Indian Culture- भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारताचे मंदिर पुराण}
काय आहे मंदिरांचे महत्त्व...वाचा सविस्तर

भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

स्नेहा नगरकर

मंदिरे ही भारतीय संस्कृतीचे अविभाज्य आयाम आहेत. भारतीय इतिहास आणि संस्कृती या दोहोंच्या विकासात मंदिरांचे प्रचंड मोठे योगदान आहे...काय आहे भारतीय संस्कृतीत मंदिरांचे महत्त्व....

भारतीय मंदिरांचे महत्त्व हे केवळ धार्मिक नव्हते. ही मंदिरे कला, संस्कृती, समाज आणि अर्थ यांचीदेखील केंद्रे होती. मंदिरे ही शैक्षणिक केंद्रे होती. या मंदिरांशी संलग्न अनेक मठ आणि वेद पाठशाळा होत्या आणि वर्तमानातसुद्धा आहेत. मंदिर संस्कृतीचा हा समृद्ध वारसा जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शासकीय संस्थांव्यतिरिक्त आपणही मंदिरांच्या संवर्धनासाठी आपल्या क्षमतेनुसार योगदान दिले पाहिजे. (Temples in India Its Importance for Society)

मंदिरे ही भारतीय संस्कृतीचे (Indian Culture) अविभाज्य आयाम आहेत. भारतीय इतिहास आणि संस्कृती या दोहोंच्या विकासात मंदिरांचे (Temples) प्रचंड मोठे योगदान आहे. मंदिर या संस्थेचा भक्ती आणि मूर्तिपूजन यांच्याशी जवळचा संबंध आहे. असे मानले जाते, की मंदिरातील देवतेचे दर्शन घेतल्यानंतर भक्त आणि भगवान यांच्यातील द्वैत संपुष्टात येते आणि एका प्रकारे भक्ताचा पुनर्जन्मच होतो. केवळ भक्तच भगवंतांचे दर्शन घेत नाही, तर भगवंतांची कृपादृष्टीदेखील भक्तावर पडली पाहिजे. मंदिर स्थापत्यात पंचमहाभूतेदेखील प्रतीत होतात.

सुप्रसिद्ध कलाइतिहासकार जॉर्ज मिशेल यांच्या मते मंदिरे ही हिंदू धर्माची सर्वात महत्त्वाची प्रतीके आहेत. त्यांच्या मते गेल्या दोन सहस्रकांपासून हिंदू धर्माचे (Hinduism) जे स्वरूप आहे ते मुख्यत्वे मंदिरांच्या संदर्भात म्हणजेच ‘टेम्पल हिंदुइझम’ आहे. मंदिरे ही साधारणपणे एखाद्या तीर्थाजवळ उभारली जातात. तीर्थ म्हणजे असे स्थान जिथून आपण एखादी नदी किंवा समुद्र पार करू शकतो. तीर्थ या संकल्पनेचा संबंध जल किंवा पाण्याशी आहे.

मंदिरांची उभारणी ही वास्तुपुरुषमंडल या संकल्पनेच्या आधारे केली जाते. वास्तुपुरुषमंडल आणि ऋग्वेदात येणारा विराट पुरुष या दोन्ही संकल्पनांमध्ये बरेच साधर्म्य आहे आणि या दोन्हींचा संबंध हा विश्वउत्पत्ती किंवा कॉस्मॉलॉजीबरोबर आहे. स्टेला क्रॅमरीश या थोर विदुषींनी असे मत मांडले आहे, की वास्तू म्हणजे सकल ब्रह्माण्डाचे स्वरूप आहे आणि या सबंध सृष्टीचे बीज हे वास्तू या संकल्पनेत समाविष्ट केले गेले आहे.

वास्तुपुरुषमंडल ही संकल्पना मंदिराच्या ग्राउंड प्लॅनच्या संदर्भात येते. मंदिरबांधणीच्या आधी जिथे मंदिर बांधण्याचे निश्चित केले गेले आहे, तिथे हे वास्तुपुरुषमंडल आखले जाते. मंदिर स्थापत्यशास्त्रात अचूक वास्तुपुरुषमंडल रेखांकित करणे ही पहिली पायरी मानली गेली आहे. हे वास्तुपुरुषमंडल चौकोनी असते आणि या चौकोनी आकृतीत ६४ छोटे चौकोन असतात. हा प्रत्येक चौकोन एका विशिष्ट देवतेचे स्थान मानले जाते.

पृथ्वी किंवा भूमी ही मूल वास्तू आहे आणि सर्व निर्मितीचा आधार आहे. स्टेला क्रॅमरीश यांनी मंदिरांना ‘monuments of manifestation’ म्हटले आहे. भारतीय विचारपरंपरेनुसार मंदिरे ही ब्रह्माण्डाचे लघु स्वरूप आहे. मंदिरांची तुलना ही मानवी देहाबरोबर केली गेली आहे. म्हणूनच मंदिरांच्या वास्तूला वास्तुपुरुष म्हटले गेले आहे आणि याच वास्तुपुरुषाला परम दैवत मानण्यात आले आहे.

प्राचीन आणि मध्ययुगीन मंदिरे ही मुख्यत्वे अश्म आणि विटा यांचा वापर करून उभारण्यात आली. वैदिक काळात विटांचा वापर हा यज्ञवेदीची रचना करण्यात केला जात असे. विटांना ‘इष्टिका’ असे म्हटले जात असे आणि कुठल्याही यज्ञाचा विटा हा अविभाज्य घटक असे. विटांना ‘यज्ञ तनु’ असेही म्हटले गेले आहे. असे एक मत आहे की, पुढे याच यज्ञवेदीचे रूपांतर मंदिरांमध्ये झाले आणि यज्ञवेदी आणि मंदिरे यांच्यातील संबंध हा विशेष करून मंदिरांच्या अधिष्ठानात दिसून येतो. प्रारंभिक ऐतिहासिक काळापासून वैदिक यज्ञांचे महत्त्व थोडे कमी झाले आणि मंदिरांचे महत्त्व निश्चितपणे वाढीस लागले.

‘मयमतम’ या स्थापत्यशास्त्राच्या ग्रंथात उत्तम प्रकारच्या विटांच्या उत्पादनाची प्रक्रिया दिली गेली आहे. मंदिर उभारणीत इष्टक न्यास या विधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या विधीत मंदिरबांधणीला प्रारंभ करताना प्रथम विटांची रचना केली जात असे. हा विधी मंदिरबांधणीकरिता एक खड्डा खोदल्यावर केला जात असे. हा खड्डा मंदिराच्या विस्ताराबरोबर तंतोतंत जुळत असे. सिंधू-सरस्वती संस्कृतीत वास्तुउभारणीसाठी भाजलेल्या विटांचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. या संस्कृतीतील एक प्रसिद्ध शहर म्हणजे गुजरात येथील धोलावीरा. इथे मात्र विटांऐवजी दगडाचा वापर केला गेला आहे. मौर्य काळापासून मात्र लयन स्थापत्याचे प्रमाण बरेच वाढले. तसेच या कालखंडात भारतात अनेक ठिकाणी, विशेष करून महाराष्ट्रात अनेक लेणी, जी बहुत करून बौद्ध होती, दगडात कोरली गेली.

गुप्त काळापासून दगडी मंदिरांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मौर्य काळातील काही दगडी मंदिरांचे अवशेष सापडले आहेत. दगडी मंदिर बांधण्यापूर्वी ‘शिलान्यास’ हा विधी केला जात असे. हा विधी इष्टक न्यासाप्रमाणेच असे. मत्स्य पुराणात ‘ब्रह्म शिला’ रचण्याचा उल्लेख सापडतो. ही शिला म्हणजे मंदिराचा आधार समजली जात असे. विष्णुधर्मोत्तर या ई.स. सहाव्या शतकातील उपपुराणात मंदिर निर्मितीबद्दल तपशिलात लिहिले गेले आहे. या ग्रंथानुसार मंदिरबांधणीपूर्वी वास्तुपुरुषमंडलाच्या मध्यभागी एक दगडी पात्र ठेवले जात असे आणि त्यानंतर शिलांची रचना केली जात असे.

मंदिरबांधणीत अनेक व्यक्तींचा सहभाग असे. सर्वप्रथम या प्रक्रियेत यजमानांची मुख्य भूमिका असे. यजमान म्हणजे अशी व्यक्ती जिला मंदिर उभारण्याचा मानस असे. मंदिरासाठी आवश्यक अशी आर्थिक मदत यजमान करीत असे. यजमान (पुरुष) आणि वास्तुपुरुष यांचा संबंध वास्तुपुरुषमंडलाच्या माध्यमातून प्रस्थापित होत असे. मंदिर उभारण्यात स्थपती यांचादेखील महत्त्वाचा सहभाग असे. मंदिर स्थापन करण्याकरिता योग्य स्थपतीची नेमणूक अत्यंत महत्त्वाची समजली जात असे. या स्थपतीचे मन आणि शरीर हे संतुलनात असले पाहिजे आणि त्याचा शिल्पशास्त्र आणि पुराणे यांचे उत्तम अध्ययन असले पाहिजे.

मंदिर स्थापत्यात ‘सूत्रग्राहीन’ याचीसुद्धा महत्त्वाची भूमिका असे. हा बहुतकरून मुख्य स्थपतीचा पुत्र किंवा शिष्य असे. मंदिरबांधणीत आवश्यक असणारी अनेक कौशल्ये यांच्या मध्ये तो निष्णात असला पाहिजे. तक्षक ही व्यक्ती दगडाच्या मोठ्या तुकड्यांना व्यवस्थित आकार देत असे आणि त्यावर कोरीव कामदेखील करत असे. वर्धकी ही व्यक्ती तक्षकाने कोरलेल्या दगडांना व्यवस्थित रचत असे; तसेच अधिक कोरीव कामदेखील करत असे. मंदिराचे रंगकामसुद्धा वर्धकी करत असे. मंदिरबांधणीचे संपूर्ण कार्य हे आचार्य किंवा पुरोहित यांच्या मार्गदर्शनानुसार केले जात असे. शास्त्रांच्या आधारे आचार्य हे मंदिर स्थापत्य आणि तेथील मूर्तींचे मूर्तिविज्ञान यांच्याबद्दल मार्गदर्शन करीत असत.

हेही वाचा: राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

मंदिरांसाठी वापरल्या जाणाऱ्या संज्ञा
हिंदू धर्मात मंदिराला देवाचे निवासस्थान मानले गेले आहे. म्हणूनच ज्या संज्ञा घरांसाठी उपयोगात आणल्या गेल्या आहेत, त्याच संज्ञा मंदिरांकरितादेखील वापरल्या गेल्या आहेत. प्राचीन आणि प्रारंभिक मध्ययुगीन कालीन स्थापत्यशास्त्र ग्रंथांमध्ये मंदिरांना ‘प्रासाद’ असे म्हटले गेले आहे. प्रासाद म्हणजे एखाद्या राजाचे भव्य सदन. प्राचीन भारतीय राजनीतीमध्ये अनेकदा राजाला देवत्व आणि देवाला राजत्व प्रदान करण्यात आले आहे. साधारणपणे उत्तर भारतीय मंदिरांना ‘प्रासाद’ म्हटले जाते. दक्षिण भारतात मंदिरांना ‘विमान’ म्हटले जाते. विमान म्हणजे एक दिव्य वाहन. मंदिराला विमान असे म्हणण्यात आले आहे, कारण अशी एक धारणा आहे की, मंदिर आपल्याला त्या विशिष्ट देवतेजवळ घेऊन जाते आणि आपली आध्यात्मिक उंचीदेखील वृद्धिंगत होते. विमान म्हणजे अशी वास्तू जिचे सर्व घटक प्रमाणात बांधले गेले आहेत. विमानांबद्दलचे तपशील मत्स्य पुराण, गरुड पुराण आणि हयशीर्ष पाञ्चरात्रात समाविष्ट करण्यात आले आहेत.

प्राचीन पुराभिलेखांमध्ये मंदिरांसाठी ‘देवयातन’ आणि ‘देवकुल’ या दोन संज्ञा वापरल्या गेल्या आहेत. मंदिरांना ‘देवालय’देखील म्हटले जाते. ‘रथ’ आणि ‘शिखर’ ही दोन्ही नामाभिदाने मंदिरांसाठी वापरली जातात. कोणार्क (ओडिशा) येथील सूर्य मंदिर आणि दारासुरम (तमिळनाडू) येथील ऐरावतेश्वर मंदिर ही ‘रथ’ या संकल्पनेवर आधारित आहेत. तसेच महाबलीपूरम (तमिळनाडू) येथील पल्लवकालीन एकाश्म मंदिरांनादेखील ‘पंच पांडव रथ’ म्हणण्यात आले आहे; पण या नावाचा आणि या मंदिरांच्या इतिहास आणि स्थापत्याचा तसा परस्पर संबंध नाही. प्राचीन भारतीय स्थापत्यकारांना मंदिरांची शिखरे आणि पर्वत शिखरे यांच्यात जवळचे साधर्म्य दिसून आले. जशी पर्वत शिखरे ही उत्तुंग असतात, तशीच मंदिरांची शिखरेदेखील भव्य-दिव्य असतात. देवस्थान आणि देवगृह या संज्ञादेखील मंदिरांकरिता वापरल्या गेल्या आहेत.

मंदिरांचे वाङ्‍मयीन उल्लेख
महर्षी पाणिनि (इ.स.पूर्व ५ वे-४ थे शतक) त्यांच्या ‘अष्टाध्यायी’ या ग्रंथात अनेक देवतांचा उल्लेख करतात आणि या उल्लेखांवरून असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की, या देवतांची उपासना ही मंदिरांमध्ये होत असावी. कौटिल्य (इ.स.पूर्व ४ थे शतक) च्या अर्थशास्त्रात महाकाल, मदिरा, इंद्र आणि कुबेर या देवतांच्या आयतनांचे उल्लेख सापडतात. योग सूत्रांचे प्रणेते महर्षी पतंजली (इ.स.पूर्व २ रे शतक) त्यांच्या ‘महाभाष्य’नामक ग्रंथात कृष्ण, बलराम आणि कुबेर यांच्या मंदिरांचा उल्लेख करतात. वराहमिहीर (इ.स. ५ वे- ६ वे शतक) नावाच्या एका प्रथितयश विद्वानांच्या ‘बृहत संहिता’ या ग्रंथात मंदिर स्थापत्याविषयी अनेक महत्त्वाचे तपशील ‘प्रासाद लक्षण’ नावाच्या अध्यायात सापडतात.

मंदिर कोणी बांधले पाहिजे, मंदिर कुठल्या जागेवर उभारले गेले पाहिजे; तसेच मंदिरबांधणीची पद्धत आणि प्रक्रिया कशी असली पाहिजे- या सर्व मुद्द्यांवर विस्तृत चर्चा वराहमिहीर करतात. त्यांनी वीस प्रकारच्या मंदिरांची सूची दिली आहे. ही मंदिरे प्लॅन, आकार, भूमी (मजले), शिखरे, द्वारांची स्थिती या बाबींमध्ये एकमेकांपासून भिन्न आहेत. या काही देवालयांची नावे अशी आहेत- मेरू, मंदर, कैलास, विमान, नंदन, समुद्ग, पद्म इत्यादी. साधारण याच कालखंडातील विष्णुधर्मोत्तर पुराण हे विष्णु पुराणाचे उप-पुराण, मंदिर स्थापत्य, मूर्तिशास्त्र तसेच चित्रकारिता या विषयांचे एक अत्यंत महत्त्वाचे वाङ्मयीन साधन आहे. या ग्रंथातदेखील अनेक प्रकारांच्या मंदिरांचे उल्लेख आहेत आणि त्यातील काही पुढीलप्रमाणे आहेत- हिमवान, माल्यवान, भवन, शिखर, कुंजर, सुभद्र, गरुड इत्यादी. ही नावे नागर शैलीतील मंदिरांसाठी वापरली जातात. मत्स्य पुराण या ग्रंथात देवमंदिरांच्या निर्मितीचे तपशील दिले गेले आहेत.

मंदिरांच्या विविध घटकांची- म्हणजेच भिंती, शिखर, प्रदक्षिणापथ, मंडप, मुखमंडप इत्यादी यांची प्रमाणे या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहेत. याही ग्रंथात विविध प्रकारच्या मंदिरांची नामाभिदाने देण्यात आली आहेत तसेच जवळ जवळ सत्तावीस प्रकारच्या मंडपांची नावे, उदा.: पुष्पक, पुष्पभद्र, सुव्रत इत्यादीदेखील मत्स्य पुराणात अंतर्भूत करण्यात आली आहेत. अग्नि पुराणातदेखील मंदिर स्थापत्याविषयी बरीच माहिती सापडते. या पुराणाच्या मते मंदिर बांधणी हे अतिशय कौशल्याचे काम आहे आणि ते अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे. मंदिराच्या प्लॅनची आखणी कशाप्रकारे करावी, वास्तुदेवता आणि इतर देवता यांचा पूजन विधी इत्यादी तपशील या ग्रंथात सापडतो.

समरांगणसूत्रधार हा ग्रंथ इ.स. ११व्या शतकात परमार राजा भोज याने रचला आहे. मंदिर स्थापत्यशास्त्र वाङ्मयाचा हा ग्रंथ म्हणजे मुकुटमणी आहे. या ग्रंथात मंदिरासाठी अनेक नामाभिदाने समाविष्ट केली गेली आहेत. उदा. : देवधिष्ण्य, सुरस्थान, चैत्य, अर्चा गृह आणि विबुध आगार. या ग्रंथात अशी नोंद आहे की, ब्रह्मदेवाने देवतांसाठी पाच प्रकारचे प्रासाद निर्माण केले. उदा. : शंकरासाठी ‘कैलास’ नावाचा प्रासाद. याच प्रासादांना आधारभूत मानून दगड आणि विटा वापरून मंदिरांची निर्मिती करण्यात आली. या पाच प्रासादांचे पुढे अनेक उपप्रकार तयार झाले. प्रासादांचे वर्गीकरण हे ज्येष्ठ, मध्यम आणि कनिष्ठ किंवा अधम अशा प्रकारे या ग्रंथात केले गेले आहे.

हेही वाचा: एका सुफी विचारवंताच्या नजरेतले हिंदुत्व

प्रासादांची शुभ आणि अशुभ लक्षणेदेखील या ग्रंथात वर्णित केली असून, अनेक प्रकारच्या प्रासादांची आणि विमानांची नावेदेखील या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहेत. या ग्रंथाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे यात नागर, द्राविड आणि भूमिज या तीन मंदिर स्थापत्य शैलींचे विस्तृत वर्णन आले आहे. तसेच मंदिरांच्या विविध घटकांच्या वैशिष्ट्यांची चर्चादेखील करण्यात आली आहे. दक्षिण भारतात रचलेला ‘मयमतम’ या ग्रंथाने मंदिर स्थापत्यशास्त्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. याही ग्रंथात देवालयांसाठी अनेक संज्ञा दिल्या आहेत- उदा.: विमान, भवन, हर्म्य, प्रासाद, सदन इत्यादी. ही नावे जरी अनेक असली तरी त्यांचा अर्थ ‘मंदिर’ असाच होतो. या ग्रंथात मंदिरांच्या भूमींच्या संख्येच्या आधारे मंदिरांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

यातील प्रत्येक प्रकारच्या मंदिरांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. नागर, द्राविड आणि वेसर या तीन मंदिर स्थापत्य शैलींचे विस्ताराने वर्णन या ग्रंथात दिले गेले आहे तसेच संचित (पुल्लिंगी), असंचित (स्त्रीलिंगी) आणि उपसंचित (नंपुसकलिंगी) असेही मंदिरांचे वर्गीकरण देण्यात आले आहे. वरील उल्लेख केलेल्या ग्रंथांच्या व्यतिरिक्त अनेक स्थापत्यशास्त्रीय ग्रंथांमध्ये मंदिरांचे उल्लेख आणि वर्णने समाविष्ट केली गेली आहेत. रामायण, महाभारत, हरिवंश या ग्रंथांमध्ये तसेच भास, कालिदास आणि बाणभट्ट या वाङ्मयकारांच्या रचनांमध्ये मंदिरांचे उल्लेख सापडतात. उदा.: कालिदासाच्या मेघदूतात उज्जयिनी येथील महाकालेश्वर मंदिराचे वर्णन आले आहे.

मंदिर स्थापत्याच्या विकासाचे टप्पे
मंदिर स्थापत्यतज्ज्ञांनी भारतीय मंदिरांच्या विकासाचे चार चरण किंवा टप्पे मांडले आहेत.
१. प्रथम चरण : पहिल्या चरणात सिंधू-सरस्वती संस्कृती आणि वैदिक काळाचा समावेश केला जातो. सिंधू-सरस्वती संस्कृतीचे बनावली नावाचे हरियाणा राज्यात, प्राचीन सरस्वतीच्या प्रवाहाजवळ एक पुरातात्विक स्थान आहे. या स्थानात उत्खननांदरम्यान एक apsidal वास्तू सापडली गेली. काही तज्ज्ञांच्या मते ही वास्तू एका मंदिराची आहे; पण या मुद्द्यावर पुरातत्त्वज्ञांचे एकमत नाही. वैदिक काळात मंदिरांचा किंवा मूर्तिपूजेचा तसा उल्लेख मिळत नाही. वैदिक समाज हा निसर्गपूजक समाज होता. पण वैदिक वाङमयात एके ठिकाणी इंद्राच्या मूर्तीचा उल्लेख सापडतो; पण मंदिरांचा तसा उल्लेख नाही आहे. वैदिक धर्माचा पाया हा यज्ञ संस्था होता. कालांतराने यज्ञ संस्थेची जागा मूर्ती पूजा, मंदिर उभारणी, व्रते आणि तीर्थयात्रा यांनी घेतली.

२. द्वितीय चरण : या चरणाचा कालखंड हा साधारण इ.स.पूर्व ४०० ते इ.स. १०० इतका आहे. या चरणात आपल्याला मंदिर स्थापत्याचा प्राथमिक विकास दिसून येतो. मौर्य-शुंग-कुषाण-सातवाहन या राजघराण्यांची सत्ता या कालखंडात भारतावर होती. भारहूत आणि विशेष करून सांची येथील शिल्पांमध्ये अनेक प्रकारच्या उपासना स्थळांचे अंकन करण्यात आले आहे. ही उपासना स्थाने ही बहुत करून बौद्ध होती आणि त्यांच्या अंकनात बऱ्यापैकी विविधता आहे. यातील काही आयतने ही छोट्या कुटीप्रमाणे आहेत; तर काही अतिशय भव्य आहेत. या वास्तू ही आयातनेच आहेत असे निश्चितपणे सांगता येते. कारण त्यांच्या सभोवती नमस्कार मुद्रेतील व्यक्तींचे चित्रण करण्यात आले आहे. विदिशा या प्राचीन नगरीच्या परिसरात काही शुंगकालीन मंदिरांचे अवशेष आणि ध्वजस्तंभ सापडले आहेत.

मथुरा येथील शिल्पपटांवर काही प्रार्थनास्थळांचे अंकन झाले आहे. मथुरा नगराच्याजवळ असणाऱ्या माट या गावी कुषाणांचे एक देवकुल उत्खननांदरम्यान सापडले. तज्ज्ञांच्या मते हे देवकुल एक शैव मंदिर होते. या ठिकाणावरून कुषाण सम्राट विमा तक्षम आणि कनिष्क यांच्या भारदस्त मूर्तीदेखील सापडल्या आहेत आणि सध्या त्या मथुरा येथील शासकीय वस्तुसंग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तसेच मथुरेजवळ सोनख या ठिकाणी उत्खननादरम्यान एक नागदेवतेचे मंदिरदेखील सापडले आहे. मथुरा येथे सापडलेल्या पुराभिलेखांमध्येदेखील मंदिरांचे उल्लेख सापडतात. या काळात मोठ्या प्रमाणावर कोरीव लेण्यांचीदेखील निर्मिती करण्यात आली. ही लेणी बहुत करून बौद्ध होती आणि काही जैन धर्मीय होती.

३. तृतीय चरण : या चरणाचा कालखंड हा इ.स. ४००- इ.स. ६०० असा आहे. या काळात गुप्त साम्राज्याची स्थापना झाली आणि हिंदू धर्माचे पुनरुत्थानही झाले. गुप्त काळात भोपाळजवळील उदयगिरीच्या टेकड्यांमध्ये भारतातील पहिले हिंदू लेणी कोरण्यात आली. ही लेणी साधारण इ.स. ४ थ्या शतकाच्या शेवटास किंवा इ.स. ५ व्या शतकाच्या प्रारंभी निर्माण केली गेली. गुप्त काळापासून मंदिर निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर दगड वापरला जाऊ लागला.

सांची, भीतरी, ऐरण, नाचना, भुमरा, तीगावा, अहिछ्त्र, मथुरा, पद्मावती, भित्तरगाव आणि देवगढ ही गुप्तकालीन मंदिर स्थापत्याची प्रमुख केंद्रे होती. या काळात नागपूरजवळील रामटेक येथे वाकाटक सम्राट रुद्रसेन द्वितीय आणि त्याची पत्नी प्रभावती गुप्ता (गुप्त सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य याची कन्या) यांच्या पुढाकाराने नरसिंह, वराह, त्रिविक्रम तसेच वासुदेव-संकर्षण यांची मंदिरे बांधण्यात आली. रामटेकच्या व्यतिरिक्त विदर्भात मांढळ, पवनार आणि मनसर हीदेखील वाकाटकांची मंदिरनिर्मितीची महत्त्वाची केंद्रे होती.

४. चतुर्थ चरण : हा कालखंड साधारण इ.स. ७०० पासून सुरू होतो. या कालखंडात मंदिर स्थापत्याच्या अनेक प्रादेशिक शैलींचा उदय झाला. यातील काही शैली होत्या -लाट (गुजरात), कलिंग (ओडिशा), वैराट (मध्य प्रदेश) आणि भूमिज (मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान). पुढे या शैलींचेदेखील उपप्रकार निर्माण झाले. याच काळात कर्नाटकात बदामी चालुक्य आणि तमिळनाडूत पल्लव यांनी मंदिर स्थापत्याला बरेच प्रोत्साहन आणि आर्थिक मदत दिली. कर्नाटकात ऐहोले, बदामी आणि पट्टडक्कल; तर तमिळनाडूत महाबलीपूरम आणि कांचीपूरम ही मंदिर स्थापत्याची प्रमुख केंद्रे होती.

पट्टडक्कल येथे तर नागर आणि द्राविड या दोन्ही शैलीची मंदिरे उभारली गेली. याच काळात महाराष्ट्रात प्रथम कलचुरी आणि नंतर राष्ट्रकुट या राजघराण्यांच्या छत्रछायेत मंदिर स्थापत्याला, विशेष करून हिंदू लयन स्थापत्याला बहर आला. मुंबईजवळ घारापुरी, जोगेश्वरी, मंडपेश्वर येथे पाशुपत शैव लेणी कोरण्यात आली; तसेच वेरूळ येथे या शैव संप्रदायाची काही लेणी निर्माण करण्यात आली. वेरूळ हे बौद्ध आणि जैन लयन स्थापत्याचे केंद्र म्हणूनदेखील विकसित झाले. वेरूळ येथील एकाश्म कैलास मंदिर राष्ट्रकुटांच्या कारकिर्दीत (इ.स. ८ वे शतक) कोरले गेले. हे मंदिर भारतातील सर्वात मोठे एकाश्म मंदिर आहे.

मंदिर स्थापत्य शैली
भारतात मंदिर स्थापत्याच्या दोन प्रमुख शैली आहेत- उत्तर भारतात नागर शैली आणि दक्षिण भारतात द्राविड शैली. या दोन शैलींव्यतिरिक्त वेसर आणि भूमिज याही दोन स्थापत्य शैली अस्तित्वात होत्या. आपण या चारही मंदिर स्थापत्यशैलींचा आढावा घेऊ या.

१. नागर शैली : नागर शैलीची मंदिरे ही मूलतः उत्तर भारतात उभारली गेली. या शैलीतील विकसित मंदिरांना रेखा नागर प्रासाद असे म्हटले जाते. या शैलीतील मंदिरांमध्ये प्राथमिकरीत्या दोन घटक असतात- गर्भगृह आणि मंडप. गर्भगृहात देवतेची मूर्ती किंवा शिव लिंग यांची प्रतिष्ठा केली जाते. गर्भगृह हे मंदिराचे सर्वात महत्त्वाचे घटक आहे. गर्भगृहाला साधारण एकच द्वार असते. मंडप हा गर्भगृहाच्या समोर बांधला जातो. तो तीन बाजूंनी मोकळा असतो. मंडपातून भक्तांना गर्भगृहातील देवतेचे दर्शन होते. अनेक वेळा मंडपांमध्ये सुंदर कोरीव काम असलेले खांब असतात. नागर शैलीचा विकास साधारण गुप्त काळापासून सुरू झाला. प्रारंभिक काळात नागर मंदिरांमध्ये मंडप आणि गर्भगृह हे दोनच घटक होते. मंडप आणि गर्भगृह हे साधारण चौकोनी आकाराचे असत. पुढे गर्भगृहाच्या सभोवती प्रदक्षिणापथ बांधला गेला पण सर्व मंदिरांमध्ये प्रदक्षिणापथ असेलच असे मात्र नाही.

काही काळानंतर गर्भगृह आणि मंडप यांच्या मध्ये ‘अंतराळ’ म्हणजेच एक प्रकारचा vestibule हादेखील बांधण्यात आला. साधारण इ.स. ७ व्या शतकापासून मंदिर शिखरांचा विकास सुरू झाला. सुरुवातीच्या नागर मंदिरांमध्ये शिखर दिसत नाही. शिखर हे भारतातील सर्व मंदिर स्थापत्यशैलींमधले सर्वात प्रमुख वैशिष्ट्य आहे. या शैलींमधले भेद हे बऱ्याच अंशी शिखरांच्या भिन्नतेच्या आधारे केले गेले आहेत. गर्भगृहावरचे शिखर हे सर्वात उंच असते. प्रारंभिक मध्यकाळात मंदिरांच्या मंडपांची तर संख्या वाढलीच, पण त्यांच्यावरदेखील शिखरे बांधण्यात आली; पण ही शिखरे उंचीने आणि रचनेत गर्भगृहावरील शिखरापेक्षा भिन्न होती. कलिंग आणि खजुराहो मंदिर स्थापत्यशैलींमध्ये मंडपांची शिखरे ही pyramidal होती. मंदिरांमध्ये प्रकाश आणि हवेकरिता खिडक्या अथवा गवाक्षांचीदेखील सोय केली जात.

नागर मंदिरे ही अनेकवेळा ‘जगती’ नावाच्या प्लॅटफॉर्मवर उभारली जात आणि जगती ही दगड किंवा विटांनी बांधली जात असे. जगतीवर पीठ आणि पीठाच्या वरती अधिष्ठान किंवा वेदीबंध बांधले जायचे. अधिष्ठानावर मंदिर उभारले जात असे. मंदिरांच्या भिंतींना ‘भित्ती’ असे म्हटले जाई. मंदिरांच्या अधिष्ठानावरती अनेक वेळा नर थर, अश्व थर आणि गज थर कोरले जात. मंदिराचे अधिष्ठान आणि शिखर यांच्या मधल्या भागाला ‘जांघ’ असे म्हटले गेले आहे. नागर शैलीतील मंदिर शिखरांमध्ये मुख्य शिखराच्या व्यतिरिक्त आकाराने लहान अशी शृंग शिखरेदेखील बांधली जात. ही शृंग शिखरे मुख्य शिखराला जोडून असत. काही नागर मंदिरांमध्ये शिखरांमध्ये भूमी असत. शिखराच्या वरती ‘स्कंध’ नावाचे मोल्डिंग असे आणि त्यावर ग्रीवा बांधली जात असे.

ग्रीवेच्या वरती गोलाकृती आमलक आणि त्यावर चंद्रिका बांधली जात. चंद्रिकेवरती आमलक सारिका आणि त्यावर कलश ठेवला जाई. मंदिराच्या शिखरावरती गर्भगृहात प्रतिष्ठापना झालेल्या देवतेचे आयुध आणि ध्वज उभारले जात. उदा. : शैव मंदिर असेल तर त्रिशूल आणि वैष्णव मंदिर असेल तर चक्र. नागर मंदिरांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे द्वारशाखा. या द्वारशाखांवर उत्तम प्रकारचे कोरीव काम केले जात असे. या द्वारशाखा ‘T’ या इंग्रजी अक्षराप्रमाणे असत. द्वारशाखेवरच्या ललाटबिंबावर गर्भगृहात असलेल्या देवतेचे छोटे शिल्प असे. या द्वारशाखांवरती फुलांची नक्षी, गण, दंपती आणि गंगा-यमुना या नदी देवता यांची शिल्पे असत. या प्रकारच्या द्वारशाखा गुप्त काळापासून बांधल्या गेल्या. अजंता येथील लेण्यांमध्येदेखील अशा प्रकारच्या द्वारशाखा कोरल्या गेल्या आहेत.

२. द्राविड शैली : द्राविड शैली ही मुख्यत्वे दक्षिण भारतात आणि विशेष करून तमिळनाडूत दिसून येते. असे म्हटले जाते की द्राविड मंदिरांचे मूळ हे महाश्मयुगीन (megalithic) समाध्यांमध्ये आहे. तमिळनाडूत आणि कर्नाटकात साधारण इ.स. ६ व्या शतकात लयन स्थापत्याचा प्रारंभ झाला. तमिळनाडूत पल्लव राजे महेंद्रवर्मन आणि नृसिंहवर्मन यांनी अनेक लेण्यांची आणि एकाश्म मंदिरांची निर्मिती केली. महाबलीपूरम येथील एकाश्म मंदिरे ही द्राविड शैलीत कोरली गेली. साधारणपणे द्राविड मंदिरांना ‘विमान’ असेही म्हटले जाते. या मंदिरांचे स्थापत्य हे आगम, शिल्पशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विषयांच्या ग्रंथांवर आधारले आहे. द्राविड शैलीतील मंदिरांमध्ये स्थापत्याची सहा अंगे सापडतात. ती म्हणजे :
१. अधिष्ठान : अधिष्ठानावर संपूर्ण मंदिर उभारले जाते
२. पाद : हे अंग म्हणजे मंदिराच्या भिंती आणि खांब ज्यांच्या आत गर्भगृह असते.
३. प्रस्तर : प्रस्तर हे मंदिराच्या भिंती आणि विमान यांच्यामधला भाग. अनेक वेळा प्रस्तरावर चैत्य गवाक्षांचे अंकन केले जाते.
४. ग्रीवा : ग्रीवा म्हणजे मंदिराच्या विमानावरचा भाग.
५. शिखर : ग्रीवेच्या वरती शिखर उभारले जाते. द्राविड शैलीत ग्रीवेच्या वरती असलेल्या भागालाच शिखर असे म्हणतात. ही शिखरे नागर, द्राविड किंवा वेसर प्रकारची असतात.
६. स्तूपी : स्तूपी हा मंदिराचा सर्वात वरचा भाग असतो आणि या भागात कलशाची प्रतिष्ठा करण्यात येते. द्राविड विमाने ही एकताल (एक मजला असणारे) किंवा बहुताल (अनेक मजले असलेले) असतात. सर्वात खालचा मजला हा आकाराने सर्वात मोठा असतो आणि त्यानंतर चा प्रत्येक मजला हा त्याच्या खालच्या मजल्यापेक्षा आकाराने लहान असतो. द्राविड विमान हे एका pyramid सारखे असते. शिल्प शास्त्रांमध्ये १६ मजले असलेल्या विमानांचा उल्लेख सापडतो. प्रत्येक मजल्यावर हर्म्य आणि प्रस्तर असतात. कूट आणि शाल हे द्राविड मंदिरांचे दोन प्रकार आहेत आणि त्यांची अनेक उदाहरणे या स्थापत्यशैलीत आढळतात.

३. वेसर शैली : वेसर शैलीत द्राविड आणि नागर शैलींचा संगम दिसून येतो. वेसर शिखरांवरती अनेक कूटस्तंभ असतात आणि हे कूटस्तंभ मुख्य मंदिर शिखराची लघु प्रतिकृती असतात. वेसर मंदिरांची शिखरे गोलाकार किंवा घंटेच्या सारखी असतात. कर्नाटकात काही चालुक्य कालीन आणि काही होयसळ कालीन मंदिरे ही वेसर प्रकारची आहेत.

४. भूमिज शैली : ही मंदिर स्थापत्य शैली मुख्यत्वे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे सापडते. या मंदिर शैलीला स्टेला क्रॅमरीश यांनी प्रथम प्रकाशात आणले. भूमिज म्हणजे थेट भूमीतून जन्म घेणारे मंदिर तसेच अनेक कूटस्तंभांनी युक्त असणाऱ्या भूमी या मंदिर शिखरांवर उभारल्या जातात. समरांगणसूत्रधार, अपराजितपृच्छ आणि क्षीरार्णव या ग्रंथांमध्ये या मंदिर शैलीची माहिती देण्यात आली आहे. भूमिज मंदिरे ही साधारणपणे जगतीवर बांधली जात नाहीत. त्यांच्या शिखरांच्या चारही बाजूंच्या मध्य रथांवर ‘लाट’ असते. या लाटांना जोडून मुख्य शिखराची प्रतिकृती असणारी छोटी शिखरे ज्यांना कूटस्तंभ किंवा स्तंभकूट म्हटले जाते यांची उभारणी केली जाते.

भूमिज मंदिरांच्या लाटांच्या खाल्या बाजूस चैत्य गवाक्ष किंवा सूरसेनक असते. मंदिर शिखराच्या समोरच्या लाटाखाली शुकनास असते. या गवाक्षांमध्ये आणि शुकनासिकेत देवतांच्या मूर्ती कोरल्या जात. भूमिज मंदिरांमध्ये सहसा प्रदक्षिणापथ नसतो. माळवा प्रांत हा भूमिज शैलीचा मूल प्रदेश मानला जातो. मुंबईजवळील अंबरनाथ येथे असलेले भूमिज मंदिर हे सर्वात जुने डेटेड भूमिज मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती शिलाहार राज्यांनी इ.स. १०६० मध्ये केली. महाराष्ट्रात सिन्नर येथील गोंडेश्वर मंदिर हेदेखील भूमिज मंदिराचे उत्तम उदाहरण आहे. मध्य प्रदेशमधील उदयपूर येथे स्थित असलेले उदयेश्वर मंदिर हेदेखील भूमिज शैलीचे अत्यंत सुंदर उदाहरण आहे आणि हे मंदिर इ.स. १०८० मध्ये पूर्ण झाले.

उत्तर भारतात गुर्जर प्रतिहारकालीन अनेक भव्य मंदिरे आहेत तसेच चंडेल राजवंशाच्या कारकिर्दीत खजुराहो येथे उभारली गेलेली जवळ जवळ सर्वच मंदिरे आणि त्यातही विशेष करून कंडारीय महादेव मंदिर ही नागर स्थापत्य शैलीची सर्वोत्तम उदाहरणे आहेत. कलिंग किंवा ओडिशा प्रदेशाला मंदिर स्थापत्याच्या समृद्ध वारसा लाभला आहे. कलिंग शैली ही नागर शैलीची जरी उपप्रकार असली तरी त्याचा विकास स्वतंत्रपणे झाला. या शैलीची मंदिरे मुखत्वे भुवनेश्वर, पुरी आणि कोणार्क येथे सापडतात. कलिंग शैलीत रेखा देऊळ म्हणजे गर्भगृह आणि त्यावरचे उंच शिखर आणि पिढा देऊळ किंवा जगमोहन अथवा मंडप असे दोन प्रकार आहेत. खखर नावाचा ही एक प्रकार या शैलीत आढळतो आणि याचा वापर शाक्त मंदिरांकरिता अधिक केला जात असे.

कलिंग मंदिर शैली ही साधारण इ.स. ७ व्या शतकापासून उदयास आली. प्रारंभिक काळात रेखा देऊळ आणि त्यासमोर असलेले एक जगमोहन एवढेच घटक या मंदिर शैलीत होते; पण जसाजसा मंदिरांशी निगडित धार्मिक विधींचा विकास झाला, तसे मंदिरांच्या समोर उभारण्यात येणाऱ्या मंडपाचीदेखील संख्या वाढली. कलिंग शैलीतील अनेक मंदिरांमध्ये भोग आणि नट मंडपे असतात. या मंडपांचा थेट संबंध अनुक्रमे भोग म्हणजेच नैवेद्य आणि संगीत, नृत्य इत्यादी कलांशी आहे. परशुरामेश्वर, मुक्तेश्वर, लिंगराज, पुरी येथील जगन्नाथ मंदिर, कोणार्क येथील सूर्यमंदिर तसेच अनंत वासुदेव मंदिर ही कलिंग शैलीची भव्य उदाहरणे आहेत.

मध्य काळात बंगाल मध्ये टेराकोटापासून निर्माण केलेली अनेक मंदिरे आहेत. त्यांची स्थापत्य शैली इतर स्थापत्यशैलींपेक्षा भिन्न आहे. या प्रकारची मंदिरे विशेषकरून पश्चिम बंगाल येथील ‘बिष्णुपूर’ या गावात सापडतात. ही मंदिरे मुखत्वे वैष्णव किंवा राधा-कृष्णाची मंदिरे आहेत. ही मंदिरे त्यांच्यावर अंकित झालेल्या शिल्पांसाठीदेखील सुविख्यात आहेत. तामिळनाडुत पल्लव आणि चोल काळात अनेक द्राविड शैलीच्या मंदिरांची निर्मिती करण्यात आली. तंजावूर येथील बृहदेश्वर मंदिर हे द्राविड शैलीचा परम बिंदु आहे. पुढे पांड्य, विजयनगर आणि नायक काळांत या प्रदेशात अनेक मंदिरे उभारण्यात आली. मदुराई येथील मीनाक्षी मंदिर, श्रीरंगम येथील रंगनाथ मंदिर तसेच कांची येथील एकामरेश्वर आणि वरदराज पेरुमल मंदिर ही या कालखंडातील काही महत्त्वपूर्ण उदाहरणे आहेत.

प्रारंभिक मध्ययुगात कर्नाटकात अनेक होयसळ कालीन मंदिरे आहेत. ही मंदिरे प्लॅनमध्ये ताराकृती आहेत. व्हर्टिकल ओरिएंटेशनपेक्षा या मंदिर शैलीचा भर horizontal विस्तारावर अधिक आहे. यातील काही मंदिरांना एकापेक्षा अधिक गर्भगृहे आहेत. या मंदिरांवर अनेक प्रकारची शिल्पे आहेत. या शिल्पांमध्ये अतिशय आखीव-रेखीव आणि तपशीलवार कोरीवकाम करण्यात आले. सौंदर्यशास्त्र आणि मूर्तिविज्ञान या दोन्ही शास्त्रांच्या दृष्टिकोनातून ही शिल्पे महत्त्वाची आहेत. हळेबिडू येथील होयसळेश्वर मंदिर, बेलूर येथील चेन्नकेशव मंदिर तसेच सोमनाथपूर येथील चेन्नकेशव मंदिर ही होयसळ शैलीची प्रमुख उदाहरणे आहेत. मध्ययुगात विजयनगर साम्राज्यात, विशेष करून हंपी किंवा विजयनगर या शहरात अनेक मंदिरांची उभारणी करण्यात आली.

विरुपाक्ष, विठ्ठल, हजार राम आणि कृष्ण ही या स्थापत्यशैलीत बांधली गेलेली काही महत्त्वाची मंदिरे आहेत. महाराष्ट्रात शिलाहार आणि यादव राजघराण्यांच्या राज्यकाळात अनेक भव्य मंदिरे उभारली गेली. गुजरातमध्ये प्रारंभिक मध्ययुगात मरू-गुर्जर स्थापत्य शैलीची अनेक उदाहरणे सापडतात आणि त्यातील सर्वात देखणे मंदिर म्हणजे मोढेरा येथील इ.स. ११ व्य शतकात बांधलेले सूर्य मंदिर. या मंदिराच्या प्रांगणात मुख्य मंदिर आणि त्याच्या समोरचा अनेक स्तंभांनी युक्त असा मंडप आणि एक भव्य पुष्करणी या तीन वास्तु आहेत. इ.स. १६ व्य शतकात मथुरा-वृंदावन येथे कृष्णाला समर्पित अशी लाल सँडस्टोनपासून बांधलेली काही मंदिरे आहेत आणि या मंदिरांमध्ये वृंदावन येथील गोविंद देव मंदिर हे सर्वात भव्य आहे.

भारतीय मंदिरे यांचे महत्त्व हे केवळ धार्मिक नव्हते. ही मंदिरे कला, संस्कृती, समाज आणि अर्थ यांचीदेखील केंद्रे होती. मंदिरे ही शैक्षणिक केंद्रे होती. या मंदिरांशी संलग्न अनेक मठ आणि वेद पाठशाळा होत्या आणि वर्तमानातसुद्धा आहेत. इ.स. ९ व्या शतकात शृंगेरी, पुरी, बदरिकाश्रम आणि द्वारका येथे आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेली चार आम्नाय पीठे ही वैदिक

शिक्षणव्यवस्थेची प्रमुख केंद्रे आहेत. अनेक मंदिरांच्या ग्रंथागारांमध्ये अनेक महत्त्वाच्या ग्रंथांची हस्तलिखिते सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. संगीत आणि नृत्य या दोन्ही कलांच्या उत्कर्षाचा संबंध थेट मंदिरांशी आहे. संगीत आणि नृत्य या दोन्ही कला उपासनेची माध्यमे समजली जातात. मंदिरांच्या नित्य विधींमध्ये या दोन्ही कलांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतातील अनेक शास्त्रीय नृत्यांचा उगम हा मंदिरांमध्ये झाला. तसेच मध्ययुगात पुष्टिमार्गीय संप्रदायाच्या मंदिरांमध्ये हवेली संगीताचा विकास झाला. हे हवेली संगीत प्राचीन धृपद संगीतावर आधारलेले आहे.

पुष्टिमार्गीय मंदिरांना हवेली असे म्हटले जाते आणि त्यांत प्रस्तुत झालेल्या संगीताला हवेली संगीत असे म्हटले जाते. हवेली संगीत हे विशेष करून कीर्तन या प्रकारात मोडते आणि या पदांमध्ये सहसा कृष्णाच्या लीलांचे वर्णन असते. देवतेसमोर प्रस्तुत झालेल्या संगीताला राग सेवा असे म्हटले जाते. वृंदावन येथील राधारमण मंदिरात वर्तमानकाळातसुद्धा अनेक गायक, वादक आणि नर्तक राधारमण यांचे पूजन राग आणि नृत्यसेवेद्वारे करतात. मंदिरांमध्ये स्थापत्य आणि शिल्पकला तसेच चित्रकला यांचादेखील विकास झाला.

मथुरा-वृंदावन प्रदेशात सांझी नावाचा एक रांगोळीचा प्रकार आहे. ही सांझी कला जनमानसात तसेच मंदिरांमध्ये विकसित झाली. अनेक मंदिरे ही तेथील भोग किंवा नैवेद्य यासाठीही प्रसिद्ध आहेत. देवाला अर्पण केलेला भोग हा प्रसाद म्हणून भक्तांना वितरित केला जातो. पुरी येथील जगन्नाथ मंदिरातील प्रसाद हा जगप्रसिद्ध आहे. रसगुल्ला हे मिष्टान्न मुळात या मंदिरातील भोग परंपरेत तयार करण्यात आले. भारतातील अनेक मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नदान करण्यात येते.

मंदिर हे एक सामाजिक संस्थादेखील आहे. अनेक वेळा न्यायनिवाडा हा मंदिरात केला जात असे. मंदिरांच्या परिसरात अनेक अग्रहार असत जी विद्यासंपादनाचीदेखील केंद्रे होती आणि आहेत. मंदिरातील उत्सवांमुळे सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत होते. मंदिरांमुळे अनेक व्यक्तींना रोजगार आणि उपजीविकेची साधने प्राप्त होतात. यात पुजारी, कारागीर, स्वयंपाकी, कलाकार तसेच पुष्पमाला तयार करणारे अशा अनेक लोकांचा समावेश आहे.

भुवनेश्वर, ओडिशा येथील लिंगराज मंदिराने जवळ जवळ १०० कुटुंबांना उपजीविकेची साधने प्रदान केली आहेत. मंदिरांना अगदी प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळत असत. कधी कधी राजे काही गावे किंवा जमिनी मंदिरांना दान करत आणि या गावांचे अथवा जमिनींचे उत्पन्न हे मंदिर व्यवस्थापनाकरिता वापरले जात असे. मंदिर संस्कृतीचा हा समृद्ध वारसा जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शासकीय संस्थांव्यतिरिक्त आपणही मंदिरांच्या संवर्धनासाठी आपल्या क्षमतेनुसार योगदान दिले पाहिजे.
sneha.itihaas@gmail.com

टॅग्स :artHindu religionTemples