Maratha Kranti Morcha : पुरंदरला मराठा मोर्चाच्या पाठींब्यासाठी सासवडला शंभर टक्के बंद

श्रीकृष्ण नेवसे
Thursday, 9 August 2018

विशेष म्हणजे पुरंदर तालुक्यातील छोट्या खेडेगावांतही हा बंद उत्स्फूर्तपणे पाळला गेला. सासवडला तहसिलदार सचिन गिरी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारले. तरीही सायंकाळपर्यंत ठिय्या आंदोलन सुरु होते.  

सासवड (जि.पुणे) - पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण असणाऱया सासवड (ता. पुरंदर) येथे सकल मराठा समाजाने आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी आज नगरपालिका चौकात (शिवतीर्थ) ठिय्या आंदोलन केले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच मराठा समाजाच्या मागणीला पाठींबा म्हणून शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी पाठींबा दिला होता. विशेष म्हणजे पुरंदर तालुक्यातील छोट्या खेडेगावांतही हा बंद उत्स्फूर्तपणे पाळला गेला. सासवडला तहसिलदार सचिन गिरी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारले. तरीही सायंकाळपर्यंत ठिय्या आंदोलन सुरु होते.  

सासवड शहरात ता. 27 ला मोर्चा काढून शहर बंद ठेवले होते. त्याच पध्दतीने आजही ठिय्या आंदोलनास प्रतिसाद मिळाला. सासवड शहराबरोबरच तालुक्यातील अनेक गावचे प्रतिनीधी यात सामील होण्यास आले होते. विविध पक्षीय मराठा बांधव पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यात आघाडीवर होते. मात्र ठिय्या आंदोलनात अग्रभागी युवती व महिलाच होत्या. आजच्या ठिय्या आंदोलनात युवतींनी मनोगते मांडली. त्यात आतापर्यंत 58 मोर्चे शांततेच्या मार्गाने काढूनही सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबवू नका. बळी जाऊ नका.. लढ्याला बळ द्या, असे आवाहन वक्त्यांनी केले. दोन वर्षे झाली तरी राज्य व केंद्र सरकार मराठा मोर्चाच्या भावना दुर्लक्षित करते आहे. त्यातून आज समाज टोकाची भूमिका घेत आहे. त्यास सरकारचा वेळकाढूपणाच कारणीभूत आहे., असेही अनेक वक्त्यांनी मांडले.

purandar

सासवड शहरात पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. त्याशिवाय गृहरक्षक दल, पोलिस मित्र संघटना, विद्यार्थी संघटना यांनीही बंदोबस्ताच्या कामी मदत केली. सासवड शहरात साधी चहाची टपरीसुध्दा उघडी नव्हती, इतका प्रतिसाद बंदला मिळाला. दुकाने, उद्योग, व्यावसाय, शाळा, काॅलेज, अनेक संस्था, बसप्रवास बंद होता. येथील राष्ट्रीय महामार्गावर तर तुरळकच वाहतुक होती. पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागातही सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठीच्या `बंद`ला चांगला प्रतिसाद होता. अनेक व्यवहार ठप्प होते. सासवडला तहसिलदार सचिन गिरी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारले. पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील व इतर यावेळी उपस्थित होते. 

purandar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Bandh Good response at purandar sasvad pune