उकडीच्या मोदकांची कोटीच्या कोटी उड्डाणे

उकडीच्या मोदकांची कोटीच्या कोटी उड्डाणे

पुणे - ‘बाप्पा’चे आवडते खाद्य असलेल्या मोदकाची लज्जत काही औरच म्हणावी लागेल. म्हणूनच गणेशोत्सवात उकडीच्या मोदकांची मागणी वाढल्याचे दिसते. घरोघरी मोदक बनविण्यात येत असले तरी, तयार मोदकांची मागणी वाढत आहे. शहरात केटरिंग व्यावसायिकांबरोबरच साडेतीन हजार महिला हातवळणीचे उकडीचे मोदक बनविण्याचा व्यवसाय करत असून, यात दरवर्षी जवळपास ७५ लाख रुपयांची उलाढाल होते.

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीला शहरात जवळपास सव्वा लाख उकडीचे मोदक विकले जातात, तर उत्सवादरम्यान दहा दिवसांत सुमारे तीन ते साडेतीन लाख मोदकांची विक्री होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी हातवळणीच्या उकडीच्या मोदकांना अधिक मागणी असते. यादिवशी मोदकांच्या मागणीएवढा पुरवठा होत नसल्याचे वास्तव विक्रेते मान्य करतात.

‘पूना गेस्ट हाउस’चे किशोर सरपोतदार म्हणाले, ‘‘या वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी पुण्यात अंदाजे सव्वा लाख हातवळणीचे मोदक विकले गेले. पुणे आणि परिसरात साडेतीन हजार महिला मोदक बनविण्याचा व्यवसाय करत आहेत; परंतु पाकळ्यापाकळ्यांनी कळीदार मोदक करणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. एका मोदकाला नऊ, बारा, वीस किंवा एकवीस पाकळ्या करणाऱ्या मोजक्‍याच महिला आहेत. या व्यवसायात महिलांबरोबरच पुरुष व्यावसायिकदेखील आहेत.’’

नारायण पेठेतील सुमती कर्वे या १९९० पासून हातवळणीचे मोदक बनवून विकत आहेत. त्या म्हणाल्या,‘‘उकडीच्या मोदकांची मागणी वर्षानुवर्षे वाढत आहे. एका मोदकाची किंमत साधारणत: २२ रुपये असते. या मोदकांना मागणी चांगली आहे; परंतु आम्ही शक्‍य होतील, तितकेच मोदक बनवितो.’’

बालाजीनगर येथील वंदना घाटपांडे म्हणाल्या, ‘‘उकडीच्या मोदकांची ऑर्डर घेणाऱ्या परिवारात मी काही वर्षांपूर्वी मदतीसाठी जात होते. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून स्वत:च मोदकांची ऑर्डर घेत आहे. यावर्षी पहिल्याच दिवशी १२०० ते १३०० मोदकांची मागणी पूर्ण केली.’’

घरोघरी विराजमान झालेल्या ‘बाप्पा’सह सोसायट्यांमध्येही ‘बाप्पा’ला नैवेद्य दाखविण्यासाठी मोदकांना मागणी आहे. नावाजलेल्या गणपती मंडळांच्या आजूबाजूला उकडीच्या मोदकांची बाजारपेठ अधिक करून फुलल्याचे दिसते. या परिसरात अनेक मिठाईवाल्यांच्या दुकानांमध्ये ‘येथे उकडीचे मोदक मिळतील’ ही पाटी हमखास दिसते. अलीकडे साचातील उकडीचे मोदक बनविले जातात, मात्र त्याला तुलनेने कमी मागणी असल्याचे पाहायला मिळते. गणेशोत्सवादरम्यान पंचतारांकित हॉटेल्समध्येही उकडीचे मोदक ‘डेझर्ट’ म्हणून दिले जातात.

दहा हजार मोदक परदेशात 
महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्य आणि परदेशातही अनेक ठिकाणी ‘बाप्पा’ला नैवेद्य दाखविण्यासाठी उकडीच्या मोदकांना प्राधान्य दिले जाते. काही व्यावसायिक उकडीचे मोदक व्यवस्थित ‘पॅक’ करून परदेशात पाठवत आहेत. दुबई, अमेरिका, मॉरिशस, इंग्लंड या देशांमध्ये प्रामुख्याने उकडीचे मोदक ‘फ्रोझन’ पद्धतीने पाठविले जात आहेत. गणेशोत्सवात जवळपास दहा हजार मोदक परदेशात पाठविण्यात येतात.

हातवळणीच्या मोदकांचे वैशिष्ट्य
एका मोदकाची किंमत - २० ते ३० रुपये
एका मोदकाचे वजन  - ४० ते ८० ग्रॅम
मोदकांसाठी वापरण्यात येणारे तांदूळ : आंबे मोहोर, बासमती कणी, इंद्रायणी इतर

उकडीचे मोदक व्यवसायात महिला अग्रेसर
दहा दिवसांत महिलांना मिळतोय १० ते ५० हजार रुपयांचा नफा
एक महिलेला एका तासात ६० ते ७० मोदक बनविण्याचे कौशल्य
मोदक बनविण्याची कार्यशाळा मार्गदर्शक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com