esakal | मौखिक वाङ्‍मयात ‘राम’
sakal

बोलून बातमी शोधा

Ramayan Katha}

मौखिक वाङ्‍मयात ‘राम’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

प्रभाकर मांडे

श्रीरामचरित्राचा आशयकोश शतकानुशतके प्रवाही राहिला आहे. मूळ कथासूत्र सारखे अशले तरी त्यात खूप विविधता आढळते. मौखिक परंपरेने प्रचलित असलेल्या रामकथेतूनच वाल्मिकींनी रामायणाची रचना केली, असे म्हटले जाते. स्त्रिया ओव्यांमधून रामकथा सांगतात., तेव्हा त्यातून त्या आपल्या आयुष्याचे चित्रही मांडतात. राम-सीता हे आप्त-सोयरे आहेत, असाच भाव त्या प्रकट करतात.

श्री राम ही त्रेतायुगात झालेली भारतातील एक ऐतिहासिक व्यक्ती आहे. या व्यक्तीची जीवनकथा हजारो वर्षांपासून भारतातील सर्व जाती-जमातींच्या संकीर्तनाचा विषय आहे. रामकथा जीवनादर्श म्हणून पिढ्यान् पिढ्या प्रचलित आहे. रामकथेची रचना सतत होत आली आहे. रामकथेचे पठण अखंडपणे प्रवाही राहिले आहे. मौखिक परंपरेने प्रचलित असलेल्या रामकथेतूनच वाल्मीकींनी ‘रामायण’ या महाकाव्याची रचना केली, असे म्हटले जाते.

कथागाथांच्या स्वरूपात भारतातील सर्व जाती-जमातींचे लोक रामचरित्र गात होते व गात आहेत. अनेक वर्षे हे मौखिक परंपरेनेच प्रवाही राहिले. त्याच्याच आधारे वाल्मीकींनी आपले रामायण महाकाव्य लिहिले. वाल्मीकी रामायणातदेखील सतत वाढ होत गेली. बालकांड आणि उत्तरकांड हे रामायणात नंतर अंतर्भूत झाले, असे जवळजवळ सगळ्या अभ्यासकांचे मत आहे.

श्रीरामाचा रामावतार म्हणून स्वीकार होणे आणि रामभक्ती देशात रूढ होणे, या बाबी रामायण विकसित होण्यामागे आहेत. प्रभू रामचंद्रांविषयी हिंदुस्थानात विपुल वाङ्‍मयनिर्मिती झाली आहे. रामभक्तीसंबंधीची उपनिषदेही आढळतात. त्यांत केवळ रामयंत्र, राममंत्र, सीतामंत्र यांचाच उल्लेख आहे असे नाही, तर रामाला परमपुरुष आणि सीतेला मूळ प्रकृती मानण्यात आले आहे. भगवद्‍गीतेच्या धर्तीवर ‘रामगीता’ नावाचा ग्रंथही निर्माण झाला आहे.

सांप्रदायिक रामायणांची रचना

रामभक्तीचा विकास होत असताना अनेक सांप्रदायिक रामायणांचीही रचना झाली. ‘अध्यात्म रामायण’, ‘आनंद रामायण’ आणि ‘अद्‍भुत रामायण’ ही त्यांतील काही प्रमुख आहेत. त्याशिवाय ‘महारामायण’, ‘हनुमत्संहिता’, ‘संगीत रघुनंदन’ इत्यादी ग्रंथांत रासलीलेबरोबर रामलीलादेखील वर्णन करण्यात आली आहे.

रामकथा जवळजवळ सर्व पुराणांत आढळते. जैन आणि बौद्ध पंथीयांनीही रामकथेची रचना केली आहे. संस्कृत भाषेत रामकथेवर प्रचंड ललित वाङ्‍मय निर्माण झाले आहे. त्याप्रमाणेच महाराष्ट्रीय प्राकृतातदेखील रामकथांची रचना झाली आहे. संस्कृत साहित्यात रामकथेवर अनेक स्फूट रचनादेखील आढळतात. एकूण महाकाव्ये, पुराणे त्याचप्रमाणे ललित वाङ्‍मय यांत विपुल प्रमाणात रामासंबंधीच्या काव्यरचना निर्माण झाल्या. देशात रामभक्तीचा संप्रदाय निर्माण झाला. भागवत सांप्रदायिकांनीदेखील रामभक्तीचा पुरस्कार केला. वाल्मीकी रामायणाचा प्रभाव इतका मोठा होता, की हिंदुस्थानातील निरनिराळ्या प्रादेशिक भाषांत रामायणे लिहिली गेली.

भारताच्या सर्व प्रांतांतील लोक कथा-कीर्तनांतून रामकथा गात राहिले आहेत, त्यामुळे जनसामान्यांच्या मनावर रामकथेचा खोलवर प्रभाव पडलेला आहे. हिंदुस्थानातील एकूण लोकमानसात श्रीरामप्रभूंच्या चरित्राचा एक भावसंपन्न आशयकोष शतकानुशतके प्रवाही राहिला आहे. मूळ कथासूत्र एकसारखे असले तरी त्यात खूप विविधता आढळते.

वाल्मीकी रामायणाच्या निरनिराळ्या पाठांतदेखील कितीतरी फरक आढळतात. येथे एकाच रचनेचे एवढे पाठ असू शकतात, तर अनेकविध रामायणांचा प्रभाव ज्यांच्यावर पडला आहे, देशी भाषांतील निरनिराळ्या रामायणांचे ज्यांना श्रवण घडत आले आहे, त्यांच्या मौखिक वाङ्‍मयात किती आणि कशी विविधता निर्माण होत आली असेल, याची कल्पनाच केलेली बरी. रामाची जीवनकथा ही हजारो वर्षांपासून समाजाच्या संकीर्तनाचा विषय आहे.

सार्वकालिक दिव्यकथेचे स्वरूप

समाजातील व्युत्पन्न पंडितवर्ग, देशी भाषांत लेखन करणारे प्रतिभावंत कवी-लेखक आणि आपले कष्टमय आयुष्य सर्जनक्षम प्रतिभेची जोड देऊन नाचत-गात जगणारे सामान्यजन या सर्वांनी रामकथेच्या नौकेत बसूनच संसारसागर पार केला आहे. हिंदुस्थानात रामकथेच्या अभिजात, लौकिक आणि मौखिक या तिन्ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आल्या आहेत, त्या आपल्या अंगभूत लक्षणांनी प्रवाही राहिल्या आहेत. संपूर्ण आग्नेय आशियाचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्‍या रामकथेतील ऐतिहासिक व्यक्तींच्या जीवनाला आदिकवी वाल्मीकींनी सार्वकालीन जीवनाचा आदर्श असल्याचे स्वरूप दिले. राम, सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान, त्याचप्रमाणे बिभीषण ही सर्व पात्रे जीवनातील काही विशेषांचे आदर्श बनले; तर कैकेयी, रावण हे खलव्यक्तींचे नमुने बनले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती अलौकिकत्वाचे वलय निर्माण झाले. किंबहुना त्या व्यक्ती न राहता ‘विभूती’ झाल्या. ही पात्रे अतिमानवी झाली. रामकथेला दिव्यकथेचे (मिथचे) स्वरूप प्राप्त झाले. दिव्यकथा किंवा मिथ ही सदैव जिवंत राहते, समाजजीवनाला समांतर राहून प्रवाही राहते. निरनिराळ्या काळांत समाजाला प्रेरणा देण्याची तिच्यात क्षमता असते. तिच्यातील आवाहकत्व कधीही आटत नाही, सरत नाही, संपत नाही.

अशा दिव्यकथेची निरनिराळ्या काळांत कालसंवादी आकलने संभवू शकतात. थोडक्यात म्हणजे, वाल्मीकींनी आणि नंतर जनमानसाने ऐतिहासिक व्यक्तींच्या जीवनचरित्राला एक अजर-अमर आणि सार्वकालिक दिव्यकथेचे (मिथचे) स्वरूप दिले. भारतातील निरनिराळ्या भाषांत दिव्यकथेसाठी किंवा मिथसाठी ‘मिथक’ हा शब्द वापरला जातो. भारतातील पश्चिमीकरण झालेल्या आणि इहवादाचा प्रभाव असलेल्या अभ्यासकांनी मिथकाचा अर्थ मिथ्याकथा असा केला, त्यामुळे रामकथेला कल्पनानिर्मित ठरविण्यासाठी प्रयत्न केला. (यामागे राजकारणही असू शकते, किंबहुना एकगठ्ठा मतांसाठीदेखील मिथकाचा चुकीचा अर्थ लावला गेला असल्याचे दिसते.)

लोकमानसाचा आविष्कार

रामकथेच्या मौखिक परंपरेचे स्वरूप हा लोकमानसाचा स्वाभाविक आविष्कार आहे. कोणतेही काम करताना निर्माण झालेल्या लयीतून जन्माला आलेले हे वाङ्‍मय आहे. यात तत्त्वज्ञान आहे, गोष्ट आहे, आदर्शांचा विचार आहे, व्यवहार आहे. महाराष्ट्रातील स्त्रिया श्रमाचे काम करताना आणि विशेषतः जात्यावर दळताना रामकथा गात होत्या आणि क्वचित अजूनही गातात. त्या सलग रामकथा गात नाहीत, तर स्थलकालानुरूप प्रभू रामचंद्रांच्या जीवनातील विविध घटनांचे, व्यक्तींचे स्मरण करतात, त्यामुळे त्यात सलगता आढळत नाही.

विविध जागरणाच्या कार्यक्रमांत कथागाणी गातात. खानदेशातील वह्या, पेरणी जागरात गायिली जाणारी गाणी, ‘गोमंतकातील गड्या रामायण’ ही याची उदाहरणे होत. स्त्रिया रामकथेविषयीची जी गाणी गातात किंवा महाराष्ट्रातील लोक रामकथांविषयक जी अनेकविध गाणी म्हणतात, त्यांच्यासमोर रामाचे चरित्र सांगणारा कोणताही ग्रंथ नसतो. सांस्कृतिक परंपरेने चालत आलेल्या कथांचे आणि कथागीतांचे श्रवण, तसेच रामकथेसंबंधीची कीर्तन-प्रवचने यांचे श्रवण हाच त्यांचा मूलस्रोत असतो. त्याच्याच आधारावर लोकमानसाने त्यातही विशेषतः स्त्री-पुरुषांनी आपला अनुभव आणि आपली कल्पनाशक्ती यांची जोड देऊन आपल्या जीवनाच्या माध्यमातून रामकथा गायिली. रामविश्‍व आणि आपले भावविश्‍व यांचा संयोग करून आपल्या जीवनाच्या परिप्रेक्षात रामकथेला गायले. जसे -

सात समिंद्राचं पानी । दसरथाच्या रांजनी ।

रामराय झाले तान्हे । कौसल्या बाळांतिनी ॥

कौसल्या बाळांतीन । तिच्या नहानीला तापता ।

राम घेतला इकत । चंद्रसूर्य उगवता ॥

रामकथा गाताना महाराष्ट्रातील स्त्रियांनी वास्तव आणि अद्‌भुत यांचे सुरेख मिश्रण केले आहे. सीता स्वयंवराच्या प्रसंगासंबंधीच्या ओव्या गाताना त्यांनी पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे.

शिवाचं धनुष्य । सीतेनं केलं घोडं ।

रावण आला पुढं । देवाला पडलं कोडं ॥

रावणानं कोधंड । उचललं घाई घाई ।

रामाची सीता नार । याला मिळायची नाही ॥

त्रिंबक धनुष्य । जनक राजाच्या अंगनी ।

मोडीलं उसावानी । रामरायानं माझ्या ॥

यात ओवी गाताना स्त्री ‘रामराजानं माझ्या’ असे म्हणते. म्हणजेच रामाविषयीचा आत्मीय भाव प्रकट करते. जणू राम त्यांच्याचसारखा, त्यांचा कोणी आप्त आहे, आपला सोयरा आहे. असाच भाव सीतेसंबंधीच्या त्यांच्या ओवीगीतांतून प्रकट करतात. सीतेला कैकेयीचा सासुरवास होतो. त्यासंबंधी...

येवढा वनवास सीताबाई येकलीला ।

वाटून देला बाई घरोघरीच्या नारीला ॥

असे सांगून, जिथे सीतेला वनवास चुकला नाही, तिथे आपल्या कष्टाचे काय कौतुक? असे म्हणून मनाची समजूत काढतात. स्त्रियांच्या ओव्यांमधून गायली जाणारी रामकथा भावोत्कट अभिव्यक्तीचे उदाहरण आहे. रामाचा जन्म, सीतेचा वनवास, मंदोदरीचा शोक, कौसल्येचा शोक, हे सर्व स्त्रिया समरसून गातात. आपल्या संसाराचा संबंध सीतेच्या संसाराशी जोडतात. सीतेला आपल्यातीलच एक करून टाकतात. सीतादेखील आपल्यासारखीच झाडलोट करते, केरकचरा काढते, पाखडून धान्य निवडते, कैकेयीचा सासुरवास सहन करते, अशी वर्णने करतात.

स्त्रिया ओव्या गाताना आपलेच आयुष्य त्या गीतांतून सांगतात. भारतीय लोकमानस श्रमगीतांतून आणि विधी-उत्सवांच्या प्रसंगी रामकथा गातात. गाताना स्वातंत्र्यही घेतात. आपल्या प्रतिभेच्या अनुषंगाने काव्यांची, गीतांची नवी रचना करतात. त्यात कथेचा विपर्यास झाला तरी त्यांना त्याची फारशी फिकीर नसते. रामाविषयीचा भक्तिभाव, सीतेविषयीची अनुकंपा, मंदोदरीविषयीची सहानुभूती; त्याचप्रमाणे रावण, कैकेयी यांच्याविषयीचा राग हा त्यातून सहजपणे प्रकट होतो. हनुमंताविषयीचा भक्तिभाव प्रकट होतो.

कलांद्वारे रामलीलांचे दर्शन

महाराष्ट्रातील लोकमानस रामकथा जशी गाते, त्याचप्रमाणे रामकथेचे मंचनही करते. नाट्यस्वरूपात विविध प्रसंग सादर करताना कलेच्या माध्यमांतून रामलीलेचे दर्शन घडविले जाते. नाट्यस्वरूपात रामकथेतील प्रसंगांचे दर्शन घडविताना मात्र त्याचे अलौकिकत्व कायम ठेवण्याचा प्रयत्न असतो. मराठवाड्यात लळीतात, पंचमीत, भवाड्यात रामकथेतील प्रसंगांचे सादरीकरण करतात, त्याचप्रमाणे ‘लक्ष्मणशक्तीचे’ नाट्य रामविजयाच्या पारायणाच्या वेळी सादर करतात.

वनवासाचे नाट्य प्रत्यक्ष पोत्याचा पोशाख घालून आणि चौदा दिवस गावोगाव भिक्षा मागत फिरून प्रत्यक्ष अनुभवतात. एकूण, रामकथा ही भारतीय लोकमानसाचे प्राणतत्त्व बनली आहे. सकाळी उठल्यावर रामाचे नाव घेऊनच धरतीवर पाऊल टाकावे, रामाला मित्र करावे, आपला देह पवित्र करावा, संसारसमुद्र राम नावाच्या नौकेत बसून ओलांडावा. मराठी स्त्री आपल्या जिभेला रामनाम विसरू नको, अशी विनंती करते आणि स्वर्गाची वाट मोकळी करते. रामरायाचे नाव आपल्याला अंतिम मोक्षाला नेईल, अशी सर्व भारतीयांप्रमाणेच तिचीही श्रद्धा असते.

पहाटंच्या पाऱ्यामंधी । रामाचं नाव घ्यावं ।

धरती मातावरी । मग पाऊल टाकावं ॥

सकाळी उठून । राम करावा मित्र ।

रामरायाचं नाव घेता । देह व्हईल पवित्र ॥

संसार समुद्राचा । मला कळना खोलावा ।

राम नावाडी बोलवा । नेईल पैलतीरा ॥

हात जोडूनी इनंती । जिभेबाई तुला ॥

इसरून जाऊ नको । रामा माझ्या सोयऱ्‍याला ॥

भारताच्या सर्व प्रांतांतील सर्व जाती-जमातींचे लोक रामकथा गातात. रामकथा हा त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. सनातनी हिंदूंप्रमाणेच भारतातील अनेक मुसलमानही रामाविषयी श्रद्धा बाळगतात. राम हा भारतातील हिंदू आणि मुसलमान यांच्यातील सेतू असल्याचे मत मुझफ्फर हुसैन यांनी त्यांच्या ‘मुस्लिम मानस ः तरंग अंतरंग’ या पुस्तकात मांडले आहे. संपूर्ण आग्नेय आशियातील लोक प्रभू रामचंद्रांविषयी श्रद्धाभाव बाळगतात. एवढेच नाही, तर अतिपूर्वेकडील फिजी बेटावरदेखील रामकथा हा तेथील लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. दक्षिण अमेरिकेतील सूरीनाम या देशातही रामकथा गायिली जाते.

मॉरिशसमध्ये तर रामाविषयी श्रद्धा बाळगणाऱ्‍या हिंदूंची संख्या मोठी आहे. एकूण, जगातील अनेक देशांत रामकथा गायिली जाते. आग्नेय आशियातील मुस्लिमबहुल देशांतही रामकथेतील प्रसंगांचे मंचन केले जाते. रामाविषयी अनेकविध पद्धतींनी श्रद्धा व्यक्त केली जाते. रामायण हे भारतीय संस्कृतीच्या समन्वयाचे सूत्र आहे. भारतात सामाजिक विविधता आहे. अनेक पंथ-संप्रदाय आहेत. निरनिराळ्या प्रांतांत सांस्कृतिक विविधता आहे. मात्र, रामकथेचे महत्त्व आणि मूल्य सर्वत्र समान आहे. रामाला आदर्श म्हणून सर्वांनीच मान्य केले आहे. रामाविषयी श्रद्धा आणि विश्‍वास सर्वत्र समान आहे. त्यातून भारतीयांची एकात्मता ठळकपणे अधोरेखित होते.

(लेखक लोककथांचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत.)