Sarang Khanapurkar writes special articles about global warming changes
Sarang Khanapurkar writes special articles about global warming changes

पर्यावरण बदलांचे इशारे

पर्यावरण बदल हा मुद्दा फक्त मोठमोठ्या परिषदांमध्ये चर्चा करण्याचा नाही. ती आपल्या दैनंदिन व्यवहारांशी, घडामोडींशी आणि आयुष्याशी फार जवळून निगडीत असलेली बाब आहे. बिहारमध्ये गेल्या महिन्यात इतक्या विजा कशा कोसळल्या, तिथे सारखा पूर का येतो, समुद्रातील वादळाने आपला मोर्चा महाराष्ट्राकडे कसा वळवला, उत्तरेत टोळधाड कशी आली, अमेरिका - ऑस्ट्रेलियात लागणारे वणवे, जपान-चीन मधील पूर....! घटनांची यादी मोठी आहे. त्यांचा आपल्या भविष्याशी संबंध आहे, म्हणूनच या बदलांची किमान जाणीव असावी म्हणून त्यावर ऊहापोह करणे आवश्यक आहे.

बिहार आणि उत्तर प्रदेशात या वर्षी मे महिन्यापासून विजा कोसळून साडे तीनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला. बिहारमध्ये एकाच दिवशी विजा पडून 83 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या भागात दरवर्षी विजा पडतातच, पण यंदा हे प्रमाण लक्षणीयरीत्या अधिक आहे. याच प्रदेशाला सध्या पुराने त्रस्त केले आहे. गेल्या अनेक वर्षांत असे कधी झालेच नाही, असे पुराव्यासह म्हणता येतील अशा अनेक घटना गेल्या काही महिन्यांत भारतासह जगभरात घडल्या आहेत. पर्यावरण बदलाचे ठोस पुरावेच म्हणता येतील अशा घटनांनी या विषयावर पुन्हा एकदा; मात्र अधिक गांभीर्याने चर्चा करणे भाग पाडले आहे. 

तापमानातील वाढ हे पर्यावरण बदलाचे मूळ आहे आणि या तापमान वाढीला मानव कारणीभूत आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 'कार्बन ब्रिफ' या संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणानुसार, पर्यावरण बदलाच्या एकूण घटनांपैकी 69 टक्के घटना मानवी हस्तक्षेपामुळे घडल्या आहेत. पर्यावरणातील तीव्र बदलांपैकी 47 टक्के घटना या उष्णतेच्या लाटा तर, 15 टक्के घटना पाऊस आणि पुराच्या आहेत. कोळसा आणि इतर नैसर्गिक इंधनांचा वीजनिर्मिती, विविध उपकरणे, वाहतूक अशा कारणांसाठी वापर वाढल्याने त्यातून कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते.

हा कार्बन वातावरणात अडकतो आणि हवा गरम करतो. यामुळे पृथ्वीवरील एकूण तापमानात वाढ होते आहे. या तापमान वाढीमुळेच वातावरणात होणारे बदलांची गती वेगवान झाली असून त्यांचा प्रभावही वाढला आहे. असे बदल जगात सर्वत्र झाले आहेत. एखाद्या प्रदेशावरील तापमान अचानक वाढणे, नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडणे, पूर येणे, तापमान वाढून, विजा पडून जंगलांना वणवे लागणे, समुद्राची पातळी वाढणे अशा स्वरूपात आपल्याला हे बदल दिसू शकतात. गेल्या एक दोन वर्षांत घडलेल्या घटनांचा मागोवा घेतला तरी आपल्याला त्याची तीव्रता समजेल. 

वणवे आणि विजा

दक्षिण अमेरिकेतील अमेझॉनच्या जंगलात मागील वर्षी एक हजारहून अधिक वणवे पेटून हजारो हेक्टरवरील झाडांचा कोळसा झाला. यात अनेक दुर्मीळ, शेकडो वर्षे वयाचीही झाडे होती. या वर्षीही कॅलिफोर्नियामध्ये प्रचंड प्रमाणात विजा कोसळून जंगल पेटले आहे. आठवडाभरात बारा हजार विजा येथे कोसळल्या आहेत. असाच प्रकार बिहार-उत्तर प्रदेशातही यंदाच घडला आहे. कॅलिफोर्नियातील लोकांचे तर चांगलेच हाल झाले. येथे तापमानही प्रचंड वाढले असल्याने लॉकडाउनमुळे घरी बसलेल्या लोकांनी एसी, कुलरचा प्रचंड वापर केला. बाहेर जंगले धुमसत असल्याने धुराचे लोट टाळण्यासाठी दारे-खिडक्यांची बंदच ठेवावी लागत होती. उकाडा, उपकरणांचा वाढलेला वापर आणि आग यामुळे हवेतील कार्बनचे प्रमाण आणखीनच वाढले. ऑस्ट्रेलियात गेल्या वर्षी बुशफायरमध्ये या देशातील 20 टक्के जंगल नष्ट झाले, 3 अब्ज प्राण्यांचा बळी गेला. 400 मेगाटन कार्बन हवेत मुक्त झाला. तापमान वाढ कमी करण्याच्या प्रयत्नांना बसलेला हा प्रचंड मोठा धक्का आहे. 

पाऊस-पूर

या वर्षी चीन, जपान, भारत, अमेरिका, व्हिएतनाम, ब्रिटन या देशांमध्ये पुराने थैमान घातले. चीनमधील अनेक शहरे पाण्याखाली असल्याची आजची स्थिती आहे. या सर्वच ठिकाणी नेहमीपेक्षा अधिक असाच पाऊस झाला आहे. 

चक्रीवादळ

गेल्या काही वर्षांत समुद्रात चक्रीवादळ येण्याचे आणि त्यांची तीव्रता अधिक असण्याचे प्रमाण वाढले आहे. अमेरिकेला सध्या धडकलेले लॉरा वादळ, 2017 मधील मारिया आणि 2005 मधील कॅटरिना वादळे आठवत असतील. भारतालाही बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या वादळांचा तडाखा बसतोच, पण यंदा 1902 नंतर प्रथमच अरबी समुद्रात चार वादळे निर्माण झाली होती. हा सागरावरील तापमान वाढीचा परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

समुद्रपातळीत वाढ

जागतिक तापमानात वाढ झाल्याने ध्रुवांवरील बर्फ वितळून समुद्राची पातळी उंचावत आहे. अंटार्क्टिका खंडापासून तुटून महाप्रचंड हिमनग वेगळे होत आहेत. गेल्या दीडशे वर्षांत समुद्राची पातळी आठ इंचाने वाढली आहे.

ही केवळ ठळकपणे दिसणारी आणि अद्यापही आपल्या स्मरणात असलेली उदाहरणे आहेत. वातावरण बदलाची व्याप्ती आणि परिणाम याहून अधिक आहेत. हा बदल रोखायचा अथवा त्याचा वेग कमी करायचा असेल तर मूळ समस्येवर तोडगा काढायला हवा. तापमान वाढ ही ती समस्या आहे. याच वाढत चाललेल्या तापमानाला आळा घालण्याचा आटापिटा सुरू आहे. वाढत्या तापमानामुळे ओझोन थराला पडलेले भगदाड मोठे झाल्यावर आणि पर्यावरण तज्ज्ञांनी आवाज वाढवल्यावर 2015 मध्ये पॅरिस पर्यावरण परिषद झाली.

हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करणे आवश्यक असल्यावर यात एकमत झाले. यावेळी झालेल्या करारात जागतिक तापमानवाढ 2 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ न देण्याचे मान्य करण्यात आले. शिवाय पर्यावरणातील बदल ओळखून त्यानुसार बदल करण्याची क्षमता विकसीत करणे आणि त्यासाठीच्या प्रयत्नांना निधी कमी पडू न देणे यावरही जवळपास 190 देशांनी शिक्कामोर्तब केले. या घटनेला आता पाच वर्षे होत आली आहेत. या कराराची प्रभावी अंमलबजावणी अद्याप बाकी आहे. कार्बन उत्सर्जनात आघाडीवर असलेल्या अमेरिकेने करारातून अंग काढून घेतले आहे. आगामी अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्यास पर्यावरण प्रश्नाकडे लक्ष देण्याचे आश्वासन डेमोक्रॅटिक पक्षाने दिले आहे, पण ती जर-तरची बाब झाली. कार्बन उत्सर्जनात चीन क्रमांक एक वर आहे. एका अहवालानुसार, जगातील एकूण कार्बन उत्सर्जनात पुढील देश आघाडीवर आहेत.

चीन : 29.4%
अमेरिका : 14.3 %
युरोपीय देश : 9.8 %
भारत : 6.8%
रशिया : 4.9 %
जपान : 3.5%
 
पर्यावरण रक्षकांवर हल्ले

सर्वसामान्य जनतेच्या अज्ञानाचा आणि दुर्लक्षाचा फायदा पर्यावरणाच्या बाबीतही घेतला गेला आहे. निसर्गाचे रूपांतर स्रोतात झाले आणि त्याला हव्यास, स्वार्थ आणि क्वचित गरज आणि परिस्थिती यांची जोड मिळाल्याने पर्यावरण नाशाला सुरुवात झाली. पर्यावरणाला पूरक ठरणारी जीवनशैली विसरली गेल्याने समोर असलेल्या संकटाची अद्यापही अनेकांना जाणीव नाही. तरीही अनेक पर्यावरणप्रेमी एकट्याने किंवा संघटना करून लढा देत आहेत. मात्र त्यांना मार्गातून दूर करण्याचे प्रयत्न होत आहेत. या पर्यावरण रक्षकांमध्ये शेतकरी, आदिवासी, मच्छीमार असे निसर्गावर अवलंबून असणारे घटक आणि सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांचा समावेश आहे. पर्यावरण संरक्षणात यांची भूमिका मोठी असल्याचे संयुक्त राष्ट्रांनीही मान्य केले आहे. त्यांच्या चळवळींमुळेच 11 टक्के ठिकाणी संभाव्य ऱ्हास रोखला गेला आहे. पण त्यांच्याविरोधात कारस्थाने होतच असतात. एका आकडेवारीनुसार, आतापर्यंत 20 % पर्यावरणप्रेमीं विरोधात गुन्हे दाखल झाले असून , 18% जणांना मारहाण, तर 13% जणांची हत्या झाली आहे. 

समाजामध्ये पर्यावरणाबाबत जागृती येऊन त्यांच्या सवयी बदलल्यास, समाजाचा सरकारवर दबाव वाढून उपाययोजना झाल्यास आशेचे किरण दिसू शकतात. बदलणाऱ्या वातावरणाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास व्हायला हवा, तो अभ्यास जनतेसमोर यायला हवा. नाहीतर, 2015 मध्ये चेन्नईत कोसळलेला पाऊस आणि आंध्रातील उष्णतेची लाट याची कारणे न शोधता काही माध्यमांनी पर्यावरण बदलावर खापर फोडले होते, तसे झाल्यास उपयोगाचे नाही.

पूर वाढण्याचा अंदाज

आगामी काळात पूर येण्याचे आणि त्यांची तीव्रता वाढणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. पुढील काही दशकांत पुराचा फटका जगातील 1.2 टक्के लोकांना बसेल, असा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे. केरळमध्ये गेल्या वर्षी आलेला पूर विसरता येणार नाही. पुरामुळे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही धक्का बसतो. शेतीचे नुकसान होते. आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. पुरामुळे मोठ्या लोकसंख्येवर परिणाम होत असल्याने विकासाची दरी रुंदावत जाते. समाज काही वर्षे मागे ढकलला जातो. 

काय करता येईल?

तापमान वाढीचा वेग कमी करणे हा अवघड पण आवश्यक उपाय आहे. त्यासाठी स्वच्छ ऊर्जेचा आग्रह धरायला हवा. सौर, पवन ऊर्जेचा वापर वाढल्यास त्यात नवनवीन शोध लागून त्याचा वापर करणे सोयीचे जाईल. जीवनशैलीत बदल ही प्रत्येकाने अमलात आणण्याची बाब आहे. कोणतीही कृती करताना पर्यावरणाचा विचार व्हायला हवा. पर्यावरण संरक्षण हा आपला स्वार्थ आहे, असे समजून काम होणे आवश्यक आहे.

पर्यावरण बदल हा काही चर्चेसाठीचा नवीन विषय नाही. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यावर सविस्तर चर्चा, वाद, करारमदार होतच असतात. पण हा केवळ चर्चेचा मुद्दा नसून आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला, जागतिक धोरणे ठरवण्याची ताकद असलेला विषय आहे.

हे आपल्या समोर अनेक वर्षांपासून उभे ठाकलेले आणि गेल्या काही वर्षांत स्पष्टपणे अस्तित्व दाखवणारे आव्हान आहे. पर्यावरण बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी कृती करणे हेच केवळ आपल्या हातात आहे. गेल्या काही दशकांत कार्बन डाय ऑक्साईड आणि मिथेनसारख्या हरित वायूंचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. वारेमाप वापर करणारे श्रीमंत देशच वातावरणीय बदलांकडे स्वार्थी हेतूने दुर्लक्ष करत आहेत. पण तरीही हालचाल करणे आवश्यकच आहे. बदलांचा वेग आपल्याला झेपणारा नाही. त्यामुळे आताच हालचाल करणे शहाणपणाचे आहे. कारण शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या बदलांचा वेग कमी करण्यासाठी आपल्याकडे काही दशकांचाच अवधी आहे.
 
 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com