#MarathaKrantiMorcha गावकऱ्यांनीच विझवले गाव 

गणेश बोरुडे
Wednesday, 1 August 2018

तळेगाव स्टेशन - चाकणमधील आवाक्‍याबाहेर गेलेली जाळपोळ स्थानिकांकडून नव्हे, तर बाहेरगावहून आलेल्या आंदोलकांकडून होत असल्याचे समजल्यानंतर पोलिस आणि स्थानिकांनी एकत्र येत त्यावर नियंत्रण मिळविले. गावाविषयीची स्थानिकांची आत्मीयता आणि पोलिसांची कर्तव्याची जाण यातील समन्वयातून पेटलेले चाकण शमले. 

तळेगाव स्टेशन - चाकणमधील आवाक्‍याबाहेर गेलेली जाळपोळ स्थानिकांकडून नव्हे, तर बाहेरगावहून आलेल्या आंदोलकांकडून होत असल्याचे समजल्यानंतर पोलिस आणि स्थानिकांनी एकत्र येत त्यावर नियंत्रण मिळविले. गावाविषयीची स्थानिकांची आत्मीयता आणि पोलिसांची कर्तव्याची जाण यातील समन्वयातून पेटलेले चाकण शमले. 

मराठा आरक्षणासाठी सोमवारी (ता. 30) खेडसह चाकण बंद पुकारण्यात आला. प्रक्षुब्ध जमावाने अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. काही मंडळींनी चिथवण्याचे काम केले आणि तळेगाव चौकात जमलेल्या हजारोंच्या जमावाने अचानक दगडफेक सुरू केली. काही वेळानंतर पोलिसांवर आणि गाड्यांवरही दगडफेक झाली. जमावापुढे निभाव लागू न शकल्याने पोलिसांनीदेखील काढता पाय घेतला. कोणालाही मोबाईल अथवा कॅमेरा बाहेर काढू दिला जात नव्हता. तळेगाव चौकातील वाहतूक पोलिस चौकी उद्‌ध्वस्त करून बसस्थानकात बस आणि एक जीप जाळली. त्यानंतर जमावाने मोर्चा माणिक चौकमार्गे चाकण पोलिस ठाण्याकडे वळविला. येथील वाहने पेटविली. हे आंदोलनकर्ते बाहेरील असल्याचे लक्षात आल्यानंतर येथील स्थानिकांनी याबाबत पोलिसांना सांगितले. त्यामुळे त्यांना रोखायला हवे असे स्थानिकांना वाटले. 

जादा कुमक म्हणून मागविलेल्या तळेगाव दाभाडे ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गिरिगोसावी तेथे दाखल झाले होते. ते या वेळी साध्या वेशात होते. गिरिगोसावी यांनी पूर्वी चाकणला निरीक्षक म्हणून काम केले होते. परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी जुनी ओळख महत्त्वाची हे लक्षात घेऊन त्यांनी तत्परतेने चक्रे फिरवत काही स्थानिक मंडळींना त्या ठिकाणी बोलावून घेतले आणि त्यानंतर बाहेरील आंदोलकांना हुसकविण्यास सुरवात केली. तसेच, स्थानिकांसह गावातून फेरी काढत शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर आंदोलक तोडफोड करणारे पसार झाले आणि जाळपोळ बऱ्यापैकी शमली. साडेचारच्या सुमारास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विश्‍वास नांगरे पाटील चाकणमध्ये दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना एकत्र बोलावत भावनिक आवाहन केले. ""मी शिवाजी महाराजांचा भक्त आहे. तुमच्यामध्ये शिवाजी महाराजांचे रक्त आहे. आपल्या तोंडाशी आलेला घास आपल्याला जाऊ द्यायचा नाही. मला तुमचा भाऊ समजा. आपल्याला शांततेने घ्यायचे आहे,'' असे आवाहन त्यांनी करताच जमाव बऱ्यापैकी शांत झाला. सायंकाळी जमावबंदी लागू केल्यानंतर धुमसते चाकण शांत झाले. नांगरे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना केलेले भावनिक आवाहन, गिरिगोसावी यांनी प्रसंगावधान राखत योग्य वेळी वापरलेली गावकऱ्यांची जुनी ओळख, तसेच दोघा अधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चाकणच्या जाणकार मंडळींनी शमविलेले प्रक्षुब्ध आंदोलन यामुळेच "गाव करील ते राव काय करील' याची प्रचिती आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha in chakan