धडाडणाऱ्या तोफा आणि शहिदांना सलामी 

धडाडणाऱ्या तोफा आणि शहिदांना सलामी 

पुणे : चहूबाजूंनी धडाडणाऱ्या तोफा...हेलिकॉप्टर व सैनिकांच्या बंदूकांमधून झडणाऱ्या गोळ्या...शत्रूंना संपविण्यासाठी भारतीय जवानांची चाललेली धडपड...'भारत माता की जय'चा जयघोष आणि शहीद जवानाच्या पार्थिवाला सलामी देताना कुटुंबीयांचे भरून आलेले ऊर...भारत-पाकिस्तान युद्ध, भारत-चीन युद्ध आणि चीनच्या वस्तूंवरील बंदी या जिवंत देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. यंदा सामाजिक व संवेदनशील विषयांवरील देखावे आणि विधायक उपक्रमांना मंडळांनी प्राधान्य दिले आहे. 

यंदाच्या गणेशोत्सवामध्ये लष्कर परिसरातील मंडळांनी देशभक्तिपर व जिवंत देखावे सादर करण्यावर भर दिला आहे. भारत-पाकिस्तान, भारत-चीन संबंध, युद्धाचे प्रसंग मंडळांनी साकारले आहेत. याबरोबरच सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या महिलांच्या सुरक्षिततेवरही मंडळानी प्रकाश टाकला आहे. 'सेल्फी'च्या मोहजालात अडकवून जीव गमावणाऱ्या तरुणाईला जागृत करण्यासाठीही मंडळांनी देखावे सादर केले आहेत. 

लष्कर परिसरातील मानाचा गणपती अशी ओळख असलेल्या कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा 'चिनी वस्तूंवर बंदी' आणण्याच्या दृष्टीने 'मेक इन इंडिया' हा देखावा सादर केला आहे. डोकलाम प्रश्‍नाबरोबरच चीनकडून भारताला असणारा धोका लक्षात घेऊन चिनी वस्तूंचा वापर टाळावा, यादृष्टीने मंडळाने देखाव्यावर भर दिला आहे. 

धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक, विधायक उपक्रम वर्षभर राबविण्यास प्राधान्य देणाऱ्या हिंद तरुण मंडळानेही यंदा 1962 चे भारत-चीन युद्धावर आधारित 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' हा देखावा सादर केला आहे. बॉंबस्फोट, चहूबाजूंनी येणारे बंदुकीचे आवाज, जवानांकडून दिला जाणारा लढा, राजकीय चर्चा, शहीद जवानाचे पार्थिव कुटुंबांकडे देतानाची परिस्थिती, या स्वरूपाचा देखावा मंडळाने सादर केला आहे. 

बुट्टी स्ट्रीटवरील पापा वस्ताद गवळी तालीम संघाने यंदा 'रणरागिणी जागी हो, आजच्या युगाची झांशी हो' हा जिवंत देखावा सादर केला आहे. महिलांवरील वाढते अन्याय-अत्याचार, वाढती गुंडगिरी, हिंसाचार, स्त्री भ्रूणहत्या या संवेदनशील विषयाला मंडळाने वाचा फोडली आहे. पुण्यासारख्या शहरातही महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ होत असल्याचे मंडळाने देखाव्याद्वारे दाखविले आहे. याबरोबरच मंडळाने स्त्रियांना आरतीचा मान देण्यापासून महिलांसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

उत्सव संवर्धक संघाने 'पोलिसांवरील ताण' आणि 'चिनी मालावर बहिष्कार' या विषयावरील जिवंत देखावा साकारला आहे. शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस कर्मचारी ते अधिकारी करत असलेले कार्य, त्यांच्यावर येणारा ताण देखाव्यातून दाखविला आहे. याबरोबरच भारत-चीनचे ताणलेले संबंधावरही मंडळाने प्रकाश टाकला आहे. 

दस्तूर मेहेर रोड मंडळाने आकर्षक पद्धतीचा 'गणेश महल' सादर केला आहे. राणी लक्ष्मीबाई उद्यानाजवळील शिवमुद्रा प्रतिष्ठानने 'सेल्फीचे दुष्परिणाम' हा जिवंत देखावा यंदा सादर केला आहे. श्रीमंत साईनाथ गणेशोत्सव मंडळाने 'एक गोष्ट - सात तिढा' हा सामाजिक विषयावरील देखावा सादर केला आहे. 
श्री राजेश्‍वर तरुण मंडळ, शिवतेज मित्र मंडळ, नंदनवन तरुण मंडळ, कॉन्वेनंट स्ट्रीट मित्र मंडळ, ओशो मित्र मंडळ, वीर तरुण मंडळ, नवयुग तरुण मंडळ या मंडळांनी साधेपणावर भर दिला आहे. 

आवर्जून पाहावे असे 

  • श्रीकृष्ण तरुण मंडळ - सर्जिकल स्ट्राइक 
  • कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - मेक इन इंडिया 
  • हिंद तरुण मंडळ - अब तुम्हारे हवाले वतन साथियों 
  • उत्सव संवर्धक संघ - पोलिसांवरील ताण, चिनी मालावर बहिष्कार 
  • पापा वस्ताद गवळी तालीम संघ - रणरागिणी जागी हो, आजच्या युगाची झांशी हो 
  • सोलापूर बाजार मित्र मंडळ- उंदीरमामाकडून बाप्पांची आरती 
  • श्रीमंत साईनाथ गणेशोत्सव मंडळ - एक गोष्ट - सात तिढा 

दहा दिवस अन्नदान करण्याचा निर्णय 
महात्मा गांधी रस्त्यावरील सैफी अली लाइन येथील श्री शिवराय तरुण मंडळातर्फे दरवर्षी उत्सव साधेपणाने करण्यावर भर दिला जातो. देखाव्यासाठी खर्च होणारे दोन-तीन लाख रुपये विधायक कामासाठी खर्च केले जातात. मंडळाने यावर्षी उत्सवाचे दहा दिवस अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दररोज हजारो गरिबांना मंडळाकडून अन्नदान केले जात आहे. मागील 22 वर्षांपासून मंडळाकडून उत्सव साधेपणाने साजरा करून विधायक कामांना पैसे खर्च केले जात आहेत. दरवर्षी रस्त्यावरील महिला व नागरिकांना साड्या, ब्लॅंकेट व अपंगांना 'व्हीलचेअर' भेट देऊन गणेशोत्सव साजरा केला जातो. मागील अनेक वर्षांपासून मुस्लिम धर्माचे आसिफ शेख हे मंडळाचे अध्यक्ष असून, त्यांनी उत्सवाला सामजिक कार्याची जोड दिली आहे. लोकवर्गणी न घेता मंडळाच्या कार्यकर्त्यांकडील पैसे घेऊन उत्सव साजरा केला जातो. ध्वनी व जलप्रदूषणामध्ये भर नको, म्हणून मंडळाकडून विसर्जन मिरवणूकही काढली जात नसल्याचे शेख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com