Maratha Kranti Morcha : सकल मराठा समाजाच्या वतीने भिगवणमध्ये विक्रमी मोर्चा

प्रा. प्रशांत चवरे
Thursday, 9 August 2018

गुरुवारी (ता. 9) सकाळी नऊ वाजता भव्य मोर्चा काढण्यात आला व त्यानंतर पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करुन शासनास निवेदन देण्यात आले. सुमारे दोनशे तरुणांनी मुंडन करत शासनाच्या भुमिकेचा निषेध केला.

भिगवण : येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला भिगवण व परिसरातील तक्रारवाडी, मदनवाडी, डिकसळ, भादलवाडी (ता. इंदापुर) स्वामी चिंचोली, खानोटा (ता. दौंड) गावांमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के व्यवसाय बंद होते. गुरुवारी (ता. 9) सकाळी नऊ वाजता भव्य मोर्चा काढण्यात आला व त्यानंतर पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करुन शासनास निवेदन देण्यात आले. सुमारे दोनशे तरुणांनी मुंडन करत शासनाच्या भुमिकेचा निषेध केला. मोर्चामध्ये मराठा समाजासह इतरही समाजाचे प्रतिनिधी व सर्वच राजकिय पक्षाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांती दिनी घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला भिगवण येथे शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. यानिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (ता. 9) सकाळी 9 वाजता येथील शिवरत्न मंगल कार्यालयापासुन महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पुजन करुन मोर्चास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर भिगवण पोलिस ठाणे, आंबेडकर, चौक, तक्रारवाडी, मदनवाडी मार्गे मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी, डिकसळ, भादलवाडी (ता. इंदापुर) स्वामी चिंचोली, खानोटा (ता. दौंड) आदी भागातील मराठा तसेच इतर समाजाचे व सर्व पक्षाचे प्रतिनिधीही उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. मोर्चामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. 

मोर्चा दरम्यान शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मोर्चानंतर येथील पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या वतीने श्रावणी वाघ, शितल जामले, तृप्ती जाधव, स्नेहल पवार यांनी मराठा समाजास सोळा टक्के आरक्षण देण्यात यावे, कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात आदींसह समाजाच्या मागण्या मांडल्या. मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन शासनाचे प्रतिनिधी भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळंकठ राठोड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शासनाच्या निषेधार्थ मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सूमारे दोनशे मराठा युवकांनी मुंडन करत शासनाचा निषेध केला.

सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला भिगवण, तक्रारवाडी मदनवाडी परिसरामध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के व्यावसाय बंद होते. मराठा आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकही मंदावली होती. बंद व रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभुमी भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी चोख बंदोबस्त ठेवला. होता. बंद व मोर्चा शांततेत पार पडला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Bandh Good Response to Maratha Kranti Morcha at Bhigwan Pune