फुलांची उलाढाल रोज 70 लाखांवर 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 August 2017

पुणे : गणेशोत्सव आणि गौरीनिमित्त लिलीयम... ग्लॅडिओला... ऑर्किड... आदी फुलांची उलाढाल दुप्पट झाली आहे. इतर सणांच्या तुलनेत या दहा दिवसांत फुलांचा चांगला व्यापार होतो. सध्या प्रति दिन 60 ते 70 लाख रुपयांची उलाढाल होत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत असल्याचे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुलबाजाराचे प्रमुख मंगेश पठारे यांनी सांगितले. 

पुणे : गणेशोत्सव आणि गौरीनिमित्त लिलीयम... ग्लॅडिओला... ऑर्किड... आदी फुलांची उलाढाल दुप्पट झाली आहे. इतर सणांच्या तुलनेत या दहा दिवसांत फुलांचा चांगला व्यापार होतो. सध्या प्रति दिन 60 ते 70 लाख रुपयांची उलाढाल होत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत असल्याचे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुलबाजाराचे प्रमुख मंगेश पठारे यांनी सांगितले. 

मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात गणेशोत्सव आणि गौरी आगमनामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. केवळ गणेश मंडळेच नव्हे तर घरगुती मूर्तींच्या सजावटीसाठी देखील फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे सजावटीसाठी फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. फुलांबरोबरच सजावटीसाठी 'फिलर्स' म्हणून वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या पानांची आवक चांगली होत आहे. बंगळूर, कोलकता येथील बाजारांतून या पानांची आवक होत आहे. 

लिली, गुलछडी, गुलाब या फुलांबरोबरच आता कार्नेशन, जरबेरा, ग्लॅडिएटर, लिलीयम, ग्लॅडिओला, ऑर्किड या फुलांचीही गणेश भक्तांना ओळख झाली आहे. दोन ते तीन दिवस ही फुले टिकत असल्याने त्याला पसंती मिळत आहे. सजावटीमध्ये डेसीना, आरेका पाम, सायकस, टेबल पाम, फिशपाम, सॉंग ऑफ इंडिया अशा विविध प्रकारच्या पानांचा 'फिलर्स' म्हणून वापर केल्याने सजावटीमधील सौंदर्य खुलण्यास मदत होत आहे. 

सजावटीच्या फुलांना 'भाव' 
पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या फुलांना अपेक्षेप्रमाणे मागणी असली, तरी सजावटीच्या फुलांना ही ठराविक कालावधीतच मागणी असते. लग्नसराई, दसरा, दिवाळी या कालावधीपेक्षा गणेशोत्सवात सजावटीची फुले 'भाव' खाऊन जातात. 

प्लॅस्टिक फुलांचे आव्हान 
सजावटीसाठी प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर वाढू लागल्याचा फूल व्यापारावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. पूजेसाठी लोक ताजी फुले घेतात, परंतु सजावटीसाठी प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर करतात. सजीव फुलांसारखी दिसणारी प्लॅस्टिकची फुले बाजारात मिळत असल्याने दररोजच्या फुलांच्या मागणीवर परिणाम होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. 

गणेशोत्सव काळात आणि गौरी आगमनाच्या दिवशी फुलांच्या मागणीत मोठी वाढ होते. त्यामुळे मंगळवारी (ता. 28) लिलीयम या फुलांना 350 ते 600 रुपये (प्रति जुडी), आर्किडला 150 ते 250 रुपये, तर ग्लॅडिओलास 50 ते 60 रुपये (प्रति किलो) असा भाव मिळाला. बहुतेक फुले ही गोवा, उटी, बंगळूर, कोलकता येथून येतात. स्थानिक भागातून कार्नेशन, ग्लॅडिएटर, जरबेरा या सजावटीच्या फुलांची आवक होते. 
- सागर भोसले, व्यापारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival 2017 Pune Ganesh Utsav