Sakal Property Today : व्यवसायानुरूप कमर्शिअल जागा कशी निवडाल? Sakal Property Today how to choose commercial lands for your business | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Property Today

Sakal Property Today : व्यवसायानुरूप कमर्शिअल जागा कशी निवडाल?

कोरोनानंतर काही अंशी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असले, तरी अनेक कंपन्यांची ऑफिसेस पूर्वपदावर आली आहेत. कोरोनानंतर वर्षभरात कमर्शिअल रिअल इस्ट (CRE) अर्थात व्यावसायिक जागांच्या उलाढालीत १२१ टक्क्यांची वाढ झाल्याचे निरीक्षण सॅव्हिलिस संस्थेने नोंदविले असून, २०२३ मध्ये ७० लाख स्क्वेअर फुटांच्या व्यावसायिक जागांचे व्यवहार होतील, असे भाकीत केले आहे. विविध व्यवसायांच्या नेमक्या गरजा ओळखून ऑफिस किंवा वर्क प्लेसच्या दृष्टीने कमर्शियल जागा कशा असाव्यात, याचा आढावा घेणारा हा लेख.

कळकट भिंती, फाईल्सचे ढीग, बंद पडलेले पंखे, अपुरा प्रकाश अशा वातावरणात काम करण्याची मानसिकता मिलेनियल जनरेशनमध्ये राहिलेली नाही. बव्हंशी सरकारी कार्यालयेही आता नव्या कमर्शिअल जागा निवडून कॉर्पोरेट संस्कृतीचा अवलंब करताना आढळून येतात. ज्याप्रमाणे आपल्या घरातील वातावरण आपल्या मानसिकतेवर परिणाम करते, त्याचप्रमाणे ऑफिसच्या ठिकाणी कसे वातावरण आहे, याचाही आपल्यावर परिणाम होत असतो. अनेकदा तर आपण घरापेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्येच असतो. त्याचमुळे ऑफिसच्या ठिकाणी चांगले वातावरण असणे गरजेचे आहे. वर्कप्लेस जितकी चांगली, तितका त्याचा कामावर सकारात्मक परिणाम होतो. कर्मचारी किंवा क्लाएंट्सना सहजपणे पोहोचता येईल असे लोकेशन, चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मीटिंग्जसाठी स्वतंत्र व्यवस्था या महत्त्वाच्या गोष्टी बहुधा सगळ्याच प्रोफेशनसाठी आवश्यक आहेत.

व्यवसाय कोणता आहे, त्याची व्याप्ती किती आहे, यांवर त्यासाठीची वर्कस्पेस तयार केली जावी. जर व्यवसाय छोटा, एखाद्या शहरापुरताच मर्यादित असेल तर त्या दृष्टीनेच जागा घेतली जावी. व्यवसायाच्या नेमक्या गरजा काय आहेत, हे ओळखून वर्कस्पेस तयार केल्यास अवास्तव खर्चही वाचतो आणि तुमच्या व्यवसायाला मदतही होते. विविध व्यवसायांसाठी कशा प्रकारच्या कमर्शियल जागा लागू शकतात, यावर एक नजर.

आयटी कंपन्या, स्टार्टअप

आयटी कंपन्या किंवा स्टार्टअप्स शिफ्टमध्ये काम करतात. या कंपन्यांमध्ये कामाचा बराच ताणही असतो. त्यामुळे वातावरण खेळीमेळीचे, सहकार्याचे असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्व लोकांना सामावून घेता येईल अशी जागा असणे जास्त चांगले. भरपूर केबिन्स आणि फ्रेश होण्यासाठी छोटी जागा असावी.

1) खेळीमेळीच्या वातावरणाला प्रोत्साहन देणारी ओपन प्लॅन ऑफिसेस

2) ब्रेनस्टॉर्मिंग आणि टीम मीटिंग्जसाठी ब्रेकआऊट स्पेसेस

3) रिलॅक्स होण्यासाठी रिक्रिएशनल स्पेसेस

लीगल प्रोफेशनल

वकिलांची किंवा कायदे सल्लागारांची ऑफिसेस पारंपरिक लूक असलेली आणि औपचारिक असतात. या लोकांना स्वतंत्र मीटिंग रूमची आवश्यकता भासते. तसेच फाईल्स ठेवण्यासाठी पुरेशी जागा आणि क्लाएंट्सना सहज पोहोचता येईल असे लोकेशन गरजेचे असते.

1) खासगी ऑफिसेस आणि क्लाएंट मीटिंग्जसाठी स्वतंत्र रूम्स

2) लायब्ररी आणि फाईल्ससाठी जागा

3) क्लाएंट्सना सहजपणे पोचता येतील असं लोकेशन

क्रिएटिव्ह प्रोफेशनल

कलाक्षेत्रातील व्यावसायिकांसाठी त्यांच्यातील सृजनशीलतेला वाव देणारी जागा असावी लागते. कलाकृती ठेवता येतील अशाप्रकारे मोकळी जागा असावी. स्वतंत्र डिस्कशन रूम्स असाव्यात. या जागेला लागूनच छोटीशी बाग किंवा बाल्कनी गार्डन असल्यास उत्तम.

1) सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ओपन स्पेस

2) अनौपचारिक मीटिंग्ज आणि ब्रेनस्टॉर्मिंगसाठी जागा

3) आर्टिफॅक्ट्स, प्रोटोटाईप्स, मॉक-अप्ससाठी स्वतंत्र जागा

रिटेल शॉप

रिटेल व्यवसाय शक्यतो शहराच्या मुख्य बाजारपेठेत किंवा वर्दळीच्या ठिकाणी असतात. व्यवसायाचे स्वरूप कोणतेही असले, तरी स्टोअरेज असणे गरजेचे आहे. कमीतकमी वेळेत ग्राहक येऊन खरेदी करून जाऊ शकेल असा ले -आऊट असावा.

1) वर्दळ असलेल्या परिसरातील प्राईम लोकेशन

2) आकर्षक स्टोअरफ्रंट, वर्दळ हाताळण्यासाठी योग्य

3) भरपूर स्टोअरेज, सामान ने-आण करण्याची सोय

बँका, वित्तीय संस्था

व्यवहार कितीही ऑनलाईन झाले, तरी प्रत्यक्ष बँकेमध्ये कधीतरी जावे लागतेच. बँकेची जागा, तेथील वातावरण सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे.

1) औपचारिक कार्यालयीन व्यवस्था

2) भरपूर केबिन्स, मीटिंगसाठी जागा

3) लॉकर, डॉक्युमेंट स्टोअरेजसाठी सुरक्षित जागा

रेस्टॉरंट्स, फूड सर्व्हिसेस

रेस्टॉरंट्स, क्लाऊड किचन्ससाठी स्वच्छता आणि सुरक्षा हे महत्त्वाचे निकष पाळणे गरजेचे आहे. लोकेशन आणि अॅम्बियन्स हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरतात. अन्नपदार्थांच्या स्टोअरेजची पुरेशी सोय असणे गरजेचे आहे.

1) इनडोअर, आऊटडोअर डायनिंग एरिया, वेटिंग एरिया आणि टेक-अवेची सोय

2) स्वच्छ, सुरक्षित किचन एरिया, अन्नपदार्थांसाठी पुरेसे स्टोअरेज

3) प्राईम लोकेशन, पार्किंगची सोय

शैक्षणिक संस्था

भरपूर प्रकाश, मोकळी जागा आणि हवा खेळती असलेले वर्ग, लायब्ररी, लॅब्ज, म्युझिक-आर्टसाठी वेगळ्या रूम्स असणे गरजेचे आहे. शिवाय स्टाफ रूम्स आणि विद्यार्थ्यांसाठी मैदान, कॉमन रूम्स या सुविधाही असाव्यात.

1) पुरेसा प्रकाश आणि खेळती हवा असलेल्या क्लास रूम्स

2) लायब्ररी, लॅब्स आणि आवश्यकतेनुसार अन्य रूम्स

3) कर्मचाऱ्यांसाठी प्रशासकीय कार्यालय, मैदान, कॉमन रूम

हेल्थकेअर प्रोफेशनल

पॉलिक्लिनिक्स किंवा स्पेशालिटी डॉक्टर्ससाठी कन्सल्टेशन रूम्स, पॅथलॅब, फार्मसी एकाच ठिकाणी असण्याची गरज असते. लहान हॉस्पिटलसाठी यासोबत रिसेप्शन, पेशंट रूम्स, जनरल वॉर्ड, नर्सस्टेशन, ऑपरेशन थिएटर, ऑफिस, किचन या गोष्टीही लागतात. मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश आणि स्वच्छता हे यासाठीचे महत्त्वाचे निकष आहेत.

1) हॉस्पिटलचे निकष पूर्ण करणारी, परवानगी असलेली जागा

2) पुरेसे पार्किंग, पेशंट्सना अनुकूल व्यवस्था

3) हॉस्पिटल मॅनेजमेंटसाठी स्वतंत्र जागा