savitri devi
savitri devisakal

सावित्री देवी : एक हिंदू महिला जी हिटलरला भगवान विष्णूचा अवतार मानायची

ग्रीसमधील ‘गोल्डन डॉन पार्टी’च्या वेबसाइटवर एका हिंदू महिलेचं चित्र पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल. त्याहून मोठं आश्चर्य म्हणजे, त्या चित्रात निळी साडी परिधान केलेली स्त्री जर्मनचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या प्रतिमेकडे पाहताना दिसतेय. गोल्डन डॉन पार्टी ही परदेशी लोकांना हद्दपार करण्यासाठी 'वचनबद्ध' असून हा वर्णद्वेषी पक्ष देखील आहे. या पक्षाच्या वेबसाइटवर हिंदू महिलेचं चित्र का आहे आणि हिटलरशी तिचा काय संबंध? हे प्रश्न मनात शंका उपस्थित केल्याशिवाय राहत नाहीत. मनावर थोडासा भर दिल्यास, या बाईचं नाव सहज लक्षात येतं. सावित्री देवी यांनी, 'द लाइटनिंग एंड द सन' या आपल्या पुस्तकात जर्मनच्या अ‍ॅडॉल्फ हिटलरचा भगवान विष्णूचा अवतार म्हणून उल्लेख केला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादी-समाजवाद पुन्हा उदयास येईल, अशीही ग्वाही दिलीय.

कोण होत्या सावित्री देवी?

अमेरिका आणि युरोपमध्ये उजव्या विचारसरणीच्या लोकांनी चांगलाच जोर पकडलाय आणि अशा स्थितीत सावित्री देवींचं नावही चर्चेत येऊ लागलंय. अमेरिकन दक्षिणपंथी नेते रिचर्ड स्पेंसर आणि स्टीव्ह बॅनन यांनी सावित्री देवींचं काम पुन्हा सुरु करण्याची योजना आखलीय. सावित्री देवींचं नाव व पारंपरिक पेहराव सोडल्यास, त्या पूर्णपणे युरोपियन स्त्री वाटत होत्या. त्यांचा जन्म 1905 मध्ये फ्रान्समधील लियोन शहरात झाला. सावित्रींची आई ब्रिटीश, तर वडील ग्रीको-इटालियन होते.

सुरुवातीपासूनच सावित्री देवी समतावादी विचारांचा तिरस्कार करत आहे. 1978 मध्ये एका मुलाखतीत त्या म्हणतात, 'कुरुप मुलगी सुंदर मुलीशी कधीच बरोबरी करु शकत नाही.' या विधानावर त्या ठाम होत्या. पहिले महायुद्ध संपल्यानंतर 1923 मध्ये त्या अथेन्स येथे पोहोचल्या. ग्रीसच्या अपमानासाठी सावित्रीनं पाश्चिमात्य आघाडीला दोष ठरवत ग्रीस आणि जर्मनी या देशांना त्रास होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

प्रथमच सावित्री भारतात पोहोचल्या

यहूद्यांविरूद्ध हिटलरने क्रूर कारवाई करुन अनेकांचा बळी घेतला आणि 'आर्य वंश' वाचला, असं सावित्रींचं स्वत: च असं मत होतं. या कारवाईला त्या वेगळ्या नजरेनं पाहत होत्या आणि त्याचवेळी सावित्रीनं हिटलरला आपला 'फ्यूहरर' बनविला. फ्यूहरर हा एक जर्मन शब्द आहे, ज्याचा अर्थ नेता किंवा मार्गदर्शक असा होतो. राजकीय प्रवाहात हा शब्द हिटलरसाठीच वापरला जातो.

1930 च्या दशकाच्या सुरुवातीस सावित्री देवी युरोपच्या इतिहासाच्या शोधार्थ भारतात आल्या. त्यावेळी त्यांना असे वाटले, की भारतातील जातीव्यवस्थेमुळे आंतरजातीय विवाह होत नाहीत आणि यामुळेच 'शुद्ध आर्य' इथे सुरक्षितपणे भेटू शकतात. सावित्रीवर ब्रिटीश अधिकाऱ्यांची करडी नजर होती, त्यामुळे त्या भारतात ट्रेनच्या चौथ्या श्रेणीतील डब्यातून प्रवास करायच्या. मात्र, सावित्रीला ब्रिटिशांशी काहीच देणं-घेणं नव्हतं. त्या स्वत: च्या विश्वात रमायच्या. सावित्रीनं भारतात राहून भारतीतील विविध भाषा शिकल्या आणि त्यांनी एका ब्राह्मण व्यक्तीशी लग्न केलं आणि तेव्हापासून त्या स्वत: ला आर्यच मानत राहिल्या. त्यांना आर्य असल्याचा मोठा अभिमान वाटत होता.

सावित्री यांनी हिंदू पौराणिक कथा आणि फॅसिझम यांचं विस्तृतपणे मिश्रण केलं. त्यांनी सांगितलं, की हिटलर ही काळाच्या वेगानं चालणारी व्यक्ती आहे आणि हिच व्यक्ती एक दिवस कलियुग संपवेल आणि आर्यांचं वर्चस्व असलेल्या सुवर्णयुगाची सुरुवात करेल, असं त्यांचं ठाम मत होतं.

दरम्यानच्या काळात सावित्री यांनी कोलकात्यामध्ये हिंदू राष्ट्रवादाच्या प्रसारासाठी काम केलं. जेव्हा ब्रिटिशांनी भारतात धार्मिक बंधुता बिघडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हिंदुत्व अभियानालाही त्यांनी मोठं बळ दिलं. या मोहिमेत असं म्हटलं होतं, की हिंदू हे आर्यांचे खरे वारस आहेत आणि भारत एक हिंदू राष्ट्र आहे. या चळवळीचे संचालक स्वामी सत्यानंद यांच्यासमवेत सावित्री यांनी काहीकाळ काम केलं. स्वामी सत्यानंद यांनी सावित्रीला परवानगी देत तिला हिंदू चळवळीत फॅसिझमच्या चर्चा करण्यास अनुमती दिली. सावित्रीनं बंगाली आणि हिंदी भाषेत लोकांशी संवाद साधला आणि त्यांना आर्यांचं महत्त्व समजावलं, सांगितलं.

सन 1945 मध्ये जर्मनीत नाझींचा नाश झाल्यानंतर, सावित्री देवी युरोपमध्ये गेल्या. त्या इंग्लंडमध्ये पोहोचल्याची वार्ता त्यांच्या 'लॉन्ग-व्हिस्कर एंड द टू लेग्ड गॉडेस' या पुस्तकात नमूद केली गेलीय. या पुस्तकातील मुलांच्या कथेत नायिका एका मांजरीवर खूप प्रेम करणारी नाझी बाई आहे. या कथेत सावित्री लिहितात, 'हीलियोडोरा' नावाची नायिका प्राण्यांवर मनापासून प्रेम करते. मात्र, मुक्या प्राण्यांच्या त्रासाला ती लोकांना दोषी ठरवते, त्यांचा ती तिरस्कार करते.

हिटलर की जय हो..

हिटलरप्रमाणे सावित्री या ही शाकाहारीच होत्या. त्या संसाराला आपल्या नजरेनं पाहण्याचा नेहमी प्रयत्न करायच्या आणि निसर्गाच्या जवळ जावून त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असत. जेव्हा आयसलँडमधील हेकला पर्वताजवळ ज्वालामुखी फुटत होता, तेव्हा त्या ठिकाणी सावित्रीनं दोन रात्री घालविल्या. त्या या अनुभवाविषयी सांगतात, सृष्टीचा मूळ आवाज 'ओम' आहे. जो या ज्वालामुखीतून दर दोन-तीन सेकंदाने बाहेर येत होता. ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना पायाखालची जमीन थरथरत होती. मात्र, ओम.. ओम! हा आवाज दिर्घकाळ सुरुच होता.

1948 मध्ये सावित्री जर्मनी गाठण्यात यशस्वी झाल्या आणि तिथे तिने अनेक नाझी समर्थकांना पत्रके वितरीत करत 'एक दिवस आपण पुन्हा उठू आणि जिंकू, प्रतीक्षा करा.. हिटलर की जय!' अशा घोषणा दिल्या. बऱ्याच वर्षांनंतर सावित्री यांनी एका गोष्टीचा खुलासा केला, की ब्रिटीश अधिकाऱ्यांनी तिला तुरूंगात डामलं होतं, तेव्हा त्यांना खूपच आनंद झाला होता. कारण, त्या त्यांच्या नाझी सहकार्यांसोबती तुरुंगात एकत्र होत्या. मात्र, नंतर सावित्रीच्या पतीनं भारत सरकारच्या मदतीनं शिक्षा कमी केली.

सावित्री दुसऱ्यांदा भारतात परतली

सावित्रीच्या लग्नावर आणि पतीबरोबरच्या संबंधांवर अनेक शंका उपस्थित राहिल्या. बऱ्याच लोकांचा त्यांच्या विवाहाला विरोध होता. असित मुखर्जीबरोबर सावित्रीचे लग्न हा सोहळा त्यांना योग्य वाटत नव्हता. कारण, ते दोघेही एका जातीतले नव्हते. त्यामुळे त्यांच्या नात्याला अनेकांनी विरोध दर्शविला होता. आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षात सावित्री पुन्हा भारतात परतल्या. त्यानंतर तिने भारतालाच आपलं घर मानलं. त्या दिल्लीतील फ्लॅटमध्ये राहू लागल्या. बहुतेक वेळेस सावित्री हिंदू विवाहित स्त्रीयांप्रमाणे सोन्याचे दागिने घालत होत्या.

त्या स्वत: वेगळं जीवन जगण्याचा प्रयत्न करत होत्या. 1982 मध्ये इंग्लंडमध्ये त्यांच्या मित्राच्या घरी त्यांचा मृत्यू झाला. अमेरिकेचे नाझी नेते जॉर्ज लिंकन रॉकवेलच्या समाधीशेजारीच त्यांचे अस्थिकलश पूर्ण फॅसिस्ट पध्दतीने सन्मानाने दफन करण्यात आले. आज सावित्री देवी क्वचितच कोणालातरी ठाऊक असेल; पण हिंदू राष्ट्रवादाच्या प्रसारात त्यांनी भारतासाठी महत्वाची भूमिका बजावलीय. हेही विसरता कामा नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com