
ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...
संजीव कुसुरकर
यशस्वी व्यवसायासाठी अचूक व्यवस्थापन जसे गरजेचे आहे, तसे मानवी संसाधने प्रशिक्षित असणे कोणत्याही व्यवसायवृद्धीस आवश्यक बाब ठरते. त्याची संकल्पना गीता आणि ज्ञानेश्वरीत पाहायला मिळते....चला जाणून घेऊ या नव्या बाबी
गीता मुळात अध्यात्मप्रधान नीतीशास्त्र आहे आणि त्यावर ज्ञानेश्वरीच्या विस्तृत विवरणात अध्यात्माच्या बरोबरीने विविध विषयांचे संदर्भ पाहायला मिळतात. व्यवस्थापन शास्त्र आणि नीतीमूल्यांचा नजीकचा संबंध आहेच. नियोजन, उपलब्धी आणि परिणाम या प्रमुख तीन बाबींचा समावेश व्यवस्थापन शास्त्रात येतो आणि त्याची जोड अर्थातच मानवी धाग्यांशी जोडलेली आहे. येथे भांडवल, मानवी संसाधन आणि बाजारपेठ यांचा विचार होतो. ज्ञानेश्वरीत मानवी मूल्यांचा विचार प्रकर्षाने आला आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या सर्वांचा संबंध कर्माशी जोडला गेला आहे. उत्तम कर्म घडणे हे व्यवस्थापन तत्वांशी निगडित आहे, त्याचा विचार ज्ञानेश्वरीत आहे. (What Dnyaneshwari by Saint Dnyaneshwar Say About Management Skills)
भगवद्गीतेच्या (Bhagawgita) सातशे श्लोकांवर माऊलींनी (Saint Dnyaneshwar) नऊ हजार ओवींची सविस्तर टिप्पणी केली आहे. गीता मुळात अध्यात्मप्रधान नीतीशास्त्र आहे आणि त्यावर ज्ञानेश्वरीच्या विस्तृत विवरणात अध्यात्माच्या बरोबरीने विविध विषयांचे संदर्भ पाहायला मिळतात. व्यवस्थापन शास्त्र (Management Science) आणि नीतीमूल्यांचा नजीकचा संबंध आहेच. नियोजन, उपलब्धी आणि परिणाम या प्रमुख तीन बाबींचा समावेश व्यवस्थापन शास्त्रात येतो आणि त्याची जोड अर्थातच मानवी धाग्यांशी जोडलेली आहे. येथे भांडवल, मानवी संसाधन आणि बाजारपेठ यांचा विचार होतो. ज्ञानेश्वरीत मानवी मूल्यांचा विचार प्रकर्षाने आला आहे.
ज्ञानेश्वरीतील तिसरा आणि अठरावा अध्याय हे कर्माशी निगडित आहेत. त्यातील ओवी व्यवस्थापन सूत्रांशी तंतोतंत जुळतात. आज सर्वत्र व्यवस्थापन शास्त्रांचे अनेक परिमाण व परिणाम सांगणारे तज्ज्ञ आपण पाहतो. यशस्वी व्यवसायासाठी अचूक व्यवस्थापन जसे गरजेचे आहे, तसे मानवी संसाधने प्रशिक्षित असणे कोणत्याही व्यवसायवृद्धीस आवश्यक बाब ठरते. त्याची संकल्पना गीता आणि ज्ञानेश्वरीत पाहायला मिळते.
‘‘म्हणऊनी महाभारती जे नाही|ते नोहेचि लोकी तिहीं’’ (१.४७) हे म्हणताना हा ग्रंथ व्यावहारिक जीवनाचे सुद्धा अधिष्ठान आहे, हे स्पष्ट होते.
व्यवसायात प्रत्येकाचे काम वेगळे आहे आणि त्यास अनुसरून व्यवस्थापन पद्धती, नियम ठरलेले आहेत. उच्चपदस्थ अधिकारी व्यक्ती आणि त्यांच्या अखत्यारीत काम करणारे दोघांचा उद्देश हा व्यवसायवृद्धी हाच आहे. तरी ‘‘म्हणोनि जे जे उचित आणि अवसरे करुनि प्राप्त’’ (३.७८) या नियमाचे पालन सर्वांसाठी आहे.
तरी स्वधिकाराचेनि नावे|
जे वाटिया आले स्वभावे|
ते आचरे विधीगौरवे|
शृंगारोनि||
ज्ञानेश्वरी १८.२००
वरील ओवीत प्रत्येकाला आपल्या अधिकारानुसार काम दिले जाते, त्याचे जे नियम ठरले आहेत, त्यानुसार उत्कृष्टपणे काम करावे, तेच व्यवस्थापनाला अपेक्षित आहे. मोठ्या पदावरील व्यक्ती दुसऱ्या लोकांकडून काम कसे करून घ्यायचे, हे ठरवते. त्यातच त्यांचे कौशल्य असते. एखादा साधा इंजिनियर आपल्या साहेबांच्या अखत्यारीत असलेले काम करीत असेल, तर ते अधिकाराचे उल्लंघन ठरू शकते, हे व्यवस्थापन शास्त्र सांगते.
Every person is assigned with his role depending upon his strength & quality to perform job within ambit of rules, he should give the best to organisation!
हे देखिल वाचा-
आपल्या वाट्यास आलेले कर्म उत्कृष्टपणे केल्याने यश शिखर गाठता आले, तर आनंदाने बेहोष होऊ नये
परी आदरिले कर्म दैवे|
जरी समाप्तीते पावे|
तरी विशेषे तेथे तोषावे|
हेही नको|| २.२६८
हा संदर्भ येतो अथवा
का निमित्ते कोणे एके|
ते सिद्धी न वचता ठाके|
तरी तेथिचेनि अपरितोखे|
क्षोभावे ना|| (२.२६९)
अथवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये अपयशाचा सामना करावा लागला, तर निराशा, तळमळ न होता पुन्हा जोमाने कार्यरत राहिले पाहिजे.
Every business is full of ups & downs, we should accept this either as boost or as challenge as situation demands.
जो थांबला तो संपला, हा व्यवस्थापनाचा मोठा नियम आहे. तो याच पद्धतीने ज्ञानेश्वरीत आला आहे.
याकारणें पार्था|
होआवी कर्मी आस्था|
हे आणिकाही एका अर्था|
उपकारेल|| ३.१५३
आपल्याला दिलेले काम हे यथासांग झाले पाहिजे, हेच व्यवस्थापन शास्त्र सांगते. केवळ ते सोपवले आहे म्हणून करतो ही भावना नसली पाहिजे; अन्यथा त्याचा दर्जा खालावतो हेच या ओवीत सूचित केले आहे.
जे कर्म भांडवला सूये|
तयाची चौगुणी येती पाहे|
येवढे सायास साहे|
जया घृती|| १८.७४७
एखादा व्यवसाय आपण सुरू करतो, त्याची निदान चौपट तरी प्राप्ती होईल, असे धोरण तो बांधतो. येथे नियोजनकौशल्याचा विचार आहे, त्यासाठी धैर्य आवश्यक आहे, हे सांगितले गेले आहे.
अगा स्वधर्मु हा आपुला|
जरी का कठीण जाहला|
तरी हाचि अनुष्ठीला|
भला देखे|| ३.२१९
हे देखिल वाचा-
आपल्यावर एखादी अवघड जबाबदारी दिली गेली असेल तर त्यामागे दोन कारणे असू शकतात. एक आपल्यावर दाखविलेला तो विश्वास असतो अथवा आपली परीक्षा त्या माध्यमातून घेतली जाते. दोन्ही ठिकाणी आपले प्रभुत्व सिद्ध करण्याची आपल्यावर जबाबदारी आहे.
The work culture may be difficult for us to follow but to work in adverse conditions proves our identity.
जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्म आहेच, ‘‘तैसेचि इया शरीरा|कर्म तंव देहा संसारा|’’(१५.१८१) आणि जेथे कर्म आहे, तो व्यवस्थापन धागा उत्तम व्यवहाराशी जोडलेला आहे. भांडवल कमतरता जाणवत असली तरी उपलब्ध मानवी, तंत्र साधनांचे व्यवस्थापन यशाची किनार गाठण्यास उपयुक्त ठरते.
ज्ञानेश्वरी हा अध्यात्मिक ग्रंथ असला तरी त्यास नीतिशास्त्राची जोड आहे, कर्माला ज्ञानाचे अधिष्ठान आहे. व्यवस्थापन शास्त्राचे यश त्याची मूल्ये जपण्यात आहे. काम लहान अथवा मोठे असा भेदभाव करणे शक्य नाही; कारण कोणताही व्यवसाय कीर्तिमान ठरण्यास त्यास सामूहिक प्रयत्नांची गरज असते. ज्ञानेश्वरी मी पणाचा त्याग शिकवते आणि I पेक्षा We ला महत्त्व देते.
‘‘तैसा कर्तृत्वाचा मदु आणि कर्मफलाचाआस्वादु’’ (१८.२०५) भोवती मी चिकटला आहे, तो सोडण्यास माऊली सांगतात.
ज्ञानेश्वरी आणि व्यवस्थापन सूत्रे HR संकल्पनेशी निगडित आहेत. Money, Men आणि Market हे तिन्ही महत्त्वाचे आहेतच; त्यातही HR विषयक ज्या बाबी ज्ञानेश्वरीत आल्या, त्याचा संक्षेपाने विचार केला आहे.
कर्मे ईशु भजावा (१८.१४४४) हे सांगताना कर्माविषयी आळस असू नये, ही दक्षता घ्यायला सांगतात. तो नियम व्यवस्थापन शास्त्राचे मूलतत्व आहे. कारण त्यामुळेच व्यवसायसिद्धता आहे, तेथेच यश आहे!
(लेखक बँकिंग व व्यवस्थापन क्षेत्रातील जाणकार अभ्यासक-विश्लेषक आहेत.)