#MarathaKrantiMorcha पुन्हा मराठा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 July 2018

पुणे - मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतलेच पाहिजेत, शेतकऱ्यांना हमीभाव दिला पाहिजे यांसह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी मोर्चा काढण्यात आला. या वेळी आंदोलनकर्त्यांनी ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चले जाव’ अशा घोषणा देत, मागण्या मान्य न झाल्यास ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी आंदोलन करण्याचा इशारा दिला.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता डेक्कन जिमखान्यावरील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि जिजाऊ वंदना गाऊन मोर्चाला सुरवात झाली. मोर्चात तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गळ्यात भगवा मफलर, हातात भगवे झेंडे आणि मागण्यांचे फलक घेऊन निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व महिलांनी केले. शिस्तीत निघालेला हा मोर्चा जंगली महाराज रस्त्याने एसएसपीएमएस महाविद्यालयाजवळ आला. ‘कोण म्हणते देणार न्याय, घेतल्याशिवाय राहणार नाही,’ ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘मागे घ्या मागे घ्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या’, ‘जय जिजाऊ, जय शिवराय,’ अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर जंगली महाराज रस्त्यावरील सर्व वाहतूक आणि दुकाने पोलिसांकडून बंद करण्यात आली होती. मोर्चादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

मोर्चा एसएसपीएमएस महाविद्यालय येथे पोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी पूजा झोळे आणि अर्चना भोर यांनी मागण्यांचे निवदेन वाचून दाखविले. आंदोलनदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या काकासाहेब शिंदे यांच्यासह तिघांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांनतर राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha again in pune