
स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन बसस्थानकातून जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक सायंकाळपर्यंत पूर्णपणे बंद ठेवली होती. परिणामी एसटी महामंडळाचे काही कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
पुणे : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला सोमवारी चाकण, कात्रज, हडपसरसह अनेक परिसरात हिंसक वळण लागले. त्यामध्ये आंदोलनकर्त्यांनी एसटीगाड्यांसह अन्य गाड्यांची जाळपोळ, तोडफोड केली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाच्या शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन बसस्थानकातून जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक सायंकाळपर्यंत पूर्णपणे बंद ठेवली होती. परिणामी एसटी महामंडळाचे काही कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
खबरदारीचा उपाय म्हणून तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक बंद ठेवली. मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नगर, सांगली, दादरमार्गे जाणाऱ्या बस बंद ठेवल्या. तसेच बाहेरील डेपोतून आलेल्या गाड्या पुढे सोडल्या नाही. परिणामी, स्थानकात बस आणि बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. तसेच स्थानकाबाहेर एसटी गाड्यांची रांग लागल्याने या परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचेही चित्र दिसून आले.
दुपारी दोनच्या दरम्यान शिवाजीनगर बस स्थानकात आलो. तेव्हापासून मला गाडी मिळाली नाही. चौकशी केली तर मराठा आंदोलकांनी एसटी गाड्यांची तोडफोड केल्याचे समजले. परंतु पुन्हा वाहतूक सुरू कधी होणार याविषयी काहीच माहिती दिली जात नाही.
- डी. बी. बोऱ्हाडे, प्रवासी
"राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून काही वेळेसाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. चाकण, कात्रज, हडपसर आणि पिंपरी-चिंचवड येथे एसटी बसवर दगडफेकीच्या घटना घडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.''
- यामिनी जोशी, पुणे विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ