Jainism and Hinduism- का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जैन धर्म आणि हिंदुत्व}

का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

प्रफुल्ल शहा, अतुल शहा
जैन हा भारतातील एक प्राचीन धर्म आहे. हजारो वर्षे हिंदू आणि जैन भारतात गुण्यागोविंदाने राहत आलेले आहेत. दोन धर्मांतील मूलतत्त्वे सारखी असल्यानेच हे साहचर्य निर्माण झाले आणि टिकले आहे....काय आहे हे नाते?

जैन परंपरा वेदांइतकी जुनी असल्याचे मानले जाते. इ.स.पूर्व ६०० च्या काळात होऊन गेलेले भगवान महावीर हे जैनांचे २४ वे तीर्थंकर... अशा या प्राचीन धर्माचे हिंदूंशी नेहमीच साहचर्य राहिल्याचे दिसते. ती परंपरा आजही कायम आहे. दोन धर्मांतील मूलतत्त्वे सारखी असल्यानेच हे साहचर्य निर्माण झाले आणि टिकले आहे. (Relation between Jainism and Hinduism)

हिंड्यते मन्यते इति हिंदव: म्हणजे पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात ते हिंदू. हिंसात दुह्यते इति हिंदव: म्हणजे हिंसेने दुःखी होतो तो हिंदू. हिमालयापासून सिंधूपर्यंत म्हणजे हिंदी महासागरापर्यंत आणि सिंधू नदीपर्यंत राहतात ते हिंदू. अशा या हिंदुत्वाच्या (Hinduism) मूळ व्याख्या भौगोलिक-व्यावहारिक आहेत. मुळात हिंदुत्व ही एक जगण्याची पद्धती आहे, असे वरील व्याख्यांवरून दिसते. त्याच्यानंतर शैव, वैष्णव, जैन असे धर्मपालन करणारे आले, पण तेही मूळ हिंदूच, त्यांचे मूळही हिंदूच आहे, असेच म्हणावे लागेल.

आर्य धर्म हा मोक्षाला मानतो, मोक्षप्राप्ती हेच आपले अंतिम लक्ष असते. अमेरिका, इंग्लंड यांना कोणी माता म्हणत नाही, पण इथे आपण भारतमाता म्हणतो. या आपल्या देशाबद्दलच्या भावना असतात, हे संस्कार आपले आहेत. भारताच्या (India) इतिहासात अनेक परकीय आक्रमकांनी आपल्यावर हल्ले केले, अत्याचार केले; तरी आपल्या संस्कृतीची मुळे मजबूत राहिली आहेत, ती कोणीच तोडू शकले नाहीत. ही भूमी ऋषी आणि कृषी संस्कृतीची भूमी आहे. या देशात राहणाऱ्या सर्वांची भावना अत्यंत चांगली आहे, एकमेकांना सांभाळून एकमेकांचे रक्षण करणे ही आपली परंपरा आहे, हीच आपली धर्मसंस्कृती आहे.

अत्यंत पुरातन असा हिंदू धर्म हा खूप महान आहे. इतर धर्मांप्रमाणेच यातील मूलतत्त्वे अत्यंत चांगली आहेत. या हिंदू धर्माचा आजच्या काळातील कायद्यांमधील संदर्भ पाहिला तरीदेखील हीच बाब लक्षात येते की या कायद्यांमध्येही हिंदू धर्माची अनेक मूलतत्त्वे आहेत. प्राणिमात्रांवर अनुकंपा दाखवा, प्राण्यांना क्रूरतेने वागवू नका, असे अनेक कायद्यांमध्ये आणि राज्यघटनेमध्ये लिहिले आहे. ते मुळात हिंदू धर्मतत्त्वांमध्ये आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ मध्ये समानतेचे तत्त्व दिले आहे. अनेक हिंदू संतपरंपरांमध्ये सर्वांना समान वागणूक द्यावी, असे सांगितले आहे. खुद्द आपल्या देवांची शिकवणही तशीच आहे.

हेही वाचा: हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

अर्थात हिंदू धर्म केवळ देवपूजा, यज्ञ यापुरताच मर्यादित नाही. त्यापलीकडे जाऊन माणसाने कसे वागावे, नीतिमत्ता कशी हवी याचा उल्लेखदेखील जुन्या ग्रंथांत आहे. उदाहरणार्थ द्विभार्या प्रतिबंधक कायदा हल्ली आला असला, तरी प्रभू श्रीरामचंद्रांनी हे व्रत आजन्म पाळले होते. त्यांनी सर्वांना हा धडाच घालून दिला होता. परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्याला शिक्षा करणे हे आपले कर्तव्य आहे, हेदेखील त्यांनी दाखवून दिले होते. हेच तत्त्व आजच्या कायद्यात आहे. दुसऱ्याच्या मालकीच्या वस्तूला स्पर्शही करू नये, या हिंदू मूलतत्त्वावर आधारित असे आज कायदे आहेत.

अगदी आपण शास्त्र किंवा हल्लीची आपली जगण्याची पद्धती पाहिली तरीदेखील त्यात हिंदू परंपरांचा समावेश दिसतो. आज आपल्याला डॉक्टर सांगतात उकळलेले पाणी प्या, ताजे अन्न खा, शिळे अन्न खाऊ नका... हे सारे आपल्या धर्मशास्त्रात, आयुर्वेदात लिहिले आहे. चातुर्मासात-श्रावणात सामिष आहार घेऊ नये, कांदा-लसूण खाऊ नये, ही हिंदूंची परंपराच आहे. ही परंपरा आज शास्त्रीय कसोटीवर टिकून राहिली आहे.

समाजात कसे वागावे, नातेसंबंध कसे टिकवावेत, याचे दर्शन वेगवेगळ्या सणांमधून होते. वाईट प्रवृत्तीचे दहन करणे किंवा बहिणीचे रक्षण करणे हे आपले सणच सांगतात. आपल्या देशातील कल्चरल बॅलन्स म्हणजेच सांस्कृतिक समतोल हा धर्माच्या पगड्यामुळेच टिकलेला आहे.
जैन आणि हिंदू या दोन धर्मांमध्ये पूजेचे प्रकार भिन्न असले, तरी धर्मातील मूलतत्त्वे सारखी आहेत. सत्य, अहिंसा, शांती, घरच्यांशी कसे वागावे, समाजात एकोप्याने कसे राहावे, स्त्रीला मान द्यावा, ही परंपरा हिंदू आणि जैन या दोघांमध्ये सारखीच आहे. हे दोन्ही धर्म मिळून किंबहुना सर्वच धर्म मिळून मानव जातीच्या कल्याणासाठी बरेच काही करू शकतात, ही बाब खरे म्हणजे प्रत्येकावर बिंबवली पाहिजे.

आपल्याकडे जादा असेल तर दुसऱ्याला द्या, त्यांचाही विकास करा, तरच साऱ्यांचा विकास होईल, हे हिंदू संतमंडळींनी सांगितलेले आहे; तर जैन धर्मामध्येही आपल्याला आवश्यक तेवढेच वापरा आणि जास्त असेल तर दुसऱ्याला द्या, असे नमूद केले आहे. अनावश्यक अशा कुठल्याही बाबीचा संग्रह करू नये, हे महात्मा गांधीही सांगून गेले आहेत. याच तत्त्वामुळे सर्वांचे कल्याण होईल, हे निश्चित.

जैन धर्मातील बरीच तत्त्वे हिंदू धर्मातूनच आली आहेत. किंबहुना ती हिंदू धर्मातून जैन धर्मात येताना काहीशी काटेकोर झाली आहेत. उदाहरणार्थ सूर्यास्तानंतर जेवू नये, सूर्यास्तानंतर शक्यतो पाणीदेखील पिऊ नये, सूर्योदयानंतरच जेवावे, रोज पूजाअर्चा करून मगच जेवण घ्यावे, गरम पाणी प्यावे, आपल्या हातून दिवसभर अजाणतेपणी घडलेल्या चुकांची रात्री माफी मागणे, या साऱ्या जैन तत्त्वांचे मूळ हिंदू धर्मातच आहे. पर्युषण काळात जैन समाज काही विशिष्ट भाज्याही खात नाहीत. कारण त्यामुळे त्यांच्यावरील सूक्ष्मजीवांची हत्या होते, असा समज आहे.

नागपंचमीच्या दिवशी हिंदू भाविक काही विशिष्ट प्रकारे स्वयंपाक करीत नाहीत, यामागील तत्त्वही तेच आहे. हिंदूंमध्ये पायी चालण्याची खूप परंपरा होती. चार धाम यात्रा, तीर्थयात्रा, पंढरपूरची वारी, देवदर्शन हे सगळे पायीच होत असे. जैन धर्मातही गुरुमहाराज पायी चालत जातात, ते कोणत्याही वाहनांचा वापर करत नाहीत. कारण त्यामुळे सूक्ष्म जीवांची हानी होऊ नये, हा त्यांचा हेतू असतो.

(प्रफुल्ल शहा हे आत्मकमल लब्धीसुरीश्वरजी ज्ञानमंदिर ट्रस्ट (दादर) व मोतीशा सेठ ट्रस्ट (भायखळा)चे विश्वस्त आहेत; तर अतुल ब्रजलाल शहा श्रावक आहेत.)