Maratha Kranti Morcha: गोविंदबागेसमोर ठिय्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 August 2018

बारामती शहर/माळेगाव - बारामती शहर व तालुक्‍यात मराठा समाजाचे भव्य मोर्चे, ठिय्या आंदोलने व ‘रस्ता रोको’ होत असताना गुरुवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानावर मराठा आंदोलनाच्या क्रांतीचे वादळ थडकले. बहुसंख्य मराठ्यांनी येथे ठिय्या आंदोलन करीत नीरा-बारामती रस्ता रोखून धरला. 

बारामती शहर/माळेगाव - बारामती शहर व तालुक्‍यात मराठा समाजाचे भव्य मोर्चे, ठिय्या आंदोलने व ‘रस्ता रोको’ होत असताना गुरुवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानावर मराठा आंदोलनाच्या क्रांतीचे वादळ थडकले. बहुसंख्य मराठ्यांनी येथे ठिय्या आंदोलन करीत नीरा-बारामती रस्ता रोखून धरला. 

गोविंदबागेसमोर ठिय्या आंदोलन करून ‘रस्ता रोको’ होणार असल्याचा निरोप या अगोदर आयोजकांकडून सगळीकडे दिला गेल्याने युवक, युवती, महिलांसह मोठ्या संख्येने मराठा समाजबांधवांनी गर्दी केली होती. जिकडे पाहावे तिकडे भगवे झेंडे आणि गर्दीमुळे येथील परिसर मराठामय बनून गेला होता. युवक-युवतींपासून ज्येष्ठांपर्यंत साऱ्यांचाच ओसंडून वाहणारा उत्साह या आंदोलनात सगळ्यांनी अनुभवला. बारामतीत आजवर सामाजिक, राजकीय विषयांवर अनेक आंदोलने झाली. परंतु आंदोलनासाठी (एक वेळचे ऊस आंदोलन वगळता) शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी येण्याची अनेकांची पहिलीच वेळ होती. 

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नीरा रस्ता, फलटण रस्ता, भिगवण रस्ता, इंदापूर रस्ता, पाटस रस्ता अशा चोहोबाजूंनी एक मराठा-लाख मराठा हे घोषवाक्‍य डिझाइन केलेली वाहने बारामती शहरात प्रवेश करू पाहत होती. परंतु जागोजागी रस्ते अडविल्याने अनेकांना गोविंदबागेपर्यंत पोचता आले नसल्याचे सांगण्यात आले. पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने व आंदोलनकर्त्यांनीही स्वयंशिस्त दाखवीत सकाळी नऊ वाजता सुरू केलेले आंदोलन तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर मागे घेतले.

न्यायासाठी घोषणांचा पाऊस...! 
पूर्वी मराठ्यांनी मूक मोर्चे काढले, परंतु आजच्या आंदोलनात न्यायासाठी अक्षरशः गगनभेदी घोषणांचा पाऊस पडल्याचे दिसून आले. या घोषणांमधून अनेक वर्षे आर्थिक दुर्बलतेने पिचलेल्या मराठा समाजातील अस्वस्थता दर्शविणारे वातावरण तयार झाले होते. नव्या पिढीसाठी, लेकराबाळांच्या भल्यासाठी गोविंदबागेसमोरील आंदोलनात महिलांसह मराठा समाज बांधवांनी लक्षणीय उपस्थिती दाखविली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Martha Kranti Morcha maratha reservation agitation #MaharashtraBandh