‘कारकिर्दीबाबत समाधानी...!’, अंजन श्रीवास्तव
पूजा सामंत
प्रख्यात रेडिओ, टीव्ही, चित्रपट आणि ओटीटी कलावंत अंजन श्रीवास्तव यांची कारकीर्द तब्बल ५५ वर्षांची आहे. आपल्या यशाचे श्रेय अंजन चित्रपटसृष्टीतील ज्युनिअर आर्टिस्ट, मेकअप आर्टिस्ट, सहकलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांना तर देतातच पण आवर्जून आपल्या कुटुंबाचा, पत्नी मधू श्रीवास्तवचाही उल्लेख करतात. त्यांच्या निवासस्थानी झालेल्या गप्पांमध्ये त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या.
तुम्ही अलीकडेच वयाचा अमृतमहोत्सव, तसेच कारकिर्दीची ५५ वर्षे साजरी केलीत. मागे वळून पाहताना काय भावना आहेत?
अंजन श्रीवास्तव : माझा जन्म कोलकता येथे झाला. नंतर वडिलांसोबत आम्ही अलाहाबादला आलो. नंतर अभिनयाचे करिअर मुंबईत घडले. माझे व्यक्तिगत जीवन आणि कारकीर्द याबाबत मी समाधानी आहे. व्यक्तिगत जीवन सुखी ठरले त्याचे पूर्ण श्रेय माझी पत्नी मधू, दोन जुळ्या मुली, मुलगा व त्याची पत्नी अशा सगळ्यांना आहे. मी अभिनयात इतका गुंतलो की माझ्या कुटुंबाकडे द्यायला हवे तितके लक्ष देऊ शकलो नाही.
पण पत्नीने त्याबद्दल कधीही तक्रार केली नाही. उलट प्रापंचिक अडचणींपासून मला दूर ठेवले. तिनेच माझ्या आहाराकडे लक्ष दिले, आरोग्य सांभाळले. गेली काही वर्षे माझा मुलगा माझ्या करिअरकडेही लक्ष ठेवून आहे. ७५वा वाढदिवस साजरा करावा असा माझा मानस नव्हता, पण मुलांनी हट्टच धरला. करिअरची ५५ वर्षे, वयाची ७५ वर्षे असा एक कौटुंबिक छोटेखानी वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा केला.
तुम्ही अलाहाबाद बँकेचे कर्मचारी होतात, मग अभिनयाकडे कसे वळलात?
अंजन श्रीवास्तव : अलाहाबादमध्ये माझे शालेय शिक्षण झाले. या शहराला एक शैक्षणिक, सांस्कृतिक वारसा आहे. मोतीलाल, बलराज साहनी या अभिनेत्यांचे चित्रपट मी पाहिले आणि भारावून गेलो. आपोआप मी अभिनयाकडे आकर्षित झालो. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांत जमेल तसे मी अभिनयाचे दार ठोठावत होतो. माझ्या वडिलांना अभिनयाचे हे भूत अजिबात रुचले नव्हते, ते स्वाभाविकही होते. त्या काळात कलाकारांना आजच्यासारखा फार मानसन्मान नव्हता आणि मानधनदेखील जेमतेम असे. वडिलांनी फर्मान सोडले, ‘प्रथम पदवी घे. जमल्यास नोकरीदेखील कर.
अभिनयात आपले छंद पुरे होतात, पण पोट भरत नाही.’ मी बी.कॉम., एलएलबी पदवी घेतली आणि अलाहाबाद बँकेत नोकरीदेखील मिळवली. पण मुंबईला आल्याशिवाय अभिनयाच्या सुयोग्य संधी मिळणार नाहीत हे लक्षात आल्यावर मुंबई गाठली आणि ‘इप्टा’ (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) जॉईन केले. या संस्थेचा मी आतापर्यंत अध्यक्ष होतो. दिवसा बँकेत नोकरी आणि संध्याकाळी नाटकाचे शो करत असे.
दिवस मोठे धावपळीचे असले तरी अभिनयातून मला ऊर्जा मिळत असे. फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गजांचे, अमिताभ बच्चन ते शबाना आझमी यांचे अकाउंट माझ्या बँकेत उघडून मी त्या काळात विक्रमच केला. रेडिओ, रंगभूमी, चित्रपट, टीव्ही आणि अलीकडे ओटीटी अशा सगळ्या माध्यमांचा मी आनंद घेतला.
प्रख्यात व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘कॉमन मॅन’ त्यांनी वागले की दुनियामधून सामोरा आणला आणि याच सर्वसामान्य माणसाचे प्रतिनिधित्व तुम्ही ‘वागळे’ या व्यक्तिरेखेतून साकारले. या व्यक्तिरेखेने तुम्हाला काय दिले?
अंजन श्रीवास्तव : आर.के. लक्ष्मण यांची सर्जनशीलता वागळे या व्यक्तिरेखेतून दिसून येते. अत्यंत खुसखुशीत, मार्मिक आणि आजच्या काळाशी सुसंगत असा वागळे हा गृहस्थ आणि आता त्याच्या पुढची पिढी असा तो प्रवास चालूच आहे.
मला या मालिकेने नाव, पैसा, समाधान असे सगळेच मिळवून दिले. बाळासाहेब ठाकरेंनाही ही व्यक्तिरेखा फार आवडली होती. आज भी ऐसे कई दर्शक है जो मुझे ‘वागले’ नाम से ही पुकारते है, जानते है। वागले मेरी एक पुख्ता पहचान है। पण, वागळे ही व्यक्तिरेखा माझा सर्वोत्तम अभिनय आविष्कार आहे अथवा नाही, हे मी ठरवू शकत नाही. दामिनी, कभी हां कभी ना, चायना गेट, प्यार के दो पल अशा अनेक चित्रपटांमध्ये माझ्या उत्तम व्यक्तिरेखा होत्या.
वागळे मालिका करताना संपूर्ण देशभर माझी लोकप्रियता पसरली. तरीही मी नेहमीप्रमाणे रेल्वे, बस, रिक्षाने प्रवास करत असे. ओम पुरीने मला प्रेमळ सल्ला दिला होता, ‘अंजन, आता ‘वागळे’मुळे तुला स्टारडम लाभले आहे. माझी आधीची कार सुस्थितीत आहे, ती वापरायला घे.’ ओम पुरीने दाखवलेला चांगुलपणा माझ्या कायम स्मरणात राहील. इतकी माणुसकी दाखवणारे कलावंत दुर्मीळ आहेत! खरे म्हणजे ओम पुरी यांची ती लकी कार होती, तीच त्यांनी मला दिली.
संतोषी यांच्या दामिनी सिनेमात ऋषी कपूर, तर त्यांचा अभिनेता मुलगा रणबीरसोबत संजूमध्ये काम केलेत. अमिताभ बच्चन, विकी कौशल, आयुष्मान खुराना अशा अनेक ज्येष्ठ आणि युवा स्टारसोबत काम केले. हे अनुभव तुम्हाला किती वेगळेपण देऊन गेले?
अंजन श्रीवास्तव : पिछले ५५ सालों में मेरे लिये अभिनय का सफर बेहद समृद्ध रहा है। ऋषी कपूर हे अतिशय जिंदा दिल व्यक्तिमत्त्व होते. कुठलीही चुकीची गोष्ट त्यांना चालत नसे. रणबीर कपूर त्यांचा चिरंजीव; तो खूप निगर्वी, साधा आहे. संजू फिल्मच्यावेळी सेटवर तो जितक्या वेळा मला पाही तितक्या वेळा तो माझ्या पाया पडे.
मला त्याला शेवटी सांगावे लागले, ‘बस बेटा, अभी और नहीं झुकना!’ कपूर कुटुंबाचा नेहमी उत्तम अनुभव आला. अमिताभ बच्चन यांच्या सोबत शहेनशहा फिल्मचे शूटिंग केले. ते म्हणजे खरोखरच अभिनयातील शहेनशहा आहेत! विकी कौशल, आयुष्मान खुराना अगदी सहज अभिनय करतात. नव्या पिढीसोबत काम करणेदेखील मला एक नवी स्फूर्ती देते.
करिअर अथवा जीवनातला आव्हानात्मक प्रसंग कोणता?
अंजन श्रीवास्तव : २००३मध्ये नाटकाचा प्रयोग चालू असताना डोक्यात एक वजनदार वस्तू पडून गंभीर दुखापत झाली आणि तातडीने ऑपरेशन करावे लागले. डॉक्टरांनी सांगितले या विकाराला सब न्यूरल हेमॅटोमा म्हणतात. मी सहा महिने मेंदूतील संवेदना हरवून बसल्यासारखा घरी होतो. नंतर माझी जखम बरी झाली तरी मी काम करू शकत नव्हतो.
डॉक्टरांनी एक नामी शक्कल लढवली, ज्याने मला पुनर्जन्मच दिला म्हणायला हरकत नाही. मला माझा हरवलेला आत्मविश्वास त्याच नाटकात पुन्हा काम केल्यास परत येईल, असा सल्ला त्यांनी दिला आणि ही मात्रा मला अचूक लागू पडली! माझा आत्मविश्वास मला परत मिळाला आणि मी नव्या जोमाने कामाला लागलो.
जीवनात काही खंत, काही उणीव जाणवते का?
अंजन श्रीवास्तव : हो आहे ना! ५५ वर्षे मी रेडिओ, रंगभूमी, चित्रपट, ओटीटी, टीव्ही सगळ्याच माध्यमात उत्तम भूमिका करत आलोय. अनेक पुरस्कार मिळाले आहेत, पण पद्म पुरस्कार किंवा एखाद्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मला मिळाला नाही. पण तरीही अभिनयात झोकून देऊन काम करायचेच हा निर्धार कायम आहे आणि असेल!