तीन कर्मे करू शकत, तर ब्राह्मण सर्वच्या सर्व म्हणजे सहाही कर्मांचे अधिकारी होते. विशेष म्हणजे ही कर्मे करण्याचा अधिकार केवळ पुरुषांना होता. स्त्रियांना त्यापासून दूर ठेवले गेले होते. त्यामुळे त्यांनाही शूद्रांचाच दर्जा होता. म्हणूनच ‘स्त्रीशूद्र’ असा उल्लेख सतत होत असे.

अशा प्रकारे धर्माच्या माध्यमातून भारतीय समाज (Indian Society) ही जातींची उतरंड झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तिला अनेक मजल्यांच्या मनोऱ्याची उपमा दिली. यात एका मजल्यातून दुसऱ्या मजल्यात जाण्यासाठी दारच नाही, असे बाबासाहेब म्हणत. खालच्या मजल्यावरील मनुष्यापेक्षा (Human) वरच्या मजल्यावरील मनुष्य दर्जा आणि अधिकाराने श्रेष्ठ असे. बाबासाहेब सांगतात, तो उभा मनोरा संतांनी त्यांच्या काळात आडवा केला. सर्व मजल्यावरील माणसे एका पातळीवर आणून ठेवली; मात्र एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठीची दारे संतांना तयार करता आली नाहीत. कारण ती त्यांच्या काळाची मर्यादा होती आणि ही दारे समाजाच्या भौतिक, आर्थिक, उत्पादन संबंधाशी निगडित होती. त्यामुळे ती उघडण्यासाठी ब्रिटिशांचे राज्य यावे लागले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जन्म घ्यावा लागला.

अर्थात संतांनी विषमतेचा उभा मनोरा आडवा करून सर्वांना समान पातळीवर आणून ठेवले, हीच हिंदू धर्मात झालेली ऐतिहासिक क्रांती होती. संतांच्या खांद्यावर उभे राहूनच आम्हाला भविष्यातले दूरवरचे पाहता आले, अशी भूमिका बाबासाहेबांनी (Dr. Babasaheb Ambedkar) मांडली होती. त्यामुळेच तर अस्पृश्यतेची उत्पत्ती सांगणारा ‘द अनटचेबल्स’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी संत नंदणार, संत रविदास आणि संत चोखामेळा यांना अर्पण केला. अर्थात येथील जातिव्यवस्थेला ‘भीमटोला’ बसण्यासाठी विसावे शतक उजाडावे लागले. त्यापूर्वी हिंदू धर्मात राहूनच धार्मिक स्वातंत्र्यासाठी चळवळ करत, संतांनी स्त्रीशूद्रांना समतेची वाट दाखविली होती. हा काळ होता १३ व्या शतकाचा.

कर्मकांडांचा अस्वस्थ कालावधी
संत ज्ञानदेव आणि संत नामदेवांनी या समतेच्या वारकरी चळवळीचा पाया घातला. या दोघांच्याही पूर्वी पंढरपूरचा विठोबा आणि त्याच्या पायी वारीची परंपरा महाराष्ट्रात होतीच; परंतु देवगिरीच्या यादव राजवटीने या काळात धार्मिक बाबींमध्ये अधिक हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली होती. यादव राजे सनातन वैदिक धर्मात सांगितलेली वर्णव्यवस्था, स्मृतींनी सांगितलेले नियम आणि परंपरा पाळणारे होते. त्यांच्याच काळात देवगिरीचा हेमाद्री पंडित, कोकणातील अपरार्क आणि कल्याणीचा विज्ञानेश्वर हे धर्मशास्त्राचे भाष्यकार होऊन गेले.

हेमाद्रीचा चतुर्वर्ग चिंतामणी, भट्ट-लक्ष्मीधराचा कृत्य कल्पतरू या ग्रंथांमध्ये वर्षभरात करावयाची हजारो व्रतवैकल्ये, विधी, प्रायश्चित्ते सांगितली गेली. याच काळात वर्णाश्रम व्यवस्थेत कडक शिस्त आणण्यासाठी याज्ञवल्क्य स्मृति हा हिंदूंचा आचार ग्रंथ ठरला. एकंदरीतच यज्ञ, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, दानधर्म, नवससायास, शूद्र देवतांची पूजा आदींचे प्रस्थ वाढले होते. सर्वसामान्यांना वैदिकांच्या या जोखडातून मुक्त करण्यासाठी तत्कालीन नाथ, वीरशैव, लिंगायत, महानुभव या पंथांनी प्रयत्न केले. तथापी सिद्धांचे चमत्कार, तांत्रिक नाथजोगींबद्दलचे भय यामुळे सर्वसामान्य जनता नाथ पंथापासून अंतर ठेवून राहिली.

वीरशैव मठाधिपतींनी राजा-महाजनांच्या पाठिंब्याने अनेक मंदिरे आणि मठ स्थापन केले. शैव ब्राह्मणांच्या शिवपुरी स्थापन केल्या. तथापि त्यांच्यातील कापालिकांसारखे तंत्रमार्गात बुडाले. त्यामुळे महात्मा बसवेश्वरांनी शरणांचे आंदोलन उभारून वर्णाश्रम परंपरेला धक्का देण्याचा प्रयत्न केला. मात्र वैदिकांनी राजा बिज्जलाचे कान भरून राजसत्तेच्या सहाय्याने हे शरण आंदोलन चिरडून टाकले.

महानुभव पंथाने वेद, यज्ञ-याग, व्रतवैकल्ये, देवता, ब्राह्मण या सगळ्यांना नकार देत नवी उपासना पद्धती, नवे द्वैती तत्त्वज्ञान मांडले; परंतु या पंथात ब्राह्मणेतरांचा प्रवेश मोठ्या संख्येने होऊ शकला नाही. त्यांच्या मठातील धर्मचर्चा सामान्य जनतेला आकर्षित करू शकली नाही. महानुभवांचा काळा वेष आणि साहित्याची गुप्त लिपी यामुळे त्यांच्याविषयी लोकांना संशय वाटू लागला. मठातील स्त्रियांचा वावरही लोकापवादास कारणीभूत ठरला. महानुभव पंथीयांवर यादव राजसत्तेचा रोष ओढवला. हेमाद्रीसारख्या वैदिकाने पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींना न्यायसभेपुढे उभे करून शिक्षा सुनावली. साहजिकच महानुभवांचा प्रभाव ओसरला.

याच काळात बौद्ध आणि जैन धर्माचाही मोठा प्रभाव जनसामान्यांवर होता; परंतु बौद्धांचा पूर्ण पाडाव करण्यात आणि जैनांचा प्रभाव पुसण्यात वैदिक ब्राह्मण यशस्वी ठरले. जैन आणि बौद्धांचा कुमारिल भट्ट आणि मंडन मिश्रांनी वादविवादात पराभव केला. पुढे जैन आणि बौद्धांच्या बस्ती आणि विहाराला तोंड देण्यासाठी शंकराचार्यांनी मठस्थापना केली.

हा सर्व इतिहास संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्या समोर होता. त्यामुळे त्यांनी त्यातून बोध घेऊन आपल्या वारकरी चळवळीची अत्यंत विचारपूर्वक उभारणी केली. संत ज्ञानदेव आणि संत नामदेव हे दोघेही मूळचे मराठवाड्यातील. संत ज्ञानदेव इंद्रायणी काठी आळंदीत, तर संत नामदेव श्री विठ्ठलाच्या पंढरपुरात स्थिरावले. या दोघांचेही पूर्वज पंढरपूरची पायी वारी करत होते. पंढरपुरात येणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, बहुजन समाजातील स्त्रीशूद्रांना धार्मिक अधिकार मिळवून देण्याचा, आत्मसन्मान मिळवून देण्याचा, समतेचा विचार समाजात रुजविण्याचा निश्चय संत नामदेवांनी केला. त्यासाठी त्यांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ तसेच शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा केली.

संत नामदेवांनी वारकऱ्यांचे व्यापक संघटन केले. अभंग हा काव्यप्रकार रूढ केला. हे प्रबोधनपर अभंग समाजापर्यंत पोहचविण्यासाठी ‘कीर्तन’ प्रकाराचा आधार घेतला. शिवाय हे कीर्तन त्यांनी बंदिस्त मंदिरातून पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या खुल्या वाळवंटात नेले. त्यामुळे त्यात सर्व जातीधर्मातील लोकांना सहभागी होता येऊ लागले. त्यातून समतेच्या विचारधारेचा मेळाच वाळवंटात नियमितपणे भरू लागला. संत नामदेवांचीच परंपरा पुढे नेणाऱ्या संत तुकाराम महाराजांनी त्याचे वर्णन पुढील अभंगात केले आहे -
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई।
नाचती वैष्णव भाई रे।
क्रोध अभिमान गेला पावटणी।
एक एका लागतील पायीं रे॥
वर्णअभिमान विसरली याती।
एकएकां लोटांगणीं जाती।
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें।
पाषाणा पाझर सुटती रे॥

याचाच अर्थ सर्व वर्णजातींचे लोक यात सहभागी झाले. याच वाळवंटात संत नामदेवांच्या कीर्तनामध्ये उत्तरेतील संत कबीर उपस्थित असल्याचा उल्लेख संत जनाबाईंच्या अभंगात आहे. आपल्या घरी दासी असलेल्या जनाबाईंना फडप्रमुख करून नामदेवांनी संतचळवळीची धुराच त्यांच्या खांद्यावर दिली होती. चोखामेळ्यासारखा यातीहिन संत ते संत कान्होपात्रेसारख्या वेश्या कुटुंबातील महिलाही या वाळवंटातील समतेच्या मेळ्यात सहभागी झाल्या.

पुढे समतेच्या प्रसारासाठी संत नामदेव जेव्हा उत्तरेत गेले, तेव्हा तेथेही त्यांनी विविध अधिकारहिन जातींतून संत घडविले. धार्मिक कर्मकांडातून बाहेर काढून संत नामदेवांनी सर्वसामान्य जनतेला नामभक्ती सांगितली. म्हणजे आपल्या कामात व्यग्र राहून केवळ देवाचे नामस्मरण केले, तरी देव प्रसन्न होतो, हे त्यांनी जनमानसावर बिंबवले. त्यामुळे कष्टकरी, शूद्रातिशूद्र, महिला असे सर्वजण वारकऱ्यांच्या पताकेखाली जमू लागले.

हेही वाचा: का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

धर्माच्या चौकटीतच समतेची चळवळ
नामदेव-ज्ञानदेवांच्या रणनीतीचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी तत्कालीन धर्म, पंथांप्रमाणे धर्म, वेदांची चौकट नाकारली नाही. त्यांनी या चौकटीत राहूनच विनम्रपणे स्त्रीशूद्रांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी लढा देणे सुरू केले. त्या काळात ग्रंथप्रामाण्यावर अधिक भर होता. त्यातूनच कर्मकांडे आणि अंधश्रद्धा अधिक प्रभावी झाल्या होत्या. वर्णांवर आधारित समाजव्यवस्था दृढ होऊ लागली होती. सर्वसामान्यांना त्यांचे अधिकार नाकारले गेले होते. त्यामुळे आपल्या चळवळीलाही ग्रंथप्रामाण्य असावे या विचारांतून संत ज्ञानेश्वरांनी स्त्रीशूद्रांना उपदेश करणारी ज्ञानेश्वरी लिहायला घेतली. त्यासाठी त्यांच्या डोळ्यासमोर आली, ती महर्षी व्यासांनी लिहिलेली श्री भगवद्गीता! व्यासांनी भगवद्गीता ही मुख्यत: धर्म आणि अध्यात्म यांच्यापासून वंचित ठेवलेल्या स्त्रिया आणि शूद्र यांच्यासाठी लिहिली होती.

वेदाने ‘कृपण’ होऊन तीन वर्णांना जवळ केले आणि चौथ्या शूद्र वर्णाला दूर लोटले, हा सरळसरळ पक्षपात असल्याचे सांगून ज्ञानेश्वर ती वेदांची उणीव मानली. ही उणीव लक्षात आल्याने वेदाने भिऊन गीतेच्या पोटात जणू आश्रय घेतला, असेही ते सांगतात. यातून एकीकडे वेदांचा पक्षपात आणि संकुचितपणा अधोरेखित करत गीतेची व्यापक आणि समान दृष्टीही त्यांनी सूचित केली. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे वेदाने गीतेत आश्रय घेतल्याने तो गीतेतून अभिव्यक्त झाला, हा अर्थही त्यांनी सूचित केला; पण त्याचबरोबर आता वेदांची काही गरज उरली नसल्याचेही ध्वनित झाले. काढुनिया गुह्य। वेद केले फोल।। असे संत नामदेवांनी त्या संदर्भात म्हटले.

गीतेमधील नवव्या अध्यायातील एका श्लोकानुसार स्वत: ईश्वराने अशी ग्वाही दिली आहे, की माझ्या आश्रयाला आलेल्या सर्वांचा मी उद्धार करतो. मग ते स्त्रिया, वैश्य किंवा शूद्र असले तरी. गीतेच्या माध्यमातून व्यासांनी जणू स्त्रीशूद्रांना अधिकार देणारी घटनाच लिहिली; पण गीतेचा अर्थ लावणाऱ्या भाष्यकारांनी गीतेला पारंपरिक वैदिक चौकटीत बसविले होते. गीतेचा अर्थसंकोच केला होता. स्त्री, शूद्र, वैश्य यांना ‘पापयोनी’ म्हणजे पूर्वजन्मात पाप केलेले, असे संबोधले. कारण त्यांना या सर्वांना धार्मिक अधिकार द्यायचे नव्हते. मग ज्ञानदेवांनी एक वेगळीच शक्कल लढविली. ती म्हणजे, दैत्यकुळात जन्म घेतलेल्या भक्त प्रल्हादासारख्यांना पापयोनी म्हणण्यास हरकत नाही, असा अर्थनिर्णय केला.

हेही वाचा: हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

दैत्य हे माणसांच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेत नसल्यामुळे त्यांचे हितसंबंधही दुखावले नाहीत. अशा रीतीने ज्ञानदेवांनी आपल्या विशाल दृष्टिकोनाने, बुद्धिमत्तेने स्त्रीशूद्रांनाही न्याय मिळवून दिला. त्यामुळेच तर ते सर्वसामान्यांचे, उपेक्षितांचे ‘माउली’ बनले.

माउलींनी सर्वसामान्यांना समजणाऱ्या त्यांच्या मातृभाषेत अर्थात मराठीत गीतेचा अर्थ विशद करून सांगितला. ज्ञानदेवांनी केलेली ही फार मोठी भाषिक क्रांती होती. संस्कृत ही देवांची पवित्र भाषा असल्याने ती धर्मज्ञान आणि अध्यात्माची विशेष भाषा असल्याचा प्रचलित समज होता. तो संत ज्ञानेश्वरांनी मोडून काढला. ज्ञानदेवांच्या या कृतीमुळे मराठी ही साहित्याची आणि तत्त्वज्ञानाची भाषा बनली.

परंपरेनुसार गीता हा मुख्य ग्रंथ मानला गेला नाही, कारण ती वेदांप्रमाणे ईश्वराची कृती नाही. ती व्यास नावाच्या मानवी व्यक्तीची निर्मिती आहे. म्हणून तर तिची गणना श्रुतिग्रंथांत न करता तिला स्मृती मानले गेले. ज्ञानेश्वर माउलींनी ही अडचणही शिताफीने दूर केली. भगवद्गीता जरी व्यासांनी लिहिली असली, तरी गीता म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवानाने स्वत:च्या मुखातून अर्जुनाला केलेला उपदेश आहे. श्रीकृष्ण हा परमात्म्याचा पूर्णावतार मानला जातो. त्यामुळे गीता व्यासांनी लिहिली यापेक्षाही ती ‘ईश्वराने सांगितली’, या मुद्द्यावर ज्ञानेश्वर माउली यांनी भर दिला.

मग ईश्वराने सांगितलेल्या गीतेची ईश्वरानेच सांगितलेल्या वेदांशी त्यांनी तुलना केली. खुद्द वेदांमध्येच असा उल्लेख आहे, की वेद हा परमात्म्याचा निःश्वास आहे. या वेदोक्तीचा उपयोग करून ज्ञानेश्वर निदर्शनास आणतात, की वेद हा ज्या परमेश्वराचा झोपेतला निःश्वास आहे, त्याच परमेश्वराने गीता ही जागृतावस्थेत प्रत्यक्ष उपदेशिली आहे. त्यामुळे प्रामाण्याच्या दृष्टीने पाहिले, तर गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे! ज्ञानेश्वर माउलींच्या या बिनतोड युक्तिवादाच्या पुढे वैदिकांचे काही चालले नाही.

गीतेच्या आधारे माउलींनी घेतलेल्या या भूमिकेमुळे त्यांना सर्व भूतमात्रांमध्ये समता आहे, असे म्हणता आले. जे स्थान एखाद्या ब्राह्मणाचे तेच स्थान संत चोखामेळासारख्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या व्यक्तीचे झाले. यातून धर्माच्या क्षेत्रात समता स्थापन झाली. अठरा पगड जातीतील लोकांना धार्मिक आणि सामाजिक जीवन समतेने जगणे शक्य झाले. चोखोबांना स्फुरलेले अभंग अनंतभट अभ्यंग नावाचा ब्राह्मण, आपल्या जातीचा अभिमान सोडून लिहून घेऊ लागला, असे चित्र समाजात दिसू लागले. यामुळेच कर्मठ ब्राह्मणांच्या कुटुंबात गीतेला दूर ठेवले जात असे.
एखाद्या धर्म, पंथाला स्वतंत्र प्रतिष्ठा तेव्हाच मिळते, जेव्हा त्याला स्वतंत्र दैवत, त्याची उपासना पद्धती आणि प्रमाणग्रंथ असतो.

वारकरी पंथाला संत ज्ञानेश्वरांच्या पूर्वीपासून पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाच्या रूपाने स्वत:चे दैवत, त्याच्या व नियमित वारीच्या निमित्ताने उपासनापद्धत होतीच. नव्हता तो प्रमाणग्रंथ. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून तीही उणीव दूर केली. दैवत, उपासना आणि प्रमाणग्रंथ ही धर्माची त्रिपुटी एकत्र आल्याने वारकरी पंथ हा अधिकृतपणे धर्मपंथ झाला.

संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचा मराठी अर्थ सांगितल्यानंतरही निम्मे काम बाकी राहिले होते. ते संत एकनाथ महाराजांनी पूर्ण केले. त्यांनी भागवताच्या अकराव्या स्कंधावर मराठी टीका रचली. गीता आणि भागवत यांच्यातील संबंध स्पष्ट करत, भागवत हा गीताईचा पुत्र असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीकृष्णाने आपल्या आयुष्यात जसा अर्जुनाला उपदेश केला, तसाच स्वतःचा चुलतभाऊ असलेल्या यादवकुलातील उद्धवालाही उपदेश केला. हाच उपदेश भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंधात आहे. यात भागवतात वर्णजातिनिरपेक्ष आणि श्रेष्ठ-कनिष्ठ भावाचे अवडंबर न माजवता भक्ती कशी श्रेष्ठ आहे, त्याचे विवेचन येते. हा गीतेच्याच तत्त्वज्ञानाचा विस्तार आहे. या कार्यातून संत एकनाथांनी समतेचे विचार व्यापक केले. वारकऱ्यांना गीतेप्रमाणे भागवतही प्रमाण आणि प्रिय आहे.

रोटीबंदीला उत्तर गोपाळकाला
धर्मातील ‘रोटीबंदी’ अर्थात वरच्या जातीच्या लोकांनी खालच्या जातीच्या लोकांकडून अन्न ग्रहण करायचे नाही, तसेच त्यांच्या पंक्तीत जेवायचे नाही, अशी बंदी उच्चवर्णीय पाळत. नजरचुकीने जरी खालच्या जातीचे अन्न भक्षण केले, तर प्रायश्चित्त घ्यावे लागे. गोपाळकाल्याच्या माध्यमातून संतांनी ही प्रथा धुडकावून लावली. या गोपाळकाल्याचा संदर्भ संतांनी असा लावला, की श्रीकृष्णाचे बालपण गोकुळात नंदाच्या घरी व्यतीत झाले. नंदाची गाईगुरे तो रानात चरायला घेऊन जात असे. त्याच्यासोबत गोकुळातील अन्य गवळ्यांची मुलेही आपापल्या घरातील गाईगुरे घेऊन तेथे येत. या गोपाळ सवंगड्यांबरोबर कृष्ण विविध खेळ खेळत असे. त्यानंतर ही मुले आपापल्या शिदोऱ्या सोडून जेवायला बसत. कृष्णाच्या सांगण्यावरून सगळ्यांच्या शिदोरीमधील वेगवेगळे पदार्थ एकत्र केले जात. हा काला श्रीकृष्णासह सर्व गोपाळ एकत्रितपणे सेवन करत. याला ते गोपाळकाला संबोधत.

वारकऱ्यांचे दैवत श्री विठ्ठल श्रीकृष्णाचेच रूप मानले जाते. त्यामुळे तेराव्या शतकात संत नामदेवांच्या नेतृत्वाखाली वारकऱ्यांनी कृष्णरूप विठ्ठलाच्या साक्षीने पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात गोपाळकाल्याच्या म्हणजेच सहभोजनाच्या प्रथेचे पुनरुज्जीवन केले. विठ्ठल हा कृष्ण आणि वारकरी हे गोपाळ, असे समजून वारकरी वाळवंटात गोपाळकाला साजरा करू लागले. ‘काला वाटू एकमेकां’ म्हणत एकमेकांना घास भरवू लागले. कृष्णाच्या गोपाळगड्यांमध्ये गोकुळातील वेगवेगळ्या जातींची मुले असत; म्हणून वारकरीही धर्माने लादलेली ‘रोटीबंदी’ झुगारत सर्व जातीधर्माच्या वारकऱ्यांसह काल्याचा उत्सव साजरा करू लागले. अजूनही पंढरीच्या वारीतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे हा गोपाळकाल्याचा उत्सव असतो. तो पंढरपुरातील गोपाळपुरा येथील श्रीकृष्ण मंदिरात होतो. गोपाळकाला झाल्याशिवाय वारकऱ्यांची वारी पूर्ण होत नाही.

चंद्रभागा नदीत विष्णुपद नावाचे एक ठिकाण आहे. श्रीकृष्ण गोकुळातून आपले सवंगडी, गाईगुरांसह पंढरपुरात आला आणि त्यांनी जेथे गोपाळकाला केला ते ठिकाण म्हणजे विष्णुपद. नदीपात्रातील एका मोठ्या खडकावर देवाचे समचरण आणि देहुडाचरण पावले उमटलेली आहेत. त्यासोबत काठी ठेवल्याची आणि काल्याच्या वागड्याची खूण दिसते. या शिळेवर दगडी मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपाच्या खांबावर चतुर्भुज समचरण विष्णुमूर्ती आणि देहुडाचरण मुरलीधराची मूर्ती कोरण्यात आली आहे. मार्गशीर्ष महिन्यात विठुराया या ठिकाणी राहायला येतो, असे मानतात. आणखी एक उल्लेखनीय गोष्ट संतांनी केली. श्रीकृष्ण हे उत्तर भारतातून आलेले दैवत. तिथे राधाकृष्णाच्या प्रेमाची ‘मधुराभक्ती’ प्रचलित होती. वारकरी संतांनी ही मधुराभक्ती टाळून ‘वात्सल्यभक्ती’ स्वीकारली. त्यामुळे श्रीविठ्ठल वारकऱ्यांची ‘विठाई माऊली’ झाली. ही विठुमाऊली सर्व जातीतील संतांना लेकराप्रमाणे कडेखांद्यावर वागवत आहे, असे चित्र ‘विठू माझा लेकुरवाळा’ या अभंगातून संत जनाबाईंनी सांगितले.

स्वत:च्या कृतीतून संतांनी धर्मातील तथाकथित ‘रोटीबंदी’ला सणसणीत चपराक दिली. अस्पृश्य असल्याने ज्यांना मंदिरात प्रवेश नव्हता, ज्यांना मेलेली गुरे ओढून टाकण्यासारखी हलकी कामे करावी लागत, त्या संत चोखामेळा यांची एक कथा प्रसिद्ध आहे. एकदा स्वर्गातील अमृतच नासले. कोणाला ते प्राशन करता येईना. देव चिंतातूर झाले. तेव्हा इंद्राने महर्षी नारदमुनींना सल्ला विचारला. नारद म्हणाले, पृथ्वीवरील मंगळवेढा गावातील महार जातीचे संत चोखोबाच हे अमृत शुद्ध करू शकतात. त्याप्रमाणे इंद्र चोखोबांकडे गेला. चोखोबांनी आपली करंगळी अमृतात बुडवली आणि अमृत शुद्ध झाले. या कथेपेक्षाही एक वास्तव, ऐतिहासिक कृती संत नामदेवांनी केली.

ज्यांना विठ्ठल मंदिरात प्रवेश दिला गेला नाही, ते संत चोखा मेळा मंगळवेढ्याच्या गावकुसावर बांधकाम मजुरी करत असताना गावकुसाची भिंत पडून मृत्यू पावले. ही बातमी संत नामदेवांना समजल्यानंतर त्यांनी मंगळवेढ्याला जाऊन चोखोबांचे अवशेष गोळा करून पंढरपुरात आणले आणि त्यांचे अंत्यसंस्कार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात केले. अजूनही तेथील संत चोखा मेळा यांच्या समाधीला वंदन केल्यानंतरच वारकरी मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात.

नंतरच्या काळातील अशीच एक कथा संत एकनाथ महाराजांची आहे. स्वत: उच्च जातीय म्हणजे ब्राह्मण असूनही संत ज्ञानदेव आणि संत नामदेवांनी सांगितलेल्या समतेच्या विचाराला संत एकनाथांनी आपल्या साहित्यातून उजाळा दिला. एवढेच नव्हे, तर हा समतेचा विचार त्यांनी प्रत्यक्ष आचरणातही आणला. नदीच्या वाळवंटात हरवलेल्या आणि तापलेल्या वाळूचे चटके खाणाऱ्या अस्पृश्याच्या एका लहान मुलाला एकनाथ आपल्या घरी घेऊन आले. त्याला अंघोळ घालून, खाऊपिऊ घातले आणि नंतर त्याच्या घराचा पत्ता शोधत त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. एकनाथ वारंवार अशा प्रकारच्या गोष्टी करत.

त्यामुळे पैठणच्या ब्राह्मणांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. एकनाथांच्या घरी श्राद्ध होते. धर्मशास्त्रानुसार पितर म्हणून ब्राह्मणांना जेवायला घालणे क्रमप्राप्त होते. या श्राद्ध भोजनाला जायचे नाही, असे पैठणमधील ब्राह्मणांनी ठरविले. त्यामुळे एकनाथांच्या पितरांना स्वर्गात सद्गती मिळाली नसती. एकनाथांनी शरण येऊन धर्मविरोधी कृत्ये थांबवली असती, असा त्यांचा अंदाज होता; पण संत एकनाथांनी केले उलटेच. श्राद्ध भोजनाला त्यांनी चक्क गावकुसाबाहेरच्या अस्पृश्य बांधवांना बोलावले. नाथचरित्रातील कथेनुसार एकनाथांच्या घरात काय चालले आहे, हे ती कर्मठ मंडळी डोकावून पाहू लागली, तर त्यांना त्यांचे स्वतःचेच पितर म्हणजे वडील, आजोबा, पणजोबा श्राद्धाचे जेवण जेवताना दिसले! यातील चमत्कारांचा मुद्दा सोडून यातून संतांनी दिलेला संदेश आपण लक्षात घ्यायला हवा. धर्माने लादलेली जातपात, रोटीबंदी झुगारून समता प्रस्थापित करण्याचा हा विचार आहे.

मुळात वारकऱ्यांनी विठुराया म्हणून स्वीकारलेल्या श्रीकृष्णाचे जीवन प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यात गेले. गाईगुरे सांभाळणारा गवळ्याचा पोर म्हणून त्याला अवहेलना झेलावी लागली. पांडवांच्या राजसूय यज्ञात सन्मान दिलेल्या श्रीकृष्णाचा भर यज्ञमांडवात शूद्र म्हणून शिशुपालाने अवहेलना केली. श्रीकृष्णाला स्वकीयांशी आणि हितशत्रूंशी आयुष्यभर लढत राहावे लागले. आपला संघर्षमय जीवनानुभव पांडवांना सांगत श्रीकृष्ण त्यांना योग्य दिशा दाखवत राहिला. समाजात समता नांदावी, उपेक्षितांना न्याय मिळावा, कर्मकांडांपासून समाजाची सुटका व्हावी यासाठी श्रीकृष्ण प्रयत्न करत राहिला. वारकरी संतांनी तेच केले. विठ्ठलरूपातील श्रीकृष्ण आणि त्याचे तत्त्वज्ञान त्यांनी स्वीकारले. अभंग, कीर्तनादी माध्यमातून ते जनतेच्या मनावर ठसवले.

भक्तीच्या सोप्या वाटा
स्त्रीशूद्रांबद्दलची कणव बाळगणाऱ्या संत ज्ञानेश्वरादी भावंडांच्या वाट्यालाही ‘संन्यासाची मुले’ म्हणून उपेक्षा, अवहेलना आली होती. त्यामुळे धर्माने सर्व अधिकार नाकारलेल्या वर्गाचे दु:ख ज्ञानेश्वर माउली समजू शकत होते. म्हणूनच त्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानाचा दिवा दाखविला. याशिवाय ‘हरिपाठा’सारख्या माध्यमातून भक्तीचा सोपा मार्ग सांगितला. हरिपाठाच्या २८ अभंगांतून त्यांनी योग याग विधी। येणे नोहे सिद्धी। वायाची उपाधी दंभ धर्म।। असा संदेश दिला. म्हणजेच देव हा केवळ भावाचा भुकेला आहे. त्याचे नामस्मरण केले तरी तो तुम्हाला प्रसन्न होतो. त्यासाठी काही यज्ञयाग वगैरे करण्याची गरज नाही, असे माउलींनी सांगितले.
तेच पुढे संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून देव शोधण्यासाठी हिमालयात, एकांतवासात, रानावनात जाण्याची गरज नाही. एका जागी बसून देवाचे स्मरण केले तरी तो सहज सापडतो, असे सांगितले.


स्त्रीशूद्रांना सन्मानाचे स्थान
व्यासांनी जशी स्त्रीशूद्रांसाठी गीता लिहिली, तशाच पद्धतीने तत्कालीन स्त्रीशूद्रांसाठी ज्ञानदेवांनी गीता प्राकृत भाषेतून ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगितली. धर्मशास्त्रात स्त्रीशूद्रांना कुठल्याही प्रकारच्या अध्ययनाचा अधिकार नव्हता. तो ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून दिला गेला; पण केवळ एवढेच नव्हे, तर वारकरी संतांनी प्रत्यक्ष आचरणातही हा विचार आणला. ज्ञानदेवादी भावंडांची धाकटी बहीण मुक्ताई, संत नामदेवांच्या घरची दासी जनाबाई, अस्पृश्य समजली जाणारी चोखामेळा कुटुंबातील संत सोयराबाई, वेश्या कुटुंबातील कान्होपात्रा, ब्राह्मण कुटुंबातील संत बहिणाबाई अशा अनेक कर्तृत्ववान महिलांना वारकरी संतांनी संतत्व बहाल केले. त्यांना अधिकार दिले. शूद्रातिशूद्र समजल्या गेलेल्या संत चोखामेळा यांना संत नामदेवांनी शिष्य करून घेतले. एवढेच नव्हे, तर संत चोखा मेळा माझ्यासाठी चोखा माझा जीव चोखा माझा भाव। कुळ धर्म देव चोखा माझा।। असे संत नामदेवांनी म्हटले. चोखा मेळा संत भला। तेणे देव भुलविला।। अशी ग्वाहीच संत जनाबाईंनी दिली.

धर्मशास्त्राने उच्च-नीच वर्ण-जातीनुसार एकमेकांना अभिवादन कसे करायचे याचेसुद्धा नियम घालून दिलेले होते. अर्थात वरच्या वर्णाच्या व्यक्तीने खालच्या वर्णाच्या ज्येष्ठ व्यक्तीचाही उल्लेख तुच्छतेने आणि अनादराने करण्याचा संकेत होता. त्यामुळे बरोबरीच्या नात्याने वागवणे दूरच आणि वरिष्ठ जातीच्या व्यक्तीने कनिष्ठ जातीच्या व्यक्तीच्या पाया पडणे, ही गोष्ट तर अशक्यच. वारकरी चळवळीने हा प्रवाह उलटा फिरवला. तुकाराम महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे वर्णअभिमान विसरली याती। एकएकां लोटांगणीं जाती।। असे पंढरीत चंद्रभागेच्या वाळवंटात वर्णाभिमान आणि स्पृश्यास्पृश्य भेद विसरून वारकरी एकमेकांच्या पाया पडू लागले, एकमेकांना आलिंगन देऊ लागले.

वारकरी पंथ सर्वांसाठी खुला आहे. यारे यारे लहान थोर। याती भलती नारी नर।। असे आवाहन वारकरी विचार करतो. मांसभक्षण- मदिरापान वर्ज्य, सत्य, अहिंसा, सेवा, त्याग, दया, क्षमा, शांती आणि नैतिकता यावर वारकरी संप्रदाय आधारलेला आहे. ज्ञानाची साधना भक्ती आणि प्रेमासोबत करण्यास संतानी सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी, तर ‘पसायदाना’च्या माध्यमातून केवळ मानवजातीचेच नव्हे, तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचे पसायदान मागितले. वारकरी झाल्यावर पंढरपूरची वारी, एकादशी व्रत आणि विठोबाचे दर्शन याव्यतिरिक्त कसल्याही कर्मकांडाची आवश्यकता नाही. ज्याला वारकरी व्हायचे आहे, त्याने संप्रदायातील ज्येष्ठाकडे तुळशीमाळ घेऊन जायचे. तेथे ती माळ ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत किंवा तुकाराम गाथा यापैकी कोणत्याही एका ग्रंथावर ठेवून ती गळ्यात घालायची.

माळकरी झाला, की वारकरी होऊन त्याने एखादी वारी करावी, अशी अपेक्षा असते. गळ्यात माळ नसली तरी अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ। त्याचे गळा माळ असो नसो।। असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. उत्तम चारित्र्य, धर्मनिष्ठा, भूतदया, सदाचार आणि नीती यांवर वारकरी संप्रदायाचा भर आहे. वारकऱ्यांना राजाश्रयाची आस नाही. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा तुकोबारायांनी नाकारला होता. आपापली कामे करून उदरनिर्वाह करावा, कीर्तनादी सेवा विनामूल्य करावी, असे संतांनी लिहून ठेवले आहे.

विचारवंत राजारामशास्त्री भागवत म्हणाले होते, ‘ज्ञानोबा-तुकोबा यांना मानणारा माणूस म्हणजे मराठी माणूस. ज्ञानेश्वरी आणि गाथा हे आम्हा मराठी माणसांचे आगम आहेत. ज्याप्रमाणे ख्रिस्ती लोक बायबलच्या आधारे बोलतात व मुसलमान कुराणाच्या, त्याप्रमाणे आम्ही मराठी माणसे गाथा-ज्ञानेश्वरीच्याच आधारे बोलतो. आम्हाला गाथा-ज्ञानेश्वरी पुरेशी असून वेदोपनिषदांची व शंकराचार्यांच्या भाष्यांची गरज नाही. वारकरी विचारांनी समाजमनाची मशागत करून ठेवल्यामुळे छत्रपती शिवराय पुढे रयतेचे राज्य निर्माण करू शकले, असे न्यायमूर्ती रानडे यांनी म्हटले आहे. आधुनिक काळात न्यायमूर्ती रानडे यांनीच वारकऱ्यांचे सांस्कृतिक, सामाजिक योगदान अधोरेखित केले.

समन्वयाचा मार्ग
वारकरी चळवळीने केवळ हिंदूंच्या अठरा पगड जातीतील नव्हेत, तर अगदी मुस्लिम धर्मातूनही संत घडविले. वारकरी पंथात एक परंपरा सांगितली जाते. ती म्हणजे ‘ज्ञानियाचा एका, कबीराचा शेखा आणि नामयाचा तुका’. याचाच अर्थ संत नामदेवांची परंपरा संत एकनाथांनी पुढे नेली, संत नामदेवांच्या विचारांचा वारसा संत तुकाराम महाराजांनी पुढे नेला आणि उत्तरेतील संत कबीरांचा समतेचा झेंडा महाराष्ट्रातील वारकरी संत शेख महंमद यांनी उंचावला. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथे वास्तव्य केलेले शेख महंमद यांना छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांनी गुरू मानले होते. मालोजीराजांनी त्यांना इनाम देऊन मठ वगैरे बांधून दिला. शेख महंमद अविंध। त्याचे हृदयी गोविंद।। असे म्हणणाऱ्या शेख महंमदांनी योगसंग्राम नावाच्या प्रसिद्ध ग्रंथासह १० ग्रंथ लिहिले.

ऐसे केले या गोपाळे। नाही सोवळे ओवळे।।
काटे केतकीच्या झाडा। आत जन्मला केवडा।।

अशा सुंदर अभंगरचना करणाऱ्या शेख महंमद यांनी हिंदू-मुस्लिम संस्कृतीचा घातलेला समन्वय आजही श्रीगोंदेकरांनी जपला आहे. महाराजांचा उरूस दोन्हीही समाज मिळून मोठ्या उत्साहाने साजरा करतात. शेख महंमदांनी ज्यांची परंपरा चालविली ते थोर संत कबीर हे निर्गुण निराकाराची भक्ती करणारे. पण ते सगुण साकार विठ्ठलाची भक्ती करणाऱ्या महाराष्ट्रातील वारकरी संतांच्या मेळ्यात सहभागी झाले. मुळात संत नामदेव जेव्हा उत्तरेत गेले तेव्हा पेरलेल्या समतेच्या तत्त्वज्ञानातूनच शीख धर्माचा उदय झाला. संत कबीर, संत मीराबाई, संत नरसी मेहता आदी संत घडले. अजूनही आळंदी, पंढरपूर या सारख्या ठिकाणचे कबीर मठ जागते आहेत. कबीर पंथीयांची शांतता, समतेचे प्रतिक असलेली पांढरी पताका पंढरीच्या वाटेवर वारीच्या वेळी वारकऱ्यांच्या भगव्या पताकेसोबत फडकत असते.

मुळात तत्कालीन धर्म, पंथांचा प्रभाव वारकरी विचारधारेवर पडला होता. त्या धर्म, पंथातील जे चांगले आहे, ते वारकरी संतांनी स्वीकारले. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि संत तुकाराम हे मध्ययुगीन वारकरी संतांमधील प्रमुख संत. त्यापैकी संत ज्ञानेश्वर आपली गुरूपरंपरा नाथपंथीय असल्याचे सांगतात, संत एकनाथांचे गुरू जनार्दन स्वामी दत्त सांप्रदायिक होते. सुफी संत चॉंद बोधले हे जनार्दन स्वामींचे गुरू होते. तर संत तुकाराम महाराजांचे गुरू बाबाजी चैतन्य हे चैतन्य सांप्रदायीक होते. याचाच अर्थ नाथ, दत्त, चैतन्य या संप्रदायांचा संगम वारकरी विचारधारेत झाला. त्याचबरोबर सुफी, लिंगायत, महानुभव, बौद्ध, जैन यांचाही प्रभाव वारकरी विचारधारेवर पडला.
हिंदू धर्मांतर्गत जे वाद होते त्यातील एक प्रमुख वाद म्हणजे शैव आणि वैष्णव वाद. गंध उभे लावावे, की आडवे इथपासून ते एकमेकांचे आणि एकमेकांच्या दैवताचे तोंडही न पाहण्याची कट्टरता होती. हरी हरा भेद। नाही करू नये वाद।। एक एकाचे हृदयी। गोडी साखरेच्या ठायी।। असे सांगत या शैव-वैष्णवांचा समन्वय वारकरी पंथाने घातला.

पंढरपुरातील संत नरहरी सोनार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. श्रीकृष्णाचा अवतार असणाऱ्या श्री विठ्ठलाने डोक्यावर शंकराची पिंड धारण केली आहे, असे मानून महाशिवरात्रीला त्या शिवलिंगाची पूजा केली जाते. वारीच्या वाटेवर शिवावतार असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत वारकरी थांबतात आणि माउलींच्या पालखीवर खंडेरायाचा भंडारा उधळत ‘मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी’ हा संत एकनाथांचा अभंग म्हणत खंडेरायाचा ‘येळकोट’ करतात. पंढरपूरच्या चैत्री एकादशीच्या यात्रेच्या दिवशीच शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची यात्रा असते. या यात्रेला हरिहर ऐक्याची यात्रा म्हणतात. पंढरपुरातून वारकरी शिखरशिंगणापूरला महादेवाच्या दर्शनाला जातात. चंद्रभागेच्या कावडीही अभिषेकासाठी नेल्या जातात. या दिवशी शिव-पार्वतीच्या विवाहाला साक्षात विठुराया गेला आणि त्याने पंचपक्वान्नांचे भोजन केले, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे एकादशीला उपवास असूनही पंढरीत विठुरायाला दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात.

भक्तांची कामे देव करू लागला
ईश्वरप्राप्तीसाठी योगयाग विधी करावेत, वनात जावे, व्रतवैकल्ये करावीत, तीर्थाटने, दानधर्म करावेत, असे धर्मशास्त्र सांगते; पण वारकरी संतांनी देव प्राप्त करण्याच्या फार सोप्या गोष्टी सांगितल्या. आई-वडिलांची सेवा करावी, प्राणिमात्रांवर दया करावी, आपले अंत:करण निर्मळ ठेवावे, इतरांचे भले चिंतावे, दुसऱ्याला अडीअचणीत मदत करावी, आपले दैनंदिन काम करता करता देवाचे चिंतन करावे. त्यातूनच तुम्हाला देव प्राप्त होईल, असा संदेश त्यांनी दिला. देव आणि भक्तांमधील कर्मकांडे, मध्यस्थच संतांनी काढून टाकला. अठरा पगड जातीतील संतांची हलकी मानली जाणारी कामे विठुराया करू लागला. संतांना देव काय काय कामे करू लागला, याबाबतचा एक अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिला आहे....
उंचनीच काही नेणें भगवंत।
तिष्ठे भाव भक्ती देखोनियां।।
चर्म रंगू लागले रोहिदासा सांगे।
कबीराचे मागे विणी शेले।।
सजन कसाया विकू लागले मांस।
मला सावत्यास खरपु लागे।।
नरहरी सोनारा घडू फुंकू लागे।
चोख्यामेळ्या संगे ढोरें ओढी।।
नामयाच्या जनीसवे वेची शेणी।
धर्मा घरी पाणी वाहे झाडी।।
नाम्यासवें जेवि नव्हे संकोचित।
ज्ञानियांची भिंत अंगी ओढी।।
अर्जुनाची घोडी हाकी हा सारथी।
भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची।।
गौळियांचे घरी अंगे गाई वळी।
द्वारपाळ बाली द्वारी जाला।।
घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची।
हुंडी मेहत्याची अंगे भरी।।

अशा रीतीने जी कामे स्वत: परमेश्वर करू लागतो, ती कामे हीन दर्जाची कशी असतील? त्यामुळे या कामांना आणि ती करणाऱ्या विविध जातींच्या माणसांना संतांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. मग आत्मविश्वासाने आणि अभिमानाने....

कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी।। असे संत सावता माळी म्हणू शकले. देवा तुझा मी सोनार। तुझे नामाचा व्यवहार।। असे संत नरहरी सोनार यांनी सांगितले. आम्ही वारीक वारीक। करू हजामत बारीक।। अशी ग्वाही संत सेना न्हावी महाराज यांनी दिली. तर, कुलालाचे वंशी जन्मले शरीर। तो गोरा कुंभार हरिभक्त।। असे संत गोरा कुंभार यांनी स्वत:बद्दल अभिमानाने सांगितले.

शुभ-अशुभ, सोवळे-ओवळे
संत केवळ समता, मानवतेचा संदेशच देऊन थांबले नाहीत, तर त्यांनी अधिकार नाकारणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांनाही आपल्या अभंगांमधून ठणकावले. धर्माचा सोयीस्कर अर्थ लावून जे भेदाभेद, सोवळेओवळे पाळतात, खालच्या समजल्या जातींचा विटाळ मानतात त्यांना संत चोखामेळा यांच्यासारख्या संतानेही
आदिअंती अवघा विटाळ संचला। सोंवळा तो झाला कोण न कळे॥
चोखा म्हणे मज नवल वाटतें। विटाळा परतें आहे कोण॥...

असे ठणकावले; तर उच्चवर्णीय, ब्राह्मण असणाऱ्या संत एकनाथ महाराजांनीही शुद्ध-अशुद्ध, पवित्र-अपवित्र, सोवळे-ओवळे या कल्पनांची खिल्ली उडविली. नीचाचेनि स्पर्श देव विटाळला। पाणिये प्रक्षाळुनि सोवळा केला।। पण याचा अर्थ या लोकांनी देवापरिस जळ केले सबळ। असे नाथबाबा म्हणतात. हिंदू धर्मातील पवित्र गंगाजलाबाबतही ते बेधडक बोलतात....

गंगोदक ते पवित्र येर कडु अपवित्र?
दोन्ही उदके तव सारिखी।
शुद्ध अशुद्ध काय पारिखी?
गंगा देवापासून जाली। येर काय मध्यवर्ती केली?
शुद्ध अशुद्ध हे वासना। शरण एका जनार्दना।।

म्हणजे शुद्ध-अशुद्ध हा सर्व मनुष्याच्या कल्पनांचा खेळ आहे, असे एकनाथांनी बजावले. तसेच त्यांनी....

वेदवाणी देवे केली। येर काय चोरापासूनी जाली?
सकळ वाचा वदवी देव। का वाढावा अहंभाव?
असा भाषेच्या श्रेष्ठ-कनिष्ठात्वावरही सवाल उभा केला.

संत एकनाथांच्या नंतर संत तुकारामांनी धर्मठकांनी उभ्या केलेल्या भेदाभेदावर आपल्या रोखठोक भाषेत प्रहार केले. वेदाध्ययनाचा अधिकार नसलेल्या तुकोबारायांनी वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथा।। असे ठणकावले.
धर्मातील वर्णव्यवस्थेत विषमता का, तर त्याला आधार ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील पुरुषसूक्त आधार आहे. त्यात समाजपुरुषाचे मुख म्हणजे ब्राह्मण, बाहू म्हणजे क्षत्रिय, मांड्या म्हणजे वैश्य आणि पाय म्हणजे शूद्र अशी कल्पना मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर हे सूक्तच प्रक्षिप्त असल्याचे तुलनात्मक अभ्यास करून सांगितले. पण त्याच्याही अगोदर संत तुकाराम महाराजांनी
अवघी एकाचिच वीण। तेथे कैचे भिन्नाभिन्न।
वेदपुरुष नारायण। तेणे केला निवाडा।।....

म्हणजे चारी वर्ण जर एकाच पुरुषापासून उत्पन्न झाले असतील, तर त्यांच्यातील एक श्रेष्ठ, दुसरा कनिष्ठ असे कसे म्हणता येईल? असे विचारले. तुकोबारायांना जर वेदाध्ययनाचा अधिकारच नाही, तर ते वेदांचा अर्थ कसा लावू शकतात, असा प्रश्न तेव्हा साहजिकच उपस्थित झाला. तेव्हा तुकोबारायांनी दिलेले उत्तर पारंपरिकांच्या तोंडात मारणारे होते.

वेद आम्हावरी रुसोनिया गेला। आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी।। म्हणजे वेदांचा निर्माता अर्थात बाप म्हणजे साक्षात ईश्वर, त्यालाच आम्ही कंठात धारण केला आहे. आमचे बोलणे ही कंठस्थ ईश्वराचीच वाणी आहे, असे तुकोबाराय म्हणाले. काय मी पामर जाणे अर्थ वेद। वदवी गोविंद तेचि वदे।। असे नम्रपणे सांगत ज्या श्रीकृष्णाने गीता सांगितली, तोच श्रीविठ्ठल माझ्या तोंडून वेदांचा अर्थ वदवितो असेही तुकोबांनी सांगितले. त्याचबरोबर जो जगाचा नियंता आहे, त्यानेच आपली म्हणजे सर्व स्त्रीशूद्र, बहुजन, कष्टकरी समाजाची जबाबदारी घेतली असल्याने शेंद्रीहेंद्री, शूद्र दैवते पुजण्याचे कारण नाही. तसेच कसलीही व्रतवैकल्ये, कर्मकांडे करण्याचे कारण नाही, असे संतांनी सांगितले. याशिवाय ‘ब्राह्मण्य’ कर्मावर ठरते, जन्मावर नव्हे, असेही धर्माच्या ठेकेदारांना ठणकावून सांगितले.

त्यामुळे विषमतेच्या विरोधात लढणाऱ्या या संतांना सनातन्यांकडून खूप त्रासही सहन करावा लागला. संतपदाला पोहोचलेल्या संत नामदेवांना शूद्र म्हणून औंढा नागनाथ येथील देवळात कीर्तन करण्यास नकार देण्यात आला. संन्यासाची मुले म्हणून ज्ञानदेवादी भावंडांना सर्व अधिकार नाकारण्यात आले. धर्मपीठ पैठणमध्ये राहणाऱ्या संत एकनाथांच्या विरुद्ध त्यांच्याच मुलाने बंड केले. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या वह्या बुडविण्यात आल्या. धर्मशास्त्राविरोधी वागले म्हणून त्यांच्यावर खटला चालविण्यात आला. असा प्रत्येक संताला छळ सोसावा लागला. अगदी अलिकडच्या काळात संत गाडगेबाबांना तर परंपरेतील लोकांनी स्वीकारलेच नाही.

भगवद्गीतेला वेदांच्या वरचे स्थान
अर्थात हे सगळे करताना संतांनी एक काळजी घेतली ती म्हणजे, धर्माच्या परंपरेची चौकट मोडली नाही. वारकऱ्यांनी वेदांची चौकट स्वीकारली; पण गीतेला वेदांच्या वरचे स्थान देऊन. गीतेच्या अर्थनिर्णयासाठीचे त्यांनी पुरेसे स्वातंत्र्य घेतले आणि गीतेमधील समतेचा पुरस्कार केला. वारकऱ्यांनी परंपरेची चौकट न सोडण्याचे कारण म्हणजे, त्यांच्या अगोदर बौद्ध, जैन, महानुभव, लिंगायत आदींनी चातुर्वर्ण्य व्यवस्था, वेद नाकारून पर्याय देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हे सर्वजण वेगळे पडून अयशस्वी झाले होते. हा इतिहास वारकरी संतांच्या नजरेसमोर होता. संतांनीही तसे केले असते, तर अगोदरचा धर्म जसा केवळ उच्चवर्णीय पुरुषांसाठी होता, तसा त्याला उत्तर देणारा स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांचा वेगळा धर्म झाला असता. म्हणजे पुन्हा विषमतेला मान्यता दिल्यासारखे झाले असते.

त्यामुळे संतांनी विषमतेचे उत्तर प्रतिविषमतेने नव्हे, तर समतेने दिले. तुमच्या धर्मात तुम्ही आम्हाला जागा दिली नाही, तरी आमच्या धर्मात तुम्हाला जागा आहे, अशी उदार भूमिका संतांनी घेतली. वारकऱ्यांचा धर्मही ईश्वरापासूनच निर्माण झाला आहे. त्यामुळे धर्माच्या ठेकेदारांना त्याला कमी लेखणे शक्य झाले नाही आणि वारकऱ्यांनाही दूर ठेवता आले नाही. वारकऱ्यांनीही सवतासुभा न मांडता परंपरेतच ठाण मांडून परिवर्तन घडवले. ज्या धर्माने समाजाची एकजूट ठेवायची तोच धर्म जातिभेद, विषमतेस खतपाणी घालत असेल, तर समाजात फूट पडणारच. त्यातून कोसळणारा एकसंध समाज वारकरी संतांनी सावरून धरला. परंपरेत राहण्याचाही एक धोका होताच. परंपरेतील हितसंबंधी मंडळींनी हा तर आमच्याच परंपरेचा भाग आहे, म्हणत वारकरी विचारांची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला.

पैठण या जुन्या धर्मपीठाला पर्याय म्हणून समतेच्या न्यायाने निवाडा करणारे पंढरपूर उभे राहिले होते; पण शेवटचे संत मानले जाणारे निळोबाराय पिंपळनेरकर यांच्या निर्वाणानंतर वारकरी संप्रदायाच्या विचारांत ढिलाई आली. परिणामी वारकऱ्यांचे क्षेत्र असलेल्या पंढरपूरवरील त्यांची पकडही ढिली झाली. तिथे सनातन्यांचे प्राबल्य वाढले. पैठणऐवजी पंढरपुरात विषमतेचे समर्थन करणारा धर्मशास्त्रावरील ‘निर्णयसिंधू’ हा ग्रंथ लिहिला गेला. या ग्रंथाचे लेखक बाबा पाध्ये यांनी विठ्ठलदेवतेचा संबंध ऋग्वेदामधील मंत्रांशी लावला. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा आधार घेऊन विठ्ठलाच्या पूजेची पद्धत निश्चित करण्यात आली आणि या पूजेत ऋग्वेदामधील प्रसिद्ध पुरुषसूक्ताचाही समावेश झाला.

याच पुरुषसूक्ताचा उपयोग विषमतेचे समर्थन करण्यासाठी झाला होता आणि त्याला वारकरी संतांनी विरोध केला होता. त्यामुळे सनातनी परंपरेचा प्रभाव वाढला. त्यांनी वारकरी विचारांची धार बोथट केली. वारकरी संप्रदायाला आपल्या परंपरेचाच एक छोटा भाग ठरवले. वारकऱ्यांनी एवढी वर्षे परंपरेचे रक्षण केले, असेही सांगितले जाऊ लागले.

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे ‘अलौकिक नोहावे लोकांप्रति’ किंवा ‘सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा’ अशी सर्वांना सोबत घेऊन भूमिका वारकऱ्यांनी ठेवली. एकांगी किंवा धारधार भूमिकेमुळे उद्दिष्टामध्ये बाधा येऊ शकली असती. मात्र सनातनी मंडळींनी याचा आपल्या सोईनुसार अर्थ लावला. वारकरी नेतृत्त्वही संतांचे विचार जपण्यात कमी पडले. त्यामुळे समतेचे पीठ बनलेले पंढरपूर कर्मठ मंडळींच्या ताब्यात गेले. त्यातून अस्पृश्‍यांना मंदिर प्रवेश नाकारला गेला. त्यासाठी १९४७ मध्ये सानेगुरुजींना उपोषण करावे लागले. त्यातून मंदिरप्रवेशाचा कायदा झाला. नंतर मंदिर सरकारी समितीच्या ताब्यात देण्यात आले.बडव्यांचे महत्त्व कमी झाले. या गोष्टीला या वर्षी ७५ वर्षे पूर्ण झाली. आता पुन्हा एकदा पंढरपुरात आणि एकूणच वारकरी पंथात सनातनी विचार प्रभावी होऊ लागले आहेत. वारकरी संतांचा मूळ विचार मागे पडू लागला आहे. सरकारी समितीच्या ताब्यातून मंदिर मुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे पंढरपूर हे पुन्हा समतेचे पीठ होण्याची, वारकरी विचारांना बळकटी देऊन सर्वांना सामावून घेणारा, उदार हिंदू धर्म उजळण्याची गरज निर्माण झाली आहे.
संदर्भ :
१. महाराष्ट्राची लोकयात्रा : डॉ. सदानंद मोरे
२. संत नामदेव- समाजशास्त्रीय अभ्यास : डॉ. श्यामसुंदर मिरजकर
३. पाच भक्तिसंप्रदाय : र. रा. गोसावी