Tokyo Olympic : जागतिक सोहळा पण  प्रेक्षकांविना...!

Tokyo Olympic : जागतिक सोहळा पण प्रेक्षकांविना...!

Summary

जपानमध्ये या आठवड्यापासून (२४ जुलै) बहुचर्चित ऑलिंपिक स्पर्धा सुरू होत आहे. ९ ऑगस्टपर्यंत ती चालणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेबाबत जपानमध्ये मत-मतांतरे आहेत.

आपुलकीचा आणि अगत्यशील देश म्हणून ओळख असलेल्या जपानमध्ये या आठवड्यापासून (२४ जुलै) बहुचर्चित ऑलिंपिक स्पर्धा सुरू होत आहे. ९ ऑगस्टपर्यंत ती चालणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेबाबत जपानमध्ये मत-मतांतरे आहेत. सामान्य नागरिकांमध्ये मात्र स्पर्धेमुळे कोरोनाची आणखी एक लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. याबद्दल घेतलेला आढावा...

टोकियोमध्ये १९६४ नंतर उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा दुसऱ्यांदा खेळविल्या जात आहेत. दोनदा हा मान मिळणारे आशिया खंडामधील हे पहिलेच शहर असेल. ऑलिंपिकची तयारी जोरदारपणे सुरू आहे. मात्र सामान्य जपानी नागरिक या तयारीपासून आणि ऑलिंपिकपासून कोसो दूर आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बॅच यांचे टोकियोत आगमन झाले आहे. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपून ते आता रोजच्या व्यवस्थेत गर्क झाले आहेत. त्यांचा विलगीकरण कालावधी अवघ्या तीन दिवसांचाच ठेवल्याने जपानमध्ये प्रचंड आश्चर्य व्यक्त होत आहे. आताच्या जागतिक महासाथीच्या स्थितीत ऑलिंपिक पुढं ढकलावं अशी समस्त जपानवासियांची मनोमन इच्छा आहे.

विरोधामागची कारणे

स्पर्धेच्या निमित्ताने जपानमध्ये साधारणपणे सत्तर ते पंच्याहत्तर हजार खेळाडू येतील असा अंदाज व्यक्त होत आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेचे पदाधिकारी आणि पाहुणे म्हणून पाच हजारांच्या आसपास लोक येणार आणि या निमित्ताने सामना पाहण्यासाठी पंधरा हजारांच्या दरम्यान पर्यटक येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आत्ताच्या परिस्थितीत एक लाखांच्या आसपास लोक बाहेरच्या देशातून येणार असल्याने जपानवासियांच्या मनात धास्ती वाढली आहे. सध्या जपानमध्ये साधारणपणे वीस टक्क्यांपर्यंत लसीकरण झाले आहे. ते पन्नास टक्क्यांच्या पुढे गेल्यास ऑलिंपिक घ्यायला जपानी नागरिकांची हरकत नाही. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अलिंपिकच्या निमित्ताने येणाऱ्या अनेक खेळाडूंचे लसीकरण झालेले नाही. टोकियोमध्ये युगांडा, झिम्बावे या देशातून खेळाडू आले असून सरावादरम्यान काही खेळाडू पॉझिटिव्ह निघाले आहेत. बाहेरच्या देशातून येणाऱ्या खेळाडूंनी लसीकरण करून जपानमध्ये यावे असा मतप्रवाह वाढला आहे. देशवासीयांनाच देण्यासाठी लस उपलब्ध नसताना खेळाडूंसाठीचा अतिरिक्त भार कशासाठी असा प्रश्न जपानवासियांमध्ये आहे.

Tokyo Olympic : जागतिक सोहळा पण  प्रेक्षकांविना...!
गाढवांच्या पाठीवर अर्थव्यवस्थेचे ओझे !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये सद्यःस्थितीत कडक निर्बंध आहेत. ऑलिंपिकचे आयोजन होत असलेल्या राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन असून तो १३ ऑगस्टपर्यंत आहे. सुरुवातीला पन्नास टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामने खेळवायचे असा निर्णय झाला होता. आता मात्र प्रेक्षकांविना सामने होणार आहेत. कोरोनामुळे सर्व प्रकारच्या व्यवसायावर, उद्योगांवर परिणाम झालेला आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची आवश्यकता असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची जपानी नागरिकांची भावना आहे. या स्पर्धांचा जपानच्या अर्थव्यवस्थेला काहीच फायदा होणार नसून नुकसानच जास्त होणार आहे. शाळांमधून ऑलिंपिक दाखविण्याचा एक प्रस्ताव आला होता.

एकीकडे कडक निर्बंध असताना शाळेत मुलांची उपस्थिती अनिवार्य कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना केवळ स्‍पर्धेसाठी त्या सुरू करणे कितपत रास्त आहे, असा मुद्दा पालकांकडून उपस्थित होत आहे.

Tokyo Olympic : जागतिक सोहळा पण  प्रेक्षकांविना...!
आगामी काळासाठी ‘ट्रेडनीति’ कशी ठेवाल?

वातावरण निर्मितीचा अभाव

अलिंपिकचे आयोजन करणाऱ्या देशात स्पर्धेच्या काही महिने अगोदर उत्सवी वातावरण असते. जपानमध्ये मात्र यंदा याचा संपूर्ण अभाव दिसतो. चांगले स्टेडियम तयार केले आहेत, त्याचबरोबर अनेक चौकांतून लोगो लावण्यात आले आहेत.

हॉटेल्सची तयारी झाली असली तरी नागरिकांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण नाही. काही दिवसांपूर्वी ऑलिंपिक ज्योतीचे टोकियोमध्ये आगमन झाले. ती संपूर्ण जपानमध्ये फिरणार होती, तथापि दोनच दिवसात झालेल्या विरोधामुळे ती ज्योत टोकियोत परत आणण्यात आली आहे. ही ज्योत घेऊन फिरण्यास अनेक खेळाडूंनी, मान्यवरांनी नकार दर्शविला. स्पर्धेसाठी थीम सॉंगही तयार झालेले नाही. यावरून स्पर्धेबाबत सामान्य जनतेत असलेला निरुत्साह पदोपदी जाणवतो. प्रेक्षकांविना स्पर्धा होत असल्याने तिकीट काढलेल्या नागरिकांनी परताव्याची मागणी केली आहे. स्पर्धेचा कालावधी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी त्याचे नीटसे वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

जपानला अशक्य काहीच नाही, ही मानसिकता मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याला स्पर्धेचे आयोजन करता आले नाही, हा ठपका आपल्यावर नको असे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. प्राप्त परिस्थितीत इतक्या ऐनवेळी स्पर्धा रद्द करणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.

Tokyo Olympic : जागतिक सोहळा पण  प्रेक्षकांविना...!
कादंबिनींची वैद्यक गाथा

भारत आणि विषाणू

जपानमध्ये कोरोनाची आता चौथी लाट सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चौथ्या लाटेस कारणीभूत ठरलेल्या डेल्टा विषाणूला भारतीय विषाणू म्हणून सांगितले जात आहे. याबाबत अखिल जपान-भारत संघटनेने आक्षेप घेतला आहे.

(लेखक टोकियोमध्ये नगरसेवक आहेत. मूळ भारतीय असून अखिल जपान-भारत संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. )

(शब्दांकन : आशिष तागडे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com