Love Jihad- Shraddha Walker Case: वेबसीरीज ठरतेय का गुन्ह्यांचं गाइडबुक? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha Walker Case}

Shraddha Walker Case: वेबसीरीज ठरतेय का गुन्ह्यांचं गाइडबुक?

वसईतल्या श्रद्धाची निघृण हत्या करताना, आफताबने एका वेबसीरिजवरून प्रेरणा घेतल्याचं सांगितलं. पण खरंच वेबसीरिज बघून खून करता येतो का? मानसोपचारतज्ज्ञ काय म्हणतात ?

वसईतल्या श्रद्धा वालकरचा आफताब पूनावाला या क्रूरकर्मा प्रियकराने खून केला. इतकंच नव्हे तर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे सगळं करताना ‘डेक्स्टर’ ही वेबसीरिज बघून योजना केल्याचं त्याने सांगितलं. पण खरोखरच वेबसीरिज बघून खून करता येतो? या प्रश्नाचं उत्तर मानसोपचारतज्ज्ञांसोबतच्या चर्चेतूनच शोधायचा प्रयत्न केला आहे. (Shraddha Walkar Case Muder by Aftab Poonawala Delhi)

याविषयी मनोविकारतज्ज्ञ डॉ राजेंद्र बर्वे म्हणतात, वेबसीरिज बघून कुणाचा खून होत नाही. तर मुळात त्या व्यक्तीच्या मनात संताप, राग खदखदत असावा लागतो. मनात जर खून करण्याची इच्छा असेल तर मग ती योजना तडीस नेण्यासाठी, त्याचं नियोजन करण्यासाठी गुन्हेगार वेबसीरिजचा आधार घेतात. पण केवळ एखादी वेब सीरिज बघून कुणाला कुणाचा खून करण्याची इच्छा होऊ शकत नाही.

अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीला शिव्याशाप जरी दिले तरी त्यात म्हटल्याप्रमाणे व्हावं, असं आपल्याला वाटत नाही. म्हणजे रागारागात आपण म्हणतो, वाटोळं होऊदे तुझं पण खरोखर त्या व्यक्तीचं वाटोळं व्हावं, असं म्हणणाऱ्याला वाटत नसतं. हे तसंच आहे. मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण करण्यासाठी वेबसीरिज कारणीभूत ठरत नाही. एकाअर्थी अशा वेबसीरिजमधून एखादा गुन्हा कसा पार पाडावा, याचं गाइडबुकच मिळत असतं.

हेही वाचा: Bharat Jodo Yatra : काँग्रेसचा ‘इव्हेंट’की स्थित्यंतराची सुरूवात?   

पण माणसांच्या मूलभूत संवेदनशीलतेला धाब्यावर बसवणाऱ्या या घटनांमागची मानसिकता काय असेल? असा प्रश्न विचारल्यावर डॉ बर्वे म्हणतात, अशा घटनांत, कुणा एकाची चूक नसते. त्यामुळे मुली किंवा पालक यांना सरसकट दोष देता येणार नाही. आपल्या भावनिक मर्यादा (Emotional boundaries) आखायला, जपायला आपण मुलांना समजावलं, जागरुक केलं पाहिजे. मानसिकदृष्ट्या कुणाला आपण कितपत जवळ येऊ द्यायचं हे मुलांना समजावलं पाहिजे.

आपल्या प्रत्येकाची एखादी दुखरी नस असते. एखादी गोष्ट किंवा घटना, मानसिकता आपल्याला कमकुवत करते, मनाविरुद्ध एखादी गोष्ट करायला भाग पाडते. त्यामुळे आपली ही दुखरी नस सहसा कुणासमोर उघडी करू नये, एवढी मानसिक समज आपल्या मुलाला येणं गरजेचं आहे. एखाद्या माणसाची कितपत ओळख झाल्यावर तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी त्याला सांगता? आपली दु:खं, भीती त्यांच्यासमोर कधी उघड करता, हे समजलं नाही तर आपण नकळत समोरच्या व्यक्तीला आपला फायदा घेण्याची संधी देत असतो. अशा केसमध्ये मोकळा संवाद हाच त्यातून बाहेर पडण्याचा उपाय आहे.

हेही वाचा: गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

काही विकृत लोक जोडीदाराची हळवी किंवा भेद्य बाजू समजून घेतात आणि मग त्यावर आपला खेळ मांडतात. ते अनेकदा मानसिकदृष्ट्या जोडीदाराला ब्लॅकमेल करत असतात. त्यात त्यांना काही गैर वाटत नाही पण अशावेळी पीडितांनी वेळीच सावध होण्याची गरज असते. अनेकदा मारझोड करणारे प्रियकर नंतर अतिशय गरीबबिचारे असल्याचं नाटक करतात. 'तुझ्याशिवाय माझं कुणी नाही', 'तू नसशील तर मी जगूच शकणार नाही', अशासारख्या टिपीकल फिल्मी वाक्यांना अनेकजणी बळी पडतात. आपलं प्रेम त्याला सुधारू शकेल, ही वेडी आशा अनेकींना वाटते. त्यातूनच हे नातेसंबंध अधिकाधिक विषारी आणि त्रासदायक होत जातात.

आपली पुरुषप्रधान समाजव्यवस्था, त्यातून कळत नकळत बिंबवल्या जाणाऱ्या गोष्टींचाही यात मोठा वाटा आहे. बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याने मारणं हे अनेकींना चुकीचं वाटतच नाही. मुलीच्या नकाराचा मोकळेपणाने स्वीकार करण्याची, त्यांचं स्वतंत्र अस्तित्त्व मान्य करण्याची क्षमता, संवेदनशीलता प्रत्येक पुरुषांत येणं आवश्यक आहे.

अशा घटनांतील गुन्हेगारांची मानसिकता नेमकी काय असते, याबद्दल डॉ. सागर मुंदडा म्हणतात, लोकांमध्ये भावनिक साक्षरता येणं अतिशय महत्त्वाचं आहे.

कोणत्याही विकृताच्या अशा मनोवृत्तीचं मूळ बरेचदा त्याच्या बालपणात असतं त्याचप्रमाणे त्याच्या गुणसूत्रांतही असतं. लहानपणी त्या व्यक्तीला मानसिक धक्के बसलेले असू शकतात किंवा छळ सहन करावा लागला असू शकतो.

व्यक्तीच्या पालकांचा स्वभाव, त्यांच्या नात्यातील हिंसा या सगळ्याचा परिणाम मुलांच्या मनावर अतिशय वाईट पद्धतीने होत असतो. अशा व्यक्ती एकतर अतिशय अगतिक आणि दुसऱ्यावर संपूर्णपणे अवलंबून राहू लागतात नाहीतर त्यांच्यातील संवेदनशीलताच नष्ट होते.

सर्वसामान्यत: आपल्या सगळ्यांना कुठे थांबायचं हे कळतं? एखाद्या व्यक्तीची अगदी मस्करी होत असेल तरीही ती त्या व्यक्तीला कितपत त्रासदायक व्हावी, याची एक साधारण जाणीव आपल्याकडे असते. मात्र अशा विकृत लोकांमधून ती जाणीवच नाहीशी होते. दुसऱ्याला त्रास देताना, वेदना देताना कुठे थांबायला हवं, हेच त्यांना कळत नाही. ही क्षमताच त्यांनी हरवलेली असते.

त्यांचं लहानपण अतिशय त्रासाचं असू शकतं त्यामुळे समोरच्याची वेदना समजून घेण्याची एक मूलभूत शक्तीच त्यांच्याकडे उरलेली नसते. त्यांच्या डोक्यातील भावनांचं केंद्र एकप्रकारे काम करण्याचंच बंद होतं. दुसऱ्याच्या वेदना पाहण्याप्रती त्यांची नजर जणू मेलेली असते. त्यांच्या काल्पनिक जगात केवळ स्वत:चं वर्चस्व असतं आणि त्यासाठी त्यांनी जोडीदाराच्या सो कॉल्ड चुकांना दिलेली शिक्षा अगदी योग्यच वाटते त्यांना. समोरच्या व्यक्तीने चूक केली म्हणजे तिला शिक्षाच द्यायला हवी, यावर ते ठाम असतात. आपल्या या वर्तनाचा त्यांना खेद नसतोच पण ते त्याचं सहज समर्थन करू शकतात. याचं कारण मानसिक अस्थिरता आहे.

हल्लीच्या तरुणांना नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न विचारला जातोय, त्यावर बोलताना डॉ सागर मुंदडा म्हणतात, हे काही आजचं नाही. पूर्वीही असे अनेक गुन्हे घडत होते. माणसं विकृत कायमच होती. अर्थात तेव्हा प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमं तितकीशी फोफावली नसल्याने अशा घटना सगळीकडे पोहोचत नव्हत्या. नाहीतर रागाच्या भरात बायको आणि मुलांना मारुन टाकणारा बाप आपण अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिला आहे. बायकोला, सुनेला जाळून मारणारी सासरची माणसं आणि तशाप्रकारचे गुन्हे काही नवीन नाहीत.

आत्ताच्या परिस्थितीतील वेगळी गोष्ट म्हणजे, आता आपल्या मेंदूत ही भावनिक गडबड होण्यासाठी उद्युक्त करतील असे अनेक घटक आहेत. त्यामुळे अशा मानसिकतेला खतपाणी घातलं जाण्याची प्रक्रिया अधिक जलद होण्याची शक्यता वाढते. उदाहरणार्थ आता आपल्याला प्रत्येक गोष्ट एका क्लिकवर मिळते.

आपल्याला भूक लागली तर पटकन आपण खाणं मोबाइलवरुन मागवतो, कपडे घ्यावेसे वाटले काही खरेदी करावीशी वाटली की मोबाइलच्या एका क्लिकवरुन ती आपल्या घरी येते. पूर्वी हे सगळं नव्हतं. कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी काही काळ द्यावा लागतो. त्याप्रमाणे आपला मेंदू विकसीत होत असतो. मात्र आता तो वाट पाहण्याचा काळच नाहीसा होत चाललाय. त्यामुळे त्याप्रमाणे मेंदूचा विकासही तशा पद्धतीने होत नाही.

त्यातच समाजमाध्यमांमुळे हे व्हायरल आणि पर्यायाने प्रसिद्ध होण्याचं एक वेगळंच खूळ पसरत चाललंय. ३० सेकंदातल्या रील्समधून प्रसिद्ध व्हायचं तर काहीतरी असं अचाटच करायला हवं याबद्दल तरुणांची खात्री पटली आहे. मग हे अचाट करताना काय चूक, काय बरोबर याचा सारासार विचार करण्याची शक्ती ते गमावतात. हे सगळंच फार कठीण आणि गुंतागुंतीचं आहे, त्यामुळे भावनिक साक्षर होणं ही काळाची गरज आहे.